डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल जवळील कल्याण डोंबिवली पालिकेच्या सावळाराम महाराज क्रीडासंकुलात शुक्रवारी संध्याकाळी एका मोटार कार चालकाने एका १४ वर्षाच्या क्रिकेटपटूला कारची जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
प्रशांतचा आज वाढदिवस होता. याचदिवशी त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांसह त्याच्या मित्रांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रशांत दिलीप मिश्रा (१४) असे मयत युवा क्रिकेटपटुचे नाव आहे. जयेश रवींद्र नेरलेकर (२५, रा. सद्गुरू कृपा सोसायटी, आजदेगाव, डोंबिवली पूर्व) असे वॅगनॉर मोटार कार चालकाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी सांगितले, दिलीप मिश्रा (३९) हे व्यावयासिक आहेत. ते आजदेगावातील साईमाऊली सोसायटीत राहतात. दिलीप यांचा मुलगा प्रशांत नेहमीप्रमाणे पालिकेच्या सावळाराम महाराज क्रीडासंकुलात किक्रेट खेळण्यासाठी गेला होता. मैदानात संध्याकाळी पाचच्या दरम्यान क्रिकेट खेळत असताना क्रींडागणात आरोपी जयेश नेरलेकर भरधाव वेगाने मोटार चालवित होता. बेशिस्तपणे, हयगयीने मोटार चालवित असताना जयेशचा कारवरील ताबा सुटून मैदानात क्रिकेट खेळत असलेल्या प्रशांत मिश्राला त्यांनी जोराची धडक दिली. कारच्या धडकेत प्रशांत जमिनीवर कोसळला. त्याला मित्रांनी तात्काळ रूग्णालयात नेले. तेथे डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
प्रशांतचे वडिल दिलीप मिश्रा यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी मोटार वाहन कायद्याने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस उपनिरीक्षक के. के. गांगुर्डे प्रकरणाचा तपास करत आहेत.

क्रीडांगणात मोटार चालविण्यास बंदी असताना पालिकेच्या सुरक्षा रक्षकाने त्यांना का रोखले नाही, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. दिवसभरात अनेक नवशिके मोटार कार चालक सावळाराम महाराज क्रीडासंकुलात मोटार शिकण्यासाठी येतात. त्यांच्यावर पालिका सुरक्षा रक्षकांकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये सुरू आहे. आता पालिका सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील वाहन प्रवेशावर काही नियमावली करते का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सावळाराम क्रीडांगणात वाहन चालकांना प्रवेश देऊ नका, अशी अनेक वर्षांची क्रीडाप्रेमींची पालिकेकडे मागणी आहे त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे क्रीडाप्रेमींनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young cricketer killed car crash dombivali incident at savlaram maharaj sports complex thane amy
First published on: 20-05-2022 at 22:00 IST