सुदिनांची जी स्वप्नगाजरे आपल्याकडे दाखविण्यात आली आहेत, त्यात बुलेट ट्रेनचे स्वप्नही अस्तित्वात आहे. जपानसारख्या चिमुकल्या आशियाई राष्ट्राने मात्र बुलेट वेगाला हस्तगत करून पुरती पन्नास वर्षे झाली आहेत. १९६४ मध्ये टोकियो ऑलिम्पिक सुरू होण्याच्या नऊ दिवस आधी जपानचे सम्राट हिरोहिटो यांनी एका समारंभात बुलेट ट्रेनचे उद्घाटन केले होते. ताशी २१० कि.मी. वेगाने १०८ कि.मी.चा पल्ला गाठत मोठय़ा प्रदेशाची जीवनवाहिनी बनलेली टोकायडो शिनकानसेन (न्यू ट्रंक लाइन) ही जगातील वेगवान रेल्वे ठरली होती. ६७ बोगद्यातून व ३००० पुलांवरून पार करीत असे. ता टोकियो ते ओसाका हे अंतर आताची १६ डब्यांची बुलेट ट्रेन ताशी २७० कि.मी. वेगाने धावते. त्यात १३२३ प्रवासी क्षमता आहे. दर मिनिटाला टोकियोहून ओसाकाला बुलेट ट्रेन आहे. जपानच्या बुलेट वेगाच्या पन्नाशी निमित्ताने आपल्या स्वप्नांची पडताळणी..

शिनकानसेन बुलेट ट्रेन १ ऑक्टोबर १९६४ रोजी सुरू झाली. त्या वेळी ब्रिटनमधील रेल्वेचा वेग ताशी १०० किलोमीटर होता. या रेल्वे व्हिक्टोरियन लाइनवर धावत असत. फ्रान्सची टीजीव्ही, जर्मनीची आयसीई व इटलीची बेनडोलिनो या बुलेट ट्रेनही प्रसिद्ध आहेत. जपान हा देश १९४५ मधील अणुबॉम्ब हल्ल्याने पोळलेला होता. त्याचे आíथक व सांस्कृतिक पुनरुज्जीवन साधारण वीस वर्षांत झाले त्याचे सूचक ही बुलेट ट्रेन होती.   महायुद्धात बेचिराख झालेला जपान पुन्हा उभा राहात गेला व तेथील वास्तुरचना, मोटारमार्ग, मोटारबाइक्स, सिनेमा, कॅमेरा व बुलेट ट्रेन यांनी नवा जपान निर्माण केला. त्याची नवी फॅशनेबल संस्कृती उभी राहिली. १९६४च्या ऑलिम्पिकला जे लोक उपस्थित होते त्यांना हा बदल जाणवला. चेरीच्या फुलोऱ्याच्या पाश्र्वभूमीवर, हिमाच्छादित पर्वतांच्या साक्षीने बुलेट ट्रेन धावू लागली तेव्हा नव्या जुन्या संस्कृतीचा संगम झाला. या रेल्वेची छायाचित्रे काढून त्याची प्रतिमा लोकांच्या मनात ठसवली गेली.  
शिमा यांचे प्रयत्न
जपानमध्ये वेगवान रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न न्यू ट्रंक लाइनच्या रूपाने करण्यात आला, पण त्याचा खर्च १०० टक्के जास्त झाला त्यामुळे १९५४ मधील पहिल्या प्रयोगात जपान नॅशनल रेल्वेचे अध्यक्ष शिन्जी सोजो व मुख्य अभियंता हिडिओ शिमा यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यांनीच तयार केलेल्या रेल्वेच्या उद्घाटनासाठी त्यांना बोलावलेही नाही. त्यानंतर १९५९ मध्ये पुन्हा शिमा व त्याच अभियंत्याला रेल्वेचे डिझाइन करण्यासाठी बोलावण्यात आले, तोही पुन्हा खेळलेला जुगार होता पण या वेळी त्यांनी नवीन एक्स्प्रेस मार्ग काढण्याचे ठरवले. उंचीवरून जाणारा, बोगदे असलेला हा मार्ग होता. त्याला वळणे कमी होती. जुन्या रेल्वेंना या मार्गावरून जाण्यास परवानगी नव्हती. जपानच्या या आताच्या रेल्वे या शिनकानसेनपेक्षा फार अरुंद मार्गावर धावतात. अमेरिका व युरोपचे ४ फूट ८.५ इंचाचे गेज प्रमाण जास्त वेग व गाडी स्थिरपणे जाण्यासाठी वापरण्यात आले.
रेल्वेतील वातावरण
शिमा यांनी तयार केलेले डिझाइन हे जपानच्या मेन लाइन स्टीम लोकोमोटिव्हची शेवटची पिढी होती. त्यांनी जपानच्या स्टीम इंजिनवर चालणाऱ्या रेल्वेच्या वेगाचा विक्रम १९५४ मध्ये प्रस्थापित केला. नंतर शिमा हे नॅशनल स्पेस डेव्हलपमेंट एजन्सीत गेले. आज त्यांना शिनकानसेन व उच्च गती इलेक्ट्रिक एक्स्प्रेसचे मूळ निर्माणकत्रे मानले जाते. पन्नास वर्षांपूर्वी तयार झालेल्या टोकायडो शिनकानसेन रेल्वेने ५.५ अब्ज प्रवाशांची ने-आण केली. या रेल्वे भारदस्त होत्या. पुढे टोकदार नाकासारखी रचना, लपवलेली चाके व हिरवा किंवा निळा रंग अशा झकपक दिमाखात ही रेल्वे धावायची. आता ई-५ व ई-६ मालिकेतील गाडय़ा त्याच्याही एक पाऊल पुढे आहेत. त्यांचा वेग ताशी २७० कि.मी. तर काही भागांत ताशी ३२० किलोमीटर आहे. आतून या गाडय़ा स्वच्छ, शांत, अजिबात धक्के  किंवा थरथर न जाणवणाऱ्या आहेत.  
वेग जास्त, आवाज कमी
शिनकानसेन रेल्वे परिसराच्या आजूबाजूच्या लोकांना आवाजाचा त्रास होत नाही. आता नवीन पिढीतील गाडय़ा होन्शू व युशू या दक्षिणेकडील बेटांपुरत्या आहेत. त्या लवकरच होकायडोपर्यंत जातील. समुद्राखालून त्यासाठी बोगदा काढावा लागणार आहे. २०१६ पर्यंत हे काम होणे अपेक्षित आहे. मग या गाडय़ा २०३५ पर्यंत सॅपोरोपर्यंत जातील. तोपर्यंत टोकियो ते ओसाका दरम्यान शिनकानसेन गाडय़ा सुरू झालेल्या असतील. त्यांचा वेग ताशी ५०० कि.मी. म्हणजे आताच्या बुलेट ट्रेनच्या दुप्पट असेल. त्या मॅगलेव्ह प्रकारच्या असतील व मॅग्नेटिक लेव्हिटेशनमुळे त्या मार्गावरून तरंगतच जाताना दिसतील. १९६४ पासून जपानचा चेहरा बदलण्याची करामत या बुलेट ट्रेन्सनी केली.
अपघातांचे प्रमाण
 गेल्या वर्षीपासून टोहूकू शिनकानसेन ही वेगवान गाडय़ांपकी एक ठरली असून तिचा वेग ताशी ३२० कि.मी. आहे. डोंगराळ भागातून ती जाते. अशा वेगवान बुलेट ट्रेनमुळे जपानमध्ये देशांतर्गत वाहतुकीत विमानसेवेचे महत्त्व कमी होत गेले शिवाय तेथे कार्बन उत्सर्जनही मोटारींचा वापर टळल्याने कमी झाले. बुलेट ट्रेनच्या पन्नास वर्षांच्या इतिहासात केवळ दोनदा ती रुळावरून घसरली. २००४ मध्ये भूकंपाच्या वेळी व नंतर २०१३ मध्ये ती घसरली. आपल्याकडचे रेल्वे अपघात बघता फार कमी वेळा बुलेट ट्रेनला अपघात झाले.
भारतातील चाचपणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पात बुलेट ट्रेनची घोषणा केली आहे त्यात प्रामुख्याने मुंबई-अहमदाबाद रेल्वेचा समावेश आहे. दुसरा मार्ग दिल्ली-आग्रा हा आहे, तर तिसरा दिल्ली-चंडीगड हा आहे. नुकतेच चीनच्या तज्ज्ञांचे पथक आर्थिक व तांत्रिक योग्यतेची तपासणी करण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने मुंबईला आले होते. जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी या संस्थेनेही असा अभ्यास केला असून त्यांचा अहवाल पुढील वर्षी मध्यावधीत सादर होणार आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर ताशी ३५० किलोमीटर वेगाने रेल्वे धावणे अपेक्षित आहे. ही रेल्वे भूमिगत असावी कारण जागेची अडचण आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. चीनमधील वेगवान रेल्वेची प्रारूपे ही भूमिगत स्वरूपाची असून शहरात प्रवेश करताना तो भूमिगतच करावा लागेल. मुंबई-अहमदाबाद गतिमान रेल्वेला फार कमी स्थानके ठेवावी लागतील. जर चीनचे प्रारूप योग्य वाटले तर त्यांचे सरकार चीनच्या रेल्वे विद्यापीठाचे तज्ज्ञ भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजे आयआयटीत पाठवणार आहेत.

जगातील वेगवान गाडय़ा
युरोप व आशियात सध्या जगातील वेगवान बुलेट ट्रेन आहेत. त्यात चीनची शांघाय मॅगलेव व हार्मनी सीआरएच ३८० ए या गाडय़ा आघाडीवर आहेत. दहा जलद गाडय़ा पुढीलप्रमाणे-

शिनकानसेन-हायाबुसा
ई-५ ही जपानमधील शिनकानसेन-हायाबुसा रेल्वे मार्च २०११ मध्ये सुरू झाली. टोहोकू-शिनकानसेन मार्गावरचा वेग ताशी ३२० कि.मी. आहे. या गाडीने ताशी ४०० कि.मी. वेग मिळवला असून ती जपानमधील वेगवान गाडी आहे.

शांघाय मॅगलेव
शांघाय मॅगलेव ही ताशी ४३० कि.मी. वेगाने धावणारी गाडी असून तिचा सरासरी वेग ताशी २५१ कि.मी. आहे. २००४ मध्ये या गाडीची व्यावसायिक सेवा सुरू झाली. ही गाडी शांघाय मॅगलेव लाइनवर ३०.५ कि.मी. अंतर प्रथम धावली.

अ‍ॅलस्टॉम युरोडय़ुप्लेक्स
अ‍ॅलस्टॉमने युरोडय़ुप्लेक्स ही गाडी तयार केली असून ती टीजीव्ही डय़ुप्लेक्सची तिसरी पिढी आहे. डिसेंबर २०११ मध्ये ती सुरू झाली. तिचा वेग ताशी ३२० कि.मी. आहे. युरोपीयन नेटवर्कमध्ये या गाडय़ा चालतात. ५१२ प्रवासी त्यात बसू शकतात.

हार्मनी सीआरएच ३८० ए
ही जगातील दुसरी वेगवान गाडी आहे. तिचा वेग ताशी ३८० कि.मी. आहे. डिसेंबर २०१० मध्ये शांघाय-हांगझाऊ दरम्यान ही गाडी ४८६ कि.मी. वेगाने धावली. सीएसआर क्विंगडो सिफांग लोकोमोटिव्ह अ‍ॅण्ड रोलिंग स्टॉक या संस्थेने ती तयार केली आहे.

टीजीव्ही डय़ुप्लेक्स
टीजीव्ही डय़ुप्लेक्स गाडी १९९६-२००४ दरम्यान तयार करण्यात आली. अ‍ॅलस्टॉम व बम्बार्डियर या कंपन्यांनी ती तयार केली असून तिचा वेग ताशी ३०० कि.मी. ते ३२० कि.मी. आहे. फ्रान्समध्ये पॅरिस व मार्सेली दरम्यान या गाडय़ा धावतात.

एजीव्ही इटालो
इटलीत एजीव्ही मालिकेतील ही गाडी एप्रिल २०१२ मध्ये सुरू झाली, तिचा वेगाचा विक्रम एप्रिल २००७ मध्ये ताशी ५७४.८ कि.मी. होता. अलस्टॉम कंपनीने ती बनवली असून नेपोली, रोमा, फायरेन्झ, बोलोगनाव मिलानो दरम्यान ती धावते.

ईटीआर फ्रेशियारोसा
एलेट्रो ट्रेनो रॅपिडो ५०० ही गाडी २००८ मध्ये सुरू झाली. तिचा कमाल वेग ३६० कि.मी. आहे. नेहमीचा वेग ताशी ३०० कि.मी. आहे. रोम व मिलान दरम्यान ही गाडी धावते. अतिशय आरामदायी अशी ही गाडी आहे.

टाल्गो ३५० (टी ३५०)
टाल्गो ३५० ही रेनफी अ‍ॅव्ह क्लास १० नावाने प्रसिद्ध आहे. तिचा चाचणी वेग ताशी ३६५ कि.मी. आहे. कमाल वेग ताशी ३५० कि.मी. आहे. पॅटेन्टीस टॅग्लो या कंपनीने ती तयार केली आहे. माद्रिद-झरगोझा-लिडा मार्गावर ती धावते.

टीएचएसआर ७०० टी
तैपेई व काओसियुंग दरम्यान तैवानमध्ये धावणारी ही गाडी आहे. जानेवारी २००७ मध्ये ती सुरू झाली. तिचा वेग ताशी ३०० कि.मी. असल्याने वाहतुकीचा वेळ ९० मिनिटांनी कमी झाला. कावासाकी, निप्पॉन शारयो व हिताची या कंपन्यांनी तयार केली.

सिमेन्स व्हेलारो ई : एव्हीएस १०३
व्हेलारो ई ही स्पेनमध्ये तयार झालेली गाडी असून तिचा वेग ताशी ४०० कि.मी. आहे. नेहमीचा वेग ताशी ३५० कि.मी. आहे. बार्सिलोना-माद्रिद दरम्यान ती धावली.