जगातील दोन तृतीयांश लोकांना इंटरनेटची सुविधा मिळावी यासाठी २०१५ मध्ये ड्रोनच्या माध्यमातून सौरशक्तीवर आधारित इंटरनेट सेवेची चाचणी फेसबुक करणार आहे. मार्क झकरबर्ग यांनी फेसबुकच्या कनेक्टिव्हिटी लॅबची सुरुवात इंटरनेट डॉट ओआरजीच्या मदतीने मार्चमध्ये केली होती. त्यानंतर आता सौरशक्तीवर चालणारी निर्मनुष्य ड्रोन विमाने पाठवून तेथून इंटरनेट संदेशवहन पृथ्वीवर करण्याचा विचार आहे. जगात अजूनही दोन तृतीयांश लोक इंटरनेटपासून वंचित आहेत. न्यूयॉर्क येथे ‘सोशल गुड’ शिखर बैठकीत फेसबुकच्या कनेक्टिव्हिटी लॅबचे संचालक याल मग्वायर यांनी सांगितले, की इंटरनेटसाठी ड्रोनची मदत घेण्याकरिता २०१५ मध्ये चाचणी करण्यात येईल. ही चाचणी अमेरिकेत एके ठिकाणी होणार असून ते ठिकाण निश्चित करण्यात आलेले नाही. ६० ते ९० हजार फूट उंचीवरून जाणारी ड्रोन विमाने तयार करण्यात येतील. किमान १०० सोलर ड्रोन विमाने एक व्यक्ती नियंत्रित करील. सध्या एका विमानामागे एक व्यक्ती असा नियम आहे, अशी शेकडो विमाने सोडून इंटरनेट जाळे निर्माण केले जाणार आहे. ‘मॅग्वायर गिझमॅग’ या नियतकालिकाला सांगितले, की अशा प्रकारची इंटरनेट सेवा देण्यासाठी अनेक महिने कदाचित वर्षेही खूप उंचीवरून म्हणजे वातावरणापेक्षाही जास्त उंचीवरून या ड्रोन विमानांना प्रवास करावा लागेल. या प्रयोगात नेमके धोरण, तंत्रज्ञान व विकास यंत्रणा कशा प्रकारे असावी, कुठले र्निबध असावेत यावर फेसबुक कनेक्टिव्हिटी लॅबचे एक पथक स्वतंत्रपणे काम करीत आहे.