13 August 2020

News Flash

नरूची आई..!

साधारणपणे १९९५ च्या दरम्यान मंगेशनं (कदम) आणि जयंतनं ‘अधांतर’चं स्क्रिप्ट माझ्याकडे पाठवलं.

मुलगा आईच्या चारित्र्यावर चिखलफेक करतो हा प्रसंग माझ्या दृष्टीनं खास होता. तो ज्या तीव्र पद्धतीनं अभिव्यक्त होतो तेही एकदोघांना खटकत होतं. त्याचा पुनर्विचार केला तेव्हा ती तीव्रता कमी करायला माझं मन तयार होईना. याची कारणं शोधू लागल्यावर जाणवू लागलं की, हा केवळ धुरींच्या घरात घडलेला एक प्रसंग एवढंच मर्यादित असं त्याचं प्रयोजन नाही. पुरुष, मग भले तो अगदी मुलगाही का असेना, आपल्या या सामाजिक रचनेत तो किती बेदरकारपणे स्त्रीचा आत्मसन्मान ठेचून काढू शकतो, हे या प्रसंगातून अगदी उघडंवाघडं होऊन समोर येतं. तिचं क्रुद्ध घायाळ होणं हे नाटय़ात्म विधानाच्या दृष्टीनं मला अपरिहार्य वाटू लागलं. त्यामुळे त्या प्रसंगात भावबंबाळ न होता अधिक गहिरेपणाने तीच तीव्रता अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न मी करत राहिले..

वीस-बावीस वर्षे होऊन गेली.. ती आली माझ्या आयुष्यात, या गोष्टीला.. त्याआधी आणि त्यानंतरही खूप जणी नाही.. पण काही जणी भेटल्या.. मनाच्या पसाऱ्यात कुठे कुठे फिरत असतात त्या. पण ही मात्र वारंवार भेटते.. जयंत पवारच्या ‘अधांतर’ नाटकातली नरुची आई! तशी ती चार मुलांची आई.. पण चाळीत सगळे तिला नरूची आईच म्हणतात.

१९९८ मध्ये ‘अधांतर’ रंगभूमीवर आलं. पण माझ्या मनात मात्र ते त्याआधीच्या एक – दोन वर्षांपासूनच येरझाऱ्या घालत होतं. आठवणींच्या प्रदेशातल्या, परिसरांच्या, माणसांच्या अंगावरून जरा पुढे, थोडं खोलात गेलं की धुरींच्या घरातली माणसं दिसल्यासारखी व्हायची. (धुरी हे ‘अधांतर’मधलं कुटुंब.) काहींचे चेहरे, काहींच्या डोळ्यातली घाबरीघुबरी थरथर, कुणाचे बेदरकार डोळे आणि धपापणारे ऊर. कुठं थकलेल्या, साकळलेल्या नजरा. काम करणारे हात. वेगवेगळ्या गुंत्यात अडकलेले, परिस्थितीनुरूप वाकलेले – ताठलेले, माणसांचे देह.. अशा सगळ्या जगण्याच्या कोलाजमध्येच ही माणसं कुठं तरी आत आत असायची.

साधारणपणे १९९५ च्या दरम्यान मंगेशनं (कदम) आणि जयंतनं ‘अधांतर’चं स्क्रिप्ट माझ्याकडे पाठवलं. तेव्हा ते आता दिसतं तितकंच जिवंत भासलं होतं, तरीही काहीसं अपुरं वाटत होतं. त्यातल्या अपुरेपणाबद्दल आम्ही भेटलो की बोलत होतो. कधी कधी राजीव (नाईक) आणि मंगेश नाटकावर बोलण्यासाठी मुद्दाम माझ्याकडे पुण्याला फेरी मारत होते. ‘अधांतर’च्या लिखाणातल्या चोख सच्चेपणानं, यथार्थतेचं भान ठेवणाऱ्या अघोरी जिवंतपणानं मला ‘धरलं’ होतं हे नक्की. तरीही काही गोष्टी माझ्या नाटय़विषयक समजुतीला पटत नव्हत्या. जयंत – मंगेश – राजीव या सर्वानाही रूप, घाट, आकार इत्यादीचा पुनर्विचार करण्याची गरज वाटलेली होतीच. पुन्हा एकदा जयंत मांडी ठोकून लिहायला बसला. त्याच्यासाठी ही गोष्ट सोपी नव्हती, कारण पुन्हा एकदा जाणीवनेणिवेला जगण्याच्या धारेवर धरावं लागणार होतं. जो जिवंतपणा त्याच्या लिखाणातून पाझरला होता तो चुकू न देता थोडी कारागिरी करावी लागणार होती.

मध्ये काही दिवस गेले आणि सुधारित खर्डा माझ्याकडे आला. आता धुरींच्या कुटुंबात आणखी एका माणसाची भर पडली होती. गिरणी कामगार असलेल्या जावयाची. ‘अधांतर’मध्ये दिसणाऱ्या जगाला यामुळे आणखी एक गडद परिमाण मिळालं. आजारी वडिलांना जयंतनं भिंतीवरच्या हार घातलेल्या फोटोत नेऊन बसवलं. संहिता अधिक नेटकी झाली, लेखक जयंतची क्षमता आणि चिकाटी पुन्हा एकवार सिद्ध झाली. ‘अधांतर’मधल्या आईची व्यक्तिरेखा मी वठवावी अशी जयंत – मंगेशची (आणि राजीवची) इच्छा होती. या नाटकानं पहिल्या वाचनातच मला ‘धरलं’ होतं हे तर मी आधीच सांगितलंच. शिवाय या मुलांचं या अशा प्रकारच्या नाटकाचा पाठपुरावा करत राहणं, मी काम करावं म्हणून पुण्याला माझ्याकडे फेऱ्या मारणं, या सगळ्यामुळे माझ्या लक्षात यायच्या आधीच माझ्यातल्या नटीला ताजंतवानं वाटायला लागलं होतं. खूप दिवसांनी एक चांगली संहिता हाती लागली होती आणि व्यावसायिकतेच्याही पलीकडे जाऊन आम्हाला एकमेकांकडे आणि नाटकाकडे ओढणारं काही तरी सापडतंय असं मला वाटू लागलं होतं.

शिवाय बहुसंख्य माणसं जे जगतात ते जीवन व्यावसायिक रंगभूमीवर दिसण्याचे योग कपिलाषष्ठीचे म्हणावे इतकेच येतात. त्यामुळे त्या दृष्टीनेही माझं या नाटकाशी संबंधित असणं मला महत्त्वाचं वाटलं होतं. ‘अधांतर’मधली ही चार मुलांची आई. कधीकाळी, कदाचित कोवळ्या-कच्च्या वयात कोकणातून नवऱ्याच्या मागं मुंबईत आलेली. गिरणगावातल्या सगळ्या बायाबापडय़ांसारखीच काबाडकष्टाला मागे न हटणारी. चालत आलेल्या रीतीप्रमाणे संसाराचा गाडा ओढणारी. जन्माला येऊन बाईनं कष्ट करावेत, पोराबाळांना मोठं करावं, नवऱ्याची आणि संसाराची उस्तवार करीत आयुष्य खर्ची घालावं, अशी जणू काही उपजत श्रद्धा असलेल्या भारतीय बायांमधीलच एक. काहीशा धोपटमार्गी संकल्पनांच्या पलीकडे जाऊन मुंबईसारख्या शहरी जगाशी मुकाबला करण्याचा बौद्धिक वा वैचारिक वकूब तिच्याकडे अर्थातच नाही. पण तिच्याकडे आहे चिवट जीवनेच्छा. संसाराच्या वादळवाऱ्यात पाय घट्ट रोवून उभं राहण्याचं कोकणातल्या मातीनं आणि माडांनी दिलेलं आत्मबळ. अर्थात, बदलत्या वर्तमानात आणि बदलत्या मूल्यवस्थेत तिच्यासारख्या माणसांना टिकाव धरता येणार नाहीच. औद्योगिकीकरणातून निर्माण झालेल्या आर्थिक आणि मूल्यात्मक पडझडीत भेलकांडत, अर्धमेल्या होत जाणाऱ्या पिढीतली ती एक आहे, हे मात्र बिचारीला समजलेलं नाहीय.

हे सगळं असं असलं तरी, तिच्या मर्यादित कक्षेत का असेना, ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. एका बंदिस्त विचारपद्धतीतही काही वेगळा विचार करू शकण्याचा मोकळेपणा तिच्यामध्ये आहे. म्हणूनच अगदी साध्यासरळ आणि थेट रोखठोकपणे ती मुलांच्या समोर काही मूलभूत प्रश्न उपस्थित करू शकते. पावलोपावली मुलांना जगण्याच्या झगडय़ात ओढण्याची, त्यांना वास्तवाचं भान सतत देत राहण्याची अविरत धडपड करताना ती दिसते. काय आहे हे वास्तव? तिला फारसं कळलेलं नाही. पण बरंच काही उलथंपालथं होतंय याची चाहूल तिच्या सावध चित्ताला मिळते आहे. नाटकात दिसणारा काळ, हादरवणाऱ्या घडामोडी, त्यातून अपरिहार्यपणे तुटत, मोडत जाणारे मानवी संबंध आणि सुख-दु:खं, आशा-निराशेच्या खेचाखेचीत घायाळ होत जाणारं माणसाचं जगणं, या सगळ्या गोष्टी फार बेदरकारपणे प्रेक्षकांच्या पुढय़ात भिरकावत राहतं हे नाटक.

नाटकातील ‘वास्तवा’चं माझं हे आकलन आणि अशा प्रकारच्या परिस्थितीत आपल्या जैविक प्रेरणांनिशी उभी असलेली एक हाडामासाची अस्सल बाई या दोन्हीचं योग्य संतुलन राखणं हे नटी म्हणून माझं महत्त्वाचं काम आहे, असं मला जाणवत होतं. नाटकात इतक्या स्फोटक घडामोडी घडतात की त्यांना बटबटीत आणि ढोबळ होऊ न देण्याची खबरदारी घेणं हेही एक महत्त्वाचं काम होतं. प्रयोगात आम्ही हे थोडय़ाफार यशस्वीपणे साध्य करू शकलो याचं श्रेय प्रामुख्यानं अर्थातच मंगेशचं. एकतर त्याचं व्यक्तिगत अनुभवविश्व यातल्या वास्तवाशी बरंचसं परिचित असं होतं. त्यामुळे या रहाटीचे पदरपापुद्रे त्यानं जवळून न्याहाळले होते आणि हे सगळं अत्यंत संवेदनशीलतेनं आणि मर्यादशील कलात्मकतेनं सादर करण्याचं भान त्यानं सतत जागतं ठेवलं होतं.

या बाईचं भावविश्व जरी मी समजू शकत होते किंवा तिच्या मनाची जडणघडण जरी मला दिसत होती, तरी तिचं चालणं, बोलणं, रोजचे व्यवहार यामध्ये तिचा वावर कसा असेल या बाबतीतला अधिक अभ्यास मला करावा लागणार होता. साताऱ्याकडची ग्रामीण बाई मी लहानपणापासून पाहात आले होते. वडील डॉक्टर असल्यानं गुरुवारच्या बाजाराला त्या आल्या की दवाखान्यातल्या गर्दीतले त्यांचे चेहरे, उन्हातून घाम पुसत, काखेत पोर, डोक्यावर बाजार घेऊन आत शिरणाऱ्या त्यांच्या शांत तरीही प्रसन्न मुद्रा मला आजही दिसतात. ‘अधांतर’मधल्या आईचं विश्व याहून बरंच वेगळं होतं. एक तर ती कोकणातून आलेली. त्यामुळं तिचं ‘बोलणं-चालणं’ आत्मसात करायला हवं होतं. मुंबईच्या चाळीतलं जगही मी थोडंफार आणि काहीसं लांबूनच पाहिलं होतं. त्यामुळे या बाईच्या ‘वावरा’ची नस मला सापडत नव्हती. जयंत-मंगेश मदत करत होतेच.. एके दिवशी कडी उघडली.. नाटकात जावयाची भूमिका करणारा अनिल गवस. ‘त्यांच्याकडे एकदा जाऊन त्याच्या आईला भेटून ये’ असं जयंत म्हणाला. एक रात्र आणि अर्धा दिवस मी त्यांच्याकडे राहिले. तेवढय़ा वेळात तिनं मला काय काय आणि किती दिलं ते त्या माऊलीला कळलंच नाही. आणि हे फक्त या नाटकापुरतंच नाही. नाटकातले आम्ही सगळेच (भरत, लीना, संजय, राजन, अनिल, आशीष, सविता, हेमंत) नेहमीच्या व्यावसायिकतेखेरीज थोडं अधिक खरं, अधिक अस्सल सापडवण्याच्या मागे लागलो होतो. एका अस्सल संहितेनं आपसूकच आम्हाला ही जाण आणि उभारी दिली होती.

नाटकाच्या तालमी हे एक वेगळंच रोमहर्षक प्रकरण असतं, नेहमीच. आम्ही प्रत्यक्ष उभ्याने तालमींना सुरुवात करण्यापूर्वी खूप दिवस नाटक वाचत होतो. वाचनाच्या काळात खूप दिवस मला माहितीच नव्हतं की संजय (नार्वेकर) आणि भरत (जाधव) या नाटकात असणार आहेत. (म्हणजे मंगेशनं त्यांची नावं अर्थातच खूप आधी पक्की केली असावीत. पण त्यांच्या कामामुळे ते हजर राहू शकले नव्हते.) आज मात्र त्यांच्याशिवाय – आणि खरं तर (सध्या नाटकातल्या इतर असलेल्या) कुणाही शिवाय – या नाटकाच्या प्रयोगाची कल्पनाही कुणी करू शकणार नाही.. तर, सुरुवातीच्या वाचनाच्या काळात अनिल, आशीष, हेमंत आणि मी आणि अर्थातच मंगेश, लाइफ मेंबर असल्यासारखे रोज तिथं जमायचो. बाबाच्या भूमिकेसाठी भरपूर खो खो खेळून झाल्यानंतर खूप उशिरा राजन (भिसे) आम्हाला सापडला. लीना(भागवत)ही थोडय़ा नंतरच आली. या मुलांचे चेहरे एरवी वेगवेगळ्या घरातले वाटले तरी त्यांची कलावंत म्हणून समज आणि वैशिष्टय़ अशी की धुरींच्या घराशी ती एकजीव झाली. भरतची इन्स्टिंक्टिव उत्कटता, संजयचे डोळे आणि त्यातली इंटेन्सिटी, लीनाचा सहज आणि वातावरण जिवंत करणारा वावर, अनिलचा रांगडा खरेपणा, आशीषचं हुबेहूब असणं, राजनचं स्वच्छ उच्चारण आणि अतिशय नेमकेपणानं, तोलूनमापून केलेला आवाजाचा भाववाहक वापर आणि हेमंत आणि सविताची अतिशय सुयोग्य साथ या सर्वाचं एक रसायन तयार झालं.. नाटकातल्या शब्दांच्या अधेमधे भारलेलं वातावरण असतं, ते दरवेळी पुरेपूर नाहीच होत जिवंत. दर प्रयोगाच्या वेळी तीच तर धडपड चाललेली असते प्रत्येकाची, त्या जिवंतपणाला पकडायची.. दर प्रयोगाच्या वेळचा हा प्रोसेस, त्यातला थरार नवनव्या तऱ्हांनी अनुभवला आम्ही आमच्या संवेदनांनी.. हे सगळं रसायन नटी म्हणून फार उपकारक ठरलं मला..

आणि मग सापडत गेलं मला.. धुरींचं घर!

‘अधांतर’ची संहिता, प्रयोग, त्यातलं उत्तम जमून आलेलं टीम वर्क, दिग्दर्शकाचा चपखल आणि जाणकार दृष्टिकोन या सगळ्यामुळे वेगवेगळ्या थरांतून या नाटकाचं स्वागत झालं. प्रेक्षकांना मी सादर केलेली आई पसंत पडली. याचाही आनंद अर्थात मला मिळाला. पण या आईच्या भूमिकेच्या रूपानं अपूर्व असं काही पदरात पडलंय असं मला पहिल्यापासून वाटत आलंय. ते काय आहे? किती आहे? कसं आहे? याचे शोध मला अजूनही लागतच आहेत. जाणकारांच्या प्रतिक्रियांमुळे मी अनेकदा पुन्हा नव्यानं तिच्याकडे पाहिलं आहे.

मुलगा आईच्या चारित्र्यावर चिखलफेक करतो हा जो प्रसंग आहे नाटकातला, तो अनेक अर्थानं खास आहे माझ्या दृष्टीनं. तो ज्या तीव्र पद्धतीनं अभिव्यक्त होतो तेही एकदोघांना खटकत होतं. त्याचा पुनर्विचार जेव्हा मी केला तेव्हा ती तीव्रता कमी करायला माझं मन तयार होईना. मग मी, का मन तयार नाही याची कारणं शोधू लागले. तसं मला जाणवू लागलं की हा केवळ धुरींच्या घरात घडलेला एक प्रसंग एवढंच मर्यादित असं त्याचं प्रयोजन नाही. पुरुष, मग भले तो अगदी मुलगाही का असेना, आपल्या या सामाजिक रचनेत तो किती लीलया आणि बेदरकारपणे स्त्रीचा आत्मसन्मान ठेचून काढू शकतो, हे या प्रसंगातून अगदी उघडंवाघडं होऊन समोर येतं. तिचं क्रुद्ध घायाळ होणं हे नाटय़ात्म विधानाच्या दृष्टीनं मला अपरिहार्य वाटू लागलं. त्यामुळे त्या प्रसंगात भावबंबाळ न होता अधिक गहिरेपणाने तीच तीव्रता अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न मी करत राहिले.

एक घटना.. ‘अधांतर’च्या एका प्रयोगानंतरची.. अगदी रुजून गेलीय मनात.. परळच्या दामोदर हॉलमध्ये प्रयोग होता. प्रयोगानंतर भारावलेले प्रेक्षक नेहमीच येऊन भेटायचे. याहीवेळी बरेच जण आले. भेटून बोलून सगळ्यांचं कौतुक वगैरे करून गेले. एक तरुणी जरा दूरवर हे सगळं बघत काहीशी अवघडल्यासारखी थांबली होती. आम्ही आपापलं आवरू लागलो तशी ती अस्वस्थ सावकाशपणे माझ्या जवळ आली. ‘मी तुम्हाला मिठी मारू का?’ तिनं मला विचारलं. मी तिला जवळ घेतल्यावर ती माझ्या मिठीत रडू लागली आणि एक प्रश्न तिने मला केला.. ‘आमच्या घरी काय घडतं हे इतकं कसं तुम्हाला माहिती?’ हे प्रशस्तिपत्रक अर्थात जयंतसाठी असलं तरी ही मुलगी कायमची माझ्या मनात राहून गेलीय..

नाटकाच्या शेवटी भाईगिरी करणाऱ्या मुलाला पोलीस अखेरीस गाठतातच. त्याआधी तो धुवाधार हाणामारी करून रक्तानं माखलेला शर्ट आईच्या पुढय़ात टाकून चालता झाला आहे. अब्रूनं जगण्याच्या तिच्या सगळ्या कल्पना मातीला मिळालेल्या आहेत किंवा कदाचित रक्तात वाहून गेल्या आहेत.. आता या सगळ्याला ती कशी रिअ‍ॅक्ट होईल?.. तालमींमध्ये यावर खूप चर्चा झडल्या. अनेक वेगवेगळे पर्याय सुचवले गेले. आई मुलाचा रक्तानं माखलेला शर्ट जाळून टाकते आणि पेटत्या ज्वाळांच्या साक्षीनं नाटक संपतं असाही एक पर्याय विचाराधीन होता. काही तरी उणं वाटत होतं. जयंतसहित आम्हा सर्वानाच. काय करावं उमगत नव्हतं.

प्रयोग जवळ आला होता. अशोक पत्की संगीताची निवड करण्याच्या दृष्टीनं तालीम पाहायला यायचे होते. एकही पूर्ण रन-थ्रू झालेला नव्हता. प्रकरण (नेहमीप्रमाणेच) अगदी हातघाईवर आलं होतं. आज त्यांना तालीम तर दाखवू, मग शेवटाचं बघू काय करायचं ते, अशा मूडमध्ये सर्व जण होते. आधीचे काही दिवस सकाळी उठण्यापूर्वी माझ्या मिटलेल्या डोळ्यांना ही आई दिसायची. रक्ताने माखलेला शर्ट हातात घेऊन उभी असलेली. थिजलेल्या डोळ्यांनी समोर (प्रेक्षकांकडे?) पाहात असलेली. त्या दिवशी तालमीपूर्वी आधी काहीच न ठरवता काय होतं हे बघू असं म्हणून तालमीला सुरुवात केली. नाटक संपताना मुलांच्या सैरभैर काहुरातून गोठलेली नजर काढून घेत आईनं हातातल्या रक्तानं भरलेल्या शर्टाकडं पुन्हा एकवार पाहिलं. अविश्वासानं पाहत राहिली काही क्षण. नंतर चार पावलं टाकून पुढं आली. समोरच्या अंधारात कुणी दिसतंय का बघत राहिली.. अजूनही आई प्रत्येक प्रयोगाला थोडय़ाफार फरकानं हेच करते.. कधी तरी ती वेगळंही काही करेल कदाचित..

eena_desh@yahoo.co.in

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2018 12:16 am

Web Title: article on adhantar superhit marathi family drama
Next Stories
1 वर्षांनुवर्षे दरवळणारी रातराणी
2 आनंदी माधवी
3 सविता : एक गूढ
Just Now!
X