लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील सागाव येथील यशवंत कॉम्पलेक्स भागात गुरुवारी रात्री साडे वाजता सोसायटी आणि परिसरातील मुले होळीनिमित्त रंगाचे फुगे एकमेकांवर फेकून होळीचा आनंद घेत होती. रंगाचे फुगे एकमेकांवर फेकले जात असताना रंगाचा एक फुगा बाजुला उभ्या असलेल्या तरूणाच्या अंगावर पडला. त्यामुळे संतप्त झालेल्या एका तरूणाने फुगा फेकणाऱ्या अल्पवयीन तरूणाला जाब विचारला. त्याला मारहाण करत अंधारात नेऊन त्याच्यावर धारदार वस्तुने हल्ला केला.
अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी हल्ला करणाऱ्या तरूणा विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन तरूण हा १७ वर्षाचा शाळकरी विद्यार्थी आहे. तो आपल्या कुटुंबीयांसह मानपाडा रस्त्यावरील शंकेश्वर शाळेजवळील साई विधी सोसायटीत राहतो. हल्ला करणार तरूण हा बाजुच्या सागाव येथील यशवंत कॉम्पलेक्समध्ये राहतो. गुरुवारी रात्री साडे आठ वाजता यशवंत कॉम्पलेक्स जवळ ही घटना घडली.
पोलीस ठाण्यातील तक्रारीत हल्ला आणि मारहाण झालेल्या अल्पवयीन तरूणाने म्हटले आहे, की गुरुवारी रात्री आपण सागाव येथील यशवंत कॉम्पलेक्स परिसरात मित्रांसोबत होळीनिमित्त रंगाचे फुगे एकमेकांवर फेकून होळीचा आनंद घेत होतो. मौजमजा सुरू होती. त्यावेळी यशवंत कॉम्पलेक्समधील एक तरूण या मौजमजेत सहभागी न होता तो दूरवर उभा होता. रंगाचे फुगे मित्र एकमेकांवर फेकत होते. त्यावेळी एक फुगा अल्पवयीन तक्रारदार तरूणाकडून चुकून बाजुला उभ्या असलेल्या तरूणाच्या अंगावर जाऊन पडला. त्यावेळी बाजुला उभा असलेला यशवंत कॉम्पलेक्समधील तरूण साई विधी सोसायटीतील तरूणाच्या अंगावर जाब विचारण्यासाठी आला. त्याने तू आपल्या अंगावर रंगाचा फुगा का फेकला, असे प्रश्न करत अल्पवयीन तरूणाला शिवीगाळ करत ठोशाबुक्क्याने मारहाण केली.
अल्पवयीन मुलाचा टी शर्ट पकडून त्याला शंकेश्वर शाळेजवळील अंधार असलेल्या कोपऱ्यात जबरदस्तीने नेले. तेथे त्याच्या हाताच्या दंडावर धारदार वस्तुने मारून दुखापत केली. त्यामुळे काही वेळ या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घडला प्रकार अल्पवयीन मुलाने घरी जाऊन सांगितला. या मुलाच्या पालकांच्या सुचनेवरून अल्पवयीने मुलाने मारहाण, हल्ला करणाऱ्या तरूणा विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील याप्रकरणाचा तपास करत आहेत.