रंगीत आईस्क्रीम हा नवा प्रकार नाही पण आईस्क्रीमची चव चाखत जाल तसे रंग बदलणारे आइस्क्रीम तयार करण्यात यश आले आहे. स्पॅनिश भौतिकशास्त्रज्ञ मॅन्युअल लिनारेस यांनी रंग बदलणारे हे आईस्क्रीम तयार केले असून त्यात जिभेच्या स्पर्शाने बदलणारे तापमान व तोंडातील आम्लाचा आइस्क्रीमवर होणारा परिणाम यांचा संबंध आहे. लिनारेस यांनी एका संस्थेशी याबाबत करार केला असून ती स्पेनमधील आहे. हे आइस्क्रीम बनवण्याचे प्रशिक्षण ही संस्था देणार आहे. लिनारेस यांनी त्यांच्या मित्रांसमवेत काम करून हे आइस्क्रीम तयार केले आहे. त्याला शॅमिलिऑन या रंग बदलणाऱ्या सरडय़ाचे नाव देण्यात आले आहे. त्याची चव टुटी फ्रुटीसारखी आहे असे फिजिक्स ओआरजी या संकेतस्थळाने म्हटले आहे. सुरुवातीला हे आइस्क्रीम निळे होण्यास सुरुवात होते. नंतर गुलाबी बनते. नंतर जांभळा रंग घेते. कोनमधील आइस्क्रीम आपण चाटत जाऊ तसे ते रंग बदलते. रंगातील बदल हा त्यात वापरलेली फळे, त्यातील स्प्रिटझ हा प्रेमामृत समजला जाणारा घटक यांच्याशी संबंधित आहे. हा पदार्थ आइस्क्रीमवर फवारलेला असतो. कोनमध्ये टाकल्यानंतर हे आइस्क्रीम रंग बदलत जाते असे लिनारेस यांचे म्हणणे आहे.