|| प्रेमानंद गज्वी

व्यथा आणि वेदनेचं दुसरं नाव आहे नंदिनी अर्थात ‘पांढरा बुधवार’. नंदिनी मला भेटली तीही तिची व्यथा आणि वेदना घेऊनच. आणि पहिल्याच भेटीत एक प्रश्न समोर ठेवला, ‘‘काय चूक होती माझी? तो मला आवडला. केलं प्रेम.. प्रेम करणं हा काय गुन्हा आहे?.. हो, मी नाही पाहिली त्याची जात, त्याचा धर्म.. गरीब की श्रीमंत, तो मला आवडला.. आपली आवड जपणं हा गुन्हा आहे?’’

10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
Loksatta sanvidhan bhan Constitution Fundamental rights equal protection
संविधानभान: जनमते मानुस होत सब..
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
Loksatta samorchya bakavarun IT CBI ED Polling stations EVM election
समोरच्या बाकावरून: थोडे थांबा.. धीर धरा ‘अच्छे दिन’ येतच आहेत..

एखादा तीर सणसणत घुसावा छातीत नि कळ यावी वेदनेची.. तसा तिचा प्रश्न घुसला मेंदूत.. मेंदू छिन्नविच्छिन्न माझा! ‘समजून घेतलं पाहिजे नंदिनीला.’ तर तडकला ना मेंदू माझा माझ्यावरच.. कसं घेणार तिला समजून? आत्ताच तर भेटली ती आणि ती खरं बोलते की खोटं? अरे, असे छप्पन भेटतात. समोरच्या व्यक्तीला दया यावी म्हणून गयावया करणारे.. नंदिनीला समजून घेणं राहिलं बाजूला आणि माझ्या मेंदूतच उभा राहिला संघर्ष! कसं घ्यायचं समजून नंदिनीला? नंदिनीला समजून घ्यायचं तर तिच्या अंतरंगात प्रवेश करणं आवश्यक होतं. मी नंदिनीच्या नजरेत पाहिलं, ती मला उत्सुक दिसली तिची व्यथा आणि वेदना सांगायला..

आता ती मला स्पष्ट दिसू लागली. पंचविशीचं देखणं व्यक्तिमत्त्व. अंगावर जीन्स. गळ्यात सोनसाखळी. कानात कर्णफुले. कपाळावर बिंदी. ड्रेसिंग टेबलसमोर केस विंचरतेय नि बंगल्याची बेल वाजते.. ती अत्यंत उत्साहाने बंगल्याचा दरवाजा उघडते. दारात धोतर बंडीतील दादू नि नऊवारीतील त्याची बायको निंबी आणि सोबत वकटू, पाच वर्षांचा मुलगा. खेडवळ. केस वाढलेले. अस्ताव्यस्त. नंदिनी त्याचा हात धरू पाहते, तर तो मुलगा सर्रकन मागे जातो आणि दादू पायलागी करतो. दादू या बंगल्यातला नोकर. अगदी मोठय़ा मालकांपासून. आता मोठे मालक नारायणराव नाहीत आणि मालकीण सुमित्राबाईसुद्धा नाहीत. बंगल्याची सारी देखभाल या दादूवर. अगदी नंदिनीसह!

दादू पायलागी म्हणतो. तशी निंबीही पायलागी करते आणि वकटूला पायलागी करायला सांगते. तर तो नुसता बघतो नंदिनीकडे आणि नंदिनी त्याच्याकडे. तर निंबी म्हणते, ‘बघतो काय रं निस्ता, पायलागी म्हण कि रं मुडद्या.’ तर ‘मुडद्या’ हा शब्द कानावर पडताच नंदिनी दचकते. तिला समजून चुकतं, निंबी आणि वकटूवर कुठलेच चांगले संस्कार नाहीत (तसा दादूही खेडवळच पण अनेक र्वष दादू बंगल्यावर राहिल्यामुळे नंदिनीला दादूची सवय आहे.). नागर-अनागर एक सांस्कृतिक दरी!

नंदिनी चहापाणी करते. दरवाजाही नंदिनीनेच उघडलेला असतो. ही गोष्ट दादूच्या लक्षात येते आणि दादू नंदिनीला विचारतो, ‘‘त्ये चितळेबाई न्हाई आली कामाला?’’  नंदिनी, ‘‘ती येणार नाही’’ असं सांगते. दादूला वाटतं, ‘‘म्या निंबीला हितं आनली म्हून चितळेबाईला कामावरून काढलं की काय?’’ दादू चितळेबाईंची दयनीय परिस्थिती समजावून सांगतो. चितळेबाईंच्या नवऱ्याला अपघात झालाय. त्यात दोन्ही पाय गमावून बसलेला. तिची दोन लहान मुलं. त्यांच्यावर दया म्हणून का होईना चितळेबाईंना कामावर बोलवण्याची विनंती करतो. पण नंदिनी साफ नकार देते आणि बंगल्यातीलच एक खोली दादू-निंबी-वकटूसाठी उघडून देते. खरं तर तिला भय आहे निंबी आणि वकटू आल्यामुळे आपलं गुपित चितळेबाईंना समजेल याचं. त्या स्वयंपाकाचं व इतर मोलकरणीचं काम करत असतात. पण बदनामीच्या भयास्तव नंदिनीने चितळेबाईंना नोकरीवरून काढून टाकलेलं असतं.

एक दिवस व्यास भटजी बंगल्यावर येतात. ते नंदिनीसाठी लग्नाचं स्थळ घेऊ आलेले आहेत. त्यावर नंदिनी भडकते. ‘‘मला लग्नच करायचं नाही, असं सांगूनही तुम्ही पुन्हा पुन्हा स्थळं का घेऊन येता?’’ त्यावर व्यास भटजी म्हणतात, ‘‘तुझ्या मातोश्रीनं सांगितलं होतं म्हणून मी येतो.’’ हे बोलत असतानाच वकटू भाकरीचा तुकडा खात खात तिथं येतो. अत्यंत घाणेरडय़ा अवस्थेत. त्याला बघून व्यास भटजी भडकतो. यावर नंदिनी संतापते. दादूवर ओरडते आणि निंबीवरही संतापते. ‘उकिरडा करायचाय का या बंगल्याचा?’ आणि निंबी वकटूच्या पाठीत दोन तीन धपाटे हाणते. बंगल्यात निंबी आणि दादूचं भांडण होतं वकटूवरून.. निंबी, ‘‘मी बंगल्यात राहणार नाही. मी आणि वकटू आमच्या गावी जातो,’’ असं स्पष्ट सांगते. त्यावर दादू तिची समजूत काढतो. ‘‘मोठय़ा मालकिनीला म्या सबूत दिला म्हून तुला इथं आनली. नातीगोती इसरावी पण कुनाचं उपकार इसरू नये. त्यावरसी समदी शेतं पान्यासाठी आसुसली होती. गुरंढोरं मराया लागली. समदी मान्स देसोधडीला लागली. कुठं बी काम मिळना. अशा वक्ताला याच घरानं आसरा दिला. त्या येळला ही नंदू बेटी.. अंगाखांद्यावर वाढवली मी. या हातानं खाऊपिऊ घातलं मी..’’

त्यावर निंबी दादूवरच तडकते, ‘कशाला, माझ्यावर डोळं वटारावं म्हनून?’ दोघातलं भांडण आणखी वाढतं. नंदिनी त्याच वेळी बंगल्यात प्रवेश करते. त्या दोघांचं भांडण बघून दोघांवरही संतापते. दादू क्षमा मागतो आणि नंदिनी एक बॉक्स उघडून वकटूसाठी आणलेलं खेळणं बॅगेतून बाहेर काढते. वकटूला देते आणि एक बाबासूटही. निंबी आणि दादूलाही कपडे देते आणि वकटूचं शेंबडानं बरबटलेलं नाक स्वत:च्या रुमालाने पुसू लागते.

नंदिनीचं हे वागणं, क्षणात रागावणं आणि क्षणात राग विसरून जाणं एक लेखक म्हणून मलाच बुचकळ्यात टाकणारं वाटत होतं. याचा अर्थ एवढाच की, नंदिनी तिची व्यथा आणि वेदना नेमकेपणानं सांगू इच्छित नाही, असं जाणवत राहिलं. प्रेम वगैरे ठीकच आहे पण ती काही तरी लपवू पाहात होती. काय असेल नंदिनीची नेमकी व्यथा? काहीतरी लपवू पाहणारी नंदिनी तिचा भूतकाळ अत्यंत मोकळेपणानं सांगणं गरजेचं होतं आणि नंदिनी ते सांगू इच्छीत नसेल तर? ..नंदिनीचं मन मला खुणावू लागलं आणि मनस्विनी या नव्या व्यक्तिरेखेचा जन्म झाला. ही मनस्विनी (नंदिनीचं मन), मलाही अनपेक्षित असं घडाघडा बोलू लागली..

‘‘ये, रडूबाई कधीपासून झालीस तू? आकाशाला गवसणी घालणारी नंदिनी पटवर्धन तू! हो खंबीर,  हे मुळुमुळु वागणं सोड आणि दे एक झोका तुझ्या स्वप्नाला.’ मनस्विनीच्या या विचारांनी नंदिनीच्या नजरेत आशेचा एक नवा किरण जागा होतो. ती रोज वकटूला फिरायला घेऊन जाते आणि वकटूच्या डोक्यावर वाढलेले केस सलूनमध्ये नेऊन कापून टाकते. वकटू आता छान गोंडस दिसू लागतो. ती वकटूला घेऊन बंगल्यावर येते, पण वकटूच्या डोक्यावरील कापलेले केस पाहून निंबी संतापते आणि नंदिनीला जाब विचारते. ‘‘माझ्या लेकराच्या डोक्यावरचं केस नवसाचं होतं.’’ आणि नंदिनीचा तोल जातो. ‘‘वकटू खरंच का तुझं मूल आहे? तुला काय ठाऊक नऊ महिने नऊ दिवस गर्भ पोटात वाढवणं काय असतं? सांगशील प्रसूतीच्या वेदना कशा असतात? तू तर वांझ! वांझेला काय ठाऊक मातृत्वाचा महिमा?’’ नंदिनीच्या या बोलण्यानं निंबी पार कोलमडते. दादूही!

नंदिनी वकटूला घेऊन आपल्या रूममध्ये जाते. वकटू आई म्हणून किंचाळतो पण नंदिनी अजिबातच ऐकत नाही. ती त्याचं नावही बदलते. वरद..

नंदिनी तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी. लाडात वाढवलेली. देखणी, बुद्धिमान, आधुनिक विचारांची. तारुण्याच्या उंबरठय़ावर एका सतारवादकाच्या प्रेमात पडते. ही गोष्ट तिच्या आईवडिलांना अजिबात मान्य नसते. ते नंदिनीची समजूत काढतात पण ती ऐकत नाही. घराण्याची इज्जत वाचवण्यासाठी नंदिनीचे वडील, नारायणराव नंदिनीच्या प्रियकराला मारेकरी घालून ठार करतात. नारायणरावांना वाटतं बदनामीपासून सुटका झाली. पण.. नंदिनी तिच्या प्रियकरापासून गर्भवती राहिलेली असते. वडिलांच्या गर्भपाताच्या सल्ल्याला ती ठाम नकार देते. बदनामीच्या भीतीनं वडील आत्महत्या करतात. मुलीच्या हट्टापायी तिची आई, सुमित्राबाई तिचं बाळंतपण होऊ देतात, पण ते मूल जन्मत:च मेलं असं सांगून वाडय़ावरचा नोकर दादूकडे देतात. दादू निपुत्रिक. गावी जाऊन ते मूल देवळाच्या पायरीवर सापडलं असं सांगून निंबीच्या पदरात टाकतो. निंबी आनंदते. नाव ठेवते वकटू. नंदिनीचं मूल निंबीच्या सहवासात वाढू लागतं..

आणि इकडे आपल्या मृत्यूनंतर नंदिनीचं कसं होणार या चिंतेनं व्यथित नंदिनीची आई सांगून टाकते, तिचं मूल जिवंत आहे आणि ते दादूच्या गावी निंबीकडे वाढते आहे. आईच्या मृत्यूनंतर नंदिनीनं तिला तिचं मूल हवंय म्हणताच दादू वरद आणि निंबीला घेऊन वाडय़ावर येतो. असा हा नंदिनीचा भूतकाळ..

प्रेम.. प्रेमातील आनंद विलक्षण असतो पण दु:ख कुणालाच नको असतं. आणि त्या दु:खावर मात करण्यासाठी नंदिनी निंबीला वांझ म्हणण्यासही कमी करत नाही. स्वत:च्या सुखासाठी दुसऱ्याला दु:खाच्या खाईत लोटणं म्हणजे स्वत:चं अध:पतन करून घेणं होय. एका बालकाला जन्म देऊनही मातृत्व न लाभलेली नंदिनी.. मातृत्व इतकं हतबल असू शकतं! कदाचित..

..नंदिनी वरदला घेऊन बेडरूममध्ये जाते. अतिशय प्रेमानं जवळ घेते. आपल्या या बाळाला स्तनपान करू इच्छिते, पण वरद घाबरून तिथून पळत सुटतो. तिच्या वागण्याचा मनस्विनी निषेध करते. त्यावर नंदिनी प्रेम करणं पाप असतं का, असं विचारते. तेव्हा मनस्विनी तिच्या नजरेस आणून देते, ‘या जगाचा जन्मच मुळी झाला तो पापातून. वासना म्हणजे पापाची पहिली पायरी. सदैव वासनेच्या भोवऱ्यात गटांगळ्या खाणाऱ्या माणसानं निर्माण केलंय कुटुंब नावाचं मृगजळ. नव्हे, पाप झाकण्याची एक सोय. कुटुंब आपलं, आपल्या माणसांचं, आपल्या आप्तांचं, आपल्या रक्ताचं, गोत्राचं, जातीचं, धर्माचं आणि नेमकं तेच निघालीस मोडायला.’ पण ही अशी बंधनं नंदिनीला मुळातच मान्य नव्हती. तिला जगायचं होतं एक मुक्त आयुष्य!

निंबीला वांझ म्हटल्यामुळे निंबी पूर्णत: कोलमडून गेलेली आहे. त्याचा तिच्या मनावर परिणाम होऊन ती वेडी होते त्यामुळे ती बंगल्यातील कुठलंही काम करू शकत नाही आणि चितळेबाईंचाही काही थांग नाही. एकीकडे नंदिनी, दुसरीकडे निंबी आणि तिसरीकडे चितळेबाई. एकाच ठिकाणी तीन ‘वात्सल्य’ जीवनातील सुखासाठी धडपडताना दिसतात. वरद आपला व्हावा म्हणून ‘पांढरा बुधवार’चं व्रतही करायला नंदिनी कमी करत नाही. अशा वेळी नंदिनीचं बंडखोर मन.. ‘‘वरद तुझा होण्यासाठी तू पांढरा बुधवारचं व्रत करणार.’’ ‘‘ऐका हो ऐका,’’ मनस्विनी दवंडीच देते, ‘नंदिनी पांढरी वस्त्रे परिधान करणार. दहीभात, साबुदाण्याची खिचडी, असे पांढरेच पदार्थ सेवन करणार. मीठ पांढरंच असलं तरी ती ते खाणार नाही; कारण ते या व्रताला वज्र्य आहे.’ एवढंच बोलून ती थांबत नाही तर निंबी आणि नंदिनी दोन्ही एकच आहेत, असंही सांगते. निंबीने वकटूसाठी मरीआईचं व्रत केलं होतं त्याच्या डोक्यातल्या जखमा बऱ्या व्हाव्या म्हणून आणि तू पांढरा बुधवारचं व्रत करते आहेस मातृसुखासाठी.. वरद तुझा व्हावा म्हणून. मानवी मन समजून घेणं किती कठीण असतं नाही!

मला वाटत होतं, संपली नंदिनीची व्यथा आणि वेदना. पण नाही. वकटूवर झालेले ग्रामीण अनागर संस्कार वरदवर असणं तिला मान्य नव्हतं आणि हे मूल आपण दत्तक घेत आहोत असं ती व्यास भटजींना खोटंच सांगून वरदची मुंज करण्याचा घाट घालते. अर्थातच व्यास भटजी ब्राह्मणेत्तर मुलाची मुंज करण्यास नकार देतात. परिणामी नंदिनी संतापून मला माझ्या मुलाची मुंजच करायची नाही, असं सांगून व्यास भटजींना घालवून देते. आणि सांगते, ‘‘मला माझा मुलगा वरद नंदिनी पटवर्धन म्हणूनच मोठा करायचाय.’’ नंदिनीचं हे वागणं आजच्या आधुनिक स्त्री संवेदनेशी नातं सांगणारं आहे. पण एवढय़ानं तिचं समाधान होत नाही. ‘आई’ म्हणून हाक मारत नसतानाही वरदने आपल्याला आई म्हणून हाक मारावी, असा हट्ट धरून बसते. तर दुसरीकडे तो जिला ‘आये’ म्हणून हाक मारत असतो तीही बंगल्यात आता कुठे दिसत नाही आणि तो ज्याला बाप समजत आला तोही कुठे बंगल्यात दिसत नाही. अशा या द्विधावस्थेतील वकटू बंगल्यातून निघून जातो.. ती वरदचा शोध घेते. पोलिसांत तक्रारही करते. पण वरद कुठेच सापडत नाही.. ज्या मातृसुखासाठी ती हे सारं करते त्याला ती आता हरवून बसली आहे..

असं हे १९९२ मध्ये, २६ वर्षांपूर्वी लिहिलेलं  नाटक सध्या अमरावती विद्यापीठात एम.ए.च्या द्वितीय वर्षांच्या अभ्यासक्रमात लावलेलं आहे. कलासाधना मुंबई, या संस्थेनं २२ ऑक्टोबर १९९५ला दामोदर नाटय़गृहात महाराष्ट्र  राज्य नाटय़ स्पर्धेत हे नाटक सादर केलं. या नाटकाचं नेपथ्य दीपक पडते, संगीत अविनाश बोरकर तर प्रकाशयोजना उमेश मुळीक यांनी केली होती. या नाटकाचं दिग्दर्शन त्या वेळच्या उमेदीच्या नाटय़दिग्दर्शिका प्रतिभा पाटील यांनी केलं होतं आणि नंदिनीची भूमिकाही. निंबी (सुषमा भागवत), मनस्विनी (मीना शेटय़े), वकटू (मास्टर प्रसाद), व्यास (धाकटू वारेशी) आणि दादू (अशोक गांगुर्डे)

स्पर्धेत गाजलेल्या या नाटकाला स्पर्धेतील सर्वच प्रथम पुरस्कार मिळाले हे खरे, पण नंदिनीची व्यथा आणि वेदना तशीच आहे. आजही अनेक नंदिनी आजच्या आधुनिक समाजात प्रत्यही पाहायला मिळतात. ही कहाणी नंदिनीची असली तरीही नंदिनीच्या सहवासात आलेल्या तिच्या आईवडिलांची, निंबीची, दादूची, चितळेबाईची, तिनं ज्याला जन्म दिला त्या मुलाची, व्यास भटजीची, तिचा प्रियकर सतारवादक त्याचीही शोकात्मक कहाणी आहे. कारण यातील नंदिनीप्रमाणेच कुणीही सुखी झालेला नाही..

premanandgajveeg@gmail.com