प्रसिद्ध चॉकलेटिअर आणि शेफ वरुण इनामदार यांनी देश-विदेशातील चॉकलेट्सची चव घेत केलेलं हे चॉकलेटी रसग्रहण! कॅरामल सेंटर्ड चॉकलेट्सच्या दुनियेची सफर आणि त्यातून स्फुरलेल्या चॉकलेट पिझ्झाच्या जन्माची ही गोष्ट.
चॉकलेट खाण्याचा लहानपणीचा अनुभव नीटनेटका कसा असू शकेल? म्हणजे त्या लहानग्यांकडून तशी अपेक्षाच मोठय़ांनी का करावी? एकदा का त्या चिमुरडय़ाच्या हातात चॉकलेट सोपवले आणि त्याने त्याच्याभोवतीचे आवरण अधाशीपणे सोडविले की, बस्स.. तोंडात टाकलेले चॉकलेट काही वेळाने त्याच्या गाल-ओठांना फासले जाते. हातांची पण तीच गत होते. तेही चॉकलेट-क्रिमने बरबटले जातात. खरं तर निम्मे-अधिक चॉकलेट असा हातातोंडाला गिलावा करण्यातच खर्ची पडते..
तुम्हाला म्हणून सांगतो, माझ्या घरातले मला ‘प्रिन्स’ म्हणून हाक मारतात. मला नेहमीच ‘कॅरामलने ओथंबलेली चॉकलेट’ आवडायची. आतल्या चिकट कॅरामलची चव चाखताना वर वर्णन केलेय, तशीच माझीही गत व्हायची. ‘कॅरामल सेंटर्ड चॉकलेट’ दोन्ही दातांच्या मध्ये गेले की त्याचा तुकडा पाडताना जो परमानंद मला मिळायचा त्याचे वर्णन करण्यासाठी शब्द शोधावेच लागतील. नाही तर ते तुम्हाला कळणार तरी कसे!

तर चवीच्या बाबतीत एक घाव दोन तुकडे करणारा मी त्या ‘कॅरामल चॉकलेट’चा घास घ्यायचो त्याक्षणी माझे दातही त्यांचा ‘वाटा’ सोडत नसत. कॅरामलची तार म्हणा वा धागा माझ्या दातांना चिटकून बसायचा. तेव्हा त्या चॉकलेटमध्ये चीजच आहे, असं माझ्या बालबुद्धीला वाटायचं. कारण, पिझ्झामध्ये ते असतं आणि पिझ्झा खातानाही त्याच्या अशाच तारा दातांपासून खूप लांबवर निघतात. ते चित्र माझ्या मनात एवढं घट्ट झालं होतं की कॅरामलचा शोध मला लागलेला नव्हता तोवर ‘चॉकलेट पिझ्झा’ खाण्याचा आनंद मला नेहमीच मिळत होता. मोठा झालो तेव्हा कॅरामल कळलं पण त्या लहानपणच्या समजूतीतून एक नवा शोध लागला. खरोखरचा चॉकलेट पिझ्झा अवतरला. मी सुरू केलेल्या ‘चॉकलेट पिझ्झा’ची आज लोकप्रियता अमाप वाढली आहे. (तुम्हाला आठवत असेल तर या चॉकलेट पिझ्झाची रेसिपी मी मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात याच व्हिवा पुरवणीत माझ्या ‘शेफनामा’ या सदरात लिहिलेही होती.)बालपणी लागलेला एखादा शोध हा बुद्धीच्या कसोटीवर फारसा टिकणारा नसला तरी तो मनाच्या तळात कुठे तरी लपलेला असतो. बालपण ही प्रेरणा असते, हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. त्यातून संशोधन वृत्ती वाढते. खरं तर ती बालपणातच विकसित होण्यास सुरुवात झालेली असते. तसंच माझ्याबाबतीत काहीसं झालं.

आता कॅरामल म्हणजे काय तर.. १४० डिग्री सेल्शियसला तापवलेल्या साखरेपासून तयार झालेला तंतूसारखा पदार्थ.. गोड. आणि सोन्यासारखा रंग आलेला. आजकाल अनेक चॉकलेट्समध्ये कॅरामलचा वापर करण्यात येतो. लहानपणी मी खाल्लेल्या अगणित ‘चॉकलेट बार्स’नी माझ्यातल्या ‘चॉकलेटियर’ची मुहूर्तमेढ रोवली. तर अशा कॅरेमलचा गाभा असलेल्या चॉकलेटची चर्चा या लेखात सुरू आहे. भारतात फार वर्षांपूर्वी परिचित झालेला ‘फाइव्ह स्टार’ चॉकलेट बार हा ‘कॅरामल’ जातकुळीतला. सर्वच बाबतीत चविष्ट. आता एकाची आईची दोन पोरं. थोडय़ा फार फरकाने आपली छाप पाडतातच. तसं याच्या ‘भावा’चं म्हणावं लागेल. म्हणजे याच्याच जातकुळीतल्या ‘मार्स’ हा चॉकलेट बार. भारतात फाइव्हस्टारची लोकप्रियता आहे तशीच अमेरिकादी देशांत मार्स बारची. या दोहोंतला थोडासा फरक म्हणजे याच्या सभोवती मिल्क चॉकलेटचा थर जास्त.

पूर्वी जगभरातील अनेक नामवंत चॉकलेट ब्रॅण्ड्स आपल्या तोंडी लागायची ते, परदेशस्थ काका-काकी, नाही तर मामा-मामी कधी मायदेशी परतताना खाऊ म्हणून चॉकलेट घेऊन आली तर.. त्यांनी आणलेले ते चॉकलेट बार चिमुकल्यांच्या हातात अलगद पडतात तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर उरत नाही. अशा प्रकारे लोकप्रिय झालेल्यांच्या यादीत ‘हर्शे’ या कंपनीचे ‘हिथ’ आणि ‘स्कोर’ बारचे नाव यात हमखास ओठांवर आणि पाठोपाठ चवही जिभेवर येते. कॅरालमचा गाभा असलेल्या या छोटय़ा टॉफीला पुन्हा चॉकलेटचा थर. जगातील मोजक्या चॉकलेट कंपन्यांच्या पंगतीत हे दोन बार सध्या आघाडीवर आहेत.
आंतरराष्ट्रीय चॉकलेट्मध्ये आणखी नामवंत म्हणजे ‘गोदिवा मिल्क सॉल्टेट टॉफी कॅरामल बार.’ गोडधोड प्रेमींच्या चवीत मिठाचा खडा पडतो आणि तो चवीष्ट होतो, असंच या बारविषयी म्हणावं लागेल. कॅरामलसोबत ‘खडे मीठ’ अर्थात सीसॉल्ट वापरलं आणि त्यावर आटीव दूध चॉकलेटचं आवरण. ‘गोडिवा’ने याच्यात मखमली कॅरामलचा पुरेपूर वापर केलेला. दुसरा ब्रॅण्ड म्हणजे घिरारडेली. मिल्क, कॅरामल आणि डार्क अशा प्रकारांत उपलब्ध असलेले घिरारडेली चॉकलेट स्क्वेअर जगातील सवरेत्कृष्ट चॉकलेट्सपैकी एक आहे. विशेष म्हणजे हे परदेशस्थ बार हल्ली ऑनलाइन बाजाराच्या कृपेने भारतात उपलब्ध झाले आहेत.

आता तुमच्या प्लेटमध्ये आणखी खजाना हवाय, असे वाटत असेल तर स्वीट्स ऑफ ओमानचा चिको ब्रॅण्डचं नाव घ्यायला हवं. ‘चिको कोकोनाटा कोकोनट कॅरेमल’, ‘बटर कॅरामल टॉफीज’, ‘कार्डमम कॅरीमल’ अर्थात वेलदोडे घालून तयार केलेले कॅरीमल. मध आणि पुदिनामिश्रित इक्लेअर्स आदी. अनेक व्हरायटी मध्ये कॅरामल सेंटर्ड चॉकलेट्स आहेत.
आणखी एक इंटरनॅशनल ब्रॅण्ड म्हणजे ‘डाइम क्रंची कॅरेमल मिनीज’. या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डविषयी सांगायचं तर स्वीडिश मिल्क चॉकलेटमध्ये याला गुंडाळण्यात आलंय. चमकदार लाल पॅकिंगमध्ये त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसतं आणि प्रत्येकाला खाण्याचा मोह आवरता येत नाही. ‘गॅण्डौर कॅरामल चॉकलेट बार’चंही तसंच आहे. यात कॅरामल तर आहेच, पण त्याच्या जोडीला वेफरही आहे. अर्थात या गाभ्याभोवती पुन्हा मिल्क चॉकलेटचा थर आहेच. काही वर्षांपूर्वी हे ब्रॅण्ड भारतीयांना ठाऊक नव्हते. परंतु जेव्हापासून ई-कॉमर्सचे वारे चौफेर पसरले आहे, तेव्हापासून अनेकांच्या घरात हे ब्रॅण्ड दिसू लागलेत.

जाता जाता पूर्वीचीच ती गोष्ट.. प्रेरणेची गोष्ट. लहानपणच्या ‘प्रिन्स’ला पिझ्झा खाता खाता अनेक नव्या कल्पना सुचल्या आणि चॉकलेटमधला ‘प्रिन्स’ होण्याचा त्याने ध्यास घेतला. लहानपणच्या याच प्रेरणेतून सुचलेल्या अनेक रेसिपी या प्रिन्सने हिंदी चित्रपटसृष्टीतल्या ताऱ्यांपासून अनेकांना खाऊ घातल्या. एका अर्थाने चॉकलेटमधल्या कॅरामलला मी ‘चीज’ समजून बसलो त्याच कल्पनचं अखेर ‘चीज’ झालं. श्रम सार्थकी लागले. म्हणूनच म्हणतो, बालपणासारखं दुसरं प्रेरणास्थान दुसरीकडे कुठे मिळणं फार अवघड आहे.
(अनुवाद : गोविंद डेगवेकर)