डोंबिवली जवळील खोणी पलावा येथील रस्त्यावर दुचाकी वरुन जात असलेल्या एका तरुणाला याच भागातील एका दुचाकी स्वाराने उलट मार्गिकेतून भरधाव वेगात येऊन जोराने धडक दिली. या धडकेत तरुणाच्या हाताचे, पायाचे हाड मोडले आहे. या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खोणी पलावा भागातील रस्त्यांवर वाहतुकीची वर्दळ नसल्याने या भागात दुचाकी स्वार वेगाने वाहने चालवितात. अनेक वाहन चालक येणाऱ्या, जाणाऱ्या रस्ते मार्गिकेतून वाहन न चालविता उलट मार्गिकेतून वाहने चालवितात. त्याचा फटका सरळ मार्गोन जाणाऱ्या वाहन चालकाला बसत आहे. या भागात वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मानपाडा पोलिसांनी सांगितले, तक्रारदार गिरीश गवारी (२६) हे खासगी नोकरी करतात. ते खोणी पलावा येथील आर्चिड इमारतीत राहतात. गिरीश आपल्या मोटार सायकलने शनिवारी रात्री खोणी पलावा रस्त्याकडे येत होते. त्यावेळी गिरीश यांच्या इमारतीत राहणारा गौरव दीपक गिड या तरुणाने दुसऱ्या मार्गिकेतून न येता उलट मार्गिकेत घुसून दुचाकी चालवून गिरीश गवारी यांच्या दुचाकीला वेगाने धडक दिली. गौरवने जोराची धडक दिल्याने गिरीश दुचाकीसह रस्त्यावर पडले. त्यांच्या दुचाकीची मोडतोड झाली आहे. त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. मोटार वाहन कायद्याचे, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन दुचाकी चालविल्याने गिरीश गवारी यांनी गौरव याच्या विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

खणावा पलावा रस्त्यावर अनेक दुचाकी, मोटार चालक येणाऱ्या जाणाऱ्या मार्गिकांचा वापर न करता नियमबाह्य येजा करतात. त्यामुळे अपघात होतात असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.