21 October 2020

News Flash

माझी ‘व्हाइट लिली’

आमच्या नाटकातली ‘व्हाइट लिली’ खूप एण्टरप्रायजिंग आहे, जरा फिल्मी आहे, खूप हळवी आहे.

सोनाली कुलकर्णी  happysokul@gmail.com

‘‘रसिका जोशीची ‘व्हाइट लिली’ – मराठी रंगभूमीवरच्या महत्त्वाच्या स्त्री भूमिकांमधला एक मैलाचा दगड आहे. तिच्या असामान्य प्रतिभेला कुर्निसात म्हणून कुणी तरी तिथवर प्रवास करणं फार आवश्यक होतं. ते धाडसाचं होतं. तुलनेचा, अपयशाचा धोका होता.. पण मिलिंद, दिनू आणि आमच्या अख्ख्या टीमसाठी अग्निपरीक्षेला तयार होणं मस्ट होतं. माणसं धक्क्यानं गप्प झाली होती. मनं बंद झाली होती. एखादी खिडकी उघडणं गरजेचं होतं..’’

इतका अप्रतिम प्रयोग होता तो. मी प्रेमातच पडले ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ या नाटकाच्या! काय करू आणि काय नको- यातल्या माणसांसाठी – असं वाटायला लागलं; पण करण्यासारखं काही उरलंच नव्हतं. कॉस्च्युम, संगीत, नेपथ्य.. सगळं इतकं रिफ्रेशिंग आणि चपखल होतं की, आपण फक्त खरा प्रेक्षक असणं आणि नाटकाला मनसोक्त दाद देणं एवढंच हातात होतं. ते मी पुरेपूर केलं. पुढचे कित्येक प्रयोग स्वत: तिकीट काढून मी ठिकठिकाणी माझ्या आवडत्या माणसांना नाटकाला पाठवत राहिले. १०० वा प्रयोगही त्याला अपवाद नाही. नाटकाचा मूळ खंदा निर्माता दिनू पेडणेकर, मिलिंद फाटक आणि रसिका जोशी – यांना मी यशवंत नाटय़गृहात कुठे भेटले, काय बोलले हे आजही माझ्या स्पष्ट लक्षात आहे. मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला आग्रहाने (हट्टाने म्हणू या..) नाटकाला घेऊन गेले होते, जवळजवळ धाक घालून.. की तुला हे नाटक आवडलं तरच मी लग्नाचा विचार करीन.. निकाल सांगायची गरजच नाही. नचिकेत माझ्याइतकाच वेडा झाला नाटक पाहून!

मग रसिका आपल्यातून निघून गेली आणि अर्थातच नाटक थांबलं. इतकं थांबलं, की या अत्यंत प्रिय नाटकावर, त्या विषयावर पडदाच पडला. हजारोंना दु:ख झालं आणि माझ्यासकट प्रत्येकानं ते दु:ख हृदयाच्या एका कप्प्यात – पुस्तकात मिटलेल्या फुलासारखं बंद करून ठेवलं.

दरम्यान, मी संसारात रुळले, मला बाळ झालं. मी माझ्या विश्वात दंग होते.. थांब, माझ्या बाळाला न्हाऊ घालते, तीट लावते. अशा माझ्या एका रम्य सकाळी अनपेक्षितपणे मिलिंद फाटकचा फोन आला. तो म्हणाला, ‘‘व्हाइट लिली करशील का.’’ माझा वासलेला ‘आ’ बंद व्हायच्या आधी मला रसिकाशी झालेलं बोलणं आठवलं – या नितांत सुंदर नाटकासाठी मी काही करू शकत नाही ही तगमग मनात होती – मी रसिकाला म्हटलं, ‘‘मराठीपुरतं मर्यादित का ठेवायचं.. तुम्ही हे नाटक हिंदी, इंग्लिशमध्ये करा.. खर्चाचा विचार करू नका. मी निर्मिती  करते आणि याच संचाबरोबर करा.’’ माझं ते प्रॉमिसही रसिकाच्या एक्झिटनंतर मी बंद केलं होतं; पण ‘व्हाइट लिली’चं प्रॉमिस विंगेत थांबलं होतं वाटतं. ते पुन्हा एन्ट्री घेणार होतं. कारण ते नाटक होतं – आणि कितीही क्लिशे वाटलं तरी त्याचं एकच म्हणणं होतं – ‘शो मस्ट गो ऑन.’

मिलिंदने मला समजावलं आणि मी त्याच फोनवर त्याला होकार दिला. हे हास्यास्पद बळ माझ्यात कुठून आलं माहिती नाही; पण आता मला त्या धाडसाचं फार बरं वाटतं. रसिकाची ‘व्हाइट लिली’ – मराठी रंगभूमीवरच्या महत्त्वाच्या स्त्री भूमिकांमधला एक मैलाचा दगड आहे. तिच्या असामान्य प्रतिभेला कुर्निसात म्हणून कुणी तरी तिथवर प्रवास करणं फार आवश्यक होतं. ते धाडसाचं होतं. तुलनेचा, अपयशाचा धोका होता.. पण मिलिंद, दिनू आणि आमच्या अख्ख्या टीमसाठी अग्निपरीक्षेला तयार होणं मस्ट होतं. माणसं धक्क्यानं गप्प झाली होती. मनं बंद झाली होती. एखादी खिडकी उघडणं गरजेचं होतं.

टीमचं प्रचंड कौतुक वाटतं, कारण आम्ही तीन-चार महिने तालीम केली, पण ‘अगं, असं नाही.. रसिका अमुक अमुक करायची,’ असं म्हणत कुणीच मला हसलं नाही/माझं मानसिक खच्चीकरण केलं नाही. सगळ्यात जास्त आभार आणि शाबासकी – माझा लेखक-दिग्दर्शक को-स्टार मिलिंद फाटक याला. रसिका असताना मिलिंद किंचित बॅकग्राऊंडला होता – पण तो किती ताकदीचा लेखक आहे – हे मला तालमींदरम्यान जाणवलं. दिग्दर्शक म्हणून त्याला माझ्यावर प्रचंड मेहनत घ्यावी लागली आणि माणूस म्हणून कायमच स्वत:च्या भावनांना आवर घालावा लागला. मिलिंद रसिकाचा फार जवळचा मित्र.. सुरुवातीला रिहर्सलमध्ये साऊंड ट्रॅकवर रसिकाचा आवाज आला, की आम्ही नि:स्तब्ध व्हायचो.. पण रस्ता शोधावा लागला..

मी तालमी करायला लागले आणि संहितेतला आजचा काळ रोरावत समोर आला. आजची पिढी म्हणण्यापेक्षा, आजच्या आपल्या काळातली कुठल्याही वयोगटातली जगणारी माणसं – स्वत:ला बिचारं मानत नाहीत. आपल्या दु:खाला कुरवाळत नाहीत. आलेल्या दिवसाला थेट भिडतात आणि प्रश्नांनाही; पण स्वत:ची मूठ बंद ठेवूनच. समोरची व्यक्ती बोलकी आहे म्हणजे ती आपल्या कळीच्या भावना व्यक्त करतच असेल असं नाही. स्वत:चा खासगी कप्पा बंद ठेवूनही तासन्तास बोलू शकण्याचं कसब आजच्या माणसांनी कमावलंय. भरीस भर म्हणून आधुनिक तंत्रज्ञान, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर इत्यादी सोशल मीडियाही आहेच. बोलघेवडय़ांच्या विरोधाभासात शांत माणसं बुजरी वाटतात; पण त्यांच्या गप्प राहण्यात धूर्त आक्रमकता आहे. दबा धरून बसलेला त्यांचा सावधपणा सावज दिसल्यावर झडप घालतोच.

ही संहिता शोधते, की मग आजच्या माणसांना हवंय तरी काय आणि सो कॉल्ड जगापासून पळ काढल्यावरही ती यशस्वी आणि समाधानी का नाहीत? कारण वरकरणी कितीही ‘नथिंग मॅटर्स’चा मुखवटा घातला, तरी माणसाला असणारी माणसाची गरज संपत नाही. व्हाइट लिली आणि नाइट रायडर अगदी असे आहेत. एकमेकांवर शिंग रोखलेले, कुठल्याही क्षणी रणांगण सोडून पळून जायच्या तयारीत असलेले, अपेक्षांच्या लांबलचक याद्या घेऊन बसलेले आणि खरं तर फक्त प्रेमाचे भुकेले! आपल्यातच असते एक ‘लिली’ आणि एक ‘रायडर’. या पात्रांना घट्ट मिठी मारून म्हणावंसं वाटतं – की बास करा हा वेडेपणा. कुणाला आपल्या मनातली भीती, असुरक्षितता, आशाआकांक्षा कळू नयेत म्हणून किती धडपडणार आहोत आपण. किती काळ वेगळं पात्रं म्हणून जगणार आहोत. एक क्षण येतो जेव्हा बुरूज ढासळतात. तेव्हा बारीक/ जाड/ सुंदर/ हॅण्डसम, श्रीमंत/ गरीब या टप्प्यांना पार करून एका नव्या तीरावर पोचतो. त्या तीराचं नाव आहे खरेपणा. तो केंद्रबिंदू आहे जगण्याचा. आपला आपल्याशी असलेला प्रामाणिकपणा. तो सोडून विस्कटल्यासारखे परीघभर स्वत:लाच शोधत राहातो आपण आणि त्या हरवण्याची किंमत आयुष्यभर मोजत राहतो.

आमच्या नाटकातली ‘व्हाइट लिली’ खूप एण्टरप्रायजिंग आहे, जरा फिल्मी आहे, खूप हळवी आहे. स्वत:चं हसं झालं तरी स्वत:ला जपणारी आहे. नाइट रायडर चकवणारा आहे. असा हिरो मी पाहिला नव्हता फारसा. तो मवाळ वाटतो, फार आग्रही नाही, त्याच्याकडे समोरच्याला दिपवून टाकण्याची कला नाही; पण त्याच्या आत भावनांची प्रचंड गुंतागुंत आहे. नाटकात शेवटी सगळी बाकी वजा जाता, कवच गळून पडलेले हे दोघं समोरासमोर येतात. तेव्हा प्रत्येक प्रयोगात हुरहुर दाटून येते, की का दोघांनी एवढा वेळ घेतला. का अहंकाराचे मुकुट मिरवत बसले. एकटं असण्यातला माज आणि गरज असताना मिळालेल्या सोबतीचा गोडवा.. या दोन फार वेगळ्या गोष्टी आहेत. त्याची खुमारी समजून स्वत:ला न फसवता जगू या. माझ्या भूमिकेने फार चटकन हात पुढे केला; पण ती समजून रंगमंचावर उभी करणं अतिशय कठीण होतं. मी रसिकाच्या पासंगालाही पुरणार नाही याची मला ठळक जाणीव होती. त्यामुळे तिच्यासारखं करण्याचा/ कॉपी करण्याचा प्रश्नच नव्हता. मला माझ्यातूनच ही ‘व्हाइट लिली’ ऊर्फ भक्ती देशमुख, तिची स्टाइल शोधावी लागली – मिलिंदचा हात घट्ट धरून.

‘व्हाईट लिली’ची बॉडी लँग्वेज समजून घेणं महत्त्वाचं होतं. ती माझ्यासारखी नाही. तिचा स्वभाव रुक्ष आणि निवडुंगासारखा वाटला तरी आत ती भलतीच मऊ आहे. ती एकटी आहे. बरेच वर्ष एकटी आहे. तिने आयुष्यात कधी मजा केली होती कोण जाणे. आमचा एक दारु प्यायला नंतरचा सीन आहे नाटकात. आजतागायत सोनाली म्हणून झिंगण्याइतकी दारू प्यायले नाहीये, अशी बेफिकीरी अनुभवली नाहीये कधी. व्हाईट लिली म्हणून ‘टाईट’ होताना फार मजा आली. मला सुरुवातीला फार संकोच वाटत होता. माझ्या आत कायम एक ‘गुड गर्ल’पणा नांदत असतो. तो बावळटपणा झुगारायची धमक माझ्यात फार कमी वेळा डोकावते. पण ‘व्हाईट लिली’मार्फत बराच मजेदारपणा, चावटपणा मला करायला मिळाला. सीन खरा खुलला प्रेक्षकांचा प्रतिसाद त्यात सामील झाल्यावर. लोक इतके हसतात की आम्हाला अनेकदा पॉझ घ्यावा लागतो. त्यामुळे खूप दिवसांनी कधी प्रयोग असला – की मला खूप दिवसांनी प्यायला मिळणाऱ्या दारुडय़ासारखा आनंद होतो. माझं कॉमिक टायमिंग ‘व्हाईट लिली’ने सेट केलं.

शुभारंभापूर्वी झालेल्या रंगीत तालमींत गिरीश जोशींनी प्रयोग सणसणीत घट्ट विणला. दिनूची ‘साईसाक्षी’, ‘अनामिका’ची पूर्ण टीम आमच्या पाठीशी होती.  आम्ही असंख्य बदल करण्यापेक्षा पूर्ण नाटकच नव्याने बसवलं होतं. नेपथ्य, वेशभूषा आणि अर्थातच बदलत्या काळानुसार बदललेले पंच, सीन. सगळं ताजं होतं. पहिल्या पाच प्रयोगांनंतर मिलिंदने पुन्हा क्लास घेतला, निसटत चाललेल्या जागा, भडक होऊ पाहणारी वाक्यं पुन्हा सुरात लावून घेतली. आज मला प्रचंड आनंद होतो हे जाणवून – की ‘व्हाइट लिली’सारखं ताकदीचं विनोदी आणि संवेदनशील नाटक मला करायला मिळालं. ही भूमिका मला नवा आत्मविश्वास देऊन गेली.

आमच्या प्रत्येक प्रयोगाला आलेले जिवलग, त्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला टीम म्हणून फारच मोलाच्या वाटल्या – बळ वाढवणाऱ्या ठरल्या. मी फार संवेदनशील निर्माती आहे. मी माझ्या प्रत्येक नाटकावर ‘शराबी’मधल्या अमिताभसारखं बेहिशेबी प्रेम आणि गुंतवणूक केलीये; पण ‘व्हाइट लिली’ने मला स्वतंत्र निर्माती म्हणून उभं केलं. थँक्स टू दिनू! ‘व्हाइट लिली’ने केलेली परतफेड स्वीकारताना झोळी लहान वाटते आहे. दीनानाथ मंगेशकर नाटय़गृह, शिवाजी मंदिर, प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह – याबरोबरच मी पृथ्वी थिएटरलाही ‘व्हाइट लिली’चे सीझन केले – बुकिंग नीट होईल ना, प्रयोग नीट जाईल ना याने कितीदा दमछाक झाली, झोप उडाली; पण संपूर्ण प्रयोगभर येणारी हाऊसफुल प्रेक्षकांची खणखणीत दाद, हसण्याचे फवारे, टाळ्या आजही कानात दुमदुमतात. त्याचबरोबर माझ्या काही टीम मेंबर्सच्या डोळ्यांतला ‘पृथ्वी’ला पहिल्यांदा यायला मिळाल्याचा आनंद माझ्यासाठी खास!

नाटक परत सुरू झाल्यावर आम्हाला विविध लोकांनी/ संस्थांनी – विविध भाषांमध्ये हे नाटक आणण्याच्या ‘भरघोस’ ऑफर्स दिल्या. वेगळं बॅनर, नावाजलेला हिरो, जास्त पैसे आदी प्रलोभनांसकट; पण हे नाटक मिलिंद व रसिकाने एकमेकांसाठी लिहिलं. एका साथीदाराला काळाने आपल्यापासून दूर नेलं. दुसऱ्याला रिप्लेस करणारी मी कोण? त्यामुळे मी माझं राहिलेलं वचन मिलिंदबरोबरच पूर्ण केलं. आम्ही संपूर्ण भारतबरोबरच इंग्लंड, दुबई, थायलंड, स्कॉटलंड अशा किती तरी देशांमध्ये नाटक घेऊन गेलो. प्रयोग तुम्ही म्हणाल त्या भाषेत. मराठी/ हिंदी किंवा इंग्लिश! आणि हो, मी हट्टाने आमच्या प्रत्येक तंत्रज्ञाच्या पाठीशी उभी राहिले आहे. फक्त आडनाव मराठी आहे आणि स्टायलिश इंग्रजी बोलता येत नाही म्हणून कुणाची कला कमजोर होत नाही. आमचे तंत्रज्ञ स्वत:च्या कामाची भाषा कुणालाही लाजवतील अशी अस्खलित बोलतात. जगभर प्रयोग झाले. अगदी लंडनमध्ये ब्रॉडवेलाही ‘स्टँडिंग ओव्हेशन’चा सीझनच केला; पण सांगायला प्रचंड अभिमान वाटतो – की गुरू, आतिष, चंद्रू, अमित, रमेश, विनायक, योगेश या आमच्या ओरिजनल टेक्निशियन्सबरोबरच! कर्टन कॉलला एकेक करून जेव्हा ही माझी मंडळी स्टेजवर येतात तेव्हा प्रत्येक वेळी मी त्यांच्यासाठी का भांडले याचं उत्तर मला टाळ्यांच्या बॅकग्राऊंडबरोबर मिळत असतं.

‘व्हाइट लिली’ पाहिल्यामुळे मला केदार शिंदेने ‘अगं बाई अरेच्या – २’साठी विचारलं. या नाटकामुळे सायली मराठे माझी मैत्रीण झाली. आपल्या क्षेत्रातल्या कित्येक स्नेह्य़ांनी आवर्जून नाटक पाहिलं आणि पावती दिली. आता आम्ही तिकीटबारीवर फारसे प्रयोग करत नाही; पण कुणी निमंत्रण दिलं तर आम्ही एका पायावर प्रयोग करायला तयार असतो.

कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, चटकन पाया पडून मोकळं होण्यापेक्षा नाटक पेलण्याचं शिवधनुष्य दाहक होतं; पण अनेक चटके बसल्यानंतरही प्रत्येक ठिकाणाहून दणदणीत बुकिंग किंवा आग्रहाची आमंत्रणं येतात, तेव्हा ‘व्हाइट लिली’ बहरत राहण्याचं वास्तवातलं हे स्वप्न मला खूप ऊर्जा देत राहतं.

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 1:01 am

Web Title: marathi play white lily sonali kulkarni
Next Stories
1 ‘‘धन्यवाद, रमा!’’
2 आत्मिक समाधान देणारी ‘सईदा’
3 ..आणि विनया मला भेटू लागल्या
Just Now!
X