भयनिर्माता

चित्रपटासारख्या दृश्यपूर्ण माध्यमांतून खऱ्या भीतीची निर्मिती झाली, अशी अटकळ बांधता येते.

चित्रपटासारख्या दृश्यपूर्ण माध्यमांतून खऱ्या भीतीची निर्मिती झाली, अशी अटकळ बांधता येते. तत्पूर्वी शतकोनुशतके मौखिक अथवा लिखित वर्णनांवरून एखाद्या भीतीयुक्त घटकाची मानवाला जाणीव असेल. चित्रपटांपासून ते साहित्यापर्यंत आणि अगदी अलिकडच्या सर्वच मनोरंजन माध्यमांपर्यंत प्रगत झालेल्या भीती साधनांचा उगम हा एकटय़ा ड्रॅक्युला नावाच्या थरारक शब्दातून आलेला आहे. चौदाव्या-पंधराव्या शतकातील या क्रूरकर्मी ड्रॅक्युलाच्या थडग्याचा नुकताच शोध लागला आहे. यानिमित्ताने साहित्यामध्ये आणि एकूणच सर्व भयरंजन व्यवहारामध्ये टिकून असलेल्या ड्रॅक्युलाच्या भयकार्यावर टाकलेला दृष्टिक्षेप
कोण होता ड्रॅक्युला?
व्लाद तृतीय प्रिन्स ऑफ वॉलाशिया नावाचा एक क्रूर राजा रोमानियात होऊन गेला. त्याला मरणानंतर काउंट व्लाद टेपीज असे म्हटले जात असे. तो सरदार घराण्यातला होता. ऑटोमन घराण्याची सत्ता युरोपमध्ये पसरवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ऑर्डर ऑफ ड्रॅगनचा वारसा त्याला लाभलेला होता. अशा या क्रूर राजाची कबर इटलीत नेपल्स येथे पुरातत्त्वशास्त्रज्ञांना सापडली आहे. ड्रॅगन-ड्रॅक्युला म्हटले, की आपल्या अंगावर काटा उभा राहतो. या व्लाद तृतीय प्रिन्स ऑफ वॉलाशियाचे चित्र पाहिले तरी भीती वाटावी. त्याचा जन्म १४३१मध्ये झाला. ऑटोमन साम्राज्याचा युरोपात विस्तार करू पाहात होता. अनेक शतके ट्रान्ससिल्वानिया आल्प्सवर त्याचा दबदबा होता. त्याच्या वडिलांचे नाव ड्रॅक्युल होते, त्यामुळे त्याचे नाव ड्रॅक्युला झाले.
थडगे इटलीत सापडले
त्याचे अवशेष इटलीतील नेपल्समध्ये सापडले. ड्रॅक्युला हा त्याच्या विरोधकांना सुळावर देत असे. त्यासाठी तो कुख्यात होता. त्याने १४६२ मध्ये डॅन्यूब नदी ओलांडली व सगळा बल्गेरिया नष्ट करून टाकला, त्या वेळी त्याने तुर्की शिपायाचे सोंग घेतले होते. त्याने त्यालेशी २३८८४ तुर्काची मुंडकी उडवून त्यांना घरातच जाळून टाकले होते. सुलतान मेहमेद द्वितीय याने नंतर ६० हजार सन्य जमवून ड्रॅक्युलाच्या वालाशियावर आक्रमण केले, त्या वेळीही ड्रॅक्युलाने १५ हजार तुर्काना ठार केले तेव्हा मेहमेदने डॅन्यूब नदी ओलांडून ड्रॅक्युलाला मारण्याचा प्रयत्न केला, पण ते जमले नाही. शेवटी मेहमेद परत गेला.
मारला गेला नाही, त्याच्या मुलीने खंडणी देऊन त्याला सोडवले
१४७६च्या युद्धात तो मारला गेला अशी वदंता होती, पण प्रत्यक्षात तो युद्धात मारला गेला नव्हता. तर इटलीत तुर्कानी कैद करून ठेवण्यात आले होते असे टॅलिन विद्यापीठाच्या संशोधकांचे म्हणणे आहे. तेथेच तो मरण पावला व नेपल्स येथे त्याचे दफन करण्यात आले. खरेतर वास्तवातील या ड्रॅक्युलाचे अवशेष रोमानियन आल्प्समध्ये सापडायला हवे होते, पण ते इटलीत नेपल्स येथे पिझ्झा सांता मारिया ला नोव्हा या स्मशानभूमीत त्याच्या जावई व मुलीला पुरण्यात आले होते. तेथेच त्याला चिरविश्रांती देण्यात आली होते. तुर्कानी त्याला साखळय़ांनी बांधून ठेवले त्याच्या मारिया नावाच्या मुलीने खंडणी देऊन त्याला सोडवले होते. नंतर मारिया  हिचा विवाह नेपोलियनच्या एका सरदाराशी झाला होता. खरेतर ड्रॅक्युला युद्धात बेपत्ता झाला किंवा मरण पावला असे सगळय़ांना वाटले होते, पण प्रत्यक्षात तसे नव्हते, त्यामुळे इतिहासाला वेगळे वळण देणारे हे संशोधन आहे.
ड्रॅक्युला कादंबरी
१८९७ साली ड्रॅक्युला नावाची कादंबरी ब्रॅम स्टोकर यांनी लिहिली. भयकथेत मोडणारी ही गोथिक कादंबरी होती व त्यात ड्रॅक्युला ट्रान्ससिल्वानियातून इंग्लंडकडे कूच करण्याचा त्याचा प्रयत्न. वाटेत प्रा. अब्राहम व्हॅन हेलसिंग यांच्या नेतृत्वाखालील स्त्री-पुरुषांना ड्रॅक्युलाने ठार केले. हे पुस्तक व्हॅम्पायर साहित्य, गोथिक कादंबरी, आक्रमणावर आधारित कादंबरी या सर्व गटात मोडते. व्हिक्टोरियन संस्कृती, लैंगिक संकेत, स्थलांतर, वसाहतवाद, वसाहतवादानंतरची स्थिती यावर त्यात प्रकाश पडतो. स्टोकरने यात व्हॅम्पायरवर प्रकाश टाकण्यापेक्षा त्याचा आधुनिक अवतार रंगवला आहे. लेखक स्टोकर हा उद्योग व्यवस्थापक होता व लंडन येथे त्याचे लेसियम थिएटर होते. त्याने अनेक सनसनाटी कादंबऱ्या लिहिल्या. त्यापूर्वीही ड्रॅक्युला साहित्यिकांच्या आकर्षणाचा विषय राहिला. शेरडियन ले फान याने १८७१ मध्ये कॅमिला ही कादंबरी लिहिली. १८१९ मध्ये जॉन पोलिडोरी याने द व्हॅम्पायर हे पुस्तक लिहिले. स्टोकरने त्याच्या ड्रॅक्युला कादंबरीचे स्वामित्व हक्क घेतले नव्हते, त्यामुळे ती अमेरिकेत खुली करण्यात आली आहे. १८९७ मध्ये प्रसिद्ध होताच ही कादंबरी बेस्ट सेलर ठरली नाही, पण नंतर मात्र स्टोकरचा क्रमांक त्याचे समकालीन मार्क शेली व एडगर अलन, एमिली ब्रॉन्टे यांच्या वर लागला.ड्रॅक्युलाची भूमिका शेक्सपीयरियन कलाकार सर हेन्री आयर्विग करीत असे. त्याच्यासाठी ती भूमिका चपखल होती, कारण तो तसाच दिसायचा. त्याला खलनायकाच्या भूमिका करायला आवडत असत. त्याने रंगमंचावर मात्र भूमिका केली नाही.ड्रॅक्युलाज गेस्ट- ही लघुकथा १९१४ मध्ये म्हणजे स्टोकरच्या निधनानंतर दोन वर्षांनी प्रसिद्ध झाली. मूळ हस्तलिखितातील पहिले प्रकरण यात काढून टाकले होते असे म्हणतात.
‘सोळाव्या शतकातील ड्रॅक्युलाचे थडगे सापडले आहे व त्याची छायाचित्रेही काढण्यात आली आहेत. ती थडगी इटालियन सरदारांप्रमाणे नाहीत, त्यामुळे प्रतीकात्मकदृष्टय़ाही ती वेगळी आहेत. ड्रॅगन याचा अर्थ ड्रॅक्युला व दोन तोंडासारखे िस्फक्स याचा अर्थ ते थेबीस म्हणजे टेपीस शहराचे निदर्शक आहेत. ड्रॅक्युला टेपीस हे त्या परगण्याचे नाव आहे.
मध्ययुगीन इतिहासाचे विद्वान राफेलो ग्लिनी
‘तुमची ड्रॅक्युला कादंबरी वाचून वाचनाचा आनंद लुटता आला. आतापर्यंत मी अनेक वर्षांत वाचलेली सर्वोत्तम गोष्ट आहे’
सर आर्थर्र कॅनन डॉयल, शेरलॉक होम्स.
कॉमिक्स
कॉमिक्समध्ये माव्‍‌र्हल कॉमकचे टॉम्ब ऑफ ड्रॅक्युला, ड्रॅक्युला लाइव्हज, २००६ मधील एक्स मेन अ‍ॅपोकॅलीप्स विरुद्ध ड्रॅक्युला यांसारखी चांगली कॉमिक आली.ड्रॅक्युला या संकल्पनेवरून मुलांच्या करमणुकीसाठी कॉमिक्सही तयार करण्यात आली त्यात सिसेम स्ट्रीट, द इलेक्ट्रीक कंपनी, कॉसग्रोव्ह यांचे काउंट ड्रॅक्युला, क्वॅकुला, काउंट चोकुला, हेल्थक्लीफ अँड िडगबॅट, ग्रेव्हडेल हाय, मॉनस्टर टेल्स, मिनी मॉनस्टर, डिस्न्ोचे, डक टेल्स, द ग्रुव्ही गुलीज, कोडनेम, कीडस नेक्स्ट डोअर, द सिम्पसन्स, ट्री हाऊस हॉरर सेरीज, लिट्ल ड्रॅक्युला, मॅड मॉन्स्टर पार्टी, स्कूबी डू अँड द घोल स्कूल, काउंट कोप्युला, कॅप्टन एन, द गेम मास्टर, रोबोट चिकन, सिसेम स्ट्री, सिसेम स्ट्रीट, अटक अँड द कलर टोमॅटोज, आय डेटेड अ रोबोट यातही आपल्याला ड्रॅक्युलाचा प्रभाव दिसतो.
ड्रॅक्युला लोकप्रिय संस्कृती
नाटके व चित्रपट
ड्रॅक्युला या विषयावर सुरुवातीला नाटके, नंतर चित्रपट, अ‍ॅनिमेशन, गेम्स, कॉमिक्स असे सर्व काही आले. त्याची सुरुवात अर्थातच १८९७ मध्ये काउंट ड्रॅक्युला या ब्रॅम स्टोकरच्या कादंबरीने झाली. ड्रॅक्युलाज डॉटर, द ब्राइड्स ऑफ ड्रॅक्युला, झोलटन, हाउंड ऑफ ड्रॅक्युला अशी अनेक नावे त्याला मिळाली. शेरलॉक होम्सनंतर ड्रॅक्युलावर सर्वाधिक म्हणजे २०० चित्रपट निघाले. विसाव्या शतकात तर तो लोकप्रिय विषय ठरला. यात जोनाथन, मिना हार्कर, डॉ. सेवर्ड, डॉ. व्हॅन हेलसिंग व रेनफील्ड ही पात्रे तर होती. मिना व ल्युसी ही महिला पात्रे होती. जोनाथन हार्कर व रेनफील्ड ही अधूनमधून डोकावणारी पात्रे होती. स्टोकर यांच्या पुस्तकानंतर १९२० मध्ये त्यावर आधारित ड्रॅक्युला हा मूकपट निघाला. नंतर १९२२ मध्ये नोसेफेराटू -अ सिंफनी ऑफ हॉरर हा चित्रपट एफ. डब्ल्यू. मुरनाऊ या दिग्दर्शकाने काढला. १९२७ मध्ये त्यावर नाटक निघाले होते. त्यावर बेतलेला ड्रॅक्युला नावाचा चित्रपट १९३१ मध्ये आला. त्यात काउंट ड्रॅक्युलाची भूमिका बेला ल्युगोसीने केली होती. मेक्सिकोत तो स्पॅनिश भाषेत प्रदर्शित झाला. त्यानंतर ड्रॅक्युलाज डॉटर (१९३६-ग्लोरिया होल्डेन), सन ऑफ ड्रॅक्युला (१९४३- लॉन चॅने ज्युनियर), हाऊस ऑफ फ्रँकस्टेन (१९४४- जॉन कार्डिन), हाऊस ऑफ ड्रॅक्युला (१९४५- कार्डिन), अबॉट अँड कॉस्टेलो मीट फ्रँकस्टेन (१९४८- ल्युगोसी). ड्रॅक्युला (१९७९- फ्रँक लँगेला). १९५८ मध्ये हॅमर फिल्म्सने ड्रॅक्युला नवीन रूपात सादर केला. त्यात ख्रिस्तोफर ली यांनी ड्रॅक्युलाची तर पीटर कुशिंग यांनी व्हॅन हेलसिंग या भूमिका केल्या. ते चित्रपट गोथिक शैलीतील होते. २००४ मध्ये टोटल फिल्म या ब्रिटिश मासिकाने त्याची गणना ब्रिटनमधील तिसावा सर्वोत्तम चित्रपट म्हणून केली होती. अमेरिकेत हा चित्रपट हॉरर ऑफ ड्रॅक्युला म्हणून प्रदर्शित झाला. त्यानंतर ली यांनी ड्रॅक्युलाची भूमिका केलेले काही चित्रपट आले. ड्रॅक्युला (१९५८- ख्रिस्तोफर ली), द ब्राइड्स ऑफ ड्रॅक्युला (१९६०), ड्रॅक्युला-प्रिन्स ऑफ डार्कनेस (१९६६- ख्रिस्तोफर ली), ड्रॅक्युला हॅड राइजन फ्रॉम ग्रेव्ह (१९६८-ख्रिस्तोफर ली), टेस्ट ऑफ ब्लड ऑफ ड्रॅक्युला (१९६९- ख्रिस्तोफर ली), स्कार्स ऑफ ड्रॅक्युला (१९७०- ख्रिस्तोफर ली), ड्रॅक्युला एडी १९७२ (१९७२- ख्रिस्तोफर ली), द सॅटनिक राइट्स ऑफ ड्रॅक्युला (१९७३- ख्रिस्तोफर ली), द लिजन्ड ऑफ द सेव्हन गोल्डन व्हॅम्पायर (१९७४- जॉन फोर्बस-रॉबर्टसन) या चित्रपटांचा त्यात समावेश आहे.
लंडनमधील लिसियम थिएटरने स्टोकरच्या पुस्तकावर ड्रॅक्युला किंवा द अन-डेड हे नाटक रंगमंचावर आणले. त्यानंतर १९२४ मध्ये हॅमिल्टन डिन यांनी ड्रॅक्युला- द व्हॅम्पायर प्ले हे नाटक आणले. १९२७ मध्ये जॉन बाल्डरसन यांनी बेला ल्युगोसी व एडवर्ड व्हॅन स्लोन यांच्या मदतीने नाटक सादर केले. १९७७ मध्ये आणखी एक नाटक त्यावर आले. त्यात फ्रँक लँगेला यांनी प्रमुख भूमिका केली होती. त्यानंतर ड्रॅक्युला-सबात (लिऑन काट्झ), ड्रॅक्युला-द व्हॅम्पायर (१९७८- टिम केली), पॅशन ऑफ ड्रॅक्युला (१९८०- बॉब हॉल व डेव्हिड रिचमंड), काउंटेस ड्रॅक्युला (१९८०-निल ब्रॉक), ड्रॅक्युला द म्युझिकल (१९८०- रिचर्ड अबॉट), आउट फॉर द काउंट (१९८६), ड्रॅक्युला- डेथ ऑफ नोसफेरा (१९९१- ख्रिस्तोफर निकोल्स), ड्रॅक्युला (१९९६- स्टीव्हन डायटझ), अनडेड ड्रीम्स ऑफ डार्कनेस व कॅरमिला (१९९८), ड्रॅक्युला- द म्युझिकल (२००१- फ्रँक वाइल्डहॉर्न, ड्रॅक्युला ऑपेरा (२००४- हेक्टर फॅबिओ टॉरेस कारडोना), ऑपेरा ड्रॅक्युला (२००५- हेक्टर फॅबिओ टॉरेस), ड्रॅक्युला (२००६- फ्रेंच कॅनेडियन संगीतिका) बाउन्सी कॅसल ड्रॅक्युला- (२००८-स्ट्रॉलिंग थिएट्रिकल्स).
कादंबऱ्या
कादंबरी प्रकारात ड्रॅक्युलाने मोठा प्रभाव पाडला आहे. स्टीफन किंगची सालेम लॉट, किम न्यूमनची अ‍ॅनो ड्रॅक्युला, फ्रेड साबेरहेगन याची द ड्रॅक्युला टेप, वेंडी स्वान्सकॉम्ब यांची पॅरडी व्हॅम्प, डॅन सिमॉन्सची चिल्ड्रेन ऑफ द नाइट, रॉबिन स्प्रिंग्जची द ड्रॅक्युला पोएम्स- द पोएटिक एनकाउंटर विथ लॉर्ड ऑफ व्हॅम्पायर्स, लॉरेन डी एसलमन यांची शेरलॉक होम्स विरुद्ध ड्रॅक्युला, जिनी कालोग्रिडीसची द डायरीज ऑफ द फॅमिली ड्रॅक्युला, एलिझाबेथ कोसोवा यांची २००५ मधील द हिस्टोरियन, मेग कॅबॉटची इनसॅटिएबल अशा अनेक कादंबऱ्या त्यात आहेत. गेममध्ये वर्ल्ड ऑफ डार्कनेस, कॅसेलेव्हानिया, लॉर्ड्स ऑफ श्ॉडो, कॅसेलव्हानिया जजमेंट, किंग्ज क्वेस्ट २, ड्रॅक्युला-रिसरेक्शन , ड्रॅक्युला द लास्ट सँकच्युअरी व ड्रॅक्युला ३, द पाथ ऑफ द ड्रॅगन हे काही साहसी खेळ यात आले.
रेडिओ
रेडिओ माध्यमातही १९३८ मध्ये ऑर्सन वेलीस व जॉन हाउसमन यांनी ड्रॅक्युलाचा पहिला रेडिओ शो सादर केला. त्यानंतर बीबीसीने रेडिओ ४ साठी शेरलॉक होम्स विरुद्ध ड्रॅक्युला- द अ‍ॅडव्हेंचर ऑफ सँगग्विनरी काउंट हा कार्यक्रम सादर केला. १९९४ मध्ये फ्रेड्रिक जॅगर यांनी बीबीसीसाठी ड्रॅक्युला मालिकेत काम केले. २००८ मध्ये बीबीसीने व्हॉएज ऑफ द डेमेटर हे नभोनाटय़ सादर केले. २०१२ मध्ये बीबीसीच्या रेडिओ ४ ने रिबेका लेन्कीविझ यांचे गोथिक इमॅजिनेशन सादर केले.
त्या मालमत्तेचे नशीबच खोटे
मध्यंतरी न्यूयॉर्कमधील मोलदोवाचे दूत मार्क मेयर यांनी ट्रान्ससिल्वानिया येथील मध्य रोमानियातील एक मालमत्ता विकायला काढली. ती मालमत्ता काही अशीतशी नव्हती. तिचे नाव होते ड्रॅक्युला कॅसल. स्थानिक लोक त्याला ब्रान कॅसल म्हणायचे, पण ती मालमत्ता विकत घेण्याची काही कुणाची हिंमत झाली नाही ती ड्रॅक्युला या त्यातील नावामुळे. खरेतर पंधराव्या शतकातील युद्धपिपासू, रक्तपिपासू व्लाग टेपीस कधीच तिथे राहिला नव्हता. पण स्टोकरच्या ड्रॅक्युला पुस्तकातील काही उल्लेखांमुळे या मालमत्तेची बदनामी झाली ती झालीच. ती काही विकली गेली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Thats इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dracula