आपण मेंदूची १० टक्के क्षमताही वापरत नाही हे एक शहरी मिथक आहे.  दिग्दर्शक लूक बेसन यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ल्युसी’ या चित्रपटात स्कार्लेट जोहान्सन या अभिनेत्रीचे अपहरण करून तिच्या शरीरात मेंदूची न वापरलेली शक्ती वापरण्याचे औषध टाकण्यात येते. त्यामुळे ती काळावर नियंत्रण ठेवते, वाईट लोकांना फाशी देते व इतर अनेक अचाट कृत्ये करते. पण केंब्रिज विद्यापीठातील मेंदूमानसशास्त्राच्या प्राध्यापक बाब्र्ररा सहाकिन यांनी सांगितले की, आपण मेंदूची १० टक्केच क्षमता वापरतो हे मिथक कृत्रिम आहे. डेल कार्नेगी यांनी १९३६ मध्ये त्यांच्या ‘हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएंस पीपल’ या पुस्तकात प्रथम हे वाक्य वापरले व मेंदूची १० टक्के क्षमता आपण वापरतो, असे म्हटले होते. पण केवळ त्यांचा मुद्दा ठसवण्यासाठी त्यांनी हा आकडा अंदाजे दिला असावा असे मानले जाते. मेंदू वैज्ञानिकांच्या मते आपल्या मेंदूत ग्लायल सेल्स नावाच्या पेशी असतात. त्या इतर पेशींना दहा टक्के पोषक तत्त्वे पुरवतात. या दहा टक्के पेशी म्हणजे न्यूरॉन्स असतात व त्याच माणसाच्या मनात विचार निर्माण करतात. थोडक्यात, मेंदूतील राखाडी रंगाचा भाग म्हणजे या पेशींचा संच असतो. प्रा. सहाकियन यांच्या मते आपण मेंदूची पूर्ण क्षमता वापरत नाही हे खरे आहे, पण अनेकदा आपण दमलेलो असतो त्यामुळे ही क्षमता वापरू शकत नाही. मुलांनी जर व्यायाम केला तर त्यांचे गणित व वाचनाचे आकलन सुधारते. कारण ते थकलेले नसतात. मेंदूची उत्पादन क्षमता सुधारते असे नाही तर मेंदू चांगले काम करतो असा त्याचा अर्थ आहे. भविष्यकाळात काही स्मार्टऔषधे महत्त्वाची भूमिका पार पाडतील. मेंदूची १० टक्के क्षमताच आपण वापरतो असे अमेरिकी लोकांनाही वाटते.