यंदाचे नोबेल पारितोषिक लाइट एमिटिंग डायोड म्हणजे एलईडी तंत्रज्ञानाला मिळाले आहे. आपल्या नेहमीच्या बल्बपेक्षा ते खूप कार्यक्षम असतात हे खरे पण ते महागही असतात. वैज्ञानिक आता त्यांची किंमत कमी करण्यासाठी संशोधन करीत आहेत. त्यातील महागडय़ा घटकांना पर्याय शोधण्याचा हा प्रयत्न आहे. पांढरा शुभ्र प्रकाश देणाऱ्या एलईडीमध्ये रेअर अर्थ एलेमेंट्स फॉस्फर म्हणून वापरले जातात तेच एलईडीच्या प्रकाशाची तरंगलांबी वाढवतात. त्यामुळे आपल्याला भरपूर प्रकाश मिळतो. रेअर अर्थ एलेमेंट्सवर प्रक्रिया करणे अवघड असते. ते खाणीतून काढावे लागतात. सध्या चीन हा देश या पदार्थाचा पुरवठा करीत आहे. त्यामुळे एलईडी बल्बची किंमत जास्त असते. न्यूजर्सीच्या रुटगर विद्यापीठाचे वैज्ञानिक प्रा. जिंग ली यांच्या नेतृत्वाखाली जे संशोधन करण्यात आले. त्यात एलईडीमध्ये वापरण्यासाठी कॉपर आयोडाइड हा तुलनेने स्वस्त पर्याय सापडला आहे. अतिशय कमी खर्चाच्या प्रक्रियेने हा पदार्थ वेगळा करता येतो. सध्याच्या एलईडीपेक्षा त्यांचा प्रकाश तीव्र व ऊबदार असतो. सध्याचे एलईडी हे निळसर पांढरा प्रकाश देतात, त्यापेक्षा हा प्रकाश वेगळा आहे. जर्नल ऑफ द अमेरिकन केमिकल सोसायटी या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे. रेअर अर्थ एलेमेंट्सला सिलिकॉन फॉस्फरची स्पर्धा आहे. ते वॉशिंग्टन विद्यापीठाच्या ल्यूकीसँड या कंपनीने तयार केले आहे.