ठाणे – राज्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे जंगलातील वन्य प्राण्यांनाही मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटत चालल्यामुळे वन्य प्राणी तहान भागवण्यासाठी मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत. यावर काहीतरी उपाय करावा या उद्देशाने वनविभागाच्या माध्यमातून स्वराज्य सामाजिक संस्था यांच्यावतीने येऊरच्या जंगलातील पाणवठे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
येऊर जंगलातील हा नैसर्गिक पाणवठा अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून गाळ, माती, पालापाचोळा, दगड यामुळे तो झाकला गेला होता आणि त्यामुळे पाण्याचा प्रवाह खंडित झाला होता. परिणामी, या भागातील बिबट्या, सांबर, हरीण, वानर, ससे, भेकर यांसारख्या वन्यप्राण्यांना तहान भागविण्यासाठी मानवी वस्तीकडे वळावे लागत होते. जे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकते. ही गंभीर गरज लक्षात घेऊन स्वराज्य सामाजिक संस्था यांच्यावतीने दोन ठिकाणचे पाणवठे खुले करण्यात आले. या कामात माती, गाळ, दगड, पाचोळा हटवून पाणवठा मोकळा करण्यात आला
या उपक्रमात स्वराज्य सामाजिक संस्थेचे शाहू कदम, आदित्य देवकर, विजय सावंत, तेजेंद्र पोटे, दिनेश शेट्ये, भरत दिवा, संस्थापक अध्यक्ष संजय देवकर तसेच एकलव्य क्रीडा मंडळाचे किशोर म्हात्रे, निखिल जाधव, सुमित नलगे, तुकाराम दयात, राम जनाटे व ३ शालेय विध्यार्थी यांनी श्रमदान केले. या उपक्रमासाठी वन परिक्षेत्र अधिकारी सुरवसे यांचे सहकार्य लाभले.
