भारत हा शाश्वत ऊर्जा साधनांच्या विकासात आघाडीवर आहे. काही सामाजिक संस्था ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठय़ा संस्था ऊर्जा वाचवण्याचे व स्वच्छ ऊर्जेचे प्रयोग करीत आहेत, त्यांच्यापासून इतरांनी आदर्श घ्यावा असे काम त्यांनी करून दाखवले आहे. हवामान बदलांचा वेग कमी करूनही मोठी प्रगती साधता येते, लोकांची भरभराट करता येते. सारा बटलर-स्लॉस (अ‍ॅशडेन पुरस्काराच्या संस्थापक)
शाश्वत विकास हा अलिकडच्या काळात परवलीचा शब्द झाला आहे, कारण एक ना एक दिवस वीजनिर्मिती करणे अवघड होणार आहे. इंधने संपणार आहेत, प्रदूषण वाढतेच आहे अशा स्थितीत जगात या क्षेत्रात जे अभिनव प्रयोग सुरू आहेत, त्यांची दखल घेणारे अ‍ॅशडेन पुरस्कार हे दरवर्षी दिले जातात. या पुरस्कारांना ग्रीन ऑस्कर असेही म्हटले जाते कारण त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या अभिनव प्रयोगांना उत्तेजन मिळते. यंदा भारतातील दोन संस्थांनी या पुरस्कारात बाजी मारली . उत्तर प्रदेशातील एका संस्थेला उपविजेतेपद मिळाले आहे. यापूर्वी पुण्याचे डॉ. आनंद कर्वे यांनी अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात केलेल्या प्रयोगांसाठी हा मान पटकावला होता. यंदाच्या वर्षी ज्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला त्यात ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी बंगळुरूच्या इन्फोसिस कंपनीला सुवर्ण पुरस्कार मिळाला तर मुंबईच्या ग्रीन-वे ग्रामीण या संस्थेला महिला व मुलींसाठी स्वच्छ ऊर्जा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार ४० हजार पौंडांचा असून त्याला जगात बरीच प्रतिष्ठाही मिळालेली आहे. ब्रिटनमधील सारा बटलर-स्लॉस यांनी हा पुरस्कार सुरू केला आहे. एकूण चौदा व्यक्ती व संस्थांना यंदा हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्या प्रत्येकाच्या प्रयोगांना व कल्पनाशक्तीला सलाम.

इन्फोसिस, इंडिया
बंगळुरूची इन्फोसिस कंपनी म्हटले, की नारायणमूर्ती यांच्यासारख्या वेगळ्या विचाराच्या व्यक्तीने उभी केलेली माहिती तंत्रज्ञान कंपनी असे चित्र सामोरे येते, पण नारायणमूर्ती यांनी जी कार्यसंस्कृती अधिकारी-कर्मचाऱ्यांना घालून दिली आहेत ती सामाजिक जबाबदारीची आहे. पर्यावरणाची काळजी करणारी आहे. आपण जेव्हा संगणक वापरत असतो, तेव्हा मोठय़ा प्रमाणावर वीज जळत असते, जेव्हा आपण कागदांचा अतिरेकी वापर करतो, तेव्हा त्याची निर्मिती करण्यासाठी अनेक झाडे कापली जात असतात.
जेव्हा आपण पेलाभर पाण्यातले अध्रेच पाणी पिऊन बाकीचे फेकून देतो, तेव्हा दुष्काळग्रस्तांचा, जिथे पाणी सात-आठ दिवस येत नाही, काही ठिकाणी लांब पायपीट करावे लागते त्यांची आठवण आपल्याला येत नाही. मोठय़ांचे मोठेपण इथेच असते. यंदा इन्फोसिस कंपनीला विजेचा वापर कमी केल्याद्दल आंतरराष्ट्रीय अ‍ॅशडेन सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यामागे त्यांनी विजेचा वापर ४४ टक्के म्हणजे खूपच कमी केला आहे. इन्फोसिस कंपनीची सध्याची इमारत ज्या पद्धतीने बांधली आहे, त्यात या वीज वाचवण्याचे रहस्य दडलेले आहे. वातानुकूलनासाठीचे शीत प्रकल्प, छतांना दिलेला सूर्यप्रकाश परावíतत करणारा पांढरा रंग, कमी वीज लागेल अशी इमारतींची रचना, नसíगक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर या साध्या उपायांनी या कंपनीने विजेचा खर्च ८ कोटी डॉलरने कमी केला आहे ही आश्चर्यकारक घटना आहे, पण त्यांनी साध्या उपायांनी ते करून दाखवले व त्यासाठी इच्छाशक्ती दाखवली, विजेचे मोल जाणले, खरेतर आधुनिक बांधकामामध्ये अशा पर्यावरणस्नेही इमारती तयार करणे ही काळाची गरज आहे. अगदी गृहनिर्माण सोसायटय़ांनी पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था केली तरी खूप मोठे काम उभे राहू शकते, आपण पशांचे सोंग करता येत नाही म्हणतो पण कदाचित तेही करता येईल पण आपल्याकडे भरपूर पाणी असल्याचे सोंग यापुढील काळात कुणी करू शकणार नाही.

सखी युनिक रूरल एंटरप्राइजेस
महाराष्ट्रातील उस्मानाबादच्या सखी युनिक रूरल एंटरप्राइजेस म्हणजे (एसयूआरइ) या ना नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेला महिला व मुली गटात आंतरराष्ट्रीय उपविजेतेपद मिळाले आहे. या प्रकल्पाअंतर्गत ६०० स्त्रियांना सौर कंदील, सौर चुली, निर्धूर चुली विकण्याचे खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्रातील उद्योजकांचा स्वच्छ ऊर्जा साधने विकण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. २००९ पासून ‘सखी’ ही संस्था हे काम ना नफा तत्त्वावर करीत आहे. एकूण ६०० उद्योजक ही साधने विकण्याचे काम करीत आहेत, त्यात त्यांचा आत्मविश्वास वाढला व थोडी आर्थिक प्राप्तीही झाली. या स्वच्छ ऊर्जेमुळे कामाच्या व शिक्षणाच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत कारण भारतात अजूनही लाखो घरात वीज पोहोचलेली नाही, त्यामुळे तिथे सौर कंदील हे ज्ञानदीप ठरले आहेत. अनेक महिलांना या संस्थेमुळे स्वमदतीवर उभे राहण्याची जिद्दही मिळाली आहे.
http://www.sureindia.co.in

ग्रीन-वे ग्रामीण, भारत
नेहा जुनेजा या खरेतर स्वच्छ ऊर्जा देणाऱ्या स्टोव्ह कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. एमबीएची दोन वष्रे पूर्ण केल्यानंतर त्यांना सहज एखाद्या कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली असती पण त्यांनी अंकित माथूर यांना बरोबर घेऊन त्यांनी ग्रीन-वे ग्रामीण ही संस्था स्थापन केली. भारतीय महिला अजूनही खेडय़ांमध्ये चुलीवर स्वयंपाक करतात. त्याच्या धुरामुळे त्यांना फुफ्फुसाचे आजार होतात. त्यांना रॉकेल, गॅस परवडत नसतो. जंगलातले सरपण गोळा करून ते डोक्यावरून वाहून आणून, शेणाच्या गोवऱ्या वापरून रोज चूल पेटवायची हा त्यांचा रोजचा संघर्ष असतो. त्यामुळे प्रदूषण तर होतेच पण घरासाठी कष्ट उपसणारया माउलीची घरातील लोकांना दोन घास खाऊ घालताना हेळसांड होते. हे चित्र बदलण्याच्या उद्देशातून मुंबईच्या ग्रीन-वे ग्रामीण या कंपनीने साधे स्टोव्ह विकसित केले आहेत, त्यामुळे धूर तर कमी होतोच पण अन्नही पटकन शिजते. स्वच्छ ऊर्जेसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. भारतातील ग्रामीण महिलांचे जीवनमान सुधारण्याचे श्रेय त्यांना द्यावे लागेल. या कंपनीने आतापर्यंत असे १,२०,००० निर्धूर स्टोव्ह विकले आहेत. त्याचा फायदा ६,१०,००० लोकांना झाला आहे. भारताचे एकूण पाच प्रकल्प अ‍ॅशडेनच्या शर्यतीत होते. त्यातील इतर तीन प्रकल्पांना उपविजेतेपद मिळाले आहे. घरातील हवा प्रदूषणाने दरवर्षी ४३ लाख लोक मरतात, त्यात बहुतांश स्त्रिया असतात. ज्या रॉकेल, लाकूड, गोवऱ्या यांचा धूर फुफ्फुसात गेल्याने मरतात. ही संख्या मलेरियामुळे मरण पावणाऱ्या लोकांपेक्षा सहा पटींनी अधिक आहे.

राजस्थान फलोद्यान विकास संस्था
राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशातील शेतक ऱ्यांनी शहरातून परत येऊन नव्या आत्मविश्वासाने फळबागांवर काम सुरू केले. पाणी व विजेचा कमालीचा तुटवडा असताना त्यावर मात केली. पूर्वी ते मान्सूनच्या काळात साधी पिके घेत असत. पण राजस्थानात एक संपत्ती मुबलक आहे ती म्हणजे सूर्यप्रकाश. राजस्थान फळबाग विकास संस्थेने १० हजार शेतक ऱ्यांना सौर जलपंप उपलब्ध करून दिले. त्याला ठिबक सिंचनाची जोड मिळाली, पाण्याचा वापरही कमी झाला. उच्च तंत्रज्ञानाने फलोत्पादन करून या शेतक ऱ्यांचे उत्पन्न आता दुप्पट झाले आहे, त्यांना अशी समृद्धता एरवी कधीच साधता आली नसती, सरकारचे पाठबळ व कल्पकता यामुळे त्यांना आता आशेचे नवे किरण दिसले आहेत. युसेद (यूएसएआयडी)अ‍ॅशडेन कृषी ऊर्जा पुरस्कारात राजस्थान फलोद्यान विकास संस्थेला दुसरे पारितोषिक मिळाले आहे.
http://www.krishi.rajasthan.gov.in

मेरा गाव पॉवर
उत्तर प्रदेशातील ‘मेरा गाव पॉवर’ या संस्थेलाही अ‍ॅशडेनच्या उपविजेतेपदाने गौरवण्यात आले आहे. भारताचा काही ग्रामीण भाग अजूनही तेथे विजेचे जाळे पोहोचले नसल्याने अंधारात आहे, तेथील लोकांची सौर कंदील खरेदी करण्याचीही आर्थिक कुवत नाही.
यावर मार्ग काढण्यासाठी मेरा गाव पॉवर या संस्थेने मध्यम मार्ग काढला तो म्हणजे मायक्रो ग्रीड. छोटय़ा जालकांच्या मदतीने त्यांनी खेडी उजळून टाकली. एक छोटा जालक बसवला, की ३२ घरांना सात तास वीज व मोबाइल चार्जिगची सुविधा मिळते. आजमितीस २० हजार कुटुंबांना या योजनेचा फायदा मिळाला आहे. आता तेथील मुलांना रात्रीही प्रकाशात अभ्यास करता येतो. सायंकाळी सामाजिक कार्यक्रमही करता
येतात. त्यासाठी आठवडय़ाला नाममात्र म्हणजे ४० अमेरिकी सेंट इतका खर्च येतो. रॉकेलपेक्षाही ही वीज स्वस्त आहे यावरून त्याची महती लक्षात येते.
http://www.meragaopower.com