03 August 2020

News Flash

एकाच नाटकातल्या दहा भूमिका

एकाच नाटकात १० वेगवेगळ्या भूमिका करायचं आव्हान होतं ते आवडलं आणि मी हे नाटक स्वीकारलं..

(संग्रहित छायाचित्र)

‘चार दिवस प्रेमाचे’ या नाटकातील प्रसंग प्रत्येकाच्या जीवनातील प्रसंगाशी एकरूप होणारे असल्याने प्रेक्षक कुठल्या ना कुठल्या प्रसंगाशी एकरूप होऊन दाद द्यायचे. कुणाची सासू नाटकातल्या प्रसंगात वर्णन केल्याप्रमाणे असायची, राधाबाला नामदारप्रमाणे कोणी रात्रीच नवऱ्याशी भांडण उकरून काढलेले असायचे त्यामुळे हशा मिळायचाच. तर शेवटचा अंध वृद्धेचा प्रसंग रत्नाकर मतकरींनी इतका संवेदनशीलतेने लिहिला आहे की अनेकांचे डोळे पाणवायचे.. एकाच नाटकात १० वेगवेगळ्या भूमिका करायचं आव्हान होतं ते आवडलं आणि मी हे नाटक स्वीकारलं..

रत्नाकर मतकरी यांचं ‘चार दिवस प्रेमाचे’ हे नाटक. तरुण वयात प्रेमात पडलेल्या तरुण-तरुणींपासून सुरू झालेलं प्रेम, लग्नानंतर संसाराच्या कुरबुरीत अडकून कसं पडतं आणि तरीही म्हातारपणात ते एकमेकांना सांभाळत जोडीदारातच मिसळून कसं जातं, याचा प्रवास सांगणारं हे नाटक. भूमिकांचा विचार केला तर या नाटकात मला एकाचवेळी १० वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायला मिळाल्या आणि त्या सगळ्या भूमिका मला अतिशय आवडल्या.

‘चार दिवस प्रेमाचे’ हे नाटक माझ्याकडे आलं त्या आधी मी ‘तू फक्त हो म्हण’, ‘निष्पाप’, ‘चित्कार’, ‘तिची कथाच वेगळी’ अशा अनेक नाटकांतून भूमिका केल्या होत्या. यातील काही नाटकांचे प्रयोग हाऊसफुल्ल असायचे. या नाटकांमधून मी मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या, असे असतानाही मी ‘चार दिवस प्रेमाचे’ या नाटकात सगळ्याच भूमिका मध्यवर्ती असतानाही नाटक का स्वीकारले असा प्रश्न अनेकांना होता. खरं तर ‘चार दिवस..’च्या आधी मी ज्या भूमिका केल्या त्या सगळ्या गंभीर स्वरूपाच्या होत्या. त्यापूर्वी मी एकही विनोदी भूमिका केली नव्हती.

हे नाटक जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा ते वाचून मला खूपच आवडलं. या नाटकात मला नाचायचं होतं, गायचंही होतं. या पद्धतीची म्हणजे ‘कॉमेडी’ भूमिका मी यापूर्वी कधी केली नव्हती. मला एकाच वेळी १० भूमिका साकारण्याची संधी मिळणार होती. त्या सगळ्या भूमिकांमध्ये वैविध्य तर होतंच, शिवाय तरुण ते वयोवृद्ध अशा वेगवेगळ्या वयोगटांतल्या भूमिका यात होत्या. फक्त विनोदीच नव्हे तर या भूमिकांना खूप कंगोरे होते, स्वभाववैशिष्टय़े होती आणि म्हणून मी हे नाटक स्वीकारलं.

नाटक स्वीकारलं तरी नाचणं, गाणं आणि कॉमेडी जमेल का अशी थोडीशी भीती होती. मात्र निर्माते सुधीर भट यांना माझ्यावर विश्वास होता. नाटकाचे दिग्दर्शक वामन केंद्रे होते. वामन केंद्रे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) मध्ये मला एक वर्ष सीनियर होते. त्यांनी माझी एनएसडीतील नाटकं पाहिली असल्यामुळे त्यांनाही माझ्याबद्दल विश्वास होता आणि अशा प्रकारे नाटकाच्या तालमी सुरू झाल्या.

नाटकात चारच मुख्य पात्रं होती. मी, प्रशांत दामले, अरुण नलावडे आणि कविता लाड. या नाटकाचं सादरीकरणच वेगळ्या पद्धतीचं आणि प्रेक्षकांना धक्का देणारं होतं. एकच कथा असणारी नाटकं पाहणाऱ्या प्रेक्षकांना नाटकात नांदी सुरू झालीच की धक्का बसायचा. या नाटकात आम्ही चौघेही सूत्रधार होतो. हे सूत्रधार वेगवेगळ्या वयातल्या जोडप्यांच्या प्रेमाच्या तऱ्हा कशा असतात ते सांगण्याचं काम करत असतात. तरुण वयातलं प्रेम, तरुण-तरुणींचं मन, प्रेमविवाह करणारी निर्बुद्ध मुलगी, प्रेमविवाहानंतर होणारा भ्रमनिरास असा प्रवास करत अखेर उतारवयातलं एकरूप होत जाणारं प्रेम असा प्रवास नाटक करायचं. यात अखेरचा प्रसंग सोडला तर सगळं नाटक विनोदी होतं.

तालमी सुरू झाल्या. वामन केंद्रेंनी खूपच सुंदर आणि शिस्तबद्ध पद्धतीनं नाटक बसवलं होतं. तालमींच्या वेळी नाटकातल्या पात्रांचं वागणं, त्यांचे संवाद, आमचा अभिनय आम्हालाही इतके हसवून जायचे की कित्येकदा आम्ही संवाद थांबवून मनसोक्त हसून घ्यायचो. त्यामुळे आमच्या तालमी खूपच एन्जॉय केल्या. वामन केंद्रे यांनी शिस्तबद्ध पद्धतीने नाटक बसवलं असं म्हणण्याचं कारण म्हणजे विनोदी नाटक आहे म्हणून आम्ही नाटकात हशा घेण्यासाठी आमच्या मनाचे काही संवाद म्हणू नये, कोणीही लाऊड होणार नाही, विनोदाची, अभिनयाची पातळी घसरणार नाही हे कटाक्षाने कसे टाळता येईल हे त्यांनी पाहिले होते. आम्ही त्या पद्धतीने नाटक करतोय की नाही हे पाहण्यासाठी ते कित्येकदा आमच्या नकळत प्रयोगांनाही येऊन बसत असत. अर्थात, लेखक म्हणून रत्नाकर मतकरी यांनी ते नाटक इतकं नेटकं आणि प्रभावी लिहिलं होतं की तिथे आम्ही काही शाब्दिक घुसखोरी करूच शकणार नव्हतो.

मी आधीच म्हटल्याप्रमाणे यापूर्वी मी गंभीर भूमिका केल्या होत्या. माझ्या उठण्या-बसण्यामागे म्हणजे स्टेजवरच्या वावरामागे काही कारण, लॉजिक असायचे. म्हणजे मी जी भूमिका साकारतेय ते पात्रं प्रत्यक्षात तसं वागेल की नाही याचा विचार असायचा. हे नाटक करताना शारीरिक हालचालींच्या बाबतीत मी खूप मोकळी झाले. यातल्या भूमिका करताना मी ते पात्र प्रत्यक्षात तसे वागेल का असे विचार बाजूला ठेवले. म्हणजे एका भूमिकेत मी प्रोफेसरची बायको असते. तिची मैत्रीण जेव्हा त्यांच्या घरी येते तेव्हा ती त्या मैत्रिणीला प्रोफेसर शॉवर घेताहेत हे अभिनय करून दाखवते. खरं तर प्रत्यक्षात तसा अभिनय करून एखादी गृहिणी नवऱ्याच्या अंघोळीबद्दल सांगेलच असं नाही. पण मी ते केलं. एका प्रसंगात बेडरूममधला सीन आहे, मी प्रशांतची बायको असते, त्यात आधी गोड गोड बोलणारी ती कधी वाद सुरू करते आणि मग तिचं नवऱ्याला बेडवरून ढकलून देणं, वाद घालताना दोघांनीही बेडवर चढणं हे इतकं नैसर्गिक पद्धतीनं व्हायचं की पूर्वीचं अवघडलेपण नाटक करताना कधी गळून पडलं ते कळलंच नाही.

दुसऱ्या एका प्रसंगात मी प्रशांतची आई असते. नऊवारी नेसलेली, हातात काठी आणि पांढरे केस असणारी कंबरेत वाकलेली ही म्हातारी. एका लयीत कंबर हलवत चालण्याचा अभिनय मला करायचा होता. ते करतानाही मी कुठेही थिल्लर वाटणार नाही याची काळजी घेत अभिनय केला. ही म्हातारी साकारताना मला कधीही वाईट अनुभव आले नाहीत. एवढे हजार प्रयोग केले, मात्र कुठेही कोणी वाईट हेतूने शिट्टी वाजली नाही, की काही चुकीची शेरेबाजी ऐकायला मिळाली नाही. उलट ती म्हातारीही हसवूनच गेली.

या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी आम्ही कधी विसावलोय, निवांत बसलोय असं कधी घडलं नाही. कारण नाटकात चौघेच असल्याने आणि प्रसंग वेगाने पुढे जात असल्याने सतत आणि वेगाने कॉस्चुम बदलावे लागत. गेटअप बदलावा लागे. प्रत्येक प्रसंगात वेगळा पोशाख, गेटअप, मेकअप सारं काही तातडीनं करावं लागे. म्हणजे सूत्रधार असताना पंजाबी ड्रेस, सूत्रधाराचा प्रसंग झाला की कधी दुसरा ड्रेस, लगेच साडी नेसून, कधी नाइटड्रेस तर कधी नऊवारी नेसून पांढऱ्या केसांचा विग घालून तयार राहावं लागायचं. हे अतिशय वेगाने करावं लागे. त्यामुळे नाटक संपल्यानंतर निश्वास टाकता यायचा. सुरुवातीला वेगाने गेटअप बदलताना आपली चूक तर होणार नाही ना, तो बदलताना उशीर झाल्यामुळे एन्ट्रीला उशीर होणार नाही ना अशी धाकधूक वाटायची. सुरुवाती-सुरुवातीला फार लक्षपूर्वक ही सगळी कामं करावी लागायची. मात्र जसजसे प्रयोग होत गेले तसे आम्ही त्या सर्व गोष्टींना सरावलो. इतके सरावलो की अमेरिका आणि इतर देशांच्या दौऱ्याच्या वेळी कॉस्चुम, मेकअप आणि स्वत:च्या प्रॉपर्टीबाबतच्या अनेक अतिरिक्त जबाबदाऱ्या आम्ही पार पाडल्या.  आमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला होता.

या नाटकांत गाणीही गायची होती, अर्थात गाण्यासाठी आम्हा सर्वाची भिस्त प्रशांतवरच होती. आम्ही त्याला साथ देत होतो, पण कुठे बेसूर होणार नाही यांची काळजीही घेत होतो.

मुळात नाटक, मग दिग्दर्शन, कलाकार, संगीत नेपथ्य असं सगळं इतकं चांगल्याप्रकारे जुळून आलं होतं, म्हणजे नाटकाची भट्टी खूप चांगली जमली होती, त्यामुळेच त्याचे हजारावर प्रयोग झाले. एका वर्षी आम्ही ३०० प्रयोग केले होते. प्रयोगागणिक आम्ही साकारत असलेल्या पात्रांविषयी अधिक खोलात जाऊन विचार करून ती आणखी वेगळ्या प्रकारे कशी रिअ‍ॅक्ट होतील याचा विचार करायला लागलो. त्यानुसार अभिनयात बदल करत गेलो.

नाटकातील प्रसंग प्रत्येकाच्या जीवनातील प्रसंगाशी एकरूप होणारे असल्याने प्रेक्षक कुठल्या ना कुठल्या प्रसंगाशी एकरूप होऊन दाद द्यायचे. म्हणजे तरुण-तरुणींना आपण प्रेमात पडल्यावर सुरुवातीला कसे वागत असू हे आठवायचे, कुणाची सासू नाटकातल्या प्रसंगात वर्णन केल्याप्रमाणे असायची, तर राधाबाला नामदारप्रमाणे कोणी रात्रीच नवऱ्याशी भांडण उकरून काढलेले असायचे, तर प्राध्यापकाच्या बायकोप्रमाणे कित्येक जणी वागत असायच्या. त्यामुळे नाटकातील हमखास हशा मिळणाऱ्या प्रसंगांना तर हशा असायचाच. पण प्रेक्षक बदलले की वयोगटानुसार हसण्याच्या जागाही बदलायच्या. एवढेच नव्हे तर नाटकातील अखेरच्या प्रसंगात मी अंध वृद्धेची भूमिका करायचे. तो प्रसंग मतकरींनी फारच संवेदनशीलतेने लिहिला आहे. तो पाहिल्यानंतरही अनेकजणांचे डोळे पाणावलेले असत. प्रेक्षक नाटक संपले की आवर्जून सांगायला यायचे, त्यांना भावलेल्या संवादांविषयी, प्रसंगांविषयी.

नितीन नेरुरकर याने नाटकाचं नेपथ्य केलं होतं. काही ठोकळ्यांच्या आधारे केलेलं नेपथ्य आम्हाला खूपच उपयोगी ठरलं. हे नाटक करताना प्रशांत, अरुण आणि कविता यांच्याशी उत्तम केमिस्ट्री जुळली. त्यानंतर वीणा जामकर बरोबरही आम्ही तालमी केल्या, तिच्याबरोबरही छान सूर जुळले. तसंच तिच्याबरोबरच्या काही प्रयोगांसाठी मंगेश कदमने दिग्दर्शन केलं होतं, त्या तालमीही आम्ही एन्जॉय केल्या. हजार प्रयोग करताना मला कधीही आपण तेच ते करतोय असं वाटलं नाही की एकसुरी होतंय असं वाटलं नाही. नाटकातल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे नाटकातला ताजेपणा कायम होता. म्हणूनच यातल्या सगळ्या भूमिका भावल्या. विनोदी पद्धतीच्या भूमिकाही मी करू शकते आणि लोकांना त्या आवडतात याचं समाधान मला या नाटकातल्या सगळ्या भूमिका करताना मिळालं. मला प्रत्यक्ष जीवनात अशा किती व्यक्तिरेखा भेटल्या असत्या कोण जाणे पण इथे नाटकाद्वारे त्यांना मला भेटता आलं, समजून घेता आलं.

या नाटकाची काही वेगळीच मजा होती आणि आहे. ते करताना मला, आम्हा सर्वानाच खूप मजा आली. आजही ते नाटक नव्या कलाकारांना घेऊन रंगभूमीवर यायला हवं असं वाटतं. कारण ‘त्या’ दोघांतील प्रेम, त्यांच्यातील कुरबुरी, सुसंवादाकडून अबोल्याकडे आणि अबोल्यातून एकरूपतेकडे जाण्याची कारणं तरी तीच आहेत.

savita.prabhune180@gmail.com

chaturang@expressindia.com

शब्दांकन- रेश्मा भुजबळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2018 1:50 am

Web Title: article about 10 roles in chaar divas premache play
Next Stories
1 रांगडी ‘रखमा’
2 सच्चा स्वर देणारी विनी
3 वेदनेतील शल्य..
Just Now!
X