गेल्या काही वर्षांमध्ये शेती उत्पादनांमध्ये प्रचंड वृद्धी झाली असली, तरी उत्पादनांच्या दर्जामध्ये होणाऱ्या घसरणीबद्दल फारशी चर्चा झाली नाही. साधी उदाहरणे घ्यायची झाली, तरी मुळ्यातील तिखटपणा का कमी झाला. राजमाची चव का उतरत गेली. वांग्यांचा, कडधान्यांच्या चवी का उतरल्या, याला थेट उत्तरे नाहीत. बाजारामध्ये देशी भाज्यांसोबत परदेशी भाज्यादेखील कानामागून तिखट होऊ  लागल्या आहेत. सध्या ‘ऑरगॅनिक फार्मिग’मधून आलेल्या अन्न-धान्याचे आणि ते वापरत असल्याचे अभिमानाने सांगत अन्नाची दुप्पट किंमत वसूल करणारी हॉटेल- रेस्तरांचे फॅड  वाढत आहे. पण काय ती ‘ऑरगॅनिक’ उत्पादने दावा करीत असल्याप्रमाणे शंभर टक्के शुद्ध आहेत? नुकत्याच एका पाहणीच्या निमित्ताने या विषयाचा माग..
विषयनिमित्त
पूर्वीच्या काळी फळे, भाज्या व अन्नधान्ये पिकवताना रासायनिक खते वापरली जात नव्हती त्यानंतर आपण वाढणाऱ्या तोंडांना घास भरवण्यासाठी हरितक्रांती केली . त्यात कीटकनाशके व खते यांचा मोठा वाटा होता. नंतर संकरित प्रजातीही आल्या. त्यामुळे अन्नाला पूर्वीची चव राहिली नाही अशी तक्रार सारखी केली जात असे. त्याच वातावरणावर स्वार होऊन सेंद्रिय शेतीची नवी कल्पना उदयास आली. त्यात खते व रसायने न वापरता नैसर्गिक पोषके व शेणखतासारखी खते वापरली जाऊ लागली. शेतातील पालापाचोळ्यापासून खते तयार केली जाऊ लागली. गांडळूखत तयार करण्यात आले. यात कुठेही कृत्रिम खते व रसायने नव्हती त्यामुळे सेंद्रिय शेतीचा बराच गाजावाजा झाला. अनेक ठिकाणी बुटिक स्टोअरसारखी या फळे-भाज्यांची दुकाने आहेत पण तेथे असलेल्या फळे व भाज्या किंवा अन्नधान्ये रसायने व खते न वापरता पिकवलेली आहेत याची शाश्वती नव्हती व आता तर ते सिद्धही झाले आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेने राजधानी दिल्लीत गेली दोन वर्षे असे संशोधन केले व त्यानुसार ३३ टक्के सेंद्रिय कृषी उत्पादनात कीडनाशके व रासायनिक खते वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. दुधातही मोठय़ा प्रमाणावर भेसळ असते. पावडरही वापरली जाते. आता तर आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडरीचे भाव घसरले आहेत. म्हशींना ऑक्सिटोसिनची इंजेक्शन दिली जातात त्यामुळे त्या दूध जास्त देतात. एका रासायनिक सूत्राने दूध तयार करता येते त्याचा उत्पादन खर्च ९ रुपये लिटर आहे त्याच्या विरोधात संघर्ष सुरू आहे त्यात अनेक दूध डेअऱ्यांची नावे आहेत ती बाहेर येऊ दिली जात नाहीत.
सेंद्रिय कृषी उत्पादनात सापडलेली रसायने
* अ‍ॅसेटामिप्रिड
* क्लोरोपायरिफॉस
* सेपेरमेथ्रिन
* फ्लुबेनडायमाइड
* प्रोफेनोफॉस

दिल्लीतील प्रकार
दिल्लीच्या नामवंत अशा रिटेल स्टोअर्समधून  कृषी उत्पादनांचे नमुने घेण्यात आले . जानेवारी २०१२ ते ऑक्टोबर २०१४ या काळात सेंद्रिय नावाखाली विकल्या जाणाऱ्या भाजीपाल्याचे नमुने जमवण्यात आले होते. क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडिया या उद्योग संस्थेने माहिती अधिकारात विचारलेल्या माहितीत सेंद्रिय शेतीबाबत विश्वास उडवणारी माहिती सामोरी आली . वांगी, भेंडी, टोमॅटो, सिमला मिरची, साध्या मिरच्या, फुलकोबी, कोथिंबीर व हिरवा वाटणा यात कीडनाशके आढळून आली आहेत. सेंद्रिय शेती करण्याच्या पद्धतीबाबत व ती करणाऱ्यांच्या विश्वासार्हतेवर यामुळे प्रश्नचिन्ह लागले आहे. एक प्रकारे ही ग्राहकांची फसवणूक आहे. मुंबईतही सेंद्रिय भाज्याफळे मिळणारी ठिकाणे आहेत. सरकारने तेथील नमुन्यांचीही तपासणी करायला हवी. महानगरांमध्ये अशी सेंद्रिय शेती वगैरे फॅड लवकर पसरतात कारण आपण जास्त किमतीने विकत घेतो म्हणजे ते चोख सोन्यासारखे शुद्ध असणार असा ती विकत घेण्याचे फॅड लागलेल्यांना ठाम विश्वास असतो पण तो केवळ भुलभुलैयाच ठरला आहे. एकतर या फळे, भाज्या व अन्नधान्यांचे प्रमाणीकरण करण्याची वेळ आली आहे. युरोपात द्राक्षे व हापूस आंबे नाकारली जातात तेव्हा आपण गळे काढत बसतो व नंतर आमचे तसे काही नाही हो असे ओरडून सांगण्याचा प्रयत्न करतो.  आपल्या कृषी उत्पादकांना आपल्याच लोकांची काळजी मात्र वाटत नाही त्यांच्याशी खोटे वागले तरी चालेल अशी त्यांची भावना झाली असावी. चलता है या वृत्तीतून भारतात हे प्रकार होतात. भाजीपाल्याला रंगीत द्रावणाच्या सुया टोचून लाल टोमॅटो, लाल टरबूज, पिकलेली पपई तयार करणारे महाभाग कमी नाहीत, थंडीतही पिकलेले आंबे बाजारात आणणारे आहेत पण त्यात अशीच मखलाशी असते.
निसर्गाचा जो क्रम असतो त्याच्या आधीच एखादे फळ पिकू लागले की, गडबड समजावी. यावर उपाय म्हणजे कुंडीतील भाजीपाला हा आहे पण तेवढे करायला वेळ व जागा नाही. काही महाभाग तसे करतातही. फळेभाज्यांवर फवारलेली रसायने ही धुतल्याने जात नाहीत. ती पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावणात धुवावी लागतात, तसे महाभागही आहेत. दुसरीकडे काहीही पचवणारे सामान्य लोक आहेत. प्रक्रियाकृत अन्नपदार्थावर घटक पदार्थ लिहिणे बंधनकारक असते.
तसे केले नाही तर अन्न सुरक्षा कायदा २००६ अन्वये दोषी आढळणाऱ्यास ३ लाख रुपये दंड आहे पण येथे दंड कुणाला करायचा उत्पादकाला की विक्रेत्याला हा एक प्रश्न आहे. त्यासाठी थेट शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणणे हाही एक उपाय आहे. पण प्रत्येक वेळी तसे करण्यात अडचणी येतात शहरात रोज भाजीपाला आणणे त्यांना शक्य नसते त्यांच्या मालकीची शीतगृहे नसतात.

सेंद्रिय कृषी उत्पादन म्हणजे काय?
* रसायने, खते, संकरित बियाणे, जनुकीय प्रजाती न वापरता जेव्हा भाज्या, फळे  व अन्नधान्य पिकवले जाते तेव्हा त्याला सेंद्रिय शेती असे म्हणतात. पंजाबात कीटकनाशके व रसायनांमुळे जमीन नापीक झाली तर लोकांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले, अशाच कारणांमुळे सेंद्रिय शेतीची कल्पना उदयास आली.
* सेंद्रिय पीके ही चांगल्या मातीत पारंपरिक पद्धतीने पिकवली जातात. घाण पाणी वगैरे त्यात वापरले जात नाही. त्यात प्रतिजैविके, संप्रेरके फवारली जात नाहीत. नैसर्गिक कीडनाशके वापरतात. ही उत्पादने पर्यावरणस्नेही असतात. त्यात कृत्रिम रंग वापरले जात नाहीत. त्यात कंपोस्ट खत, गांडूळ खत वापरतात, कडुनिंबाचा अर्क कीडनाशक म्हणून वापरतात. नैसर्गिक परागीभवन केले जाते.
* सेंद्रिय शेतीने मातीची धूप थांबते. प्रदूषण कमी होते. ऊर्जा कमी वापरली जाते. सूर्यशक्तीचा काही वेळा वापर केला जातो.
पक्ष्यांसाठीही सेंद्रिय वनस्पती चांगल्या असतात. शेताच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना हवेत फवारलेल्या कीडनाशकांचा त्रास होत नाही.
* सेंद्रिय शेती वाईट नसते ती चांगलीच असते ती उत्पादनेही चांगलीच असतात, पण त्यात कुणी विश्वासघात करून कीडनाशके व खते वापरली तर ग्राहकांची फसवणूक होते त्यामुळे त्यावरही लेबलिंग आवश्यक आहे. थोडक्यात माणसाची मनोवृत्ती वाईट असते.

रसायने सापडलेला कृषीमाल
* १.२४ दशलक्ष टन
* बाधित कृषी क्षेत्र -७२३००० हेक्टर