12 August 2020

News Flash

आत्मविश्वास देणारी ‘प्रज्ञा’

नाटकाची एक प्रक्रिया असते, त्यात रिहर्सलची जी ‘लक्झरी’ असते ती इतर कोणत्याही माध्यमाला नसते.

निवेदिता सराफ

चौदा वर्षांच्या प्रदीर्घ ब्रेकनंतर मी पुन्हा रंगभूमीकडे वळले होते, साशंक होते, पण सुरुवात करायचीच होती. आणि एक सुंदर नाटक माझ्याकडे आलं, ‘तुझ्यात-माझ्यात’. सुयोग नाटय़ संस्थेचं. समीर कुलकर्णीने लिहिलेलं. सचिन खेडेकर, आनंद इंगळे, मीरा वेलणकर असे सहकलाकार आणि मुख्य म्हणजे दिग्दर्शक म्हणून प्रतिमा कुलकर्णी असलेलं नाटक. मला प्रचंड आत्मविश्वास देऊन गेलं. लोकांना त्यातली माझी प्रज्ञा आवडली आणि माझी दुसरी इनिंग जोरदार सुरू झाली..

लग्न झालं, मुलगा झाला आणि मी करिअरमध्ये ब्रेक घ्यायचा निर्णय घेतला. तत्पूर्वी मी नाटक केलं होतं ‘श्रीमंत’, ‘माझा छकुला’ हे मराठी तर ‘किंग अंकल’ हा हिंदी चित्रपट केला होता. त्यानंतर जवळजवळ १४ वर्षांचा दीर्घ पॉझ घेतला. मी त्याला गमतीनं वनवास म्हणते, जो माझा मीच स्वीकारला होता. मला माझ्या मुलाच्या बालपणातल्या सगळ्याच गोष्टींचं साक्षीदार व्हायचं होतं. त्याच्या बाललीलांविषयी, प्रगतीविषयी इतरांकडून ऐकण्याऐवजी मला स्वत:ला ते अनुभवायचं होतं. त्या काळात मी संसारात पूर्णत: रममाण झाले होते. अर्थात अभिनय करत नसले तरी मी संपूर्णत: या व्यवसायापासून दूरही गेले नव्हते, आम्ही ‘प्रॉडक्शन’ करतच होतो, त्यात माझा काही ना काही तरी सहभाग असायचा.

अनिकेत जेव्हा दहावीत गेला तेव्हा अभ्यासावरून आमचे सारखे वाद व्हायचे. दहावी त्याची, पण मलाच टेन्शन आलं होतं. तेव्हा अशोकनं (सराफ) मला सांगितलं की, ‘‘पहिल्यांदा तू त्याच्या अभ्यासातून बाहेर पड आणि स्वत:साठी काही तरी कर.’’ मीही त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात गेली आणि पुन्हा अभिनयाकडे वळायचं ठरवलं. इतक्या वर्षांनी पुन्हा अभिनयाला सुरुवात करायची तर नाटकासारखं उत्तम माध्यम नाही, हेही माझ्या लक्षात आलं. कारण चित्रपटाचं काम लोकेशननुसार चालतं. आज तुम्ही पहिला सीन करता तर दुसऱ्या दिवशी पंधरावा. टेलिव्हिजनचं काम वेळेची प्रचंड मागणी करणारं असतं, प्रसारणाचा एक वेगळाच ताण असतो, तिथे कलावंताला स्वत:चा विकास करण्याचं स्वातंत्र्यच नसतं, त्यामुळे अतिशय जाणीवपूर्वक मी हा निर्णय घेतला होता. नाटकाची एक प्रक्रिया असते, त्यात रिहर्सलची जी ‘लक्झरी’ असते ती इतर कोणत्याही माध्यमाला नसते.

मी नाटक करायचं ठरवलं आणि माझ्याकडे नाटक आलं ते ‘तुझ्यात-माझ्यात’. सुयोग नाटय़ संस्थेचं. समीर कुलकर्णीने लिहिलेलं. सचिन खेडेकर, आनंद इंगळे, मीरा वेलणकर असे सहकलाकार असणारं आणि मुख्य म्हणजे दिग्दर्शक म्हणून प्रतिमा कुलकर्णी असलेलं नाटक. माझ्यासाठी पुन्हा अभिनय सुरू करण्याची उत्तम संधी मिळाली होती.

असं असलं तरी चौदा वर्षांची गॅप खूप मोठी होती. त्यामुळे खूपच ताण आला होता. आपण तटस्थपणे अनेक गोष्टी अनुभवत असतो, अनेक गोष्टींचं निरीक्षण करत असतो, अनेक गोष्टी आपल्यात सामावून घेतो, शोषून घेतो. इंटरनेटमुळे तर जगच जवळ आलंय त्यामुळे जगभरातले चित्रपट, नाटक, दूरचित्रवाहिनी हे तुम्हाला पाहायला मिळत असतात, त्यामुळे त्याचाही परिणाम तुमच्यावर होत असतो. त्यामुळे मला हे दिसत होतं की मी काम करत होते तेव्हाची पद्धत आणि आता इतक्या वर्षांनंतरची काम करण्याची पद्धत यात बऱ्यापैकी फरक पडला होता. अभिनय, भाव (एक्सप्रेशन्स), तंत्र सगळंच बदललं होतं. एखाद्या सॉफ्टवेअर इंजिनीअरप्रमाणे कलावंतालाही सतत अपग्रेड व्हावं लागत असतं. त्यामुळे पूर्वी इतके चित्रपट, अनेक नाटकं केल्यानंतरही पुन्हा एकदा नव्याने अभिनयासाठी उभं राहणं माझ्यासाठी सोप्पं नव्हतं. मी हे सहज करू शकेन की नाही याची मलाच खात्री वाटत नव्हती.

पण मी त्याला सामोरं जायचं ठरवलं. मला आठवतंय, प्रतिमाने मला नाटक वाचून दाखवलं आणि मला नाटक खूप आवडलं. कारण त्यातली नायिका प्रज्ञा बरीच र्वष संसार केल्यानंतर मॉडेलिंगच्या करियरमध्ये उतरते. जे माझ्याच अनुभवाशी साधम्र्य दाखवत होतं. त्यामुळे तिची भीती मी थोडीफार समजू शकत होते. तिच्या समोर असणारी आव्हानं मला कळू शकत होती. अर्थात तिच्या आणि माझ्या घरची स्थिती सारखी नव्हती. माझ्या नवऱ्याने मला कधीच थांबवलं नव्हतं. ब्रेक घेण्याचा निर्णय पूर्णत: माझा होता. त्याने मला नेहमी पाठिंबाच दिला. त्यानेच नव्हे तर माझ्या सासरच्या-माहेरच्या लोकांनीही मला कायम पाठिंबा दिला. माझी आई आणि माझ्या मोठय़ा बहिणीला नेहमीच वाटायचं की मी परत काम करावं. ‘टॅलेंट असून तू घरात का बसतेस?’, असा त्यांचा प्रश्न असायचा. कदाचित आईची प्रबळ इच्छा, माझ्या गुरूंचे आशीर्वाद म्हणून की काय इतक्या वर्षांनंतर इतकी सुंदर भूमिका अगदी सहजपणे मिळाली.

पहिल्यांदा जेव्हा मी नाटकाच्या वाचनाला गेले तेव्हा वर म्हटल्याप्रमाणे साशंकच होते. सचिन (खेडेकर) आणि आनंदनं (इंगळे)मला समजावलं, ‘तू आधी रिलॅक्स हो, तुला पाहिजे तेवढा वेळ तू घे.’ मी त्या दोघांच्या शब्दोच्चारांचे निरीक्षण करत होते. माझ्या आवाजाचा पोत जरा वरच्या पट्टीतला आहे. त्यामुळे सलग संवाद म्हणताना तो एकसुरी होऊ शकतो, कानाला त्रासदायक वाटू शकतो हे मला माहीत होतं, कारण पूर्वी डबिंग करताना मला त्याकडे नेहमी लक्ष द्यावं लागायचं. नाटक करताना सचिनचे आणि माझे एकत्रित सीन बरेच असल्याने मी सचिनचे संवाद म्हणण्याची पद्धत, ‘नॅचरल डायलॉग’ या सर्वाचं निरीक्षण करत होते आणि त्याला फॉलो करत होते.

तरीही माझा ताण काही कमी होत नव्हता. मला अशा अवस्थेत पाहिल्यावर अशोकने खूप छान गोष्ट सांगितली. तो म्हणाला की, ‘‘तू आता नवं अभिनयतंत्र कसं आहे, मी पूर्वी कशी काम करायचे, आताचं जग, नाटय़सृष्टी किती बदललीय. मी केलेलं काम लोकांना आवडेल की नाही, असले विचार करण्याच्या भानगडीतच पडू नकोस. तू एक कलाकार आहेस, तुला जे व्यक्तिश: पटतंय, योग्य वाटतंय ना तसं तू काम कर. आपोआप सगळं नीट होईल. नाटकाचं स्क्रिप्ट हातात घे, आणि असले कोणतेही विचार डोक्यात न आणता मनापासून वाच. त्यात शीर.’’ मी ते खरच मनावर घेतलं. त्या दिवशीच मी ते नाटक वेगळे विचार न करता खूपदा वाचलं आणि दुसऱ्या दिवशी मी जेव्हा रिहर्सलला गेले तेव्हा माझं वाचन ऐकून अतिशय उत्स्फूर्त प्रतिक्रिया मला प्रतिमाकडून मिळाली. ती म्हणाली की, ‘आज तू खूप छान वाचलंस.’ मला खूप हायसं वाटलं. एवढंच नव्हे तर माझा आत्मविश्वास प्रचंड वाढला. प्रतिमा एक उत्तम दिग्दर्शक आहे. प्रतिमाने मला एक वेगळाच दृष्टिकोन दिला. मला तिचे खूपच कौतुक वाटतं. प्रतिमाच्या कामाची पद्धत खूप वेगळी आहे. ती अभिनय करून दाखवत नाही. ती तुमच्याकडूनच तुमच्यातलं सवरेत्कृष्ट मिळवण्याचा प्रयत्न करते. ती एक अतिशय संवेदनशील आणि प्रतिभावान दिग्दर्शक आहे. तिने माझा अक्षरश: हात धरून या नाटकात मला मार्गदर्शन केलं. त्याच्यासाठी मी स्वत:ला फारच भाग्यवान समजते. पुढे नाटक यशस्वी झालं त्याच्यामागे प्रतिमाचा खूप मोठा सहभाग आहे.

नाटकाच्या दरम्यान पटपट कॉश्चुम बदलणं, सेटवरचा वावर वगैरेची माझी सगळी सवय तुटली होती. परत नव्यानं स्वत:ला शिकवावं लागलं. म्हणजे खरं तर सायकल चालवणारा जसा खूप वर्षांनी पुन्हा सायकल चालवायला लागल्यानंतर तोल सांभाळून चालवू शकतो, तसंच काहीसं अभिनयाचं आहे. काय व्यक्त करायचं, याची तुम्हाला तांत्रिक माहिती असतेच, मात्र तुम्हाला त्याच्याबरोबरच स्वत:चा स्वीकारही करायचा असतो. त्यासाठी माझ्या आयुष्यात आलेलं ‘तुझ्या-माझ्यात’ हे नाटक आणि त्यातली भूमिका माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती.

लोकांनाही प्रज्ञाची व्यक्तिरेखा खूप आवडली. मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. उलट मला असं आठवतंय ‘श्रीमंत’ नाटक करताना खूप तक्रारी यायच्या की माझा आवाज शेवटपर्यंत पोहोचत नाही. इतक्या वर्षांनी ‘तुझ्या माझ्यात’ करताना मात्र तसं अजिबात झालं नाही. कारण तुम्ही आयुष्याचा अनुभव घेऊन समृद्ध झालेला असता. तुम्ही आई होता, तुम्ही बायको होता, प्रेयसी होता हे सगळे अनुभव एकत्र आलेले असतात. तेच अनुभव तुमच्या अभिनयात, भावना व्यक्त करण्यात डोकावत राहतात. ‘श्रीमंत’ नाटक करताना मी तरुण होते, अनुभवाने तेवढी समृद्ध नव्हते. मात्र प्रज्ञाची भूमिका करताना माझ्या वास्तव आयुष्यातले अनुभव उपयोगी पडले. प्रज्ञा ही आई असते, बायको असते, नवऱ्याचीच प्रेयसी असते आणि एक स्वतंत्र व्यक्तीही असते. त्याच भावना मी अनुभवल्या होत्या. त्या अनुभवाची खूप मोठी शिदोरी आता माझ्याकडे होती. त्याचा मला प्रज्ञाची भूमिका साकारताना खूप फायदा झाला, असं मला वाटतं. म्हणूनच ती भूमिका मी फार सहजतेने आणि मोकळेपणाने साकारू शकले.

समीर कुलकर्णी अतिशय हुशार लेखक आहे. त्याने लिहिलेले संवादही इतके प्रभावी होते की त्याचा एक वेगळाच परिणाम जाणवत होता. पुरुष असून त्यानं स्त्रीचं अंतर्मन फारच उत्तम प्रकारे जाणून त्यातील संवाद लिहिले होते. आणि भाषाही इतकी सहज सोपी की घरातच एकमेकांशी संवाद साधतोय असं वाटायचं. या नाटकाला एक स्त्री दिग्दर्शिकाच गरजेची होती. प्रतिमा नाटक करता करता तुम्हाला इतका छान ‘बिझनेस’ (पूरक हालचाली) करायला देते की आपल्याला वाटतं की आपण कुणाच्या तरी घरात डोकावून पाहतोय. नाटकामुळे मीराच्या रूपाने मला एक छान मैत्रीण मिळाली, सचिन, आनंद आणि प्रतिमा हे पण छान मित्र झाले. त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं. खूप छान केमिस्ट्री जुळली.

हे नाटक माझ्या सेकंड इनिंगची सुरुवात होती. माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. पैसे कमवायचेत किंवा नाव कमवायचं किंवा मला कोणी तरी बनायचं या गोष्टीचं प्रेशर नव्हतं. मला फक्त माझ्या समाधानासाठीच काम करायचं होतं आणि तेच या भूमिकेचं सौंदर्य होतं. माझ्या ‘कमबॅक’साठी सगळं जुळून आलं. मला स्वत:ला लाँच करण्यासाठी ‘तुझ्या-माझ्यात’सारखं एक साधन मला मिळालं. ज्याच्यामुळे आत्मशोध घेऊ शकले. मला तरुणपणी जेवढय़ा वैविध्यपूर्ण भूमिका मिळाल्या नाहीत तेवढय़ा या नाटकानंतर मिळाल्या. माझी सेकंड इनिंग त्यामुळे अधिकच खेळती झाली.

nivedita_saraf@yahoo.co.in  

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2018 7:06 am

Web Title: articles in marathi on marathi natak 4
Next Stories
1 कोलाहलात अंत:स्वर जपणारी अनघा..
2 कुसुमच्या शोधात…
3 नरूची आई..!
Just Now!
X