21 October 2020

News Flash

आव्हानात्मक ‘अम्मी’

माझ्या नाटय़ कारकिर्दीला जवळजवळ ५२ वर्षे झालीत.

माझ्या नाटय़ कारकिर्दीला जवळजवळ ५२ वर्षे झालीत. इतक्या वर्षांत मी ४५०० प्रयोगांतून काम केलंय. आजही रसिकांच्या स्मरणातून गेले नाही, याचा आनंद आहे. आजही रसिक भरभरून माझ्या भूमिकांचं कौतुक करतात. पण गाण्यात किंवा अभिनयात स्वत:ची मुद्रा उमटवावी असं मला नेहमी वाटत आलंय.

अपयश सहसा माझ्या वाटेला आलं नाही. पण तरीही जे वाटय़ाला आलं त्या अपयशाने मी कधी खचले नाही की, यशाने कधी हुरळून गेले नाही. माझ्या अनेक भूमिकांपैकी एका आगळ्यावेगळ्या भूमिकेविषयी मला आज सांगायचंय.. १९८९ मध्ये शेखर ताम्हाणे एका नवोदित निर्मात्याला (जातवेद संस्था) घेऊन माझ्याकडे आले. लेखक स्वत: शेखरच होते. स्पर्धेत ही एकांकिका ‘अम्मी’ या नावाने गाजली होती. माझ्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या निर्मिती सावंतने अम्मीची भूमिका केली होती. त्यांना पुरस्कारही मिळाला होता.

खरं तर संस्था कुठली, लेखक कोण, दिग्दर्शक कोण, आजूबाजूची कलावंत मंडळी कोण याची शहानिशा करूनच मी भूमिका स्वीकारल्या होत्या. इथे तर सगळंच नवीन होतं मला. अगदी भूमिकेपासून. ताम्हाणे बंधू (शेखर, राजन ताम्हाणे) ‘सविता दामोदर मुळे’ मला माहीत होते. ‘वादळवारं’ चं स्क्रीप्ट मी ठेवून घेतलं. नंतर वाचलं. खरं सांगू मी हबकलेच! मी आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा तद्दन आगळीवेगळी भूमिका करायची होती मला. नाटकांत गिरीश ओक, उत्कर्षां नाईक, सखाराम भावे होते. तिघेही मातबर!

झोपडपट्टीतली, दारूचा अड्डा चालवणारी, एक कणखर, स्वाभिमानी, लाथ मारेल तिथे पाणी काढेल असा अम्मीच्या भूमिकेचा आवाका! तारुण्यात तिच्यावर गुदरलेल्या घटना प्रसंगामुळे तिचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला होता. ती कठोर झाली होती. त्यामुळे संपूर्ण झोपडपट्टीवर तिची जरब होती. उत्कर्षांने माझ्या मुलीचं काम केलं होतं. एक उच्चभ्रू समाजातला तरुण अम्मीकडे दारू प्यायला येत असतो ती भूमिका गिरीश ओकने केली होती. दारू प्यायला रोज येणं, अम्मीशी गप्पा मारणं, तिनं दिलेला भाकरीमाशाचा तुकडा मजेत खाणं हा त्याचा दिनक्रम. तीही आपुलकीनं त्याची विचारपूस करते. त्याला माया लावते. माणसाच्या मनाचा तळ कुणालाही शोधता येत नाही. त्या तळाशी एक हलकल्लोळ असतो. हा भावभावनांचा खेळ हाच या नाटकाचा विषय होता. आई-वडिलांच्या मायेला पारखा झालेला हा तरुण नकळत अम्मीकडे ओढला जातो. तिच्या ते ध्यानीमनीही नसतं. एक दिवस तिच्या झोपडीवजा मोरीत आंघोळ करताना तो तिला पाहतो आणि इथून त्याच्या भावनांचा कल्लोळ सुरू होतो..

नाटकातलं एकूण वातावरण, पाश्र्वभूमी लक्षात घेता त्यात भरपूर शिव्या असणं अपरिहार्य होतं. अगदी ‘भ’ची बाराखडीच म्हणा ना. आणि त्या सगळ्या मला द्यायच्या होत्या. तालमीत त्या शिव्या देताना मला घुसमटायला व्हायचं. मी अवस्थ व्हायचे. मला जमतंय ना असाच प्रश्न पडायचा, कारण माझ्या स्वभावात ते नव्हतं. आमचा दिग्दर्शक हरिश तुळसुलकर, प्रायोगिकवाला (आज तो हयात नाही.) प्रायोगिकवाल्याबरोबर काम करण्याची माझी इच्छा काही अंशी सफल झाली होती. पण का कुणास ठाऊक ही भूमिका मला जमणार नाही, असं वाटू लागलं. शेवटी एक दिवस मी स्क्रीप्ट खाली ठेवलं आणि तालीम सोडून निघाले. पण बाकीचे ऐकणार थोडेच होते. स्वत: शेखर, सखाराम भावे, आणि गिरीश यांनी मला विश्वास दिला. काम चांगलंच होणार म्हणून पटवलं आणि मी परत उभी राहिले.

अम्मी अशी का घडली हे सांगत पुढे जाणाऱ्या नाटकात जेव्हा ‘तो’ प्रसंग येतो तेव्हा मात्र ती कोसळते. तिच्या आणि त्या मुलावरून झोपडपट्टीत कुजबूज सुरू होते. त्यातच तिची मुलगीही जेव्हा तिच्याकडे संशयी नजरेने बघायला लागते तेव्हा ती हतबल होते, घायाळ होते. शेवटी एक दिवस सारं असह्य़ होऊन ती झोपडपट्टीवासीयांवर शिव्यांचा भडिमार करते. आरडाओरड करत हंबरडा फोडते. इतकंच नाही तर स्वत:च स्वत:ची झोपडी उद्ध्वस्त करते, हा प्रसंग फारच तणावाचा असायचा.. थेट अंगावरच यायचा, पण अभिनेत्री म्हणून तो आव्हानात्मक असायचा. प्रत्येक प्रयोगानंतर मी शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्टय़ा कोसळलेलीच असायची इतका जबरदस्त परिणाम प्रत्येक प्रयोग माझ्यावर करायचा.

मात्र त्याच वेळी ‘बैठकीची लावणी’ या कार्यक्रमाच्या माझ्या तालमी सुरू होत्या. नाटकानंतर मला एनसीपीएला जावं लागायचं. खूप दमलेली असायची मी. साहजिकच अशोक रानडेसरांनी माझं बौद्धिक घेतलं, तू गाणारी आहेस, अशा नाटकात काम करू नकोस असा सल्लाही दिला. पण मी शेवटी प्रयोग केला. समीक्षकांनी भरपूर तारीफ केली. ‘दीनानाथ’च्या प्रयोगाला ज्येष्ठ समीक्षक माधव मनोहर आले होते. माझ्या कामाविषयी भरभरून लिहिलं होतं.  पुण्याच्या मंगेश तेंडुलकरांनी, पंडित माणकेंनीही माझी खूप तारीफ केली होती. पण इतकं सगळं होऊनही नाटक म्हणावं तसं चाललं नाही. कदाचित हवी तेवढी जाहिरात झाली नाही. तेथे पाहिजे जातीचे असंच म्हणू या!

आजच्या काळात ते नाटक आलं असतं तर टी. व्ही. चॅनल्सवर त्याचं प्रमोशन झालं असतं. जाहिरातबाजी झाली असती आणि बुकिंगवरही परिणाम झाला असता. असो. माझी तीन-चार नाटकं अशीच ‘मारली’ गेली. त्याची ना खंत ना खेद! परंतु ही भूमिका अशी वाया न जाता लोकांसमोर यायला हवी या तीव्र इच्छेतून मी स्वत: लताबाई नार्वेकरांकडे गेले. बाईंनी प्रयोग पाहिला असल्याने त्यांनाही  हे नाटक करावंसं वाटलं आणि त्यांनी ते करायचं नक्की केलं. या नाटकात अम्मीच्या भूमिकेत मीच होते तर तरुणाच्या भूमिकेत अविनाश नारकर होता. पण घडी विस्कटली ती विस्कटली. त्यात बरेच बदल बाईंनी केले. व्यवसायाच्या दृष्टीने, पण म्हणतात ना तसं झालं. शेवटी बाईंनाही नाटक बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण अम्मी माझ्या मनात घट्ट रुतून राहिली. आजही वेगळ्या वाटेनं जाणाऱ्या भूमिकेची वाट पाहते. कलाकाराने नेहमी अल्पसंतुष्टच असायला हवं ना?

फैयाज

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2018 12:47 am

Web Title: articles in marathi on old marathi natak vadalware
Next Stories
1 सिंधूताईंची वेदना
2 स्वाभिमानी, कणखर उमा
Just Now!
X