डिजिटल युद्धाची गोष्ट

काळ बदलला तसे सगळीच क्षेत्रे बदलली. तंत्रज्ञानाच्या वापराने त्यांचा कायापालट केला. आजची युद्धेही त्याला अपवाद राहिलेली नाहीत.

काळ बदलला तसे सगळीच क्षेत्रे बदलली. तंत्रज्ञानाच्या वापराने त्यांचा कायापालट केला. आजची युद्धेही त्याला अपवाद राहिलेली नाहीत. काही वर्षांपूर्वी जन्मलेल्या सोशल नेटवर्किंगने आता पॅलेस्टाईन व इस्रायल यांच्यातील युद्धात महत्त्वाची भूमिका पार पाडण्यास सुरुवात केली आहे. हमासचे अतिरेकी त्यांच्या बाजूने रॉकेटचा मारा करतात, तर त्याच्या चौपट ताकदीने इस्रायलची विमाने हमासच्या ठिकाणांवर हवाई हल्ले करतात. मानवतेला लाजवील अशी प्राणहानी तिथे झाली आहे.
पॅलेस्टाईनमध्ये एक गर्भवती महिला हल्ल्यात मारली गेली पण तिच्या पोटातील बाळ मात्र डॉक्टरांनी वाचवले. याशिवाय तेथे बरेच काही घडते आहे. सोशल नेटवर्किंगचा वापर एकमेकांना सावध करण्यासाठी या देशातील लोक करीत आहेत. हमासने हिब्रू भाषेत त्यांचे ट्विटर खाते सुरू केले आहे. त्यावर त्यांनी इस्रायलींना घाबरवणारा संदेश टाकला. त्यावर इस्रायलच्या एलिझाबेथ सुरकोव या २७ वर्षांच्या महिलेने त्यातील व्याकरणाच्या चुका दाखवून हमासला खरा धडा शिकवला आहे. मध्य पूर्वेत कोण काय मनावर घेईल त्याचा अंदाज देणे कठीण असते त्यामुळे या महिलेने रॉकटचा मारा होत असतानाही दिलेला धडा तिथल्या लोकांना अनपेक्षित नाही. हमासनेही तिचे दोनदा आभार मानत चूक झाली याचे स्पष्टीकरण दिले. युद्धाच्या ज्वाळा भडकत असतानाही इकडे ही खेळीमेळी चालू होती. जेव्हा इस्रायलमध्ये इतर लोकांना एलिझाबेथने हमासच्या ट्विटरवर संदेश पाठवल्याचे कळले तेव्हा इस्रायली लोकांनी हमासला ट्विटरवर अनुसरायला सुरुवात केली.  एका रात्रीत या खात्याचे अनुसारक (फॉलोअर्स) २००० वरून ६५०० झाले खरे पण हमासला हे खाते बंद करून माघार घ्यावी लागली. हमासने दोन आठवडय़ांपूर्वी इस्रायली लोकांचे स्मार्टफोन हॅक करून त्यात भीतीदायक संदेश सोडले. नंतर त्यांनी इस्रायलला धमकावण्यासाठी फेसबुकचाही वापर केला, तेल अवीववर रात्री बरोबर नऊ वाजता हल्ला करणार असा संदेश टाकला पण त्यांची रॉकेट्स काही वेळाने तेथे पडली. तेथील लोकांनी त्यांच्या या संदेशाची कॉमिक संदेश म्हणून मजा लुटली. श्ॉलोम असायाग हा कॉमेडियन म्हणाला, हमासला ही वेळ थोडी बदलता येणार नाही का मी जरा गडबडीत आहे, त्याच्या या कॉमेंटला पाच लाख लाईक्स मिळाले, १५ लाख इस्रायलींनी तो संदेश पाहिला. इस्रायलने ऑपरेशन प्रोटेक्टिव्ह एज या मोहिमेत हमासवर हल्ले केले त्यात अनेक लोक मरण पावले. या परिस्थितीत सोशल मीडियावरही हे युद्ध लढले जात होते. एके दिवशी इस्रायली लोकांनी चॅनेल दोन चालू केले तेव्हा त्यांना हमासने एका इस्रायली सैनिकाला पकडल्याची बातमी कळली, त्याचे नाव ओरॉन शॉल असल्याचेही सांगण्यात आले. त्यावर मीठ चोळण्यासाठी म्हणून हमासने फेसबुक पेजवर या सैनिकाचा फोटो टाकून इस्रायलला चिडवले. प्रत्यक्षात शॉल हा मारला गेल्याचे इस्रायली सैन्यानेच नंतर जाहीर केले होते त्यामुळे हमासचा हा मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न होता हे उघड झाले. इस्रायलनेही हमासच्या ट्विटर पेजेसवर हमासच्या अतिरेक्यांचे खोल्यांमध्ये जाबजबाब चालू असल्याची छायाचित्रे टाकली. २००८ मध्ये जेव्हा इस्रायलने गाझावर हल्ला केला तेव्हा तो एवढा मोठाही नव्हता आणि त्यावेळी स्मार्टफोनचाही प्रसार झालेला नव्हता. यावेळी मात्र फेसबुक, ट्विटर यांच्या माध्यमातून भीती व संतापाचे निखारे पेटवण्यात आले. लिरॉन शॅमम ही तेथील टीव्ही अँकर महिला तिच्या अपार्टमेंटमध्ये बसून गाझामधील लोकांना काय वाटत असेल यावर विचार करीत होती तिने नंतर फेसबुकवर संदेशही टाकला, ती पॅलेस्टिनी पत्रकार पुरुषाशी त्यावर संपर्क साधत होती. पण अचानक संपर्क तुटला, कदाचित गाझातील तो  पत्रकार हल्ल्यामुळे आश्रयासाठी पळाला असणार.
मी त्याला शेवटी सुरक्षित राहा असा संदेश पाठवला त्यानेही तिची अशीच काळजी केली व सुरक्षित राहायला सांगितले, दोन देशातले शत्रुत्व आणि दोन माणसातील भावनांचा असा संशयकल्लोळ. नंतर शॅममच्या अपार्टमेंटवर रॉकेटच्या ज्वाळा दिसू लागल्या. तिने दुसऱ्या एका पॅलेस्टिनी महिलेशी संपर्क साधला. तिने प्रेम, समजून घेणे असले काही करण्याच्या भानगडीत न पडता शॅममवर सगळा राग व द्वेश एकाचवेळी ओतला. सर्वच इस्रायलींना पॅलेस्टिनींविषयी द्वेष नाही. एकीकडे भीती पसरवली जात असताना सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सीमेपलीकडून मिळालेला प्रेमाचा शब्द असे विरोधाभासाचे हे चित्र होते. २००८ मध्ये काही मोजक्या अरबांकडे गाझामध्ये फेसबुक होते आज तेथे तंत्रज्ञानाचा खूप प्रसार झाला आहे. इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ५८ टक्के झाली आहे. या युद्धात अ‍ॅप्स (उपयोजने) महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. इस्रायलवर रॉकेट केव्हा पडणार आहेत याचा संदेश रेड अ‍ॅलर्ट या अ‍ॅपवर मिळत होता. ५ लाख लोकांनी हे अ‍ॅप इस्रायलमध्ये डाउनलोड केले. स्नॅपचॅट, व्हॉट्सअ‍ॅप यांनी व्यक्तिगत संदेश चालू ठेवले होते. इस्रायलच्या संरक्षण दलांनी बातम्या पसरवण्यावर बंदी घातली पण या अ‍ॅप्सवरून माहिती देण्याने काही गोंधळ झाले.  व्हॉटसअ‍ॅपवर एका कुटुंबाला त्यांचा मुलगा युद्धात मारला गेल्याचा संदेश मिळाला पण प्रत्यक्षात तो जखमी झाला होता पण जिवंत होता त्या कुटुंबाचे मानसिक, भावनिक हाल अशा संदेशाने कसे झाले असतील याची कल्पनाच केलेली बरी. तिथे लोकांनी लष्कराने संदेशवहनावर घातलेली बंधने मोडली. अनेक बऱ्या वाईट गोष्टी त्यातून घडल्या, थोडक्यात रॉकेट आणि विमानांबरोबर बाहेर लढले जाणारे युद्ध, घराघरातून डिजिटल पातळीवर असे लढले जाते आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Thats इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Digital war story