महासत्तेची महाकुरूपता

चिनी ड्रॅगनचा विळखा पूर्ण जगाला व्यापला असून सर्व खंडांवर चीनचे नववसाहतीकरण होऊ लागले आहे. कचकडय़ाच्या वस्तूंपासून ते महाकाय तंत्रज्ञान निर्यातीमध्ये ‘चिनी जादा’ अवस्था झाली आहे.

चिनी ड्रॅगनचा विळखा पूर्ण जगाला व्यापला असून सर्व खंडांवर चीनचे नववसाहतीकरण होऊ लागले आहे. कचकडय़ाच्या वस्तूंपासून ते महाकाय तंत्रज्ञान निर्यातीमध्ये ‘चिनी जादा’ अवस्था झाली आहे. वरवर दिसणारी प्रगती पाहून आपल्या राज्यकर्त्यांनाही देशात शांघायची प्रतिरूपे तयार करायची स्वप्ने पडू लागली आहेत. मात्र भावी महासत्तेकडे झेपावणारा चिनी ड्रॅगन विविध हव्यासापायी आतून पोखरू लागला आहे. भ्रष्टाचार, नकली उत्पादने, भेसळ, प्रदूषणाचे शिखर आदींनी या देशाची महाकुरूपताच समोर येत आहे. नुकतेच भारतीय हवाई दलाचे अमेरिकी बनावटीचे सी १३० जातीचे विमान कोसळून पाच जवानांचा मृत्यू झाला, त्यानंतर त्यात चीनने बनविलेले नकली सुटे भाग जोडल्याचे पुढे आले आहे. या निमित्ताने चीनच्या या महाकुरूपतेचे दर्शन घेणे महत्त्वाचे बनले आहे..
चीन म्हटले की सामोरा येतो कम्युनिस्ट राजवटीचा पोलादी पडदा असलेला देश. ड्रॅगनचा विळखा अन् जोरदार आर्थिक प्रगतीबरोबरच असली वस्तूंची नकल केलेल्या ‘मेड इन चायना’ वस्तू. अमेरिकेविरोधात दादागिरी करू शकणारा आग्नेय आशियातील एक देश. अमेरिकेच्या सोशल नेटवर्किंग साइटला तेथे पंख मारायलाही जागा नाही. तिथे तुम्ही ट्विटरवर आक्षेपार्ह मजकूर टाकलेत, तर तीन वर्षे तुरुंगाची हवा खावी लागते. तेथील पत्रकारांना भ्रष्टाचाराची किंवा सरकारविरोधी बातमी द्यायची असेल, तर ती वुईचॅटच्या माध्यमातून करावी लागते. चीनने प्रगती जरूर केली, पण ती निष्कलंक नाही. एकतर त्यात प्रदूषणाचा शाप आहे, तर दुसरीकडे प्रगत देशांनी उत्पादित केलेल्या वस्तू उघडून हुबेहूब तशाच वस्तू तयार करणारे रिव्हर्स इंजिनीयरिंग. जपानही पूर्वी असेच करीत असे. पण नंतर त्यांनी स्वबळावर तंत्रज्ञान पुढे नेले. चीनमध्ये सर्वाधिक शोधनिबंध प्रसिद्ध होतात हे आकडेवारीसाठी खरे असले तरी त्यात असली किती अन् नकली संशोधन किती, हा प्रश्नच आहे. अगदी अलीकडे चीनचे एक शिष्टमंडळ अमेरिकेला गेले, तेथे त्यांनी एका शेतावर भेट दिली तेव्हा तिथे काम करणाऱ्या चिनी वैज्ञानिकांनी त्यांच्या शिष्टमंडळातील लोकांच्या हातात काहीतरी दिले, ही लपवाछपवी होती. त्यांनी दिले ते सुधारित पिकांच्या सुधारित वाणाचे बियाणे होते, ही बाब तत्काळ लक्षात येताच चोरून अशा कारवाया करणाऱ्या चिनी वैज्ञानिकांना पकडण्यात आले. चीनचा मित्रदेश असलेल्या पाकिस्तानचा क्षेपणास्त्र कार्यक्रमही बराचसा असली वस्तू बघून त्यांचे अनुकरण करण्याच्या पद्धतीवर आधारित आहे.

अमेरिकी विमानाची नक्कल
लहान मुलांमध्ये कुतूहल प्रचंड असते. ते नवीन आणलेले खेळणे पहिल्यांदा मोडतात. मग त्यात काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करतात. चीनचे रिव्हर्स इंजिनीअरिंग असेच चालते. ते अमेरिका व इतरही प्रगत देशांतील वस्तू आणतात. त्या उघडतात व तशा पद्धतीने नवीन वस्तू तयार करू पाहतात. त्याला रिव्हर्स इंजिनीअरिंग म्हणतात. १९९९ च्या सर्बिया युद्धात अमेरिकेचे ए-११७ नाइट हॉक हे विमान कोसळले होते. त्याचे भाग चीनने उचलून आणले. त्याचा अभ्यास करून त्यांनी चेंगडू-जे-२० हे अत्याधुनिक जेट विमान तयार केले. अन्यथा हे विमान चीनला आणखी काही वर्षे तरी तयार करता आले नसते. या विमानातील जेट इंजिन आम्ही तयार केले आहे,
मग कॉपी करण्याचा प्रश्न येतो कुठे, असे चीनचे म्हणणे आहे. कॉपी करणारा विद्यार्थी कधी खरे सांगत नसतो,
तसेच हे आहे.

भारताला असाही फटका
मध्य प्रदेश, राजस्थान सीमेवर भारतीय हवाई दलाचे अमेरिकी बनावटीचे सी १३० जे विमान कोसळले, त्यात भारतीय हवाई दलाचे पाच उमदे अधिकारी मृत्युमुखी पडले. परंतु या विमानाच्या डिस्प्ले सिस्टीममध्ये वापरलेले भाग बनावट होते व ते चीनने तयार केले होते, असे सिनेटच्या तपासणीत आढळून आले आहे. चीनच्या बनावट उत्पादनांनी एक प्रकारे ‘स्वस्तात मस्त’च्या नावाखाली बार्बी डॉलपासून विमानांपर्यंत घुसखोरी केली असून एक प्रकारे लोकांच्या जिवाशी खेळ मांडला आहे.

बनावट वस्तू बनवणारी ठिकाणे
काही शहरांची खासियत विशिष्ट बनावट वस्तू बनवण्याची आहे. वेंगगँग येथे बनावट पेन बनवतात. तांझाऊ येथे वाहनांचे बनावट भाग, तर शांझाऊ येथे सौंदर्यप्रसाधने बनवतात. लहान मुलांची दूध पावडर, बीअर अशा अनेक बनावट वस्तू ते तयार करतात. गुसी, प्राडाच्या बॅग्ज, राल्फ रॉलेन, बरबेरी, गिव्हेन्ची यांची उत्पादने बनवतात. कधी कधी बनावट रोलेक्स घडय़ाळ १२ हजार डॉलरला विकले गेल्याची उदाहरणे आहेत.

बनावट मोबाइल फोन
अ‍ॅपलचे आयफोन, सॅमसंग, ब्लॅकबेरी, नोकिया, मोटोरोला या सर्व कंपन्यांचे बनावट मोबाइल चीनमध्ये मिळतात. आयफोन १०० डॉलरला विकला जातो. तेथे विकले जाणारे ३८ टक्के फोन बनावट असतात. असली उत्पादने महाग असल्याने हे स्वस्त मोबाइल विकले जातात, पण आता असली उत्पादनांच्या किमती कमी होत चालल्याने बनावट मोबाइलची विक्री कमी होत आहे. बनावट आयफोनला दोन सिम असतात वगैरे वैशिष्टय़ेही त्यात असतात. २०१० मध्ये आठ लाख असली आयफोन विकले गेले तर २५ लाख आयफोनचे स्मगलिंग झाले. बनावट सेलफोन आफ्रिका व मध्यपूर्वेत निर्यात केले जातात. विशेष म्हणजे असली सेलफोनपेक्षा नकली फोनची निर्यातच जास्त आहे. डोंगरांनी वेढलेल्या शानझाय या ठिकाणी हा बनावट माल तयार होतो, त्यामुळे त्याला शानझाय संस्कृती असेही म्हटले जाते. तेथे तयार होणाऱ्या मोबाइलना शानझाय सेलफोन असे नाव मिळाले आहे. चीनने गुगलच्या धर्तीवर बैदू ही तशीच स्वदेशी प्रणाली तयार केली आहे.

दूध पावडरीतही गैरप्रकार
चीनमधील मुलांसाठी तयार केलेल्या दुधाची बाजारपेठ १२.४ अब्ज डॉलरची आहे. या सर्व उद्योगात मोठा भ्रष्टाचार आहे. डॉक्टरांना लाच देऊन या पावडरींची शिफारस करायला लावली जाते. डॅनवन, डय़ुमेक्स, न्युट्रिशिया या कंपन्यांनी लाचखोरीचा आरोप यात केला आहे. २००८ मध्ये दुधातील पेलॅमाइनमुळे आठ बालके दगावली. स्तनपान देणे हाच वैज्ञानिक मुद्दा तिथे सांगितला जात नाही. चिनी दुधाच्या पावडरीत अमोनियम बायकाबरेनेट व मेलॅमाइन टाकलेले असते.

अ‍ॅपलच्या आयफोनचे निर्मितीस्थान
अ‍ॅपल सिटी नावाने ओळखल्या जाणाऱ्या झेंगझाऊ शहरात तैवानच्या फॉक्सकॉन फॅक्टरीज या उपकंपनीत अमेरिकेच्या अ‍ॅपल कंपनीच्या आयफोनची निर्मिती होत असते. अ‍ॅपल ही मूळ कंपनी अमेरिकेत कॅलिफोर्नियात आहे, पण त्यांचे आयफोन जोडून तयार करण्याचे काम चीनमधील या शहरात चालते. या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना खूप अपुरे वेतन आहे. साधारण तीन लाख कामगार तिथे काम करतात. हा अर्धवट शहरीकरण झालेला भाग असून तेथील रस्ते अरुंद आहेत. आजूबाजूला काँक्रिटचे जंगल आहे. कामावर घेतानासुद्धा कर्मचाऱ्यांना अनेक कागदपत्रे दाखवावी लागतात. तेथील कामगारांना कर वजा जाता महिना १००० युआन म्हणजे १६५ डॉलर मिळतात. त्यातील ९०० युआन म्हणजे १५० डॉलर वास्तव्य व खाण्यापिण्यावर खर्च होतात. राहण्याची जागा म्हणजे धर्मशाळेसारख्या खोल्या आहेत, तिथे या कामगारांना सामूहिक वास्तव्य करावे लागते. बारा बाय बाराच्या खोलीत १५ जण राहतात. या कारखान्यातील शिफ्ट १२ ते १५ तासांची असते व तासाला १ डॉलर मिळतो. अमेरिकेत आयफोन तयार करण्याचा खर्च ६५ डॉलर येईल. चीनमध्ये तो ८ डॉलर आहे. प्रत्येक आयफोनमागे कंपनीला २५० डॉलर नफा मिळतो. कारण चीनमध्ये मनुष्यबळ स्वस्त आहे व अमेरिकेसारखे कामगारहिताचे कायदे तिथे नाहीत. अ‍ॅपलच्या आयफोनची निर्मिती चीनमध्ये होत असल्याने त्याची नकली उत्पादनेही चीनमध्येच तयार होतात. आता आयफोन सहाची छायाचित्रेही इंटरनेटवर आधीच फुटली आहेत.

सुखोई विमानाचीही नक्कल
रशियाच्या सुखोई एसयू ३३ विमानांची अशीच नक्कल केली आहे. जे-१५ हे त्यांचे विमान तुपोले टीयू-४ विमानाची कॉपी आहे. मोबाइल्स, अ‍ॅपल आयफोन, आयपॉड, सोनी प्ले स्टेशन, रोलेक्स घडय़ाळे, कोका कोला, क्रिसलर जीप्स, १०० यूआनच्या नोटा, लॉटरी तिकीट, सर्टिफिकेट्स, अँटिक आयटेम्स या व इतर अनेक गोष्टी नकली मालाच्या स्वरूपात चीनमध्ये मिळतात. लुईस व्ह्य़ूइटनची बॅग २५ डॉलर, नॉर्थ फेस जॅकेट २६ डॉलर, कार्टियर व्ॉलेट १५ डॉलर, विल्सन टेनिस रॅकेट १० डॉलर इतक्या स्वस्तात या वस्तू तिथे मिळतात. ५० ते १०० युआनच्या बनावट नोटा मिळतात. डेंग शियाओ पेंगयांच्या घरात संग्रहित वस्तू ठेवल्यात त्याही बनावट आहेत.

हुबेहूब नक्कल
‘इबे’सारख्या इंटरनेट साइटवरून ‘नाइक’ बुटांची स्वस्तातली जोडी खरेदी करावी याचा मोह अनेकांना झाला असेल. हे बूट बनावट असतात. जर बनावट सॉफ्टवेअर बंद केले, तर जगात २.४ दशलक्ष नोक ऱ्या निर्माण होतील. ५०० अब्ज डॉलरची आर्थिक उलाढाल होईल, असे बिझिनेस सॉफ्टवेअर अलायन्सने म्हटले आहे. चीनमध्ये विकल्या जाणाऱ्या संगीत, चित्रपट, सॉफ्टवेअर यांच्या ९० टक्के सीडी बनावट असतात. फुजियान व ग्वांगडाँग या ठिकाणी ते बनतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Thats इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hideousness of big power of the world

ताज्या बातम्या