कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश; पोलीसाला मारहाणीचा आरोप

दीड दिवसाच्या गणपती विसर्जनादरम्यान गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांना विसर्जनाच्या तलावात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी बुधवारी चारही आरोपींना अटक केली होती. त्यांना गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कल्याण परिसरातील तिसगाव तलाव येथे दीड दिवसांचे गणपती विसर्जन सुरूअसताना मंगळवारी रात्री ही घटना घडली होती. खोळंबलेले गणपती विसर्जन सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याने वाद होऊन जरीमरी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नितीन यांना पाण्यात ढकलून देत त्यांना बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. जरीमरी मित्र मंडळ हे आमदार गणपत गायकवाड यांचे असल्याने कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करू नये म्हणून पोलिसांवर दबाव येत असल्याच्या चर्चाना बुधवारी दिवसभर उधाण आले होते. परंतु आम्ही कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडणार नाही, असे स्पष्ट करीत पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जरीमरी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना शोधण्यासाठी एका विशेष पथकाची नेमणूक केली. बुधवारी रात्रीपर्यंत राहुल गायकवाड (२०), बंदेश गायकवाड (२१), नयन गायकवाड (२२), नरेश गायकवाड (३२) या चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरुवारी त्यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती केली होती. न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी ही विनंती मान्य करीत चौघाही आरोपींना १४ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.