विज्ञानी संकल्पना, किचकट गृहीतके, गणिती आकडेमोड यांच्यामध्ये रमणारे विद्यार्थी आजच्या तंत्र प्रगतीच्या काळात अनेकदा दिसतात. पारंपरिक पाठय़ अभ्यासापासून ते मायाजालाने उपलब्ध केलेला ज्ञानाचा अनंतासमान सागर यांच्यामुळे ठरविले, तर जगाची उलथापालथ करता येऊ शकते. विज्ञानाचा उपयोग दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी करणाऱ्या नवसंशोधकांची एक भारतीय पिढीच सध्या तयार होत आहे. प्रवासात किंवा विद्युतप्रवाह उपलब्ध नसेल, तेथे मोबाइल चार्जिग करण्यासाठी उपकरण तयार करणाऱ्या लहानग्या मुलीपासून ते सॉसच्या बॉटलमध्ये उरणाऱ्या ऐवजाला जाहिरातीत दाखविल्याप्रमाणे ‘आजा.. आजा..’चा अक्राळविक्राळ धावा करण्याची गरज लागू न देता, सहज बाहेर काढण्याच्या ‘नुस्ख्या’ला शोधणारी अभिनव निर्मात्या विद्यार्थ्यांनी जगणे अधिक सुकर करत उपयोजित विज्ञानाची कास धरलेली दिसते. भारतातील अशा अभिनव निर्मात्यांचा थेट राष्ट्रपतींकडून दरवर्षी विशेष गौरव केला जातो. पुढील संशोधक पिढीला प्रेरणा मिळावी या हेतूने या संशोधकांचा व त्यांच्या प्रयोगांबद्दल घेतलेला वेध..

स्वरक्षा उपकरण!
आपल्या स्मृती फार लवकर उडून जातात. डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीत काय घडले होते असे विचारले तर आता आपण ते विसरून गेलेलो आहोत. त्या वेळी तेथे फिजिओथेरपी शिकायला आलेल्या मुलीवर ती तिच्या मित्रासोबत जात असताना सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर त्यात तिचा मृत्यूही झाला. त्यानंतर कुणी म्हणाले, मुलींनी जवळ चाकू ठेवावा, संक्रांतीला ते वाटण्यातही आले. काहींनी तिखटाच्या पुडीचा उपाय सांगितला. कानपूरच्या एका सरकारी कारखान्याने १ लाखाची रायफलच तयार केली, पण ती परवडणार कुणाला याचा विचार केला नाही. नंतर आता उत्तर प्रदेशात काय चालले आहे ते आपण पाहतोच आहोत. तर या समस्येवर त्याच वेळी इलेक्ट्रॉनिकमधील ज्ञानाच्या आधारे चेन्नई येथील मनीषा मोहन हिने मुलींसाठी एक अंतर्वस्त्र तयार केले होते, त्यामुळे जर कुणी हल्लेखोर लगट करू लागलाच तर त्याला ३८०० किलोवॅटचा शॉक देणारे इलेक्ट्रॅनिक उपकरण तिने व तिच्या मत्रिणींनी तयार केले होते. या बहुपयोगी अंतर्वस्त्रामध्ये टेक्स्ट संदेश पाठवण्याची सोय आहे. अत्याचारग्रस्त मुलगी कुठे आहे हे शोधण्यासाठी जीपीएस सिस्टीम आहे. मनीषा मोहन हिच्या या कार्याची दखल बीबीसीनेही घेतली आहे, कारण आपल्याकडेच असे गुन्हे होतात अशातला भाग नाही. मनीषा मोहन हिला राष्ट्रपतींनी या वेळी वीस दिवसांच्या वास्तव्याचे निमंत्रण दिले आहे. तिच्याबरोबर अर्थात नीलाद्री बसू बाळ व रिंपी त्रिपाठी यांनीही काम केले होते. त्यांनी तयार केलेल्या या उपकरणाचे नाव ‘शी’ म्हणजे सोसायटी हान्रेसिंग इक्विपमेंट असे होते.

संवेदकावर हल्लेखोरांमुळे दाब पडल्यास विद्युत मंडल पूर्ण होऊन त्याला शॉक बसतो व मुलीला सावध होण्यासाठी वेळ मिळतो. नुसते एवढेच नाही तर त्याला एक अशी कळ आहे, की वातावरण असुरक्षित वाटले तर ती दाबून ती घरच्यांना किंवा पोलीस स्टेशनला सावध करू शकते. प्रत्येक मुलीला रस्त्याने सन्मानाने चालता आले पाहिजे. ग्रामीण महिलांनाही सुरक्षितता मिळाली पाहिजे.                     – मनीषा मोहन

राष्ट्रपती भवनाचा उपक्रम
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारतातील अभिनव संशोधन करणाऱ्या मुलांना २० दिवस राष्ट्रपती भवनात राहण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम
११ डिसेंबर २०१३ पासून सुरू केला आहे. यंदाच्या वर्षी अशा पाच अभिनव संशोधकांना राष्ट्रपती भवनचे आमंत्रण आहे. त्यात १६ वर्षांचा टेनिथ आदित्य, मनीषा मोहन, धर्मवीर कंबोद, गुरुमेल सिंग, एम. बी. अविनाश यांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनाने ही अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणण्यामागे मुलांना त्यांचे संशोधन प्रकल्प पुढे नेण्याची संधी मिळावी हाच उद्देश आहे. तेथे त्यांना तंत्र संस्थांशी संपर्क साधून दिला जातो, जेणे करून या उपकरणांची मोठय़ा प्रमाणात व किफायतशीर दरात उपलब्धता करता येईल. त्यांच्या संशोधनाच्या प्रत्यक्षातील वापराने समाजकल्याण शक्य होईल.

बहु‘प्लगर’!
राष्ट्रपतींचे निमंत्रण मिळालेला टेनिथ आदित्य तामिळनाडूतील विरुधुनगरचा आहे. त्याने २०१३च्या स्पध्रेत सातवा अभिनव संशोधन पुरस्कार पटकावला आहे. ग्रासरूट इनोव्हेटर्स गटातील त्याचे संशोधन असून तो अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. तुम्ही विजेचा वापर करत असता तेव्हा एकाच विद्युत उपकरणावर अनेक उपकरणे चालतात हे बघितले असेल, ज्याला इलेक्ट्रिक एक्स्टेन्शन असे म्हणतात. तर या एक्स्टेन्शन बोर्डवर जास्तीत जास्त उपकरणे कशी चालवता येतील याबाबतचे प्रयोग टेनिथ याने केले. त्यासाठी त्याला अनेक विस्तार वायर्स वापराव्या लागल्या. त्यामुळे प्लग पॉइंट वाढवता आले, जिथे आपण पिन खोचतो. त्याने असा जास्तीत जास्त प्लग पॉइंट असलेला बोर्ड तयार केलेला आहे. त्याने वयाच्या १२व्या वर्षी संगणकाचे ८ गेम, ५ सॉफ्टवेअर्स तयार केली आहेत, त्यामुळे संगणकातही त्याला गती असून त्याच्या नावाने दोन गिनेस बुक रेकॉर्ड आहेत. वयाच्या तेराव्या वर्षी त्याने जगातला सर्वात जास्त लांबलचक चालणारा संगणक प्रोग्रॅम (आज्ञावली) तयार केला तो ५७० वष्रे चालतो. हा शोध त्याने १३व्या वर्षी लावला आहे. नाणी जमवण्याचाही त्याला छंद आहे, वेगळय़ा काळातील नोटा जमवणे, दुर्मीळ वस्तू, पाळीव प्राणी हे त्याचे छंद आहेत. त्याच्याकडे पाच हजार नाणी व २५० चलनी नोटा आहेत. तो संशोधक होऊ इच्छितो. त्यातून लोकांचे जीवन सुखी करणे हाच त्याचा उद्देश आहे. एकदा तर रसायनशास्त्राचा प्रयोग करत असताना विषारी धूर त्याच्या नाकात गेला. त्याला रुग्णालयात ठेवले तरी तो आईवडिलांना म्हणाला काय, ‘विज्ञानात मोठा त्याग करावा लागतो.’ त्यामुळे त्याचे आईवडील आणखी घाबरले व त्यांनी त्याला पुन्हा रसायने हाताळू दिली नाहीत. त्याला हा पुरस्कार केळीची पाने वर्षभर ताजी ठेवण्यासाठी व इलेक्ट्रिसिटी एक्स्टेन्शन बोर्डसाठी देण्यात आला आहे.

केळीची पाने दोन दिवसांत सुकून जातात. ती ताजी ठेवण्यासाठी आपण संशोधन केले. त्यासाठी पेटंट अर्ज केला आहे. रसायने न वापरता केळीची पाने ताजी ठेवता येतात. पाने जतन करताना ती जास्त तापमानामुळे वजनदार होतात, टिकत नाहीत. वनस्पतीच्या पेशीभित्तिका या जंतूंना पेशींचा नाश करण्यासापासून रोखतात. त्याचा वापर यात केला आहे. ही पाने जैवविघटनशील असतात. पर्यावरणस्नेही असतात व प्लॅस्टिकपेक्षा ८० टक्के किफायतशीर असतात.  
टेनिथ आदित्य

कृषिमित्र!
राजस्थानमधील गंगानगरसारख्या फारशा प्रगत नसलेल्या गावातले गुरमेलसिंग ढोन्सी यांना कृषी सामग्री गटात सहावा अभिनवता पुरस्कार मिळाला आहे. फॅब्रिकेटर असलेल्या गुरमेलसिंग ढोन्सी यांनी अनेक कृषी उपकरणे व माती उचलणारी मोठी यंत्रे तयार केली आहेत. ट्रॅक्टरवर बसवायचे कंपोस्ट निर्माण करणारे ढोन्सी ५५ वर्षांचे आहेत, पण नवीन काही तरी करण्याचा त्यांचा उत्साह दांडगा आहे. काही वेळा शेतातील अनावश्यक झाडे काढावी लागतात तेव्हा प्रुनर हे यंत्र वापरतात. ढोन्सी यांनी ट्रॅक्टरवर बसू शकेल असे हे यंत्र तयार केले आहे. एका वेळी १८ ते २० फूट उंचीची २०० झाडे ते काढू शकते. समजा, नुसत्या फांद्या कापायच्या असतील तर २० फूट उंचीच्या झाडांच्या फांद्या ते कापू शकते. जर १२ ते १५ फूट उंचीची झाडे असतील तर एका वेळी १० फूट व्यासाच्या भागातील झाडांच्या फांद्या ते कापू शकते. राजस्थानातील गंगानगर भागात ते राहतात. हा भाग म्हणजे राजस्थानचे धान्याचे कोठार समजला जातो. तेथे त्यांनी अनेकांना वस्तू तयार करून दिल्या, पण ते फसवले गेले. ते म्हणतात, मी कागदावर चित्र काढतो व त्यानुसार यंत्र तयार करतो. त्यांनी आतापर्यंत २२ लाख रुपये पदरमोड करून संशोधन केले आहे. जर्मन ट्रॅक्टरमध्ये सुधारणा, किलरेस्कर इंजिन्समध्ये सुधारणा, रॉकेलवर मोटारसायकल चालवणे असले अनेक प्रयोग त्यांनी सुरुवातीला केले, पण त्यातूनच त्यांच्या जीवनाला दिशा मिळत गेली. फिरोझपूरचे संतोषकुमार जाखड या शेतकऱ्याने त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. व्हर्मी कंपोस्ट तयार व्हायला पंधरा दिवस लागतात ते लवकर का तयार होत नाही, झाले. ढोन्सी अहोरात्र कामाला लागले. तीन महिन्यांत त्यांनी असे यंत्र तयार केले जे दिवसाला दीड टन कंपोस्ट खत देते. त्याची किंमत १ लाख साठ हजार आहे. त्यांचे नवीन व्हर्मी कंपोस्ट यंत्र तीन लाखांचे आहे.

स्वच्छतेचा पुजारी
जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड सायंटिफिक रीसर्च येथील एम. बी. अविनाश यांनी गोिवदराजू यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून स्वत:हून स्वच्छ होणारा पृष्ठभाग तयार केला आहे. त्यातील धूळ आपोआप स्वच्छ होते. कमळाचे पान हे त्याचे निसर्गातील मोठे उदाहरण आहे. आपण घरात जर बघितले तर प्रत्येक ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर धूळ बसलेली असते व ती साफ केली तर दुसऱ्याच दिवशी तेवढी धूळ परत बसलेली दिसते. अविनाश यांच्या मते स्वच्छता गुणधर्म हा आपण कमळाच्या पानाकडून शिकलो. त्यातून आपण ही रचना केली. कमळाच्या पानावर कधीही धूळ किंवा पाणी जमूच शकत नाही. म्हणजे त्याची काही तरी रचना असली पाहिजे किंवा गुणधर्म असले पाहिजेत. त्यांची जैविक नक्कल आपल्या नेहमीच्या वस्तूत करता येईल का असा विचार केला.

सध्या अशा प्रकारे धूळ आपोआप स्वच्छ होणाऱ्या पदार्थावर अगदी पातळसा म्हणजे ५० मि.मी. ते १ मि.मी.चा सोन्याचा थर द्यावा लागतो ही तोटय़ाची बाजू आहे. हे तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय पातळीवर वाखाणले गेले आहे. एखाद्या स्वस्त पदार्थाचा थर देऊन ते जमले तर त्याची किंमत कमी करता येईल.
– एम. बी. अविनाश