लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका भागात दुचाकीला कंटेनरची धडक बसल्याने कंटेनरचे चाक शरिरावरून गेल्याने तरुण-तरुणीचा मृत्यू झाला आहे. अमान सय्यद (१९) आणि अर्चना पगारे (२०) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही ठाण्यात कामाला असून ते घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कंटेनर चालक जितेंद्रकुमार यादव (२८) याला अटक केली आहे.

ठाण्यातील घोडबंदर भागातील एका कंपनीमध्ये अमान आणि अर्चना काम करतात. अमान हा मुंब्रा येथे त्याच्या कुटुंबासोबत तर अर्चना ही डोंबिवली भागात राहात होती. अमान त्याच्या दुचाकीने कामावर जात असतो. शुक्रवारी रात्री अमान हा त्याच्या दुचाकीने घरी परतत होती. त्यावेळी अर्चनाही त्याच्यासोबत दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाली. ते दुचाकीने खारेगाव टोलनाका येथे आले असता, भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे अमान आणि अर्चना या दोघांच्याही शरिरावरून कंटेनरची चाके गेली.

आणखी वाचा-कल्याणमधील सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरीच्या आमिषाने ४० लाखाची फसवणूक

घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कळवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघाता प्रकरणी कंटेनर चालक जितेंद्रकुमार यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.