हेरिटेज वॉच
या वेळी २६ नवीन ठिकाणांना जागतिक वारसा दर्जा देण्यात आला आहे. आतापर्यंत १६१ देशांतील १००७ ठिकाणांना हा दर्जा मिळाला आहे. भारतातील ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क व गुजरातमधील पाटण जिल्ह्य़ात असलेल्या राणी की वाव या पायऱ्यांच्या विहिरीला जागतिक वारशाचा दर्जा मिळाला आहे.
कतारमधील दोहा येथे जागतिक वारसा समितीची बैठक झाली, त्यात म्यानमारच्या एका मालमत्तेला प्रथमच जागतिक वारसा दर्जा मिळाला आहे. कतारचे पंतप्रधान अब्दुल्ला बिन नासेर बिन खलिफा अल थानी यांनी नसíगक आपत्तींपासून जागतिक वारसा ठिकाणांचे जतन करण्यासाठी १ कोटी डॉलरची देणगी जाहीर केली आहे. गेल्या वर्षी भारतातील पश्चिम घाटाला हा दर्जा मिळाला होता, त्यात साताऱ्याच्या कास पठाराचा समावेश होता.

ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क
हिमालयाच्या पर्वतराजीतील ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कची निवडही जागतिक वारसा म्हणून करण्यात आली आहे. हे उद्यान हिमाचल प्रदेश या भारताच्या उत्तरेकडील राज्यात कुल्लू जिल्ह्य़ात असून तिथे अल्पाइन शिखरे, अल्पाइन कुरणे आहेत. एकूण ९० हजार ५४० हेक्टर जागेत ते वसलेले असून डोंगरावरील हिमनद्यांचे पाणी येथील नद्यांना मिळते. सखल भागात राहणाऱ्या लोकांना या पाण्याचा फायदा होतो. मान्सूनचा फटका बसणारी जंगले व अल्पाइन कुरणे यांचे संरक्षण या उद्यानामुळे होते. जैवविविधता तेथे मोठय़ा प्रमाणावर आहे. अनेक प्रकारची फुलझाडे तर तिथे आहेतच, शिवाय ती धोक्यात आली आहेत. किमान २५ प्रकारची जंगले या भागात आहेत. जैवविविधता या निकषावर त्याची जागतिक वारसा दर्जासाठी निवड करण्यात आली आहे. केदारनाथ मंदिर याच परिसरात असून तीर्थन, सन्ज, जिवा नाल, पार्वती या नाल्यांचा प्रमुख जलस्रोत या उद्यानातील हिमनद्या आहेत. त्यांचीच पुढे एकत्र येऊन बियास नदी तयार होते. या उद्यानाचा १७ टक्के भाग जंगलाखाली असून तेथे ८३२ वनस्पतींच्या प्रजाती आहेत व उंच भागात टिकू न शकणाऱ्या १२७ वनस्पती असून तेथे पक्ष्यांच्या १८३ प्रजाती आहेत. ३१ प्रकारचे सस्तन प्राणी, हिम बिबटय़ा, आशियायी काळे अस्वल, हिमालयीन तपकिरी अस्वल, ग्रे गोराल (काळविटासारखा प्राणी) व हिमालयन कस्तुरी मृग यांचे तेथे
वास्तव्य आहे.

यंदाच्या यादीतील दावेदार
कर्नाटकात दख्खनच्या सुलतानाने बांधलेले किल्ले, िहदू व इस्लाम स्थापत्यकलेची छाप असलेली अनेक स्मारके, युनेस्कोच्या जागतिक दर्जासाठी स्पध्रेत होत्या त्यात श्रीरंगपट्टनममधील ऐतिहासिक इमारती व किल्ला, गुलबर्गातील बहामनी स्मारके, बिदरमधील बहामीन व बरीद शाही स्मारके, विजापूरमधील आदिलशाहीच्या मालमत्ता, बेल्लूर व हालेबीड येथील काही इमारती यांचा समावेश होता. गुजरातमधील गीर व गिरनार यांचाही शर्यतीत समावेश होता. ही सांस्कृतिक व नसíगक ठिकाणे असून गीरचे जंगल आशियायी सिंहांसाठी प्रसिद्ध आहे. तेथेच गिरनार टेकडय़ा, उपरकोट, जुनागड गुंफा, अशोकाच्या काळातील शिलालेख, आदी की वाव, नवघन कुवो, बौद्ध गुंफा यांचा समावेश आहे. इतर ज्या ठिकाणांची यंदाच्या वर्षी जागतिक वारसा दर्जासाठी शिफारस झाली होती त्यात अरुणाचल प्रदेशातील अपाटणी सांस्कृतिक लँडस्केप, गुजरातमधील लोथल येथील पुरातत्त्वशास्त्रीय अवशेष, नवी दिल्लीचे बहाईंचे लोटस मंदिर, अंदमान बेटांवरील सावरकरांना बंदिवासात ठेवले होते ते सेल्युलर जेल, तामिळनाडूतील चेट्टीनाडची ग्रामसंकुले, ओडिशातील चिल्का सरोवर, भुवनेश्वर येथील एकामरा क्षेत्र, भारतातील विशिष्ट साडय़ांची विणकाम संकुले, तामिळनाडूतील पद्मनाभपूरम मंदिर, अंदमान निकोबार बेटांवरील नारकोडॅम बेटे, जम्मू-काश्मीरमधील नवअश्मयुगीन बुर्झाहोम वसाहती, भारतातील थेंबांग तटबंदी खेडे, काकटिया मंदिर, अहिंसक स्वातंत्र्य आंदोलनाचे प्रतीक असलेल्या सत्याग्रहाची ठिकाणे, बादशाही मार्गालगतची ठिकाणे, अहोम राजघराण्याच्या अंत्यसंस्काराचे मोकलम हे ठिकाण, श्रीरंगम येथील रंगनाथस्वामी मंदिर अशा अनेक वास्तू व ठिकाणांची शिफारस करण्यात आली होती. त्यात फक्त दोन ठिकाणांची निवड झाली आहे.

निकष काय
या ठिकाणांची निवड करताना मानवी सर्जनशीलतेने निर्माण केलेल्या उत्कृष्ट कलाकृतीची निवड होऊ शकते. जगाच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मानवी मूल्ये, स्थापत्य रचना, स्मारकाची कलाकृती, शहर नियोजन किंवा लँडस्केप डिझाइन यांचाही विचार केला जातो. नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या किंवा अस्तित्वात असलेल्या वेगळ्या मानवी संस्कृतीची निवडही केली जाऊ शकते. पारंपरिक मानवी वसाहती, सागर व जमिनीचा अभिनव वापर, पर्यावरणाशी मानवी संबंध असेही निकष यात लावले जातात. काही महत्त्वाच्या घटना, कल्पना, परंपरा, वैश्विक महत्त्वाचे साहित्य, कला यांचाही विचार यात केला जातो. नसíगक सौंदर्य हा एक घटक नसíगक ठिकाणांची निवड करताना वापरला जातो. पृथ्वीचा इतिहास, त्यातील महत्त्वाच्या टप्प्यातील निदर्शक घटना, भूगर्भशास्त्रीय प्रक्रिया, वनस्पती व प्राणी यांचे समुदाय, सागरी परिसंस्था, जैवविविधतेचे रक्षण, विज्ञान व संवर्धनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वही बघितले जाते.

राणी की वाव
गुजरातमधील पाटण जिल्ह्य़ात वायव्येला दोन कि.मी. अंतरावर अकराव्या-बाराव्या शतकात एका राजाने बांधलेली राणी की वाव ही पायऱ्यांची विहीर आहे, तिला जागतिक वारसा दर्जा मिळाला आहे. ही विहीर सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर आहे. पायऱ्यांची विहीर ही संकल्पना पाणी साठवणीसाठी भारतीय उपखंडात पूर्वीपासून वापरली जाते. सुरुवातीला तिथे एक मातीचा खड्डा होता त्यातून अनेक मजल्यांची ही विहीर उभी राहिली. ती एक कलाकृतीही आहे. राणी की वाव त्या काळात शक्य असलेल्या उंचीपर्यंत बांधलेली असून मारू गुर्जरा बांधकाम पद्धतीचा वापर त्यात केलेला आहे. प्रमाणबद्धता व सौंदर्य हे या शैलीचे महत्त्व आहे. उतरत्या मंदिराप्रमाणे (इनव्हर्टेड टेम्पल) पद्धतीमुळे पाण्याची स्वच्छता राखण्यास मदत होत असे. जिन्यांच्या सात पातळ्या त्यात आहेत. अतिशय उत्तम दर्जाच्या शिल्पपट्टिकांचा वापर त्यात केलेला आहे. ८०० प्रमुख शिल्पे, हजारो आरसे यांचा वापर करून बांधलेली ही विहीर धार्मिक, पौराणिक व धर्मनिरपेक्ष प्रतिमांकनाची साक्षीदार आहे. त्यातील शिल्पांत हिंदू देवदेवता, अप्सरांचा दरबार अशी चित्रे रेखाटलेली आहेत. आता काळाच्या ओघात त्यातील ४०० शिल्पे शिल्लक आहेत. अनेक साहित्यकृतींमध्ये राणी की वावचा उल्लेख आलेला आहे. १९९८ पासून या ठिकाणाची शिफारस जागतिक वारसा दर्जासाठी केली जात होती. तिची चौथी पातळी आयताकार व खोल असून ही एक टाकी आहे. तिचा आकार ९.५ मीटर बाय ९.४ मीटर असून खोली २३ मीटर आहे. त्याला १० मीटर व्यासाचा व ३० मीटर खोलीचा शाफ्ट (कूपक) लावलेला आहे.

जागतिक वारशांचा भारत
आग्रा किल्ला- आग्रा, उत्तर प्रदेश
अजंठा गुंफा- महाराष्ट्र
सांची येथील बौद्ध स्मारके, मध्य प्रदेश
चंपानेर- पावागड पुरातत्त्व उद्यान, गुजरात
छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र
चच्रेस अँड कॉनव्हेंट्स ऑफ गोवा- वेल्हा, गोवा<br />एलेफंटा गुंफा, महाराष्ट्र
फत्तेपूर सिक्री, उत्तर प्रदेश
चोला मंदिरे- ऐरावतेश्वर मंदिर, दारासुरम मंदिर, बृहदेश्वर मंदिर, तंजावर. (तामिळनाडू)
हंपी स्मारक समूह- बेळ्ळारी , कर्नाटक
महाबलीपूरम मंदिरे- तामिळनाडू
पट्टाडकाल समूह-कर्नाटक
राजस्थानचे पर्वतीय किल्ले (चितोडगड, कुंभालगड, रणथंबोर, अंबेर, जैसलमेर
हुमायूनची कबर, दिल्ली
खजुराहो मंदिर, मध्य प्रदेश
महाबोधी मंदिर बोधगया (बिहार)
भारतातील पर्वतीय रेल्वे- निलगिरी पर्वतीय रेल्वे, उटी, तामिळनाडू, दार्जििलग हिमालय रेल्वे (पश्चिम बंगाल) काल्का-सिमला रेल्वे (हिमाचल प्रदेश)
कुतुबमिनार- दिल्ली
राणी की वाव, पाटण, गुजरात
लाल किल्ला, दिल्ली
भीमबेटका , भोपाळ मध्य प्रदेश
कोणार्क सूर्यमंदिर- पुरी, ओडिशा
ताजमहाल- आग्रा, उत्तर प्रदेश
जंतरमंतर (जयपूर)
ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क- हिमाचल प्रदेश
काझिरंगा नॅशनल पार्क- आसाम
केवलदेव नॅशनल पार्क- भरतपूर, राजस्थान
मानस वन्यजीव अभयारण्य, आसाम
नंदादेवी व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स- चमोली (उत्तराखंड)
सुंदरबन नॅशनल पार्क, बांगला देश, पश्चिम बंगाल
पश्चिम घाट ( कास पठार, व्याघ्र प्रकल्प यासह पेरियार, अण्णामलाई, तलाकावेरी, कुद्रेमुख,
सह्य़ाद्री निलगिरी)