21 October 2020

News Flash

‘‘धन्यवाद, रमा!’’

तालमी सुरू झाल्या. रमाशी ओळख वाढायला लागली. ती साधारण पन्नाशीची म्हणजे माझ्या वयाची, गृहिणी होती.

इला भाटे ilabhate57@gmail.com

‘यू टर्न’ नाटकाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. महत्त्वाचं म्हणजे ‘उतारवयातील कंपॅनियनशिपची गरज’ या सामाजिक प्रश्नाकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं. त्या प्रश्नावर चर्चासत्रं झाली, लेख लिहिले गेले, ज्येष्ठ मैत्री संघटना स्थापन झाल्या. रमाने या सामाजिक प्रश्नांचं भान मला दिलं म्हणून मी म्हणते, ‘‘धन्यवाद, रमा!’’

नोव्हेंबर महिना, २००८ चा. मड आयलंडला भाटी गावात आमच्या ‘असंभव’ मालिकेचं शूटिंग सुरू होतं. मला, गिरीशचा म्हणजे डॉ. गिरीश ओक यांचा फोन आला. ‘‘इला, मी एक नाटक करतोय. दोनच पात्रांचं, तुला काम करायला आवडेल?’’ म्हटलं ‘‘होऽ नाटक आवडलं तर काम करायला आवडेल की!’’

मी चांगल्या नाटकाची आतुरतेने वाटच पाहात होते. दुसऱ्याच दिवशी उत्साहाने आरे कॉलनीत तालमीच्या ठिकाणी पोचले. गिरीशबरोबरच तिथे लेखक, दिग्दर्शक आनंद म्हसवेकर आणि निर्माते गोविंद चव्हाण यांची भेट झाली. नाटकातल्या काही भागांचं वाचन झालं. मी म्हटलं, ‘‘सगळं नाटक वाचून उद्या सांगते.’’ रात्रीच संपूर्ण संहिता दोनदा वाचून काढली आणि दुसऱ्या दिवशी म्हसवेकरांना म्हटलं, ‘‘नाटक करायला आवडेल मला पण शेवट जरा..’’ माझं वाक्य पूर्ण होण्याच्या आत ते म्हणाले, ‘‘शेवट हा नसेल. आपण त्यावर चर्चा करू, पण तुम्ही त्याची चिंता करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा.’’

‘‘मग तालीम सुरू करू या का?’’ मी विचारलं.

झालं!! ‘यूटर्न’ नाटकाशी आणि त्यातल्या रमा गोखलेशी माझी गाठ पक्की झाली.

तालमी सुरू झाल्या. रमाशी ओळख वाढायला लागली. ती साधारण पन्नाशीची म्हणजे माझ्या वयाची, गृहिणी होती. पती- प्रभाकर गोखले, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस! त्यांचं तीन वर्षांपूर्वी निधन झालं होतं. एकुलता एक मुलगा साहिल, नोकरीच्या निमित्ताने लंडनमध्ये. रमा पुण्यात एकटीच राहात होती. प्रसन्न, हसतमुख, बडबडी, आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणारी सहृदय आणि विशेष म्हणजे उत्तम विनोदीबुद्धी असलेली रमा मला अधिकाधिक कळायला लागली, आवडायला लागली. ती कधी भाबडी वाटायची पण भोळसट नव्हती. तिचा धांदरटपणा लोभस होता. ती हळवी होती पण दुबळी नव्हती. नवऱ्याचा सार्थ अभिमान बाळगणारी रमा, कठीण काळात खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली होती. सर्वसाधारण गृहिणी असणाऱ्या रमामधली ही आंतरिक शक्ती मला भावली. हा तिच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा होता.

या रमाची, योगायोगाने मुंबईच्या मेजर सुधीर वैद्यांशी गाठ पडते. मेजर म्हणजे अत्यंत गंभीर, शिस्तप्रिय, कडक मिलिट्री प्रकरण! निवृत्त घटस्फोटित, त्यांची विवाहित मुलगी बंगलोरला, त्यामुळे हे एकटेच! ‘कंपॅनियन पाहिजे’ अशी मेजरने वृत्तपत्रात दिलेली जाहिरात रमा बघते. विरुद्ध स्वभावाचे हे दोघेजण कंपॅनियन म्हणून एकत्र राहायचं ठरवतात. पुढे ‘यू टर्न’ घडतं..

एरवी रमाकडे पाहिलं तर ती, चारचौघींसारखा विचार करणारी असेल असं वाटतं; पण मेजरबरोबर लग्न न करता कंपॅनियन म्हणून राहण्याचा, म्हटलं तर धाडसी निर्णय एकटीनं घेण्याची क्षमता तिच्यात होती. मैत्रिणीशी फोनवर बोलताना ती म्हणते, ‘‘लोकांचं काय गं, लग्न केलं असतं तरी बोललेच असते की! माणसानं आपल्या मनाला पटेल ते करावं.’’ मला कौतुक वाटलं रमाचं! रमात आणि माझ्यात काही बाबतीत साम्य होतं, पण काही गोष्टी अगदीच भिन्न होत्या. मी रमासारखी खूप बडबडी नाही, हळवी किंवा भाबडीही नाही. मग रमाची ही स्वभाववैशिष्टय़ लक्षात ठेऊन, त्यांचं अवसान सांभाळत त्या पलीकडची कणखर रमा पकडण्यासाठी मी तालमीत धडपडत होते. माझा आणि रमाचा लपंडाव चालायचा. ‘सापडली रमा!’ असं वाटून निश्चिंत व्हावं तर दुसऱ्या दिवशी वाटायचं ‘छे! अशी नाहीये रमा.’ मग पुन्हा अस्वस्थता, तगमग.

रमा पुण्याची आहे, तिचं बोलणं कसं असेल? यावर विचार करता करता, एका पुणेरी मैत्रिणीची, शब्दांवर जास्त आघात देऊन, ठासून बोलण्याची पद्धत रमाला दिली आणि जणू रमाच्या अंतरंगाचं दार माझ्यासाठी उघडलं गेलं. तिचं बोलणं, हसणं, वावर, हातवारे, लकबी ठरवता ठरवता मला जाणवायला लागलं की रमाच्या भाव-भावनांचा, विचारांचा आलेख माझ्या मनात आता अधिक स्पष्ट होतोय.

नाटकात, रमा आणि मेजर यांच्यामधला स्नेह हळूहळू फुलत जातो. शब्दातून आणि नि:शब्दातूनही! गिरीशबरोबर मी नाटक खूप वर्षांनी करत असले तरी सुरुवातीपासूनच आमचे सूर छान जुळले. छोटंसं उदाहरण सांगते – रमाला चहा थंड आवडतो तर मेजरना अगदी गरमागरम! हे प्रेक्षकांना पहिल्याच प्रवेशात कळलेलं असतं. नंतरच्या प्रवेशात मेजरनी चहा दिल्यावर ‘थँक्यू’ म्हणून रमा, चहा थंड होण्यासाठी थांबते पण पुढच्याच क्षणी तिला मेजरचं वाक्य आठवतं. ‘थंड चहा पिणारी माणसं मला आवडत नाहीत.’ ती पटकन कप उचलून तोंडाला लावते. गरम चहाने तिचं तोंड भाजतं – गडबडून ती मेजरकडे बघते.. मेजर तिच्याकडेच पाहात असतात, ते लगेच नजर दुसरीकडे वळवतात. रमा जोरजोरात फुंकर मारून तो गरम चहा पिण्याचा प्रयत्न करते. तिची उडालेली तारांबळ, मेजर गालातल्या गालात हसत, न बघितल्यासारखं दाखवून बघत असतात. हा लहानसा खुसखुशीत प्रसंग, कुठल्याही संवादाशिवाय केवळ प्रतिसादांच्या देवाणघेवाणीतून फार सुंदर रंगायचा.

तीच गोष्ट गंभीर प्रसंगांची. लंडनमध्ये बॉम्बस्फोट झालाय कळल्यावर मुलाच्या काळजीनं रमाचं व्याकूळ होणं आणि मेजरने तिला धीर देणं असो किंवा मुलीच्या बाळंतपणाच्या वेळी मोठी समस्या उद्भवल्यावर मेजरचं खचून जाणं आणि रमाने त्यांना उभारी देणं असो सगळे प्रसंग रमा – मेजरनी एकमेकांना अचूकवेळी दिलेल्या अर्थपूर्ण आणि नेमक्या प्रतिसादांमुळे खूप परिणामकारक होत असत.

रमाला साकारताना म्हसवेकरांचं उत्तम मार्गदर्शन आणि गिरीशचं मोलाचं सहकार्य लाभलं आणि मला वाटतं खुद्द रमा पण माझ्या मदतीला सरसावली. रमाच्या फोनवरच्या एकतर्फी बोलण्यातून पलीकडचा माणूस काय बोलतो हे कळावं म्हणून आम्ही खूप मेहनत घेतली. त्या बोलण्यातून रमाचं तिच्या मैत्रिणींशी, मुलाशी, मेजरच्या मुलीशी असलेलं आणि बदलतं नातं प्रेक्षकांपर्यंत पोचत असे. रमाच्या व्यक्तिरेखेतील बारकावे मी शोधत राहायचे आणि ते दर्शविण्यासाठी नव्या नव्या जागा तिने सुचवत राहायच्या असा आमच्यात जणू अलिखित करारच झाला. नाटकात दोनच पात्रं, ती सतत रंगमंचावर, प्रेक्षकांचे कायम त्यांच्यावर लक्ष. त्यामुळे प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याची जबाबदारी मोठी. म्हणून, रमाचा रंगमंचावरचा क्षण न् क्षण जिवंत करण्याचा आम्ही चंगच बांधला. माझं आणि रमाचं नातं प्रेक्षकांच्या मनात किती घट्ट बसलं त्याची एक गमतीदार आठवण – सांगलीत एका गृहस्थांकडे गेलो होतो. ते म्हणाले, ‘‘बिस्किट घ्या ना, तुम्हाला चहाबरोबर बिस्किट लागतं – नुसता चहा घेतला तर अ‍ॅसिडिटी होते – लक्षात आहे आमच्या.’’ मला हसू आलं. म्हटलं, ‘‘अहो, ते मला नाही, रमाला.. नाटकात.’’

‘यू टर्न’ नाटकाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. तिकीट खिडकीवर लांबच लांब रांगा लागल्या, ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड झळकले, बक्षिसांचा वर्षांव झाला, ६०० च्यावर प्रयोग झाले. आणि महत्त्वाचं म्हणजे ‘उतारवयातील कंपॅनियनशिपची गरज’ या सामाजिक प्रश्नाकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं. त्या प्रश्नावर चर्चासत्रं झाली, लेख लिहिले गेले, ज्येष्ठ मैत्री संघटना स्थापन झाल्या. रमाने या सामाजिक प्रश्नांचं भान मला दिलं आणि त्याकडे पाहण्याचा निकोप दृष्टिकोनही दिला.

एका आठवणीने आजही मन गलबलतं. पुण्यातल्या प्रयोगानंतर एका बाईंनी येऊन मला घट्ट मिठी मारली. त्यांच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहात होत्या, तोंडातून शब्द फुटत नव्हता. माझ्याही डोळ्यात पाणी आलं. मी त्यांच्या पाठीवरून हात फिरवत राहिले. जरा वेळाने त्या शांत झाल्या आणि म्हणाल्या, ‘‘माझीच गोष्ट सांगतलीत हो! माझ्या मुलाला बघायला सांगते हे नाटक म्हणजे त्याला कळेल आईची व्यथा काय आहे ते!’’ आणि भर्रकन् निघून गेल्या.

‘यू टर्न’ आणि रमा यांचं माझ्या कलाजीवनात महत्त्वाचं स्थान आहे. माझी फार इच्छा होती की मला एकतरी असं नाटक मिळावं, ज्याचं नाव घेतलं की माझं नाव आठवेल आणि माझं नाव घेतलं की ते नाटक आठवेल. माझी ती इच्छा पूर्ण झाली. ‘यू टर्न’च्या संपूर्ण संघाचे मनापासून आभार आणि धन्यवाद रमा!

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2018 1:05 am

Web Title: marathi drama u turn rama gokhale u turn marathi play
Next Stories
1 आत्मिक समाधान देणारी ‘सईदा’
2 ..आणि विनया मला भेटू लागल्या
3 एकाच नाटकातल्या दहा भूमिका
Just Now!
X