18 January 2019

News Flash

कुसुमच्या शोधात…

सुजाता ऊर्फ कुसुम मनोहर लेले माझ्या डोक्यात ठाण मांडून बसली होती.

अशोक समेळ

‘अश्रूंची झाली फुले’चा दौरा संपवून मुंबईत आलो आणि ‘कुसुम’ची व्यथा मी माझ्या फाइलमध्ये नोंद करून ठेवली. आपल्याला मूल होत नाही म्हणून एका गरीब मुलीची फसवणूक? एवढी पाताळयंत्री योजना कुणी आखू शकतो, त्यात लेलेची बहीणही सामील? कसल्या विकृतीचे हे नमुने असतील? गोष्ट छान तयार होत होती, पण त्यात ‘नाटक’ दिसत नव्हतं, विचारचक्र चालू होतं. सुजाता ऊर्फ कुसुम मनोहर लेले माझ्या डोक्यात ठाण मांडून बसली होती.

‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचा दौरा होता, १९८६ मध्ये. दौऱ्याचा पहिला प्रयोग पुण्यात होता. ‘बालगंधर्व’ नाटय़गृहापाशी संध्याकाळी ६ वाजता गाडी थांबली. रमेश भाटकर त्याच्या पुण्याच्या घरी गेला. प्रभाकर पणशीकर तिथंच आराम करतो म्हणाले. मग मी चालत चालत डेक्कन नाक्यावर आलो. प्रयोगाला वेळ होता. ‘हॉटेल पूनम’समोर फूटपाथवर एक टपरी होती, तिथे चहा घेऊन उभा राहिलो. चहाचे गरम घोट घसा तापवत होते. एवढय़ात इमर्जन्सी ब्रेक लावून एक रिक्षा थांबली.

रिक्षातून दादा कोंडकेंचा डुप्लिकेट ज्ञानदेव ऊर्फ ज्ञान्या उतरला. ज्ञान्या हे नाव त्यालाही उच्चारायला जड जायचे तेव्हा ज्ञान्याचा, नान्या झाला. उतरल्या उतरल्या एक इरसाल पुणेरी शिवी हासडत म्हणाला, ‘‘का रं अशक्या, तू म्हणे मोठा लेखकु झाला. लई नाटकं लिवतो?’’ मी ज्ञान्याला चहा मागवला.  आमच्या सर्वच संस्थेच्या कलाकारांसाठी रात्री आमचा ‘अन्नदाता’ जोशी (कॉन्ट्रॅक्टर)चे डबे घेऊन हा ज्ञानेश्वर थिएटरला पोचवायचा. माझा १९८० पासूनचा दोस्त. चहा पिता पिता मात्र म्हणाला, ‘‘आज तुला एक इस्टोरी देतो, त्यावर लिव नाटक.’’ एवढं म्हणून तो थांबला नाही. त्याने मला खेचत त्याच्या रिक्षात बसवलं आणि स्वारगेट पोलीस स्टेशनला नेलं. तिथे त्याचा भाऊ सोपान हवालदार होता. त्याला माझी ओळख करून देत म्हणाला, ‘‘आरं शंभूमहादेवाला घेऊन आलो.’’ माझी ही व्यक्तिरेखा ‘अश्रूंची झाली फुले’मधली. सोपानला काही कळेना. त्याचा आणि नाटकाचा काही संबंध नव्हता, हे ज्ञान्याच्या लक्षात आलं आणि तो म्हणाला, ‘‘ते मरू दे, तू मला ती १९८४ ची केस सांगितलीस ना, एका बाईला पोरासाठी फसिवली ती.’ सोपान्याने तोंडातला तंबाखू फिरवत मला आणि ज्ञानाला आत एका बाकडय़ावर बसवलं आणि एक फाइल आणून हातात दिली. मी ती फाइल वाचली. त्यात एका ३२/३५ वर्षांच्या स्त्रीची तक्रार होती. (मी खरी नावं घेणार नाही.) त्यात तिने तिची कर्मकहाणी लिहिली होती. त्या बाईचा नवरा दारू पिऊन रोज तिला मारहाण करायचा. बाई बी.ए. होती. तिने घटस्फोट घेतला आणि वर्षांनंतर एका विवाह मंडळात नाव नोंदवलं. तिथे तिला घटस्फोटित पुरुषांचं रजिस्टर दाखवलं गेलं, त्यात त्या बाईला (मी तिचे नाव सुजाता ठेवतो) मनोहर लेले, हा ‘वर’ म्हणून आवडला. सुशिक्षित, इंजिनीअर, परदेशी कंपनीत नोकरी, विवाह मंडळाच्या सर्वेसर्वा जोशीबाईंनी सुजाताची आणि लेलेची भेट ठरवली. भेट झाली. भेटीत दोघेही एकमेकांना आवडले. लग्नाला लेलेंकडून एकच अडचण होती, त्याच्या पत्नीने घटस्फोट स्वत: मागितला होता. पण तो अजून न्यायालयानं मंजूर केला नव्हता. पण तो घटस्फोट केव्हाही होईल हे लेलेने सुजाताला सांगितलं. सुजाताला लेले आवडला. दोघंही फिरायला लागले. प्रेमात पडले. लग्नाआधी सुजाता गरोदर राहिली. तो काळ वेगळा होता. जोशीबाई (विवाह मंडळाची संचालक) हिच्या लक्षात ही गोष्ट आली तेव्हा ती चिडली. पण सुजाताने त्यांची समजूत घालून, लेले किती चांगले आहेत. मी सदाशिव पेठेत राहू नये, म्हणून त्यांनी माझ्यासाठी औंधला दुसरं घर कसं घेतलं. लेलेंना फुलं फार आवडतात म्हणून त्यांनी माझं नाव ‘कुसुम’ कसं ठेवलं इत्यादी गोष्टी सांगितल्या. मुळात सुजाताला लेलेच्या पत्नीचं नाव कुसुम आहे हेपण माहीत नव्हतं, ना प्रेमात पडल्यावर ते समजून घेण्याचा तिने प्रयत्न केला. जोशीबाईंनी सुजाताला खूप सांगितलं, समजावलं, पण प्रेमात पडलेल्या सुजाताला ते जाणवलंच नाही. औंधच्या हॉस्पिटलमध्ये तिचं नाव नोंदवलं गेलं. लेलेनं होणाऱ्या मुलाचा पिता म्हणून स्वत:चं नाव मनोहर लावलं. मुलगा झाला. सुजाता घरी आली. (औंधला) लेलेनं तिचं सगळं व्यवस्थित केलं. मूल तीन महिन्यांचं झाल्यावर एक दिवस लेलेने, त्याची बहीण आणि पहिली पत्नी, कुसुम यांना औंधला आणलं. बाळ सुजाताकडून ताब्यात घेतलं आणि ‘तुझं काम संपलं’ म्हणून हाकलून दिलं. सुजाता, जोशीबाईंच्या विवाह मंडळात रडत आली. आपली नैतिक जबाबदारी समजून जोशीबाईनं तिला रोज वेगवेगळ्या सामाजिक संस्थेत नेलं. फसवणुकीची तक्रार केली, पण काही सामाजिक संस्थेच्या उच्चभ्रू स्त्रिया तोंडात सिगरेट ठेवून सुजाता कशी मूर्ख आहे यावर लेक्चर देत बसल्या. पुढे ही केस स्वारगेट पोलीस स्टेशनला रजिस्टर झाली. (विवाह मंडळ स्वारगेट परिसरात येत होतं) पोलिसांनी चौकशी केली, पण लेलेविरुद्ध पुरावा काही नव्हता आणि वकील करून न्यायालयात केस दाखल करण्याची सुजाताची सांपत्तिक स्थिती नव्हती. त्यात तिची मानसिक अवस्था विलक्षण खालावली होती. तिला फक्त आपल्या तान्ह्य़ा बाळाचा ध्यास लागला होता.

‘सोपान’नं मला फाइल दाखवली. त्यात चौकशीची नोंद होती. पण निकाल नव्हता. कारण हा ऐच्छिक मामला होता असं लेलेनं जाहीर केलं. ज्ञान्यानं विजयी नजरेनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, ‘‘अशक्या, नाटक हाय ना?’ मी सुन्न अवस्थेत मान हलवली. सुजाताने माझ्यातल्या माणसाला हेलावून टाकलं होतं. मी आणि ज्ञान्या ‘बालगंधर्व’ला आलो. तो म्हणाला, ‘‘नाटक लिवशील ना?’’ मी ज्ञानेश्वरला मिठी मारून म्हटलं, ‘‘जरूर लिहीन मित्रा.’’ ज्ञानेश्वर रात्री भेटायचं सांगून निघून गेला.. मी प्रयोगाची तयारी करू लागलो खरं, पण डोक्यात होती फक्त ‘कुसुम मनोहर लेले’.

‘अश्रूंची झाली फुले’चा दौरा संपवून मुंबईत आलो आणि प्रथम काम केलं ते ‘कुसुमची’ सर्व व्यथा मी माझ्या फाइलमध्ये नोंद करून ठेवली. मनात विचार आला की, आपल्याला मूल होत नाही म्हणून एका गरीब मुलीची फसवणूक? चला धरून चालू की लेलेची बायको खरी कुसुम ही वांझ होती. तर एखादं मूल दत्तक घ्यायचं होतं, पण एवढी पाताळयंत्री योजना, त्यात लेलेची बहीणही सामील? कसल्या विकृतीचे हे नमुने असतील? या प्रत्येकाच्या मानसिक अभिव्यक्तीची मी नोंद केली. अर्थात गोष्ट छान तयार होत होती, पण त्यात ‘नाटक’ दिसत नव्हतं. पण विचारचक्र मात्र चालू होतं. सुजाता देशमुख ऊर्फ कुसुम माझ्या डोक्यातून जात नव्हती. माझ्या ‘शपथ तुला जिवलगा’ नाटकाचे दौरे, ‘अश्रूंची झाली फुले’चे दौरे आणि ‘दूरदर्शन’साठी बनवत असलेली जयवंत दळवी यांच्या ‘आल्बम’ कादंबरीवरील मालिका, ‘पिंजरा’ नाटकाचे दौरे यात ‘कुसुम’ बाजूला राहिली. पुण्याला गेलो की ज्ञानेश्वर हमखास आशाळभूत नजरेनं विचारायचा, ‘‘अशक्या?..’’ मी त्याला माझ्या अडचणी सांगायचो आणि तुझ्यासाठी हे नाटक जरूर लिहीन, असं वचन द्यायचो.

१९८८ मध्ये माझ्या नाटकाच्या गोडाऊनला आग लागली. सर्व सेट जळले. नाटकं बंद पडली. माझीच नाही तर ‘द गोवा हिंदू असोसिएशन’, कांतीभाई मडियांच्या ‘नाटय़संपदे’ची आणि अनेक निर्मात्यांची. हताश अवस्थेत असताना एक दिवस माझा पत्रकार मित्र रमेश उदारेने(आता दिवंगत) विनिता ऐनापुरे यांची ‘नराधम’ ही लघुकादंबरी हातात दिली. त्यात हीच गोष्ट होती. कुसुमची! पुन्हा विचारचक्राला हलवलं, पण चालना मिळेना. त्यात ‘नाटक’ कुठंही दिसत नव्हतं. तोपर्यंत पोटासाठी कामे चालूच होती. लिहायला एकांत नव्हता.

आणि १९९० च्या सुमारास एक दिवस मला नाटक दिसलं. ‘सुजाता देशमुखचा नवरा’ जो मी साफ विसरलो होतो. ती व्यक्तिरेखा मी ‘भाच्या’ या नावानं नाटकात टाकली. ड्रॅमेटिक लिबर्टी घेतली आणि झपाटय़ाने ‘कुसुम मनोहर लेले’ हे नाटक १५ दिवसांत लिहून काढलं. पण तो रफ ड्राफ्ट होता. मी पुन: पुन्हा लिहीतच होतो. दरम्यान, मी पुण्याला एक चक्कर मारली. माझा मित्र प्रकाश योजनाकार, बाळ मोघे याला मी या नाटकाची गोष्ट सांगितली. तो म्हणाला, ‘चल माझ्याबरोबर, मी तुला मनोहर लेले (माझं नाटकातील नाव) दाखवतो.’ त्याने मला चिंचवडात एका मोठय़ा नामवंत ऑफिसमध्ये नेलं. तिथे ‘मनोहर लेले’ इंजिनीअरिंग डिपार्टमेंटला होता, त्याच्या समोर बाळचा मित्र बसायचा. त्याच्या टेबलावर आम्ही बसलो. लेलेकडे पाहातच बसलो. एक बावळट माणूस, नाकावरची माशीसुद्धा हलत नव्हती. अगदी पापभिरू दिसत होता. हा माणूस एवढं भयानक काही करेल? मी हादरलो. स्वारगेट पोलीसजवळच्या विवाह मंडळात आलो. त्यांचा पत्ता मला माहीत होता. केस फाइलमध्ये लिहिला होता. तिथे कळलं की मुलाच्या आणि एकूणच फसवणुकीच्या धसक्याने सुजाता वेडी झाली आणि वध्र्याला एका अनाथ आश्रमात गेली. त्याचं नाव मला संचालिका जोशीबाईंनी सांगितलं नाही, पण तिला काही आर्थिक मदत करायची आमची जरूर इच्छा होती. मात्र तिचा फोटो जोशीबाईंनी आम्हाला दाखवला. जो चेहरा एका सर्वसामान्य पण डोळ्यात अनेक स्वप्नं असलेल्या एका स्त्रीचा होता.

अडीच वर्षांत मी नाटक पूर्ण लिहिलं. मात्र पुढची दोन-अडीच वर्षे हे नाटक गुजराती आणि मराठीत करायला कुणीच तयार नव्हतं. विषय ‘गंभीर’ होता, फसवलेल्या ‘सरोगेट मदर’चा होता. एक दिवस हे नाटक मी प्रभाकर पणशीकरांना वाचून दाखवलं. त्यांना अतिशय आवडलं. त्यांनी ते विनय आपटेला दिलं. विनयने त्या नाटकाचं सोनं केलं. दोन वर्षांत हाऊसफुल्ल. ५०० प्रयोग केले. सुरुवातीला या नाटकाचे आम्ही ‘सामाजिक सावधानता’ म्हणून परिसंवाद आयोजित केले होते. गावोगावीही जात असू. तिथे मला अशा अनेक कुसुम ऊर्फ सुजाता भेटल्या. त्यांची कथा हीच होती. प्रत्येकीवर नाटक लिहिणं अशक्य होतं. एक विषय एकदाच लिहायचा.

कुसुमसारख्या अनेक गोष्टी आजही समाजात अधिक भयानक स्वरूप धारण करून घडतायेत आणि आम्ही समाज, आजही ‘षंढ’ म्हणून त्या गोष्टी पाहून स्वत:च्या स्वार्थासाठी ‘मला काय घेणं देणं’ या वृत्तीनं दुर्लक्ष करतोय. हा आपण आपला षंढपणा सोडला तर आजही अनेक स्त्रियांना आपण वाचवू शकतो. आपण हा भेकडपणा  कधीतरी सोडून देणार आहोत का? आपण आता तरी शहाणे होऊ या!

त्यानंतर माझा ‘ज्ञानेश्वर’ मला कधीच भेटला नाही. पण कुसुम ऊर्फ सुजाता भेटली..

ashoksamel12@gmail.com 

chaturang@expressindia.com

First Published on April 28, 2018 12:35 am

Web Title: ashok samel article on kusum manohar lele marathi natak