मंगळावर आतापर्यंत अनेक अवकाशयाने पाठवण्यात आली, त्यातील निम्म्यापेक्षाही अधिक अपयशी ठरली. मंगळ हा पृथ्वीचा सहोदर असल्याने मंगळावर एकापाठोपाठ पन्नासहून अधिक मोहिमा होऊन गेल्या. त्यातील पहिली यशस्वी मोहीम अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिकल अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासा या संस्थेची ‘मरिनर-४’ ही अवकाश मोहीम होती. हे यान अमेरिकेतील केप कॅनव्हेरॉल येथून सोडण्यात आले, त्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली. विशेष म्हणजे त्याचनिमित्ताने अमेरिकेतील ‘नासा’ या संस्थेत काम करणाऱ्या जॅकी या महिलेने व्हायकिंग या मोहिमेच्या वेळी दोन माणसे मंगळावर चालताना पाहिल्याचा सनसनाटी दावा केला. अर्थात त्याला नासाने दुजोरा दिलेला नाही. यापूर्वीही कुणी तरी मंगळावर एक बाई आहे असे दाखवणारा फोटो प्रसिद्ध केला होता. प्रत्यक्षात तो स्त्रीच्या शरीराच्या आकाराशी साम्य असलेला खडक होता; पण इंटरनेटच्या युगात अशी थट्टामस्करी चालणारच हे आता गृहीत धरून चालायला हवे. ‘मरिनर-४’ अंतराळयानाचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे ते १५ जुलै १९६५ रोजी मंगळाच्या सर्वात जवळ पोहोचले व सहा हजार मैलांवरून त्याच्या २१ प्रतिमा म्हणजे छायाचित्रे पृथ्वीकडे पाठवली. मंगळावरील ही मोहीम साजरी करण्याचे नासाने ठरवले आहे.

अपेक्षा अन् अपेक्षाभंगही
मरिनर-४ यान मंगळापर्यंत हमखास पोहोचेल व त्याच्याभोवती घिरटय़ा घालेल असे आत्मविश्वासाने वाटत नव्हते; पण ते पोहोचले व त्याने अनेक छायाचित्रे पाठवली. या मोहिमेतच मंगळावर जीवसृष्टी सापडेल, निदान पाणी तरी सापडेल अशी आशा होती; पण प्रत्यक्षात तेथील भूमी खडकाळ असल्याचे छायाचित्रात दिसल्याने सर्वाचा अपेक्षाभंग झाला.

काय पाहिलं मरिनर ४ यानानं
* किमान स्पष्ट दिसणारी  ७०  विवरे.
* विवरांचा आकार ४ ते १२० कि.मी.
* मंगळावर सर्वात छोटे विवर असल्याचा शोध.
* मंगळाच्या १ टक्के भूमीचे छायांकन.
* वातावरणीय दाबाची माहिती.
* भूपृष्ठ तापमानाची माहिती.
* आगामी मोहिमांच्या यशासाठी मोलाची माहिती.
* मरिनर यान २१ डिसेंबर १९६७ मध्ये सूर्याच्या कक्षेत होते. त्याने आठ महिन्यांचा कार्यकाल पूर्ण केला. २८ नोव्हेंबर १९६४ रोजी हे यान सोडण्यात आले होते.

मंगळावर ९० हजार संदेश उविंगू कंपनी पाठवणार
मंगळावर पहिले यंत्रमानव रूपातील उपकरण पाठवल्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त पृथ्वीवासीयांकडून ९० हजार संदेश हे रेडिओ दुर्बिणींमार्फत पाठवले जाणार आहेत. अमेरिकेची अवकाश निधी कंपनी उविंगूने हा अवकाशातील शाऊट आऊट उपक्रम सुरू केला असून नासाच्या मरिनर-४ यानाच्या मोहिमेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल निधीही गोळा केला जाणार आहे. उविंगू, बिम मी टू मार्स या उपक्रमांतर्गत इच्छुक सहभागीदारांना निमंत्रित केले असून त्यांना ५ ते ५९९ डॉलर खर्च करून मंगळावर संदेश व छायाचित्रे पाठवता येणार आहेत. कॉमेडियन सेठ ग्रीन व अभिनेता जॉर्ज टाकेई यांनी या योजनेत संदेश पाठवण्यात स्वारस्य दाखवले आहे. जॉर्ज हे स्ट्रार ट्रेक या टीव्ही मालिकेत सुलूची भूमिका करीत आहेत.
 प्रकाशाच्या वेगाने हे संदेश पंधरा मिनिटांत मंगळावर पोहोचवले जातील, असे प्रकल्प संचालकांनी सांगितले, हे संदेश पाठवण्याचे काम दोन वेळा केले जाईल. मंगळावर संदेशाला उत्तर देण्यास कुणी नाही हा वेगळा भाग आहे; पण संदेश पाठवल्याच्या प्रती काँग्रेस, नासाचे वॉशिंग्टनमधील मुख्यालय व संयुक्त राष्ट्रांचे न्यूयॉर्क येथील मुख्यालय येथे पाठवल्या जातील. उविंगू म्हणजे आकाश असा अर्थ स्वाहिली भाषेत होतो व खासगी कंपनी अवकाश संशोधन व शैक्षणिक प्रकल्पांसाठी यातून पैसा गोळा करणार आहे. मरिनर-४ हे यान मंगळाजवळून गेले होते व त्याने मंगळाच्या पृष्ठभागाची पहिली चित्रे पाठवली होती. त्यानंतर वीसहून अधिक अवकाशयानांनी मंगळाला गवसणी घातली व मंगळावर अवतरणही केले. नासाचे सध्या तीन ऑरबायटर व दोन रोव्हर व युरोपीय अवकाश संशोधन संस्थेचे मार्स ऑरबायटर मंगळाभोवती आहे. मंगळावर माणसाला उतरवणे हा अमेरिकेच्या अवकाश कार्यक्रमाचा खरा हेतू आहे.

मंगळाचे सर्वात जवळचे छायाचित्र मरिनर ४ यानाने १५ जुलै १९६५ रोजी मंगळाचे पहिले निकटचे छायाचित्र घेतले.