ठाणे – पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी ठाणे पालिकेने विविध चौकात झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे तयार केले आहेत. तसेच सुशोभिकरणासाठी रस्त्यांवर काही ठिकाणी अडथळे देखील उभे केले आहेत. मात्र, शहरातील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे हे काही वर्षातच पुसट झालेत. यामुळे वाहचालकांकडून झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यावरच वाहने उभी केली जात आहेत. तसेच काही ठिकाणी गतिरोधकांवरच खड्डे पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरातील रस्ते ओलांडणे नागरिकांसाठी धोक्याचे ठरत आहेत.

पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलंडता यावा यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील विविध चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आखले होते. तसेच सुशोभीकरणाच्या उद्देशाने काही ठिकाणी आकर्षक रंगकाम, लोखंडी अडथळे देखील केले होते. शहरात रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंगचा रंग काही वर्षापूर्वी बदलण्यात आला होता. तेव्हा लाल आणि पांढऱ्या रंगांचे पट्टे आखले होते. मात्र, या सर्व उपक्रमांची अवस्था बिकट झाली आहे. शहरातील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत मार्गांवरील झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आता पूर्णपणे पुसट झाल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील पट्टेच गायब झाले आहेत. या परिस्थितीमुळे वाहन चालक झेब्रा क्रॉसिंगच्या रेषेवरच वाहने उभी करत आहेत.

या अशा प्रकारामुळे सिग्नल यंत्रणा बंद असताना पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी जागा मिळत नसल्याने त्यांना जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागत आहे. परिणामी अपघातांचा धोका वाढल्याचे दिसत आहे. दरम्यान, अनेक रस्त्यांवरील गतिरोधकांची स्थिती देखील चिंताजनक आहे. वसंत विहार, हिरानंदानी इस्टेट अशा परिसरात गतिरोधकांची अशी अवस्था आहे. या ठिकाणी अनेकदा वेगाने येणाऱ्या वाहनांना गतिरोधक दिसत नसल्याने अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.

शहरातील मासुंदा तलाव, हरीनिवास सर्कल, कोर्टनाका या चौकात झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे रंगवल्यानंतर हे पट्टे रस्त्याच्या मधोमध अर्धवट सोडल्याचे दिसत आहे. वास्तविक नियमानुसार ते पट्टे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सलगपणे जाणे आवश्यक आहे. परंतु ते रस्त्याच्या मध्यभागी सोडून तेथे शिल्प, चिन्ह, प्रतिमा उभे करून अडथळे तयार केले आहेत.