आर्थिक फसवणुकीमुळे आत्महत्या केल्याचे उघड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्थिक फसवणूक झाल्याने बेरोजगार तरुणाने सेल्फी घेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विरारमध्ये घडली. सोमनाथ शिंदे (२१) असे या तरुणाचे नाव आहे. हा सेल्फी त्याने मित्रांनाही पाठवला होता, मात्र मित्र तिथे पोहोचेपर्यंत त्याने मृत्यूला कवटाळले होते.

मूळचा संगमनेर येथील सोमनाथ शिंदे एका वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात विरार येथे आला होता. विरार पूर्वेच्या गासकोपरी येथील एका चाळीत तो चार मित्रांसह राहात होता. ‘एअर इंडिया’मध्ये लोडरचे काम मिळवून देण्याचे आश्वासन एका एजंटने त्याला दिले होते. त्यासाठी एजंटाने त्याच्याकडून ६० हजार रुपये घेतले होते.

सोमनाथने गावी राहणाऱ्या वडिलांकडून हे पैसे घेऊन ते एजंटाला दिले होते. आपल्याला रोजगार मिळेल, या आशेवर सोमनाथ होता. मात्र त्याला ही नोकरी मिळाली नाही. एजंट पैसे परत करण्यासही टाळाटाळ करत होता. यामुळे निराश झालेल्या सोमनाथने मंगळवारी संध्याकाळी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी सोमनाथने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी सापडली असून, त्यात एजंटने फसविल्याने आत्महत्या करत असल्याचे त्याने नमूद केले आहे. विरार पोलिसांनी याप्रकरणी एजंटविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth commits suicide in vasai
First published on: 28-09-2017 at 03:16 IST