ज्ञानेश्वरांच्या उत्सवात महाराष्ट्र मागे

एकीकडे देशभरातील शाळांमध्ये शिकविले जाणारे विज्ञान अत्यंत कंटाळवाणे-निरस असल्याने देशी विज्ञानाला सुंदर भविष्य नसल्याची सत्यवाणी भारतरत्न वैज्ञानिक सीएनआर राव यांनी याच आठवडय़ात मांडली.

एकीकडे देशभरातील शाळांमध्ये शिकविले जाणारे विज्ञान अत्यंत कंटाळवाणे-निरस असल्याने देशी विज्ञानाला सुंदर भविष्य नसल्याची सत्यवाणी भारतरत्न वैज्ञानिक सीएनआर राव यांनी याच आठवडय़ात मांडली. देशात संशोधन आणि विज्ञानमय पिढी अल्पसंख्येत फुलत आहे. ज्ञानबळावर ती जगभ्रमंती करत आहे. महाराष्ट्र मात्र गेल्या काही वर्षांपासून संशोधन क्षेत्रात मागे पडू लागला आहे. ज्ञानक्षेत्रासाठी सुतराम ओळख नसलेल्या लॉस एंजेलिस येथे जगातील बुद्धिमान विद्यार्थ्यांची एक स्पर्धा नुकतीच भरली होती, मानवाला उपयोगी पडेल असे संशोधन करून दाखवण्याची. भारतातील १८ शाळा त्यात सहभागी होत्या.  दरवर्षी भरविल्या जाणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नववैज्ञानिकांमध्ये महाराष्ट्र सोडून इतर राज्यांचे वर्चस्व असते. राज्यातील  ‘विज्ञाने’श्वरांच्या’ पुढच्या पिढीच्या हाती हे चित्र बदलण्याची संधी आहे. यानिमित्ताने या स्पर्धेविषयी आणि परराज्यातील ‘ज्ञाने’श्वरांविषयी..

देशी विज्ञानेश्वरांच्या सत्यकथा
१९५८ पासून अमेरिकेत राष्ट्रीय विज्ञान स्पर्धा सुरू आहेत. दरवर्षी या स्पर्धेच्या परीक्षणासाठी नोबेल विजेत्या वैज्ञानिकांना बोलावले जाते. यंदा इंटेलच्या ‘इंटरनॅशनल सायन्स अँड इंजिनीयिरग’ या संस्थेच्या वतीने विज्ञान स्पर्धा झाली. एकूण ७८ देशांतील १८०० विद्यार्थ्यांनी या स्पध्रेत आपली बुद्धिमत्ता पणाला लावली होती, त्यात भारतातल्या १८ शाळांनी भाग घेतला होता.  त्यात काही भारतीय प्रकल्पांची निवड करण्यात आली. त्यांच्या प्रकल्पाचा लोकोपयोग लक्षात घेतला, तर  संशोधकांच्या नव्या पिढीला उत्साहाने कार्य करीत राहण्याची प्रेरणा मिळेल.

रोजच्या भाज्या-फळांतील कीटकनाशके ओळखून ती काढून टाकण्यासाठी नवी दिल्लीच्या श्रेया नंदी व कोपल गुप्ता या अमिटी इंटरनॅशनल या शाळेच्या मुलांनी एक संच तयार केला आहे. फळे व भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे व खनिजे भरपूर असतात, त्यासाठी आपण त्यांचे सेवन करतो; पण ती कीटकनाशकविरहित नसतात तरीही त्यांचे सेवन करणे थांबवता येणार नाही म्हणून कीटकनाशके शोधून ती नष्ट करण्याची पर्यावरणस्नेही साधने तयार करण्याची गरज आहे. या मुलांनी गॅस क्रोमॅटोग्राफी तंत्राने कार्बनचा वापर करून कीटकनाशकांचा फळे व भाज्यातील ९० टक्के अंश काढून टाकण्यात यश मिळवले. कीटकनाशके आहेत की नाहीत हे ओळखण्यासाठी त्यांनी काही लिटमस पेपरसारख्या पट्टय़ा तयार केल्या आहेत. त्या फळे किंवा भाज्यांवर लावताच आपल्याला त्यात कीटकनाशके आहेत की नाही हे कळते.  

* नवी दिल्लीच्या अनिमेष त्रिपाठी या विद्यार्थ्यांने या स्पध्रेत पारितोषिक पटकावले आहे. भारतात सात टक्के लोक रंगांधळे आहेत. त्यांना रंग ओळखता येत नाहीत, म्हणून या विद्यार्थ्यांने असे अ‍ॅप तयार केले आहे की, त्यांना रंगांधळेपणा राहणार नाही. अनिमेषने ‘मॅटलॅब इमेज प्रोसेसिंग’ तंत्र वापरले आहे, त्यात रंग वेगवेगळे स्पष्ट दिसून येतात. त्यात अलगॉरिथमचा वापर केला आहे. रंगांधळेपणाच्या प्रकारांचे सादृश्यीकरण त्याने केले व त्याच्याविरुद्ध प्रक्रिया शोधून संस्कारित प्रतिमा तयार करता येतील अशी व्यवस्था केली. रंगीत पदार्थाची प्रतिमा किती प्रमाणात अचूक नसते हे पाहून त्याने विविध प्रतिमांचा संच तयार केला व त्याच्या आधारे सर्वासाठी वापरता येईल असा अलगॉरिथम तयार केला. स्मार्टफोन, संगणक, ब्राऊजर प्लग इन यांची निर्मिती केली व त्यांना मॅटलॅब प्रोग्राम अनुकूल केला, त्यामुळे रंगांधळ्या लोकांना आता संगणक किंवा स्मार्टफोनच्या माध्यमातून रंगांचे आकलन होऊ शकते.

* माणसांप्रमाणेच जनावरांनाही त्वचारोग होतात. त्यावर उपाय कर्नाटकमधील पुट्टरच्या विवेकानंद इंग्रजी माध्यम शाळेच्या दीक्षा हेब्बर हिने शोधून काढला आहे. सध्या त्यावर जी औषधे उपलब्ध आहेत ती रासायनिक कीटकनाशके आहेत. ती या गाईगुरांना व माणसांना घातक असतात. या मुलीने अनाकाíडयम ऑक्सिडेंटल म्हणजे काजूच्या झाडापासून औषध तयार केले आहे, ते गाईगुरांचा त्वचारोग अगदी कमी पशात बरा करते, शिवाय त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. काजूच्या कवचाचे तेल झाडाच्या बुंध्यातून मिळणाऱ्या पदार्थात एकास एक प्रमाणात मिसळले जाते, त्यात एकास चार प्रमाणात पेट्रोलियम जेली मिसळली जाते व त्यामुळे परिणामकारक मलम तयार होते. संकरित गाईंवर याचा प्रयोग करण्यात आला.

* सौरघटातील सध्याच्या पदार्थाना पर्यायी ठरणाऱ्या घटकांचा शोध पश्चिम बंगालमधील कोलकात्याच्या साऊथ पॉइंट शाळेचा विद्यार्थी देबाप्रतिम जाना याने लावला आहे. त्याने सौरघटात महाग पडणाऱ्या फोटोव्होल्टाइक घटांना पर्याय शोधला आहे. फोटोव्होल्टाइक सेल हे पर्यावरणस्नेही नसतात, त्यामुळे त्याने जैव रंगद्रव्यांचा वापर करून सौरघटासाठी वापरलेल्या पदार्थाना पर्याय शोधला आहे. त्याने क्लोरोफायलिस, कॅरोटिन्स व अँथोसायनिन या पदार्थाचा वापर क्रोमॅटोग्राफी तंत्राने शुद्ध स्वरूपात केला आहे. या रंगद्रव्यांचे थर त्याने स्पिन कोटिंग तंत्राने बहुस्तरीय सौरघट तयार करण्यासाठी वापरले. प्रकाशाच्या सान्निध्यात त्याची प्रकाशवाहकता १० टक्के वाढलेली दिसली. बहुस्तरीय जैव रंगद्रव्ये वापरून सौरघट तयार करताना इलेक्ट्रोप्लेटिंगचा वापर केला गेला. सौरघटात वापरण्यासाठी पर्यायी नसíगक पदार्थाचा वापर हे या संशोधनाचे वैशिष्टय़ आहे.

* नवी दिल्लीच्या महाराजा अग्रसेन पब्लिक स्कूलच्या अभिषेक वर्मा व दक्ष दुआ या दोघा मुलांनी रूबस एलिप्टिकस- गियारडिया इंटेस्टायनलिस रोगावर नसíगक उपाय या विषयावर प्रकल्प सादर केला. गियारडिया इंटेस्टायनल्स म्हणजे जगात डायरियाचे कारण ठरणारा एकपेशीय जीव असतो, त्यामुळे अनेक लोक डायरियाने मरतात. दूषित पाण्यात तो आढळतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते २० कोटी लोकांना या परोपजीवीची लागण होते. भारतात हे प्रमाण हजारात ११४ म्हणजे बरेच जास्त आहे. रूबुसेलिप्टिकस ही नसíगक वनौषधी या परोजपजीवीला मारते असे या दोघा मुलांनी दाखवून दिले आहे. गियारडिया इंटेस्टायनलिस या रोगाला लगाम त्यामुळे घालता येईल. सध्या आतडय़ाच्या या रोगावर जी औषधे आहेत त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत, पण रूबुसेलिप्टिकस या वनौषधीचा अर्क वाईट परिणाम न करता या परोपजीवीला मारून अनेक माणसांना वाचवतो. या मुलांनी या गंभीर रोगावर नैसर्गिक उपाय सांगितला आहे.

*मनाली येथील गव्हर्न्मेंट सीनियर सेकंडरी स्कूलच्या जया सागर हिने ब्रासिका जूनसिया (मोहरी) फुलांचा वापर परागवाहकांना आकर्षति करून जास्त सफरचंद उत्पादन (मॅलस डोमेस्टिका) घेण्यासाठी करण्यात यश मिळवले आहे. सफरचंदे व मोहरी यांचा फुले धरण्याचा काळ सारखाच म्हणजे मार्च व एप्रिल असतो. त्यामुळे सफरचंदाच्या झाडाभोवती मोहरी लावली, तर मोहरीची भडक रंगाची फुले परागीकरण करणाऱ्या कीटकांना आकर्षून घेतात. मोहरी हा खाद्यपदार्थ आहे तसेच त्यांच्या रोपांना फार जागाही लागत नाही. मोहरीमुळे सफरचंदाला बुरशी लागत नाही, कीड लागत नाही. मोहरीच्या वनस्पतीचे हिरवे खतही तयार होते, ते सफरचंदाला उपयोगी येते. त्यामुळे कमी प्रयत्नात सफरचंदांचे जास्त उत्पादन पर्यावरणस्नेही पद्धतीने घेता येते.

* भुवनेश्वरच्या डीएव्ही स्कूलच्या अमृत साहू याने ‘व्हॉइस ओ नेटर’ नावाचे यंत्र अस्पष्ट बोलणाऱ्यांसाठी शोधून काढले आहे. अनेक लोकांना नीटपणे बोलता येत नाही, कारण त्यांच्या स्वरयंत्रात बिघाड झालेला असतो. काही शब्द बोलताना तर त्यांची जीभ चाचरते. विशिष्ट शब्दाचा उच्चार करताना आपण ओठांच्या व जिभेच्या हालचाली करीत असतो, नंतर आवाज बाहेर पडतो. या मुलाने काही विशिष्ट शब्दांचे रेकॉìडग अक्सिलरोमीटर सेन्सरच्या मदतीने केले व तो पीसीबीवर लावला. हा पीसीबी (पिंट्रेड सर्किट बोर्ड) जिभेच्या टोकावर ठेवला व दुसरा संवेदक खालच्या ओठावर ठेवला. जीभ व ओठ यांची हालचाल सहेतुक आवाज निर्माण करणारी होऊ लागली. चाचरत बोलणाऱ्या व्यक्ती आत्मविश्वासाने बोलू लागल्या. त्यांचे बोलणे मायक्रो कंट्रोलरने संस्कारक चिपकडे पाठवले जाऊन त्याचे डिजिटल संदेश संस्करण केले गेले.
शेवटी त्याच्या आऊटपुटचे संस्करण अलगॉरिथम असलेल्या चिपने केल्यावर बोलणाऱ्याला अडचणी असतानाही बोलता येऊ लागले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Thats इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra behind in science competition