ठाणे : वर्तकनगर येथील शास्त्रीनगर भागात मोबाइल चार्जिग करण्याच्या वादातून एका तरुणाची पाच जणांनी चाकूहल्ला करून हत्या केल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्री उघडकीस आला आहे. सुनील राऊत (२१) असे मृताचे नाव असून या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी अभिषेक केसरकर याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
शास्त्रीनगर येथील पाडा क्रमांक दोन परिसरात सुनील राऊत राहत होता. याच परिसरात अभिषेक तसेच त्याचे इतर साथीदार राहतात. मंगळवारी सायंकाळी अभिषेकने परिसरातील एका मुलाकडून मोबाइल चार्जर मागितला होता. परंतु त्यास त्या मुलाने विरोध केला. त्यानंतर अभिषेकने त्या मुलासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून सुनील वाद मिटविण्यासाठी त्या ठिकाणी गेला होता. त्या वेळी अभिषेक आणि सुनील यांच्यामध्येही वाद झाला. त्यानंतर सर्व जण घरी निघून गेले. बुधवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास सुनील हा परिसरात मित्रांसोबत गप्पा मारत असताना अभिषेक हा त्याच्या इतर पाच साथीदारांसोबत त्या ठिकाणी आला. त्याने सुनीलसोबत वाद घालून त्याच्यावर चाकू आणि गुप्तीच्या साहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात सुनीलचा मृत्यू झाला. यानंतर सर्व आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, सुनीलच्या भावाने या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अभिषेक याच्यासह तिघांना अटक केली असून उर्वरित दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.