ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर जंगलाच्या बाहेरील भागात एका माकडाला बाण मारुन त्याला जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्टीलचे बाण असल्याने ते धनुर्विद्या शिकणाऱ्या तिरंदाजाने चालविला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या संरक्षित वनक्षेत्रात किंवा त्याच्या आसपास कार्यरत असलेल्या बेकायदेशीर प्रकारांविषयी पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

प्राणी प्रेमींसाठी कार्यरत असलेल्या ‘राॅ’ या संस्थेला येऊर जंगलालगतच्या एका परिसरात बाण लागलेले जखमी माकड आढळून आले. त्यांनी तात्काळ या जखमी माकडाला पकडून त्याचे प्राण वाचविले. तसेच त्याच्या शरीरात आरपार शिरलेला बाण काढण्यात आला. हा बाण स्टीलचा असून धनुर्विद्या शिकणाऱ्याने तो चालविल्याचा संशय पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे. परंतु या घटनेनंतर येऊर आणि त्या परिसराच्या आसपास सुरु असलेल्या बेकायदा आस्थापनांचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. येऊरमध्ये अनेक बेकायदेशीरपणे चालणाऱ्या स्टड फार्म आणि टर्फ कथितरित्या घोडेस्वारी, तिरंदाजी यांसारख्या साहसी खेळांचे प्रशिक्षण देतात तसेच येथे स्पर्धा आयोजित करण्यात येते. माकडाच्या प्रकृतीविषयी ‘राॅ’ या संस्थेचे पवन शर्मा यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, माकडाची प्रकृती अद्याप स्थिर नाही. त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

येऊर परिक्षेत्रातील गतविधींवर कारवाई संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे कार्यकारी सदस्य रोहित जोशी यांनी माकड जखमी झाल्याने या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. हे एक अमानुष कृत्य आहे आणि आमच्या संरक्षित जंगलांतील वन्यजीवांवर थेट हल्ला आहे. ज्याने कोणी हे कृत्य केले असेल त्याला शोधून दंडित करणारच, इतकेच नाही तर समितीतील सर्व भागधारक, वन विभाग, ठाणे महापालिका, ठाणे पोलीस , स्थानिकांच्या सहकार्याने येथील सर्व बेकायदेशीर आस्थापनाना आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. या प्रकरणी एक तातडीची बैठक बोलावण्यात आली असून ठाणे महापालिका, पोलीस विभाग, स्थानिक आदिवासी समुदाय आणि प्राणी बचाव व कल्याण स्वयंसेवी संस्थांचे सदस्य उपस्थित असतील. या बैठकीत येऊर संवेदनशील क्षेत्रामधील सर्व बेकायदेशीरपणे कार्यरत आस्थापनांना त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी एक सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यावर चर्चा केली जाईल असे जोशी म्हणाले.

याव्यतिरिक्त, तपासामध्ये संवेदनशील क्षेत्राच्या सीमेवर असलेल्या खासगी बंगले आणि मालमत्तांची देखील चौकशी केली जाईल. असा संशय आहे की, माकडाला त्यांच्या फार्म किंवा बंगल्यात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी मारण्यात आले असावे. या आस्थापनांवर देखील समितीची नजर असेल, जेणेकरून ते अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी नाहीत किंवा त्यांना प्रोत्साहन देत नाहीत याची खात्री करता येईल. येऊरच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांचे, तसेच येथील वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी निसर्गप्रेमी ठाणेकरांच्या सहभाग अत्यंत आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले.