प्रसिद्ध चॉकलेटिअर आणि शेफ वरुण इनामदार यांनी देश-विदेशातील चॉकलेट्सची चव घेत केलेलं हे चॉकलेटी रसग्रहण! या पाक्षिक सदरातून शेफ वरुण नव्या-जुन्या चॉकलेटी दुनियेची सैर घडवतील. लहानपणापासून आपल्या जिभेला भुरळ घालणाऱ्या वेफर चॉकलेट्सविषयी आजच्या पहिल्या लेखात.

चॉकलेटिअर म्हणून काम करताना जगभर भ्रमंती झाली. देशोदेशीची चॉकलेट्स चाखली, जगभरातील उत्तमोत्तम कोको फाम्र्सना भेटी देता आल्या आणि सर्वोत्तम चॉकलेटचा आस्वादही घेता आला. पण तरीही, काही पदार्थाची चव अजून जिभेवर रुंजी घालतेय. मी ओबेरॉय हॉटेल्ससाठी काम करत होतो, तेव्हा बऱ्याचदा मुंबईतला प्रवास लोकल ट्रेननं व्हायचा. असाच स्टेशनवरून कामासाठी चालत जात असताना माझा त्या वेळचा सहकारी शेफ अमेय ठाकूर याने मला मुंबईतल्या सर्वात जुन्या आईस्क्रीम पार्लरला नेलं. – के रुस्तुम. त्यांची स्पेशालिटी काय आहे माहिती आहे का – आईस्क्रीम सॅण्डवीच. क्रिस्पी वेफरच्या शीटच्या मध्ये सँडवीच केलेलं आईस्क्रीम. ते आईस्क्रीम जगातलं सगळ्यात भारी चवीचं आहे, असं मला म्हणायचं नाही. पण मुंबईत असताना या आईस्क्रीम सॅण्डवीचची चव चाखावीशीच वाटते हे नक्की.. त्यातल्या त्या क्रिस्पी वेफरसाठी.
येस.. हे सडपातळ, कुरकुरीत, फ्लॅट, गोड वेफर्स मला अजूनही आवडतात. आता हे लिहीत असताना मला माझ्या आठवणीतलं पहिलं वेफर बिस्कीट आठवतंय. वेगवेगळ्या फ्लेवरच्या त्या एका पिकविकच्या पुडय़ात माझं लहानपणचं हास्य सामावलेलं असायचं. अनेकांच्या लहानपणच्या आठवणी पिकविकभोवती गोळा होतील, माझी खात्री आहे. कुरकुरीत, गोड-गोड अल्टिमेट ट्रिपल लेअर्ड वेफर बिस्किटचं पॅक – पिकविकची ही ओळख आजही कायम आहे. स्ट्रॉबेरी, पायनॅपल आणि चॉकलेट फ्लेवर्समध्ये पिकविक आजही दुकानातल्या शेल्फवर दिसतं. अनेक पिढय़ांनी या वेफर चॉकलेटची चव चाखली आहे आणि त्या कुरकुरीत चवीवर अनेक पिढय़ांमधली लहान मुलं फिदा आहेत. पण तुम्ही कधी विचार केलाय हे वेफर म्हणजे नेमकं काय असतं? कशाचं बनतं?
फूड टेक्नॉलॉजीच्या भाषेत वेफर म्हणजे चवीला सहसा गोड असणारे, क्रिस्प, फ्लॅट, पातळ आणि कोरडे बिस्किट – जे सहसा आईस्क्रीमवर सजावट करण्यासाठी वापरले जाते किंवा नुसतेदेखील खाल्ले जाते. थोडक्यात वेफर म्हणजे एक प्रकारच्या फ्लेवर्ड कुकीज असतात. त्यामध्ये क्रीमचा एक पातळ थर वापरलेला असतो, एवढंच. हे वेफर वेगवेगळ्या फॉर्ममध्ये बनवले जातात. कधी आपल्या परिचयाचे वेफर सँडवीच असतं तर कधी व्ॉफल-बेससारखं डिझाईन त्यावर असतं. वेफर स्टिक्स आईस्क्रीमबरोबर सव्‍‌र्ह करण्यासाठी लोकप्रिय झाल्या, तर अनेक प्रांतात त्या नुसत्याही खाल्ल्या जातात. यात क्रीम फीलिंग करणं म्हणजे या क्रिस्पी स्टिक्सना टेस्टी करण्याचा चलाख उपाय आहे. आईसक्रीमचा वेफर कोन तर लहानपणापासून आपला लाडका असतो.
हे झालं नुसत्या वेफरबाबत. मग जमाना आला तो चॉकलेट बारचा. किटकॅट, पर्क आणि मंच. हे तीन चॉकलेट बार म्हणजे गोड चॉकलेटने कोट केलेले वेफर्सच आहेत. वेफर बिस्किट आणि क्रीमी चॉकलेट दोन्हीची चव यात बेमालूमपणे मिसळली जाते. १९९०चं सगळं दशक या तीन वेफर चॉकलेटबार्सनं गाजवलं. बाजारात वरचं स्थान मिळवण्यासाठी त्यांची स्पर्धाही या दशकात शिगेला पोचली होती. जाहिरातींचा भडीमार आपल्यावर सुरू होता. वेफरच्या वाढीव लेअर्स हेच स्पर्धेच्या अग्रस्थानी होते. म्हणजे तुम्हाला आठवत असेल.. कॅडबरी इंडियाने जेव्हा नवीन पर्क (एन्हान्स्ड पर्क) लाँच केली, त्या वेळी ट्विन बार आणि चार वेफर लेअर आणि तरीही इतर वेफर चॉकलेटएवढी किंमत पाच रुपये (इतर चॉकलेट म्हणजे मुख्य स्पर्धक असलेली मंच) हे त्यांचे जाहिरातीचे मुद्दे होते. त्यावर उत्तर म्हणून मंचनेदेखील पंधरा दिवसात ‘मंच का पंच’ ही जाहिरात मोहीम सुरू केली. वेफर चॉकलेटची चव आणि क्रंचीनेस महत्त्वाचे.. वजन हा मुद्दा गौण, हे ग्राहकांना आणि पर्यायाने कॅडबरीला सांगण्यासाठी ही जाहिरात. पण या दोन जाहिरात मोहिमांमध्ये घुसून पुढे आलेली ‘हॅव अ ब्रेक हॅव अ किटकॅट’ मात्र चिरस्मरणात राहणारी जाहिरात आणि चवही!
भारतीय वेफर चॉकलेट्सचा विचार करता, पिकविकपासून सुरू झालेल्या वेफर चॉकलेटच्या आठवणीत दोन आणखी चॉकलेट्स घालावीच लागतील. डय़ुक्स व्ॉफी फ्लेवर्ड वेफर्स – सेम फ्लेवरच्या क्रीम फिलिंगमध्ये येणारे हे वेफर रोल व्हॅनिला वेफर आणि चॉकलेट वेफर फ्लेवरमध्ये येतात. इलायची फ्लेवर हा एक वेगळा फ्लेवर त्यांच्याकडे आहे. दुसरं म्हणजे टिफनी वेफर्स. हे पण अगदी तसेच.. त्याच स्टाइलचे. हेजलनट क्रीम हा माझा फेव्हरेट टिफनी फ्लेवर आहे. ते त्यांच्या प्रॉडक्टची जाहिरात कशी करतात हे देखील इंटरेस्टिंग आहे बरं का.. यांची कॅचलाइन आहे – ‘क्रंचीएस्ट वेफर’ पण म्हणजे या रेंजमधली बाकीची वेफर प्रॉडक्ट कमी क्रंची होत नाहीत हे खरं!
वेफर चॉकलेट्सच्या गप्पा मारताना आजच्या भारतीय तरुणाईची फेव्हरेट बनलेली फरेरो रोशे विसरून कसं चालेल! ल्युशिअस चॉकलेटी फीलिंग, आत अख्खा हेझलनट आणि बाजूने अगदी नाजूक पापुद्रा – क्रिस्पी वेफरचा. या सगळ्यावर मिल्क चॉकलेटचा थर आणि वर बारीक हेझलनटचे तुकडे. लाजवाब! सेलिब्रेशनची मजा या लेअर्ड वेफरी चॉकलेटमध्ये नक्कीच आहे. या चॉकलेटमध्ये इटायिन स्टाइल आहेच शिवाय ते ज्या नजाकतीने सोनेरी कागदात गुंडाळलेलं असतं, त्यामुळे ते स्पेशल आपोआप वाटतं.. आणि आपल्या देसी जनतेला आपलंसं करणारा आणखी एक महत्त्वाचा दुवा – मोतीचूर लाडूसारखा शेप! हा चॉकलेटचा लाडू लहान-थोर सगळ्यांनाच त्यामुळे आवडला असावा.
बाहेरच्या वेफर चॉकलेट्सचा विचार केला तर एक ट्रॅडिशनल वर्ल्ड फेमस लक्झरी डॅनिश चॉकलेटचं नाव घ्यावं लागेल – रॉयल डान्स्क (Royal dansk) हे डेलिशिअल चॉकलेट रोल्स आहेत. त्यातल्या वेफरच्या चवीपेक्षाही बोलण्यासारखा भाग म्हणजे- याचं क्लासी पॅकेजिंग. रॉयल ब्लू कलरच्या टिन बॉक्समध्ये हे चॉकलेट येतं. पाश्चिमात्य देशांमध्ये तर हे चॉकलेट ‘द ब्लू टिन’ नावानं ओळखलं जातं आणि तिथलं हे नुसतं वेफर चॉकलेट नसून तिकडचं फेव्हरेट आइस्क्रीम टॉपिंग आहे. ब्लू पॅकेजिंगखेरीज यातला आणखी एक लोकप्रिय भाग म्हणजे यातलं क्रीम फीलिंग. व्हॅनिला, हेझलनट, कॅप्युचिनो, स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट या फ्लेवर्समध्ये ते येतं.
आता शेवटी माझे सगळ्या जगातले फेव्हरेट वेफर स्क्वेअर्स – लोकर क्वाड्रान्टिनी (Loaker Quadrantini) हे इटालियन वेफर बिस्किट छोटय़ा चौकोनी आकाराच्या तुकडय़ात येतं आणि स्पेशल रीसिलेबल पॅकमध्ये असतं. त्यामुळे शेवटचा चौकोन संपेपर्यंत फ्रेशनेस टिकून राहतो. साधारण १ बाय २ सेमी आकाराच्या पाच लेअर्सचं वेफर आणि चार लेअर क्रीम असं हे भन्नाट कॉम्बिनेशन. अमेरिकेत क्वाड्रान्टिनी सर्वसाधारण नॅचरल फूड स्टोअर्समध्ये विकायला ठेवतात, कारण यामध्ये कुठलेही कृत्रिम फ्लेवर्स किंवा रंग, प्रिझर्वेटिव्हज नसतात. ट्रान्स फॅट्सदेखील अगदी शून्य असतात. अनेक फ्लेवर्समध्ये हे उपलब्ध असले तरी नेहमीचे फ्लेवर्स बाजूला ठेवून तुम्ही यांचे तिरामिसू आणि मिल्क क्रीम नक्की ट्राय करून बघा.
आपण अनेक ब्रॅण्ड्सची चॉकलेट आवडीनं खातो; पण काही प्रकार जिव्हाळ्याचे असतात. कुठल्याही ब्रॅण्डचं असो, पण वेफर चॉकलेट जिव्हाळ्याच्या कॅटॅगरीत मोडतं की नाही? चांगल्या क्वालिटीची, उच्च दर्जाची लक्झरी चॉकलेट्स असतातच आवडीची; पण वेफर चॉकलेट्सची जागा हृदयात आहे. पुन्हा भेटू नव्या चॉकलेटसह पंधरा दिवसांनी, याच जागी! हॅप्पी न्यू इअर.. चॉकलेटी इअर!
(शब्दांकन – अरुंधती जोशी)

What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
pregnant, sister, Nagpur,
पाहुणी म्हणून आली अन् गर्भवती झाली! बहिणीच्या संसारालाच सुरुंग…
Aditya Thackeray
‘एप्रिल फुल’ दिवस ‘अच्छे दिन’ म्हणून साजरा; आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका
career in singin
चौकट मोडताना : ‘छंद म्हणून हवा तेवढा जोपासा’