एक काळ असा होता की, इंटरनेट आणि गुगल हे एकच असल्याचा समज जगात होता. ज्या त्या गोष्टींच्या ज्ञानासाठी अर्धे जग अद्यापही गुगलशरण आहे. पण आरंभ असलेल्या कुठल्याही गोष्टीला अस्त असतो, या नियमाला गुगलने तरी अपवाद का ठरावे? इंटरनेटचा साम्राज्यविस्तार जसा वाढत आहे, तसाच त्याच्या वापरामध्ये सीमांत उपभोगितेचा सिद्धांत कार्यरत झाला आहे. या सिद्धांतानुसार एखाद्या गोष्टीच्या अतिवापरानंतर त्या गोष्टीचे महत्त्व घसरत जाते. इंटरनेटची गती मंदावेल तशी गुगलचीही मंदावणारच. विकसित राष्ट्रांमध्ये गुगलला पर्यायी यंत्रणा तयार झाल्यामुळेही त्याच्या लोकप्रियतेला धक्का बसायला सुरुवात झाली आहे. आपल्या देशातील गुगलप्रेम अद्याप आटलेले नसताना गुगलास्ताच्या आरंभाचा हा आढावा..
गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले लॅरी पेज यांचा मूड गेल्या आठवडय़ात ठीक नव्हता. त्यांच्या सहकाऱ्यांनी चांगले काम केले पण तरीही पेज यांच्या मनासारखे काही झाले नव्हते. महसूल १९ टक्क्यांपर्यंत वाढून १५.४ अब्ज डॉलर झाला. कुठल्याही मालकाला महसूल कितीही वाढला तरी समाधान होत नसते हे खरेच, पण लॅरी पेज यांच्या मनात काही तरी वेगळीच भीती आहे, ती म्हणजे इतर कंपन्यांच्या तुलनेत चांगली कामगिरी करूनही गुंतवणूकदार या कंपनीकडे आकृष्ट होण्याचे कमी झाले आहेत. गुगलची वाढ होते आहे, पण कृष्णेकाठी कुंडल पूर्वीचे उरलेले नाही. गुगलची आर्थिक कामगिरी थंडावली नसली तरी वाढ मात्र रोडावली आहे. गुगलची भिस्त ही इंटरनेट वापरणारे लोक व मोबाइलवर इंटरनेट वापरणाऱ्यांवर आहे. इतके दिवस गुगलवर लोकांचे प्रेम होते, पण ते आटणारच नाही व नवे पर्याय येणारच नाहीत असे नाही. ज्या मानवतावादी लाटेवर गुगल तरंगत होते तशी परिस्थिती आता राहिली नाही, असे असिमको या विश्लेषक कंपनीचे मत आहे.
गुगलला धोका का आहे याचे कारण इंटरनेटची वाढ कमी होते आहे व गुगल म्हणजेच इंटरनेट अशी सध्याची स्थिती आहे. शोधविनंत्यांपैकी ८० टक्के भाग गुगल सांभाळते व लाखो लोक जीमेल, यूटय़ूबचा वापर करतात. वेबला पर्यायी शब्द म्हणजे गुगल अशी परिस्थिती आहे. इंटरनेट जसे वाढेल तसे गुगल वाढणार असा त्याचा अर्थ आहे. पण इंटरनेटची वाढ निरंतर होणार नाही, त्यामुळे गुगललाही मर्यादा आहेत. इंटरनेट पृथ्वीवरील ५० टक्के लोकांपर्यंत पोहोचले आहे, पण आता त्याची वाढ कमी होत चालली आहे. थोडक्यात, २०१६ पर्यंत वेबची सद्दी संपणार आहे व त्यामुळे गुगल अडचणीत येऊ शकते. अमेरिका व पश्चिम युरोपात फार थोडी घरे अशी असतील जिथे लोक ऑनलाइन नाहीत. ऑनलाइनवर नवीन लोक येणार नसतील तर गुगलचे उत्पन्नही घटणार आहे. गुगलचा महसूल जर आपण बघितला तर चीनवगळता जितके लोक ऑनलाइन आहेत त्याच्या समांतर आहे. गुगलला चीनने प्रवेश दिलेला नाही हे येथे सांगायला हवे. गुगलची जी महसूल वाढ आहे ती विकसित देशांत जास्त आहे. गुगलला जर वाढायचे असेल तर गरीब देशांमध्ये इंटरनेटचा वापर वाढला पाहिजे. इंग्लंड-अमेरिकेत गुगलला वर्षांकाठी वापरकर्त्यांमागे ८६ डॉलर मिळतात, पण उर्वरित जगात केवळ १२ डॉलर महसूल मिळतो. त्यात जपान व युरोपचाही समावेश आहे. दर वापरकर्त्यांमागे कमी होत चाललेला महसूल गुगलला अडचणीत आणत आहे. श्रीमंत जग गरीब जग श्रीमंत होण्याची गेली २०० वर्षे वाट पाहात आहे, पण तसे तर काही घडताना दिसत नाही. अविकसित देशांत फार फरक पडलेला नाही. गुगलला प्रत्येक वापरकर्त्यांमागे १.२० डॉलर नफा मिळतो, पण कित्येक वर्षांत त्यात फरक पडलेला नाही. गुगलची महसूल मिळवण्याची क्षमता, प्रत्येक क्लिकमागे मिळणाऱ्या महसुलाचे प्रमाण कमी होत आहे, यावर उपाय एकच आहे तो म्हणजे गुगलला वेब म्हणजे इंटरनेटपेक्षा वेगाने वाढावे लागेल.

गुगलपर्याय
तुम्ही म्हणाल, गुगलला पर्याय कुठे आहे, तर त्याचे उत्तर असे, की आता स्मार्टफोन आलेले आहेत त्यात अ‍ॅमेझॉन, लिंक्ड इन, अ‍ॅपल, फेसबुक यांची इतकी अंतर्गत अ‍ॅप (उपयोजने) आहेत, की ज्यामुळे अनेक लोकांचा वेळ हा ही अ‍ॅप वापरण्यात जातो. न्यूज हंट हे अ‍ॅप डाऊनलोड केले तर बातम्यांसाठी गुगलवर जाण्याची गरज नाही. फेसबुक व पँडोरा यांचे ग्राहक हे स्मार्टफोनवाले आहेत. ते किती आहेत हे गुगलला कळणार नाही, गुगलच्या वाढीतील हे झारीतील शुक्राचार्य त्याला मात देत आहेत. गुगलचा ९० टक्के महसूल हा जाहिरात शोधणे व तत्सम सेवांतून येत आहे.

स्नोडेन इफेक्ट
गुगलचा आर्थिक प्रगतीचा भाग जरा बाजूला ठेवला तरी पूर्वीचे गुगल व आताचे गुगल यात बराच फरक झाला आहे. एडवर्ड स्नोडेनने अमेरिकेच्या माहिती चोरीचे बिंग फोडल्याने सिलिकॉन व्हॅलीही हादरली. अनेक कंपन्यांनी अमेरिकी सरकारपुढे मान तुकवत मागवलेली माहिती मुकाटपणे दिली. याशिवायही तुम्ही जेव्हा गुगल वापरता तेव्हा स्पायवेअरचा वापर करून तुमची माहिती गुगलला कळत असते. गुगलमध्ये व्यक्तिगतता हळूहळू संपत चालल्याने वापरकर्ते व गुगल यांच्यातील विश्वासार्हतेची दरी संपत चालली आहे. पूर्वी गुगल ही सिलिकॉन व्हॅलीतील यशाची धवल पताका होती, पण आता वापरकर्ते त्या कंपनीकडे पूर्वीच्या प्रांजळतेने पाहात नाहीत. पूर्वीचे ते प्रेम आता ओसरू लागले आहे. एक तर गुगलचे सर्च इंजिन हे जाहिरातदारांच्या कलाने चालते. गुगलची हेरगिरी आपल्यावर चालू असते पण ती कळत नाही. असे असूनही अ‍ॅपलनंतर चांगले ब्रँड म्हणून गुगलचा नंबर लागतो व तिसरा नंबर कोका कोलाचा आहे. तुमचे गुगलवर प्रेम निरपेक्ष असले तरी गुगलचे तुमच्यावरील प्रेम निरपेक्ष नाही. जगात समजा एक लाख लोक नवीन मोटार घेऊ इच्छितात तर त्यांची संख्या जाहिरातदारांना कळून ती काय चाटायचीय, त्यांना या ग्राहकांची नावे हवीत, भले ते तुम्हाला ओळखत असोत नसोत, तुमची सगळी डिजिटल ओळख जाहिरातदारांच्या झोळीत टाकायला गुगल सज्ज आहे, म्हणूनच गुगलचे तुमच्यावरचे प्रेम हे पुतना मावशीचे आहे. जर तुम्ही गुगल प्ले स्टोअर अपडेट करायला गेलात तर तुम्हाला अ‍ॅड इनकडे नेऊन तुमची व्यक्तिगत माहिती इतर संकेतस्थळांना जाते. जाहिरातदार, सायबर गुन्हेगार असे किती तरी जण त्याचा उपयोग करीत असतात.

गुगलेतिहास
सर्च इंजिन म्हटले, की सर्वतोमुखी एकच नाव असते ते म्हणजे गुगल. गुगल शोधइंजिनाची मूळ कल्पना स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या लॅरी पेज व सर्जेई ब्रीन या विद्यार्थ्यांनी शोधून काढली. टेरी विनोगार्ड या मार्गदर्शकाने त्यांना वर्ल्ड वाइड वेबचे संशोधन करीत असताना इंटरनेटच्या पसाऱ्यात विशिष्ट गोष्ट क्षणार्धात कशी शोधता येईल यावर प्रयोग करायला सांगितले. त्यांच्या या प्रयोगाचे नाव बॅकरब असे होते. ब्रीनही त्यात सामील झाला व नॅशनल सायन्स फाऊंडेशनची स्कॉलरशिपही या प्रयोगासाठी मिळाली होती. पण त्याच वेळी रॉबिन लिवास यांनी १९९६ मध्ये रँकडेक्स हे शोधयंत्र तयार केले होते. त्यानंतर चीनमध्ये ली यांनी बायदूची स्थापना केली. तोपर्यंत पेज आणि ब्रीन यांचे प्रयोग चालू होते. त्यांनी १९९७ मध्ये बॅकरब हे जरा प्रगत सर्च इंजिन सादर केले. पहिल्यांदा शोधयंत्र स्टॅनफर्डच्या संकेतस्थळावर वापरले गेले. त्याचे डोमेन नाव गुगल डॉट स्टॅनफोर्ड डॉट एज्युकेशन असे होते. त्याची नोंदणी ४ सप्टेंबर १९९८ मध्ये झाली. गुगल या कंपनीची अधिकृत स्थापना कॅलिफोíनयात मेन्लो पार्क या इमारतीतील गॅरेजमध्ये झाली. उत्तरोत्तर प्रगती करीत गेलेल्या गुगलचे गॅरेजमधील कार्यालय सिलिकॉन व्हॅलीतील माऊंट व्हय़ू या आलिशान ठिकाणी गेले. गुगलच्या शोधयंत्राने सर्वाना आकर्षति केले, कारण त्या वेळी इंटरनेटचा प्रसारही वाढत होता. गुगलच्या लोकप्रियतेचे मूळ कारण ते वापरण्यातला सोपेपणा हे होते. २००० मध्ये गुगलने कीवर्ड व जाहिरातींची विक्री सुरू केली. कीवर्डच्या क्लिकमागे ०.०५ डॉलर आकारले जाऊ लागले. एक तर तेव्हा त्याची पाने अतिशय सुबक व चटकन पडद्यावर उतरत असत. जाहिरातींचे कीवर्ड विकण्याचे प्रारूप त्या वेळी गोटो डॉट कॉम नावाने सुरू होते. नंतर ते याहूने घेतले व बंदही पडले, तरी गुगलच्या महसुलावर परिणाम झाला नव्हता.

जर गुगल कंपनीने त्यांचे बिझिनेस मॉडेल (व्यवसाय प्रारूप) बदलले नाही व आगामी काळात नवीन क्षमतांचा वापर केला नाही, तसेच केवळ इंटरनेट वापरकर्त्यांवरच त्यांची भिस्त राहिली तर २०१६पर्यंत या कंपनीचे बुरूज ढासळू लागतील. इंटरनेट वापरकर्ते वाढतील, पण किती याला मर्यादा आहेत, त्यामुळे गुगलला आतापासूनच सावध व्हायला हवे. – असिमको, व्यवसाय विश्लेषक कंपनी

तुम्ही इंटरनेटवर जे काही बघत असता त्यापेक्षा इंटरनेट सेवा तुमच्याविषयी जास्त माहिती मिळवत असते, त्यामुळेच आता लोक व्यक्तिगततेचे रक्षण करणाऱ्या सेवांकडे वळत आहेत, आपण काही शोधायच्या ऐवजी दुसऱ्यांनी आपलाच जास्त शोध घेणाऱ्या गुगलसारख्या सेवांपेक्षा व्यक्तिगतता जास्त जपणाऱ्या सेवांकडे लोक वळत आहेत. – अ‍ॅडम टॅनर, विश्लेषक

हे माहिती असायलाच हवे
*duckduckgo- हे गुगलसारखेच शोधयंत्र आहे. तुम्ही शोध घेत असता तेव्हा ते तुमची माहिती गोळा करीत नाही.
*Blekko- गुगलपेक्षा व्यक्तिगततेला जास्त महत्त्व. तरीही त्यातील सुपरप्रायव्हसी हा पर्याय वापरावा. गुगलपेक्षा
झटपट शोध.
*wolfram Alpha- संशोधन व गणनात गुगलपेक्षा जास्त सरस.
*IxQuick- यात व्यक्तिगत माहितीचा वापर केला जात नाही, वेगही तुलनेने खूपच जास्त आहे.
*Yippy- कौटुंबिक संगणकाला जास्त चांगला पर्याय. प्रौढांसाठीचा आशय- पोर्न संकेतस्थळे वगैरे आपोआप गाळली जातात.
*Mazoom- हे शोधयंत्र स्मार्टफोन व टॅब्लेटसाठी जास्त उपयुक्त आहे. चटकन हवे ते पान काढता येते.
*Now Relevant- दोन आठवडय़ांतील घटनांचा शोध घेण्यासाठी हे शोधयंत्र आहे.
*Dogpile- सर्वसाधारणपणे चांगले शोधयंत्र.
*Joongel- एकाच वेळी दहा संकतेस्थळे शोधा.
*Facebook Search- फेसबुकसाठी प्रगत शोधयंत्र.
*Linkedin People Search- गट, कंपन्या, तुमचा व्यावसायिक अनुभव यांची देवाणघेवाण करण्यासाठी.
*Linkedin Job Search- नोकऱ्यांचा शोध घेण्यासाठी.
*Twitter Search – ट्विटर सुधारित शोधासाठी- उद्योगांना स्थानिक ग्राहक शोधण्यासाठी.
*Topsy- ट्विट शोधण्यासाठी.
*Social Mention- आवडती उत्पादने व संकतेस्थळे यांची माहिती आकडेवारीसह बघा.
*Bing Social- विशिष्ट विषयावर ट्विटर व फेसबुक शोधासाठी.
*Addictomatic- विशिष्ट विषयाचे पान तयार करण्यासाठी.
*Who’s Talkin- ब्लॉग, बातम्या, व्हिडीओ, प्रतिमा छाननी करून पाहता येतात.
*Forums- फोरम शोधासाठी.
*Boardreader- उद्योग मंचात सहभागासाठी.
*PostRank- विषयानुसार ब्लॉग शोधण्यासाठी.
*Technorati- तुमच्या आवडत्या विषयावरील ब्लॉग व पोस्ट शोधण्यासाठी.
*Regator- कुठल्याही विषयावरील ब्लॉग व पोस्ट शोधण्यासाठी.
*Docjax- मोफत ई-पुस्तके व कागदपत्रे शोधण्यासाठी.
*Scribd- ¸मूळ कागदपत्रे पाहण्यासाठी.
*Slideshare- तुमच्या आवडत्या वक्त्याच्या स्लाइड्स शो शोधण्यासाठी.
*Flickr- सुंदर छायाचित्रे बघण्यासाठी.
* Bing- छायाचित्रे, स्क्रीनशॉट, इलस्ट्रेशन, व्हिडीओ शोधण्यासाठी.
* Google- आशय, बातम्या, यूटय़ूब, छायाचित्रे शोधण्यासाठी.
* Creative Commons – छायाचित्रे वापरण्यासाठी.
* Wikimedia- इतरांनी तयार केलेले मीडिया साहित्य
तुमच्या वेबसाइटवर वापरण्यासाठी. १२ कोटी छायाचित्रे मोफत वापरासाठी.
* Yahoo – आशय, बातम्या, यूटय़ूब, बातम्या, छायाचित्रे शोधण्यासाठी.
* Blinkx- व्हिडीओ शोधण्यासाठी.
* Clipblast- व्यावसायिक व्हिडीओ शोधण्यासाठी-टीव्ही
चर्चासत्रे शोधण्यासाठी.
* Videosurf – हुलू-सीएनएन, टीएमझेड, मेटकॅफे,
फॅनकास्ट, डेलीमोशन व इतर व्हिडीओ शोधा.
* CrunchBase- ऑनलाइन ब्रँड व कंपन्या यांची माहिती.
* Quantcast- वेबसाइट प्रोफाइल
* DoubleClick Ad Planner- गुगल अकाऊंट नसताना अॅड प्लानरने मोजदाद केलेली संकेतस्थळांची माहित्Fe.
* Builtwith- तंत्रज्ञानातील नवप्रवाह शोधा.
* Google Advanced Search- संशोधनासाठी विशिष्ट लेख शोधा.
* Google Search Features- गुगलवरील पीडीएफ पुस्तके डाऊनलोड करा. गुगलवर आरोग्य माहिती व रोजच्या गरजेच्या माहितीची निवड करा.