उल्हासनगर : तीन वर्षांपूर्वी सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्यावर याच काळात बलात्काराचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र हा गुन्हा खोटा असून तक्रारदार महिलेने आपल्याला ओळखत नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर न्यायालयाने आपली आरोपांतून मुक्तता केली आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशांची कोणतीही माहिती न घेता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने माझी आणि त्यांची समाज माध्यमांवर चुकीच्या पोस्ट टाकून बदनामी केली जाते आहे. ही बदनामी न थांबल्यास न्यायालयाचा अवमान झाल्याचा खटला दाखल करणार, असा इशारा भदाणे यांनी दिला आहे.

खोटा जन्मदाखला खरा आहे असे भासवून नोकरी मिळवल्याचा ठपका ठेवत तत्कालीन जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्यावर फेब्रुवारी २०२२ मध्ये उल्हासनगर महापालिकेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांना सेवेतून बडतर्फही करण्यात आले होते. याच काळात त्यांच्यावर नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र या प्रकरणात आपल्याला नाहक गोवले गेले, हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानंतर तक्रारदार महिलेने आपण भदाणे यांना पहिल्यांदाच पाहत असल्याचे सांगितले. तसेच आरोपीची ओळख परेड पोलिसांनी केली नव्हती. त्यामुळे मी यांना ओळखत नाही, असे तक्रारदार महिलेने स्पष्ट केले होते. तसे प्रतिज्ञापत्र महिलेने न्यायालयात सादर केले, अशी माहिती भदाणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे न्यायालयाने सन्मानाने आपल्याला या आरोपातून मुक्त केले आहे. मात्र काही समाज माध्यम खात्यावरून या गुन्ह्याची चुकीची माहिती पसरवली जाते आहे. तसेच काही दिवसांपूर्वी आपण खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. त्यावरून अनावश्यक टीका केली जात असून ही टीका बदनामीकारक आहे. याविरूद्ध न्यायालयाचा आणि खासदारांचा अवमान केल्याप्रकरणी खटला दाखल केला जाईल, असे भदाणे यांनी स्पष्ट केले.

दोषारोप निश्चितीकरणास स्थगिती

खोटा जन्मदाखला प्रकरणातही न्यायालयाने कोणतेही दोषारोप निश्चित करण्यास स्थगिती दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. काही व्यक्तींनी जुना जन्मदाखला प्रसारीत करून त्यावरून तक्रारी केल्या. मात्र मोठ्या संघर्षानंतर मी खरा दाखला आर. के. तलरेजा महाविद्यालयातून मिळवला. त्या दाखल्याच्या आधारे माझ्यावर फसवणुकीचा गुन्ह्याला महत्व राहत नाही, असेही भदाणे म्हणाले. त्यामुळे काही षडयंत्र रचून केलेले हे कृत्य असल्याचा दावाही भदाणे यांनी पत्रकार परिषेदत केला. खोट्या तक्रारी देऊन मला प्रामाणिकपणे काम करण्यापासून रोखले मात्र न्यायालयाने मला न्याय दिला आहे. न्यायालयाच्या निकालांची माहिती न घेता माझी बदनामी सुरू आहे. या सर्वांवर येत्या काळात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करणार असल्याचे त्यांनी सांगितले.