सहजीवन हा निसर्गाचा मूलमंत्र असतो अनेक जीव एकमेकांच्या सहकार्याने वाढत असतात. मधमाश्या असाच एक इवलासा जीव आपल्या शेती उत्पादनात फार मोठी भर टाकत असतो याची कल्पना एरवी कुणाला असत नाही. जगरहाटीत सदैव बुडालेले अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी कामात सर्वाधिक व्यग्र असणाऱ्या मधमाश्यांचे आशियाने म्हणजे मधमाश्यांचे पोळे जपण्यासाठी योजना जारी केली आहे. आपल्याकडे आपण मधमाश्यांची पोळी जाळतो हे इतके चुकीचे आहे की, आपण निसर्गाच्या दृष्टीने फार मोठे पाप करीत असतो. मधमाश्या चावण्याची शक्यता असली तरी ही मधमाश्यांची पोळी जाळण्याऐवजी मधुमक्षिकापालकांना दूरध्वनी करून काढून नेण्यास सांगावी.

तथाकथित प्रगती आणि विकास यांच्या चक्रात मानवाचे निसर्गशत्रुत्व इतके वाढले आहे, की बदलत्या ऋतुमानाला शिव्या देणे, पावसाने डूख धरल्याचा शंख वाजवणे आणि कलियुगाच्या मोठमोठय़ा बाता मारणे याशिवाय त्याला काही दुसरा उद्योग राहिलेला नाही.
दुष्काळापासून ते शेतीच्या अल्पउत्पादनाला निसर्गाला जबाबदार ठरवायला सोपे असते, मात्र निसर्गाची जी पोखरणी कळत-नकळत मानवाकडून होत आहे, त्याबाबत कुणीच ऐकायला तयार नसतो. झुरळांपासून चतुरांपर्यंत आणि बेडकांपासून ते भुंग्यांपर्यंत निसर्गातला प्रत्येक  सजीव घटक हा आपले जैवउत्तरदायित्व पार पाडत असतो. मानवाचा स्वसुखासाठी त्यांच्या जिवावर उठणारा हस्तक्षेप मात्र निसर्गाच्या संतुलनाचे नियम बदलून टाकतो. भारतात इवलाशा जीव असलेल्या मधमाश्यांच्या अस्तित्वावर गदा आली आहे, तरी आपण ‘अच्छे दिनां’च्या सुंदर भ्रमात जग उपभोगाच्या नव्या टप्प्याचा शोध घेतो.
अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांमध्य मात्र याच मधमाश्यांच्या जतन-संवर्धनासाठी नवे प्रकल्प आखले जात आहेत. प्रगतीचे उद्दिष्ट ठेवलेल्या आपल्याला याची वेळीच जाणीव झाली नाही, तर येणारा काळ अवघड असेल, हे सांगायला पर्यअभ्यासकाची आवश्यकताच नाही..

ओबामांना मधुमक्षीप्रेम का?
अमेरिकेच्या कृषी उत्पादनात मधमाशांचा १५ अब्ज  डॉलरचा वाटा आहे हे सांगून खरे वाटणार नाही पण या मधमाशा परागीभवनाच्या माध्यमातून अन्नधान्याचे उत्पादन वाढवत असतात. त्यांच्या पायांना चिकटलेल्या परागकणांमुळे हे सगळे घडून येत असते. अन्न सुरक्षेत मधमाशांचा मोठा वाटा असतो. फळे, शेंगदाणे वर्गातील पिके, भाज्या यांच्यासाठी मधमाशा परागीभवनामुळे फार मोठी भूमिका पार पाडत असतात. भारतातील कृषी उत्पादन हे मधमाशांवर मोठय़ा प्रमाणावर अवलंबून आहे. अलिकडेच सुरगाणा येथे मधमाशी संचयिका सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुणे येथे मधुमक्षिका पालन संशोधन केंद्रही आहे. मधमाशांमुळे आपल्याला शेती उत्पादनात वाढ तर मिळतेच पण मधही मिळतो जो औषधी असतो.

अन्नसुरक्षेचा अविभाज्य भाग
अमेरिकेत परागीभवन हा अन्नसुरक्षेचा अविभाज्य भाग मानला जातो. आपल्याकडेही त्याच दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. काही प्रमाणात परागीभवनाचे काम अन्य प्राण्यांच्या मदतीनेही होत असते त्यांच्या पायाला, अंगाला चिकटलेले परागकण त्यांच्या फिरण्याने पसरले जातात. उत्तर अमेरिकेत पिकांचे ९० टक्के उत्पादन हे मधमाश्यांमुळे शक्य होते. ११५ अन्न-पिके ही परागीभवनावर अवलंबून असतात. त्यात कीटक, पक्षी, फुलपाखरे, पाकोळ्या यांच्यामुळे परागकण एकीकडून दुसरीकडे जात असतात, त्यामुळे बिया रुजतात व पिके वाढतात. त्यामुळे मधमाश्या कृषी अर्थव्यवस्थेस हातभार लावत असतात. एकूण २४ अब्ज डॉलर्सचे कृषी उत्पादन ते अमेरिकेत वाढवतात.

कॅलिफोर्नियातील बदाम उद्योग
कॅलिफोर्नियातील बदाम उद्योग जगप्रसिद्ध आहे तो आता संकटात आला आहे कारण तेथील मधमाश्यांची पोळी नष्ट होत आहेत. तिथे वर्षांला मधमाश्यांची १४ लाख  पोळी परागीभवनाचे काम करीत असतात. बदामाचे पीक हे पूर्ण मधमाश्यांनी केलेल्या परागीभवनावर टिकून आहे. अमेरिकेत मधमाश्यांची पोळी १९४७ मध्ये ६० लाख होती आता ती २५ लाखापर्यंत खाली आली आहेत. अमेरिकेने मधमाश्यांची एक कोटी पोळी गमावली आहेत. मधमाशीच्या एका पोळ्याची किंमत तिथे २०० डॉलर आहे. त्यामुळे मधमाश्यांची पोळी वाढवण्यासाठी अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांना लक्ष घालावे लागले आहे, एवढी ही समस्या गंभीर आहे. व्यावसायिक परागीभवनाची किंमत त्यामुळे वाढते आहे.

भाडय़ाच्या मधमाशा?
मधमाश्यांची पोळी तिथे भाडय़ाने दिली जातात त्यांचा दर २००३ मध्ये ५० डॉलर होता तो २००९ मध्ये १५० डॉलर झाला. मधमाश्या, मोनार्क बटरफ्लाईज व इतर परागीभवन मदतनीस का नष्ट होत आहेत याचा शोध अमेरिकेचा पर्यावरण विभाग घेत आहे. पुढील वर्षी अमेरिकेत मधमाशीपालनावर ५ कोटी डॉलर खर्च करण्याची तरतूद अर्थसंकल्पातच केली जाणार आहे. त्यात मधमाश्या व परागीभवनास उपयोगी कीटकांवर संशोधन केले जाणार आहे.

आपल्याकडे काय?
मध चाखायला गोड लागतो, मात्र मध तयार करणाऱ्या मधमाश्यांबाबत कुणालाही सहानुभूती नसते. देशातील वार्षिक मधउत्पादन ३० कोटी रुपयांहून अधिक इतके मोठे आहे. मात्र हे उत्पादन प्रामुख्याने जंगलाधारित आहे. मधुमक्षिकांची शेती ही प्रामुख्याने हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, हरयाणा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश येथे होते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, पूर्व घाटातील आदिवासी क्षेत्रांमध्येही मधुमक्षिकापालनाचा व्यवसाय होतो. या व्यवसायवाढीस पोषक वातावरण असूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. वाळवी लागणे, जैविक विविधता नष्ट होणे, पिकांमध्ये कीटकनाशकांचा अतिरेकी वापर आदी कारणांमुळे मधमाश्यांच्या अस्तित्वावर गदा आली आहे. मोबाइल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिओ लहरींमुळे मधमाश्यांचे संदेशवहन बिघडून त्या नष्ट होतात. याबाबत खुद्द पर्यावरणरक्षकांचेही एकमत नाही. त्यामुळे पर्यावरणाच्या सुसंवादात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या मधमाश्यांना कुणी वाली उरलेला नाही. .