उन्हाळ्यात भाजून निघालेली धरित्री पावसाच्या थेंबांच्या स्पर्शाला आसुसलेली असते, बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसलेला असतो. तहानलेले प्राणी, पक्षीसुद्धा त्याची म्हणजे पर्जन्यराजाची आतुरतेने वाट पाहात असतात. मान्सूनचा मागोवा घेणारी माणसेच असली तरी मान्सून आल्याची वर्दी किंवा पावसाची वर्दी निसर्गच करून देत असतो. मोराचं नाचणं हे त्याच्या जोडीदारीणीला म्हणजे लांडोरीला आकर्षति करून घेणारं असलं तरी पाऊस येण्याची वर्दी तो देत असतो, पेत्रे व्हा नावाचा पक्षी बळीराजाला पेरणी करायला सांगत असतो. यंदा तर पाऊस गेल्या वर्षीपेक्षाही कमी पडणार आहे म्हणे. मग प्रशांत महासागरातील एल निनोकडे आपण बोट दाखवून मोकळे होतो. एल निनो जलप्रवाहांच्या तापमानामुळे कुठे दुष्काळ कुठे पूर अशी टोकाची परिस्थिती भीती जाणवते. त्यात तो
 ला निना नावाचा उलटा परिणाम असतो वगरे विसरून फक्त एल निनोला घाबरून बसलेला असतो. निसर्गातील प्राणी-पक्षी मात्र कशाला घाबरत नसतात ते सदैव आला क्षण आनंदात घालवतात. मोराचचं उदाहरण घ्यायचं झालं तर तो काळे मेघ पाहताच पिसारा फुलवून नाचू लागतो. यात केवळ प्रणयाराधन हेच कारण असतं असं नाही तर तो चक्क पावसाची वर्दी देत असतो. मोराला शास्त्रीय भाषेत पी औल असे म्हणतात. हा पक्षी मूळ भारत निवासी असून त्याला राष्ट्रीय पक्ष्याचा दर्जा मिळाला तो १९६३ या वर्षांत. पुणे जिल्ह्यात शिरूरजवळ (पाबळ) मोराची चिंचोली नावाचं एक गाव आहे. ते खास मोरांसाठी प्रसिद्ध आहे. ते मोरांचं अभयारण्य आहे. लोकांनी तयार केलेल्या या अभयारण्यात मोर आनंदाने राहात आहेत. तिथे ३००० मोर, नीळकंठ पक्षी, भारद्वाज आहेत. तेथील लोक मोरांची माणसासारखी काळजी घेतात.
कसा असतो मोर..
मोर हा लांब पायाचा पक्षी आहे. डोक्याकडे निळा-हिरवट व जांभळट असतो, डोक्यावर तुरा असतो. काही वेळा त्याच्या चेहऱ्यावर पांढरे पट्टे आढळतात, त्याचा पिसारा हे त्याचे खरे आकर्षण असते. त्याची शेपटीकडील पिसे लहान असतात व बाकी इतर वीस पिसे मोठी असतात. मोर थोडेसेच अंतर उडू शकतो. तो मिश्राहारी आहे. अन्नधान्य, सरपटणारे प्राणी तो खातो. मोराचा मिलनकाल एप्रिल ते सप्टेंबर असतो. मोराची मादी म्हणजे पी हेन ४ ते ८ अंडी घालते. २८ दिवस उबवल्यानंतर त्यातून पिलू बाहेर येते. मोरांचे भारतातील निळा, बर्मामधील हिरवा व कांगो मोर असे प्रकार आहेत. भारतात राजस्थानचे वाळवंट, गुजरातचा नदीकिनारा, मध्य प्रदेश, हिमालयाचा पायथा, उत्तर प्रदेश, हरयाणातील जंगले येथे मोर सापडतात, पण त्यांच्या शिकारीचे प्रमाणही वाढले आहे. मोर जंगलात १५-२० वष्रे जगत असेल तर तो बंदिस्त जागेत ३५ वष्रे जगतो. मोराच्या पिसात ५० रंगछठा असतात. मोर अकरा प्रकारचे आवाज काढत असतो. मोराच्या पिसाऱ्यामुळे त्याची लांबी ६० टक्के वाढते. तो उडणारा सर्वात मोठा पक्षी आहे. त्याची लांबी  आठ फूट असते पण मूळ शरीर पाच फूट असते, लांडोर मोराचा आकार, रंग, पिसांचा दर्जा, डोळ्यांजवळील रंग यावरून त्याची जोडीदार म्हणून निवड करतात त्याचे वजन ४ ते ६ किलो असते.
आख्यायिका
मोराविषयी बऱ्याच आख्यायिका आहेत. मोर आपल्या डोळ्यांपुढे येतो तो सरस्वती म्हणजे विद्य्ोच्या देवतेचे वाहन म्हणून. जेव्हा इंद्राने प्राण्याचे रूप घ्यायचे ठरवले तेव्हा तो मोराचे रूप घेऊन आला असे म्हणतात. मोराच्या पिसावर शेकडो डोळे असतात. जावामध्ये मोर अशुभ मानतात. उत्तर इराकमधील मोसुल येथील येझदी लोक त्याला देवदूत मानात. मोर जोडीदाराशी एकनिष्ठ असतो असे मानतात. तो मरतो तेव्हा जोडीदाराचाही मत्यू होतो असे म्हणतात. मोराला सोन्याचे वावडे असते त्याच्या जवळही तो जात नाही. मोर नाचताना पावसाची वर्दी देतो पण मोर रडायला लागला तर कुणाच्या निधनाचे ते सूचन असते. िहदू धर्मशास्त्राप्रमाणे मोराला देवदूताचे पंख, अशुभाचा आवाज, चोर पावले आहेत, तो लक्ष्मी व ब्रह्मा यांचेही वाहन बनतो. कामदेवताही त्याच्यावर आरूढ होते. भारतीय तत्त्वज्ञानाच्या प्रत्येख घटकाचे प्रतिनिधीत्व तो करतो, सम्राट अशोकाच्या काळात मोर व हरणाची हत्या हा गुन्हा होता. औरंगजेबानेही  मोराच्या हत्येवर बंदी घातली होती. मोर म्हणजे जिवंत इंद्रधनुष्य असते, स्वर्गीय सौंदर्याचे प्रतीक असते. त्याच्या नाचण्याचे मराठीतील सर्वात सुंदर वर्णन ग. दि. माडगूळकरांनी ‘नाच रे मोरा’ या कवितेत केले आहे. मोराच्या नाचण्याइतकाच ठेका धरायला लावणाऱ्या या कवितेने कृष्णमेघ व मोरांचं आनंदित होणं सगळं काही समर्थ शब्दांनी त्यात टिपलं आहे.