वृत्तपत्र व्यवसाय हा तसा आतबट्टय़ाचा व्यवसाय! चालला तर फायदाच फायदा नाहीतर नुकसान झेलण्यास तयार राहा. हा व्यवसाय वाढविण्यासाठी आणि वृत्तपत्रांचा जास्तीत जास्त खप होण्यासाठी या व्यवसायातील मार्केटिंग आणि वितरण विभाग हरतऱ्हेच्या कल्पना अवलंबतात. कुणी एका वृत्तपत्राबरोबर त्याच संस्थेतील अन्य वृत्तपत्रे कमी किमतीत देतात, तर एखाद्या वृत्तपत्राचा वितरण विभाग एखाद्या विशिष्ट परिसरात जाऊन तिथे आपल्या वृत्तपत्राच्या जाहिराती करतात. मात्र श्रीलंकेतील एका वृत्तपत्राच्या माकेर्टिग व वितरण विभागाने आपल्या वाचकांसाठी सुगंधी वृत्तपत्रे पुरविण्याचा ‘उद्योग’ सुरू केला आहे.
सारंगा विजेयारत्ने हे श्रीलंकेतील म्वाबिमा आणि सेयलॉन या सिंहली भाषेतील वृत्तपत्रात मार्केटिंग विभागाचे प्रमुख आहेत. या दोनही वृत्तपत्रांचा खप तसा कमीच. या वृत्तपत्रांचा खप वाढविण्याची मोठी जबाबदारी विजेयारत्ने यांच्यावर होती. त्यासाठी त्यांनी ‘सुगंधी’ योजनेचा अवलंब केला. वृत्तपत्रातील पानांना जर विशेष प्रकारचे अत्तर लावल्यास त्यातून सुगंध येईल आणि वृत्तपत्राचा खप वाढेल, अशी त्यांची योजना होती. ही योजना राबविण्यासाठी विजेयारत्ने योग्य मुहूर्ताच्या शोधात होते आणि त्यांना मुहूर्त सापडला. ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. मग याच दिवशी आपण ही योजना का राबवू नये, असा विचार विजेयारत्ने यांच्या मनात आला. या दिवशी वाचकांना ‘सिंट्रोनेला सेंटेड’ वृत्तपत्र वाचायला मिळाले. डासांना दूर ठेवणाऱ्या आरोग्यदायी वनस्पतीचा या सुगंधात वापर केला गेला. श्रीलंकेमध्ये डासांपासून होणारे विकार आणि त्यांच्या रुग्णांची संख्या खूपच आहे. दरवर्षी तब्बल ३० हजार रुग्ण डेंग्यूने त्रस्त असतात. त्यामुळे डासांना दूर ठेवणाऱ्या वनस्पतीचा वापर विजेयारत्ने यांनी केला. त्याचा परिणामही चांगलाच झाला. वाचकांना वृत्तपत्र वाचताना आता डासांचा त्रास होत नाही. या वृत्तपत्रांच्या खपानेही मग उच्चांक गाठला. पहिल्याच दिवशी या वृत्तपत्राच्या दोन लाख प्रती संपल्या. दररोजच्या खपापेक्षा ३० टक्के अधिक. श्रीलंकेच्या आरोग्य विभागानेही या योजनेचे स्वागत केले आहे, तर ‘मायक्रोसॉफ्ट’चे सर्वेसर्वा आणि सामाजिक कार्यकर्ते बिल गेट्स यांनीही ‘ट्विटर’वर या योजनेचे कौतुक केले आहे.