13 August 2020

News Flash

वर्षांनुवर्षे दरवळणारी रातराणी

४ मे १९७३ पासून आजपर्यंत मी एकूण १०० कलाकृती दिग्दर्शित केल्या आहेत.

रातराणी’ नाटकामध्ये भक्ती बर्वे इनामदार आणि अरुण नलावडे

४ मे १९७३ पासून आजपर्यंत मी एकूण १०० कलाकृती दिग्दर्शित केल्या आहेत. ज्यामध्ये ७० हौशी आणि व्यावसायिक नाटके, १७ मराठी चित्रपट, ३ टेलिफिल्म्स आणि १० मराठी-हिंदी मालिका यांचा समावेश आहे. सुरुवातीच्या काळात अधिकतर स्त्रीप्रधान नाटके आणि चित्रपट दिग्दर्शित केले. त्यातल्या अनेक भूमिका गाजल्या. त्यांना पारितोषिकेही मिळाली. हौशी नाटकातल्या ‘अरूपाचे रूप’मधील ‘कामिनी’, ‘आषाढातील एक दिवस’मधली ‘मल्लिका’, ‘मा अस् साबरीन’मधली ‘शांकली’.

व्यावसायिक नाटकांतील ‘अग्निपंख’मधील ‘बाईसाहेब’, ‘देहभान’मधील ‘दमयंती/ मावशी’, ‘कुणी तरी आहे तिथं’मधील ‘पद्मा’. पण या सर्वात माझी आवडती आणि लाडकी व्यक्तिरेखा म्हणजे ‘रातराणी’ नाटकातील ‘मिसेस् अ‍ॅना स्मिथ’. ही व्यक्तिरेखा मला इतकी आवडली की, मराठी ‘रातराणी’ नाटकानंतर ‘रेशमगाठ’ या हिंदी नाटकातून ती सादर केली आणि नंतर ‘रेशमगाठ’ या मराठी चित्रपटातून सादर केली. नाटकातील ‘अ‍ॅना’ भक्ती बर्वे इनामदार यांनी सादर केली, तर चित्रपटातील भूमिका रीमा लागू यांनी सादर केली. ‘अ‍ॅना स्मिथ’ला त्या वर्षीची नाटय़दर्पण, नाटय़ परिषद, व्यावसायिक राज्य नाटय़ स्पर्धेत पारितोषिके मिळाली, तर महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात ‘अ‍ॅना स्मिथ’ सवरेत्कृष्ट अभिनेत्री ठरली.

‘रातराणी’ हे प्रभाकर लक्ष्मण मयेकरांचे नाटक ‘भद्रकाली’ या संस्थेने २२ जानेवारी १९८७ रोजी प्रकाशित केले. एखाद्या पाश्चात्त्य नाटकाच्या कथेवर आधारित किंवा रूपांतरित वाटावे असे हे नाटक प्र. ल. मयेकरांचे स्वत:चे स्वतंत्र नाटक आहे. नाटक पाश्चात्त्य वाटण्याचे कारण यातील पात्रे. अ‍ॅना स्मिथ ही अँग्लो इंडियन पियानोवादक स्त्री (भक्ती बर्वे-इनामदार), सॅली स्मिथ (अरुण नलावडे) हा व्हायोलिनवादक तिचा नवरा, डॉ. जिमी क्रॉफर्ड (उदय म्हैसकर) हा अ‍ॅनाचा डॉक्टर मित्र आणि देवेन माहिमकर (सतीश पुळेकर) हा कॉलेजमध्ये शिकणारा व्हायोलिनवादक, अशी चार-पाच पात्रे. त्यातील पात्रांमुळेच यातला माहौल परकीय वाटावा अशी परिस्थिती. प्र. ल. मयेकरांनी लिहिलेल्या संहितेत एका शब्दाचाही बदल न करता मी हे नाटक करायला घेतले इतके अस्सल नाटक मयेकरांनी लिहिले होते.

स्त्री-पुरुष संबंध पियानो-व्हायोलिनच्या नात्याच्या माध्यमातून प्रकट होताना दिसतात. रातराणी जशी उत्तररात्री फुलते तशीच पन्नाशी उलटलेल्या अ‍ॅना स्मिथची गोष्ट आहे ही. या नाटकात अ‍ॅनाची वेगवेगळी रूपे दिसतात. यात ती प्रियकराची प्रेयसी आहे, नवऱ्याची बायको आहे, मुलाची आई आहे, एका सज्जन माणसाची मैत्रीण आहे, तरुण मुलाची वयस्कर मैत्रीण आहे. अशी विविधरंगी भूमिका, शिवाय अँग्लो इंडियन वाटेल अशी अभिनेत्री म्हणून त्या वेळी एकच नाव समोर आले ते भक्ती बर्वे-इनामदार! ‘अग्निपंख’ नाटकातील मोठय़ा कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव गाठीशी असल्याने आणि ‘अथ मानुस जगन हं’, ‘अग्निपंख’ नाटकांच्या यशाची धुंदी मनात ठेवूनच मी आणि प्र. ल. मयेकर भक्ती बर्वे यांच्या घरी गेलो. नाटक वाचून त्यांनी नाटकाविषयी प्रश्नमालिकाच वाचून दाखवली. सुमारे ६०-७० प्रश्न आणि शंका होत्या. फक्त त्यांनी त्या शंका एकदम वाचून दाखवल्यामुळे जेव्हा पहिल्या प्रश्नाचे उत्तर द्यायची वेळ आली तिथपर्यंत मी आणि प्र. ल. या दोघांचीही मानसिक तयारी झाली होती. एका प्रश्नानंतर लगेचच उत्तर द्यायची वेळ आली असती तर कदाचित पंचाईत झाली असती. हे सांगण्याचे कारण एक श्रेष्ठ कलाकार आपल्या भूमिकेचा आणि नाटकाचा किती बारकाईने विचार करतो. त्यांचे प्रश्न प्रामुख्याने ‘अ‍ॅना स्मिथ’बद्दलच जास्त होते. कारण अ‍ॅनासारखी पात्रे रोजच्या वावरात कमी दृष्टीस पडतात. त्यामुळे अ‍ॅनाचे राहणीमान, तिचे कपडे, तिच्या सवयी, चर्चमध्ये किंवा बाहेर जाताना ती हॅट कशी, कोणत्या प्रकारची घालेल, छत्री वापरेल का, स्वयंपाकाच्या वेळचे तिचे कपडे आणि अ‍ॅप्रन, अँग्लोइंडियन असल्याने तिने आत्मसात केलेल्या चालीरीती.. अशा आणि अगणित प्रश्नांची उत्तरे मी दिली. कारण लेखकाने लिहिलेल्या ‘अ‍ॅना’बाबत माझी कल्पनाशक्ती पणाला लावून माझी ‘अ‍ॅना’ मी तयार केली होती. लेखकाने तयार केलेल्या पात्राविषयी तो सहज लिहू शकतो, कारण त्याने ते शब्दात उतरवलेले असतेच, पण दिग्दर्शकाला ते पात्र प्रत्यक्षात जिवंत करायचे असते. या नाटकातील अ‍ॅना स्मिथबाबतची महत्त्वाची गोष्ट म्हणजे विशिष्ट धून वाजल्यावर तिला होणारे सॅलीचे भास. त्या धूननंतर होणाऱ्या भासांमुळे होणारे मानसिक आणि शारीरिक बदल. यासाठी भक्तीताई आणि मी एका मानसोपचारतज्ज्ञांकडे गेलो आणि अ‍ॅना स्मिथ अशा परिस्थितीत कशी वागेल? तिला अ‍ॅटॅक येईल म्हणजे नक्की काय होईल त्यावरचा उपाय काय असेल? यावरचा अभ्यास करून या संपूर्ण स्थितीची एक दिशा ठरवली आणि मगच अ‍ॅनाची व्यक्तिरेखा जिवंत करायची तयारी सुरू झाली..

अ‍ॅना स्मिथ आणि पियानो हे वेगळे असूच शकत नाहीत. ‘रातराणी’ नाटकात व्हायोलिन आणि पियानो ही महत्त्वाची पात्रे आहेत. व्हायोलिन आणि पियानो यांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि त्यालाच समांतर असणारा स्त्री-पुरुष संबंध यांची सांगड लेखकाने या नाटकात घातली आहे. त्यामुळे नाटकातील अ‍ॅनाची भावावस्था ही पियानोच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न मी यात केला आहे. म्हणजे सुरुवातीला सॅलीच्या प्रेमात आकंठ बुडालेली अ‍ॅना जेव्हा बेबी पियानो वाजवते तेव्हा त्या पियानोची रचना, त्याचा अँगल आणि नंतर देवेन माहिमकरमध्ये गुंतत गेलेली अ‍ॅना पियानो वाजवेल तेव्हा त्या पियानोची रचना आणि त्याचा अँगल वेगळा असेल. लेखकाने शब्दांनी दाखवलेला फरक दृश्य स्वरूपात दाखवताना अ‍ॅना स्मिथ जिवंत करायचा प्रयत्न अशा प्रकारे नाटकात करण्यात आला आहे.

पियानो वाजवणारी अ‍ॅना स्मिथ नाटकात भक्ती बर्वे यांच्या रूपात पाहाणे ही रसिकांसाठी एक मेजवानीच होती. या नाटकाचे पाश्र्वसंगीत पुरुषोत्तम बेर्डे यांनी केले होते आणि त्यासाठी मोझार्टसारख्या संगीतकाराच्या रचनांवर आधारित पण स्वतंत्र शैलीचे संगीत त्यांनी दिले ते केवळ अप्रतिमच होते. पुरूचे हे संगीत ‘रातराणी’ नाटकाच्या यशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अ‍ॅना स्मिथ हे एक काल्पनिक पात्र आहे, पण त्याची विविध रूपे आपल्याला या नाटकात पाहायला मिळतात. इतकी रूपे आहेत की जणू एखाद्या अस्तित्वात असलेल्या व्यक्तीचेच चरित्रचित्रण असल्यासारखे वाटते. सॅलीवर प्रेम करणारी अ‍ॅना, सॅलीच्या संगीताने भारावलेली अ‍ॅना, सॅलीने फसवल्याने दुखावलेली अ‍ॅना, सॅलीने वाईट रोग घरात आणल्यावर तितक्याच खंबीरपणे त्याला हाकलून देणारी अ‍ॅना, प्रत्येक वाढदिवसाला सॅलीसाठी केक कापणारी अ‍ॅना, सॅलीच्या वाढदिवसाला वर्तमानपत्रातून जाहिरात देऊन त्याला परत घरी बोलावणारी अ‍ॅना, सॅलीच्या संगीतानेच अ‍ॅटॅक येणारी अ‍ॅना, डॉक्टर मित्र जिमीशी आपले मन मोकळे करणारी अ‍ॅना, पेइंग गेस्ट म्हणून देवेनला पहिल्या भेटीत हाकलून देणारी अ‍ॅना, जिमीने रदबदली केल्यावर तितक्याच प्रेमाने देवेनला घरी राहायला सांगणारी अ‍ॅना, देवेनच्या संगीताला साथ देणारी अ‍ॅना, देवेनवर आईसारखी माया करणारी आणि त्याची काळजी घेणारी अ‍ॅना, हळूहळू देवेनमध्ये गुंतत जाणारी अ‍ॅना, सॅलीने देवेनबद्दल अपशब्द काढल्यावर खचलेली अ‍ॅना, देवेनचे प्रेम प्रकरण समजल्यावर उद्ध्वस्त झालेली अ‍ॅना, देवेनला घरातून परत नेण्यासाठी जिमीशी संबंध तोडून टाकणारी अ‍ॅना, सॅलीला जिमीचा खून करायची सुपारी देणारी अ‍ॅना, दागिने चोरणाऱ्या सॅलीने देवेनवर वार केल्यावर वेडीपिशी होणारी अ‍ॅना, देवेनला ठार मारायची शपथ घेतलेल्या सॅलीला भासात ठार करू पाहाणारी अ‍ॅना, सॅली मेला आहे असे समजून किरणऐवजी स्वत: वेडिंग गाऊन घालून देवेनशी लग्न करू पाहणारी अ‍ॅना, सॅलीऐवजी देवेनला नवरा मानून पियानो वाजवत पूर्ण वेडी झालेली अ‍ॅना. या नाटकात अ‍ॅनाची अशी अनेक रूपे पाहायला मिळतात आणि नाटकात ती जिवंतपणे अनुभवताही येतात.

अ‍ॅना स्मिथ आणि पियानो यांचे नाते विलक्षण आहे. अ‍ॅना स्मिथ आपल्या भावना पियानोद्वारे व्यक्त करते. ती सुरुवातीला सॅलीबद्दलचे प्रेम व्यक्त करताना पियानोचा आधार घेते. ती सॅलीच्या प्रेमात इतकी आकंठ बुडालेली असते की, सॅली गेल्यावरही कुठलीही धून पियानोवर वाजवायला लागली की ती धून सॅलीच्या त्या चक्रवर्ती धूनमध्ये परावर्तित होते. तिला सॅलीचे भास होऊ लागतात. सॅलीचे भलेबुरे अनुभव डोळ्यासमोर येतात आणि तिला अ‍ॅटॅक येतो. ती बेशुद्ध होते.

अ‍ॅनाच्या आजारावर इलाज म्हणून मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारा, व्हायोलिनवादक देवेनला पेइंग गेस्ट म्हणून डॉ. जिमी अ‍ॅनाकडे पाठवतात. ती प्रथम नकार देते, पण तो उत्तम व्हायोलिनवादक आहे असे समजताच त्याला धून वाजवायला सांगते. तो पियानोवर तिला साथ करायला सांगतो तेव्हा शुद्ध भावनेने ती त्याला साथ करते. तो एक कलाकाराच्या कलेचा सन्मान असतो. देवेन अ‍ॅनाच्या घरी रुळल्यावर इलाजाचा एक प्रकार म्हणून अ‍ॅनाला तो सॅलीची धून वाजवायला सांगतो. स्वत: व्हायोलिन वाजवू लागतो. त्याला बघायचे असते की, ही धून वाजवल्यावर नेमके काय होते? भास होतात म्हणजे नक्की काय होते? दोघेही ती विशिष्ट धून वाजवू लागतात आणि अचानक खिडकीचा पडदा दूर होतो. पडद्यामागे अत्यंत किळसवाणा आणि हिंस्र असा सॅली असतो. प्रत्यक्ष जिवंत, खराखुरा. तो अ‍ॅनाचा भास नसतो. देवेनची पाठ असल्याने तो त्याला दिसत नाही. अ‍ॅना सॅलीचे रूप पाहून किंचाळते, ओरडते, घाबरते आणि बेशुद्धही पडते. शुद्ध आल्यावर ती सत्य सांगू पाहाते, पण डॉक्टर जिमी आणि देवेन मात्र त्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्या मते ते सत्य नसून भासच असतो.

देवेन कॉलेजात जातोय, त्याची किरण नावाची प्रेयसी आहे. तो तिच्याबरोबर लग्न करून निघून जाईल, तू एकटी राहशील असे सॅली अ‍ॅनाला घरी येऊन सांगतो. देवेन घरी आल्यावर अ‍ॅना त्याला किरणबद्दल विचारते. तो प्रश्न टाळू पाहातो. त्याच वेळी किरणचा फोन आल्याने अ‍ॅनाला सत्य समजते. ती अस्वस्थ होते. स्वत:वरच चिडलेला देवेन आपला राग व्यक्त करण्यासाठी सॅड मुव्हमेंट वाजवतो. तेव्हा किरणचे सत्य समजल्याने आणि देवेनची सॅड मुव्हमेंट ऐकून उद्ध्वस्त झालेली अ‍ॅना आपल्या भावना पियानोतून व्यक्त करू लागते. ती अत्यंत रौद्र आणि भयावह धून पियानोवर वाजवू लागते. तिचे रौद्र रूप पाहून देवेन हादरतो आणि अ‍ॅनाजवळ आपल्या आणि किरणच्या प्रेमाची कबुली देऊन टाकतो. हा सर्व प्रकार जिमीला कळतो आणि सॅलीमध्ये पाहिलेला राजकुमार अ‍ॅना आता देवेनमध्ये पाहू लागलीय हे लक्षात आल्याने तो देवेनला परत नेण्यासाठी येतो तेव्हा चिडलेली अ‍ॅना त्याला घरातून हाकलून देते. त्याच वेळी फोन आलेल्या सॅलीला जिमीला मारायची सुपारीही देऊन टाकते; पण किरणशी लग्न करून तो घरातून निघून जाऊ शकतो हा देवेनबद्दलचा जिमीचा इशारा ऐकून भानावर येते आणि किरणला सून म्हणून स्वीकारून देवेनला मुलगा म्हणून तिथेच राहायची विनंती करते.

अ‍ॅना पूर्णपणे वेडी होण्याची प्रक्रिया इथूनच सुरू होते. प्रत्यक्षात ती देवेनमध्ये गुंतलेली असते आणि त्याला आपल्यापासून दूर जाऊ न देण्यासाठी त्याला मुलगा मानायला तयार झालेली असते. हा नात्यांकडे पाहाण्याचा लपंडाव तिला वेडाच्या मार्गावर घेऊन जातो. कधी किरणसाठी अ‍ॅनाच्या आईचे मंगळसूत्र द्यायची तयारी करते, तर कधी किरणला स्वत:चा वेडिंग गाऊन देऊन ख्रिश्चन करण्याची तयारी करवते. अचानक चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या सॅलीला देवेन अडवतो. दागिन्यांच्या डबा खेचून घेतो, पण त्याच वेळी सॅली देवेनला ठार मारायची धमकी देऊन निघून जातो. सॅलीने देवेनवर केलेला हल्ला आणि नंतर दिलेली धमकी यामुळे अ‍ॅना संतुलन हरवून बसते आणि सॅलीला कायम पैसे द्यायला नकार देणारी अ‍ॅना त्याला घरी बोलावते. स्वत: दार उघडून सोफ्यावर बसवते आणि उशीचे असंख्य प्रहार सॅलीच्या डोक्यावर करते. उशीतला कापूस घरभर विखुरतो. भासात तिने सॅलीला मारलेले असते आणि प्रत्यक्षात रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या सॅलीची बातमी द्यायला जेव्हा देवेन आणि जिमी घरी येतात तेव्हा अ‍ॅना स्वत:च वेडिंग गाऊन घालून त्यांना आपले आणि देवेनचे लग्न असल्याचे सांगून पियानोवर धून वाजवीत हसू लागते.

अशी ही अ‍ॅना स्मिथ भक्ती बर्वे यांनी अजरामर करून टाकली. मराठी ‘रातराणी’ नाटकानंतर ‘हम’ प्रॉडक्शन्सच्या ‘रेशीमगाठ’ या हिंदी आवृत्तीमध्ये अवतरली. ज्याचे प्रयोग टाटा थिएटर, नरिमन पॉइंट आणि पृथ्वी थिएटरमध्ये सादर झाले. भक्ती बर्वे यांना जेव्हा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांना सन्मानित करण्यासाठी मुंबईतील भाईदास नाटय़गृहात एक प्रयोग सादर केला गेला, जो तीन भाषांत सादर झाला. पहिला प्रवेश मराठी भाषेत, दुसरा हिंदी आणि तिसरा गुजराती असे क्रमाक्रमाने १३ प्रवेशांचे दोन अंक सादर झाले. ज्यात अ‍ॅना स्मिथ होती भक्ती बर्वे इनामदार, सॅली- अरुण नलावडे, देवेन- सतीश पुळेकर/ अली राजा नामदार आणि डॉ. जिमी- उदय म्हैसकर/ चांद उस्मान धर.

१९९० पासून मी चित्रपट दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली आणि १९९९ च्या सुमारास ‘रातराणी’वर चित्रपट करायची हालचाल सुरू केली. अ‍ॅना स्मिथ अर्थातच भक्ती बर्वे-इनामदार. डिसेंबर २००० मध्ये भक्तीताईंबरोबर बैठकही झाली. २००१ च्या मार्चमध्ये त्या परदेशातून आल्यावर शूटिंग करायचे ठरले, पण दुर्दैवाने फेब्रुवारी २००१ मध्ये त्यांचे निधन झाले आणि रातराणीची ‘अ‍ॅना’ तशीच राहिली.

२००२ मध्ये पूनम टेलिफिल्म्स्तर्फे अ‍ॅना स्मिथवर मराठी ‘रेशीमगाठ’ आणि हिंदीत ‘तुम्हारा इंतजार है’ चित्रपटाची सुरुवात झाली ज्यामध्ये अ‍ॅना स्मिथ झाली रीमा लागू झाली. सॅली- अरुण नलावडे, जिमी- सचिन खेडेकर, देवेन- श्रेयस तळपदे यांनी काम केले. चित्रपट असल्याने अ‍ॅनाचे विविध पैलू आणखी बारकाव्यांसह दाखवता आले. मराठी ‘रेशीमगाठ’ महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात दाखल केला जो अंतिम १० मध्ये निवडला गेला. आणि अ‍ॅना भूमिकेसाठी रिमाला, देवेनसाठी श्रेयसला आणि सॅलीसाठी अरुण नलावडे यांना राज्य पुरस्कार मिळाले. हिंदी चित्रपट पूर्ण केला, पण सेन्सॉर होण्याआधीच पूनम टेलिफिल्म्सच्या निर्मात्यांच्या भावाचे निधन झाले आणि तो अडकला. मराठी चित्रपट ईटीव्हीवर प्रकाशित झाला, पण मराठी आणि हिंदी चित्रपटाला पडदा पाहायचे भाग्य लाभले नाही. आजही अ‍ॅना स्मिथ परदेपर ‘तुम्हारा इंतजार है’!

– कुमार सोहोनी

kumar.sohoni@gmail.com

chaturang@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2018 1:27 am

Web Title: bhakti barve inamdar in marathi natak ratrani
Next Stories
1 आनंदी माधवी
2 सविता : एक गूढ
3 आव्हानात्मक ‘अम्मी’
Just Now!
X