|| प्रतीक्षा लोणकर

स्थळ बालगंधर्व, पुणे. १५ ऑगस्ट १९९१. वेळ दुपारी १२.३०. नाटक ‘चारचौघी’. तुडुंब भरलेलं प्रेक्षागृह! नाटक संपतं. आत भेटायला येणाऱ्यांची अलोट गर्दी. कुणी रडतंय, कुणी भरभरून बोलतंय. कुणी हात हातात घट्ट धरून आहे तर कुणी गच्च मिठी मारलीय..

when is Ram Navami
Ram Navami 2024 : १६ की १७ एप्रिल; कधी आहे रामनवमी? जाणून घ्या शुभ मुहूर्त
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन
Nita ambani in paithani
Video: पैठणी, चंद्रकोर अन् मराठमोळा साज! NMACC च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात नीता अंबानी मराठीत म्हणाल्या…

२७ वर्षे झाली या घटनेला! पण अजूनही हे तेवढंच लख्ख आठवतंय! कारण.. काही नाटकं, काही भूमिका या तुमच्या आयुष्यात, तुमच्या करिअरमध्ये तेवढय़ाच महत्त्वाच्या असतात. तसं बघितलं तर प्रत्येक नाटक किंवा प्रत्येक भूमिका तुम्हाला काही ना काहीतरी देत असते, तुमच्यात सूक्ष्म का होईना, पण काहीतरी बदल घडवत असते. पण ‘चारचौघी’नं, त्यातल्या ‘विनी’नं जे दिलं ते आयुष्यभर पुरेल असं! आणि मला वाटतं, ‘चारचौघी’त काम करणाऱ्या प्रत्येकाचीच थोडय़ा फार फरकानं हीच भावना असेल..

खरं तर ‘चारचौघी’ रंगभूमीवर आलं तेच मुळी अडथळ्यांची मोठी शर्यत पार करून. ‘चिंतामणी थिएटर्स’च्या लता नार्वेकर (नाटकाच्या निर्मात्या) त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या म्हणून ते रंगभूमीवर येऊ शकलं. पुढे सूत्रधार राजू नार्वेकरनं त्याचे धडाक्यात प्रयोग लावले आणि रंगभूमीवर १०००च्या घरात प्रयोग करत ते मलाचा दगड ठरलं.

मला आठवतंय, प्रशांतनं (दळवी) लिहिलेल्या या नाटकाचं अर्थातच चंदू (चंद्रकात कुलकर्णी) दिग्दर्शन करणार होता. ‘विनी’ची भूमिका माझ्या वाटय़ाला आली. मला खूपच आनंद झाला. माझ्या करिअरला नुकतीच सुरुवात झाली होती. अशावेळी अशा प्रकारचं नाटक, वेगळ्या वळणाची भूमिका मला करायला मिळणं ही खचितच खूप महत्त्वाची गोष्ट होती. एक आई, तिच्या तीन मुली, त्यांचे नवरे, मित्र अशी एकूण सात कॅरेक्टर्स त्यात होती. मला स्वतला त्या सगळ्याच भूमिका नातं सांगणाऱ्या, जवळच्या, कनेक्ट होणाऱ्या वाटत होत्या. अपवाद फक्त ‘विनी’चा. जी भूमिका मी करणार होते.

विवाहित पुरुषाशी संबंध ठेवूनही त्यावर अवलंबून न राहता, खंबीरपणे आपल्या तीन मुलींना सांभाळणारी, योग्य-अयोग्याचा अचूक तपशील मांडणारी, स्वतंत्र बुद्धिमत्तेची आई अर्थातच सगळ्यांना भावणार होती तर घटस्फोटाचं प्रमाण ज्या काळात वाढत चाललं होतं आणि लोक त्याबद्दल अतिशय संवेदनशील होते त्यावेळी घटस्फोटित ‘विद्या’ बायकांना खूपच जवळची वाटणार होती. तिच्या वाटय़ाला आलेल्या दीर्घ फोन सिक्वेन्समुळे तर ती बायकांना भावनिकरीत्याही खूप भिडणार होती. दुसरी मुलगी ‘वैजू’. स्वाभिमानी तरीही नाकर्त्यां नवऱ्यामुळे कुचंबणा सहन करणारी. ही तर घरोघरी दिसत होती (आताही अनेकदा दिसते.) प्रश्न होता तो ‘विनी’चा. म्हणजे मी जी भूमिका करणार होते तिचा. विनीची व्यक्तिरेखा होती महत्त्वाची, पण दोन मित्रांसोबत राहण्याचा तिचा निर्णय लोकांना कितपत पचनी पडेल, ते मात्र मला कळत नव्हतं. ती लोकांना कितपत भावेल? कनेक्ट होईल का ‘उपरीच’ वाटेल, या संभ्रमात मी होते.

रवींद्र नाटय़मंदिरमध्ये तालमींना सुरुवात झाली. त्यावेळी मी ठाण्याला राहत होते. रिक्षा, ट्रेन, टॅक्सी असा प्रवास करत मला तालमींना पोहोचेपर्यंत हमखास १०-१५ मिनिटं उशीर व्हायचा. सगळ्यांचं वेळेवर तालमींना हजर राहणं बघितल्यावर हळूहळू लक्षात आलं, तुम्ही कितीही दुरून या, तालमींना मात्र तुम्हाला वेळेवरच पोहोचायला हवं. तुमच्या प्रोफेशनालिझमला (व्यावसायिकतेला) तिथूनच सुरुवात होते.

तालमीत चंदू सगळ्यांच्या स्वरांवर, लयीवर मेहनत घेत होता. पण मी मात्र मघाशी म्हटल्याप्रमाणे थोडीशी गोंधळलेली असल्याने चाचपडत होते. अनेकदा कृत्रिम स्वर लागत होते. आणि एक दिवस, मला आठवतंय.. मी, सुनील (बर्वे) आणि मििलद (सफई)असा आमचा तिघा मित्रांचा सीन आम्ही वाचत होतो आणि त्यात माझा एकदम (नकळत) नसíगक सूर लागला. तेव्हा चंदू म्हणाला, ‘बघ, आत्ता एकदम नसíगक, खरा स्वर लागलाय तुझा.’ आणि मग बोळा निघाल्यावर साचलेलं पाणी जसं खळखळ वाहू लागतं तसं काहीतरी उलगडल्यासारखं झालं मला. विनी चुकीचं वागतेय की बरोबरपेक्षाही ती तसं का वागतेय, हे समजून घेणं, तिचा प्रामाणिकपणा लोकापर्यंत कसा पोहोचवता येईल याचा मी विचार करायला लागले. ती कनेक्ट होईल की नाही हा मुद्दा बाजूला पडून तिची सुखी होण्याची तळमळ, फॅमिली हिस्ट्रीतून अपरिहार्यपणे तिचं या निर्णयापर्यंत पोहोचणं हे प्रेक्षकांना समजावं याचा विचार मी करायला लागले. दोन मित्रांबरोबर राहण्याचा तिचा विचार काहीतरी सनसनाटी करण्याच्या हेतूनं आला नव्हता तर तिच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे, नसíगकपणे ती (विनी) या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलीए ही तिच्या ‘भूमिकेमागची भूमिका’ मला आतून समजली आणि मग पुढे इतर भूमिका करताना ती मी आवर्जून अमलात आणत राहिले. यानिमित्ताने दुसऱ्या एका महत्त्वाच्या गोष्टीची मी कायमची खूणगाठ बांधली ती म्हणजे भूमिका कोणत्याही प्रकारची असो नसíगकरीत्या तुम्ही तिला भिडलात तर तुम्हाला सच्चा, अस्सल स्वर मिळतो आणि तुम्ही भूमिकेच्या गाभ्यापर्यंत पोहोचू शकता.

‘चारचौघीची टीम’ ही फार मोठी जमेची बाजू होती. आईचा रोल ‘युनिक’ पद्धतीने साकारणाऱ्या दीपा लागू, अत्यंत ताकदीने आणि तितक्याच उत्स्फूर्तपणे विद्या साकारणारी वंदना गुप्ते, आसावरी जोशी, सुनील बर्वे, मिलिंद सफई, प्रबोध कुलकर्णी सगळेच जण भूमिकांना अतिशय फिट्ट होते आणि त्यांनी भूमिका साकारल्याही तितक्याच मनापासून आणि दमदारपणे. नाटकाचे जसजसे प्रयोग होत गेले तसं तसं आमचं आपापसातलं टय़ुनिंगही वाढत गेलं आणि त्यामुळे प्रयोगही अत्यंत रंगतदार होत गेले. नाटक छान चालत असल्यामुळे आमचे महिन्याला २७-२८ प्रयोग व्हायला लागले आणि मग ‘चारचौघी’चं एक छान ‘कुटुंबच’ बनलं! माझ्याबाबतीत सांगायचं तर या निमित्ताने मी पहिल्यांदा रंगभूमीवर ‘व्यावसायिक यशा’ची चव चाखली. १४-१४ वेळा नाटक बघणारी मंडळी भेटत होती. त्यामुळे मालिकेत काम करणाऱ्या चेहऱ्यांना आता जशी लोकप्रियता मिळते तसं आम्हाला त्यावेळी सगळेजण ओळखायला लागले होते. करिअरच्या सुरुवातीच्या काळात कलाकाराला मिळणारी ही ओळख खूप दिलासा देणारी असते.

‘चारचौघी’च्या निमित्तानं मी आणखी एक वेगळा ‘शो मस्ट गो ऑन’चा अनुभव घेतला. आमचा १०० वा प्रयोग होता. नेहमीप्रमाणे हाऊसफुल्ल! आणि मला १०३ ताप! धड उठवत नव्हतं तर प्रयोग कसा करणार हा प्रश्नच होता. प्रयोगाच्या तिथे (शिवाजी मंदिर) कशीबशी पोहोचले आणि ग्रीनरूममध्ये डायरेक्ट गादीवर आडवी झाले. माझी अवस्था बघून सगळ्यांनी जवळजवळ प्रयोग रद्द करण्याचे ठरवून टाकलं होतं. इतक्यात नेहमीच्या उत्साहात वंदना आत आली आणि म्हणाली, ‘‘चल ऊठ. आपण डॉक्टरांना फोन करू. औषध घेऊ आणि प्रयोग करू. काही होणार नाही तुला. बरंच वाटेल बघ.’’ मी काही विचार करण्याच्या मन:स्थितीत नव्हतेच. सुनील, आसावरीनं धावपळ करून डॉक्टरांकडून औषधं मागवून घेतली आणि मी कशीबशी प्रयोगाला उभी राहिले. प्रचंड थकवा जाणवत होता. प्रयोग सुरू झाला. पण खरं सांगते नंतर तो कसा आणि कधी संपला मला कळलंच नाही! एक विलक्षण उत्साह अंगात संचारला होता. ‘शो मस्ट गो ऑन’ हे आत्तापर्यंत ऐकलं होतं. त्या दिवशी ते प्रत्यक्ष अनुभवलं! निर्मात्या, सहकलाकार यांच्या चेहऱ्यावरचं प्रयोग झाल्याचं समाधान, प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे सगळं मी अनुभवलं. माझं आयुष्यभराचं संचित होतं ते! त्या दिवशी रंगभूमीची ही विलक्षण जादू मला जाणवली!

‘चारचौघी’तली ‘विनी’ करताना यासारखे अनेक महत्त्वाचे क्षण माझ्या वाटय़ाला आले..

प्रयोगांबरोबरच ‘चारचौघी’वर परिसंवादही खूप झाले. अनेक अंगांनी चर्चा झाल्या. यात वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रिया, मुली भेटल्या. त्यांनी आपले अनुभव आवर्जून सांगितले. मनमोकळेपणानं त्यांच्या व्यथा सांगितल्या. त्यातल्या काही मुलींनी ‘आम्ही याच समस्येतून जात आहोत’ म्हणत मला घट्ट मिठी मारली तर काही जणींनी यामुळे कुटुंबव्यवस्थेला तडा जाईल का? अशी कळकळीनं शंका व्यक्त केली. या सगळ्याला खरं तर येणारा काळच उत्तर देणार होता. पण ते काहीही असलं तरी या सगळ्यांनी माझं कलाजीवन समृद्ध केलं. मी पुढे ज्या स्त्री व्यक्तिरेखा साकारल्या त्यात या सगळ्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मग ती ‘इक्बाल’मधली ‘सईदा’ असो, ‘एवढंसं आभाळ’मधली ‘शकुन’ असो, ‘भेट’मधली ‘सुधा’ असो किंवा ‘स्वराज्यरक्षक संभाजी’मधली ‘जिजाबाई’ असो!

‘चारचौघी’त जेव्हा मी पहिल्यांदा दोन मित्रांबरोबर राहण्याचा निर्णय बोलून दाखवते तेव्हा प्रेक्षागृहातून अनेकदा ‘ऑ?’, ‘ आई गंऽऽ’, ‘बापरेऽऽ’ असे चीत्कार ऐकायला येत. एका प्रयोगाच्या वेळी तर एकजण म्हणाला, ‘मी पण हाये की तिसरा’. पण हेच सगळे नाटक संपताना तिच्या म्हणण्याकडे गांभीर्याने बघत असायचे, तिचा निर्णय कशातून आलाय याचा विचार करायचे. कदाचित भविष्यात असं घडूही शकेल असं म्हणत घरी जायचे. विनीचा निर्णय उच्छृंखल वृत्तीतून किंवा चंचलतेतून आला नसून एका विशिष्ट परिस्थितीत, तिच्या वयाच्या समजेतून घेतलेला तो निर्णय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्यात मी यशस्वी झाले होते याचीच ती एकप्रकारे पावती होती! अशी वर्तमानाबरोबर भविष्याशी नातं सांगणारी, रंगमंचाबरोबर रंगमंचाबाहेरही अनेक गोष्टी शिकवणारी, अनुभव देणारी ही विनीची भूमिका म्हणूनच माझ्या करिअरमधली मला अतिशय महत्त्वाची भूमिका वाटते.

आज अनेकदा मागे वळून बघताना वाटतं, विनीची भूमिका आज आपण अधिक चांगली, अधिक बारकाव्यानिशी करू शकू.. पण मग दुसऱ्या क्षणी वाटतं, आज त्या वयाचा निरागसपणा कसा येणार? अभिनयातून तो आणण्याचा प्रयत्न केला तरी तो ‘प्रयत्नच’ असणार. शेवटी ‘खरं’ आणि ‘खऱ्यासारखं’ यात नेहमी अंतर असणारच!

नाटकाच्या शेवटच्या प्रसंगात विनी आईला विचारते, ‘‘अगदीच चुकीचा आहे का गं माझा निर्णय?’’ तेव्हा आई तिला सांगते, ‘‘विनी, आरशासमोर उभं राहायचं आणि आपणच आपल्याला प्रश्न विचारायचे. ही उलटतपासणी जितकी परखड ना तितक्या कठोरपणे तुला कोणीही जाब विचारू शकणार नाही.’’

आजही जेव्हा मनात अनेक गोष्टींबद्दल शंका निर्माण होते, चूक की बरोबर? योग्य की अयोग्य? असे प्रश्न निर्माण होतात तेव्हा असेच मी स्वत:ला प्रश्न विचारते-

आणि मग हळूहळू सगळं उमगत जातं..

premanandgajveeg@gmail.com
chaturang@expressindia.com