22 September 2020

News Flash

सविता : एक गूढ

खरं सांगायचं तर त्या व्यक्तिरेखेचे गूढ आजही मला उकललेले नाही.

 

 

एका उच्चशिक्षित स्त्रीच्या शरीरात एका अशिक्षित मृत स्त्रीचा संचार होणे, ही मृत स्त्री अंगात येताच त्या स्त्रीचे व्यक्तिमत्त्व आणि आवाज बदलणे असा अजब प्रकार घडत होता. त्या घरात मी महिनाभर नोकरीधंदा सोडून बसून होतो. मी स्वत: इंजिनीअर असल्यामुळे भूतप्रेत या संकल्पना मी मान्य करणे शक्यच नव्हते. शेवटी आव्हान म्हणून मी ही अंगात येणारी बाई मृतात्मा आहे हे स्वत:शी मान्य करून या प्रेतात्म्याच्या मानसिकतेचा विचार करू लागलो, प्रेतात्म्याशी चर्चा करू लागलो. हा प्रकार भयानक होता. मात्र त्यातूनच उभी राहिली, सविता दामोदर परांजपे!

माझी जेवढी व्यावसायिक नाटके आहेत त्यांच्या कथा स्त्री या मध्यवर्ती व्यक्तिरेखेभोवतीच गुंफल्या गेल्या आहेत. या व्यक्तिरेखा मी जवळून किंवा दुरून पाहिल्या आहेत. स्त्री मनातील अंतर्नादाचा शोध हा सर्वच लेखकांच्या आवडीचा विषय राहिला आहे. ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता आहे,’ असे म्हटले जाते तेव्हा प्रेयसी आणि माता यामधील मोकळ्या जागा भरताना लेखकाचे संपूर्ण आयुष्य खर्ची पडेल पण त्या मोकळ्या वाटणाऱ्या जागा संपणार नाहीत.

नाटय़ संकल्पनेची बीजे ही पाहिलेल्या, वाचलेल्या किंवा ऐकलेल्या असाधारण घटनांतून मिळतात तशीच ती भन्नाट व्यक्तिरेखांतूनही मिळतात. याच सदरात फैयाजताईंनी मी लिहिलेल्या ‘वादळवारं’ या नाटकातील ‘अम्मी’ या त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेवर लिहिले आहे. ही ‘अम्मी’ मी प्रभादेवीला असलेल्या अड्डय़ावर पाहिली होती. त्या नाटकातील इतर पात्रेही त्या अड्डय़ावर मला भेटली होती. पण नाटकाची कथा मात्र अगदी तशीच घडली नव्हती. ‘अम्मी’ मला कळली होती, तिला मांडण्यासाठी तशी कथा मला रचावी लागली. काही नाटके घडलेल्या घटनांवर आधारित असतात. तेव्हा व्यक्तिरेखांच्या मानसिकतेचा अभ्यास करावा लागतो. हे असे माझ्या ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकाच्या बाबतीत घडले. त्या सत्य घटनेत मी स्वत: सामील होतो. नाटकातील ‘कुसुम अभ्यंकर’ ही व्यक्तिरेखा अशी का वागते आहे याचा त्या वेळी विचार करून डोक्याचा भुगा झाला होता. खरं सांगायचं तर त्या व्यक्तिरेखेचे गूढ आजही मला उकललेले नाही.

घडले असे होते की मी त्या काळात (१९८१) ‘निरलॉन’ नामक गोरेगाव स्थित कंपनीत मॅनेजरचे काम करीत होतो. त्या वेळी मी राहायला प्रभादेवीला होतो. अधूनमधून मी वसईला माझ्या मामीकडे राहून कामावर जात असे. कुसुम (नाटकातले नाव) ही मामीची मैत्रीण. तिला सोळा र्वष पोटदुखीचा अधूनमधून अ‍ॅटॅक येत असे. ती अक्षरश: गडबडा लोळत असे. अनेक उपचार होऊनही ती बरी होत नव्हती. मी त्या वेळी नावाजलेला (सोकॉल्ड!) हस्तरेषातज्ज्ञ होतो. मामीने मला तिच्या या मैत्रिणीचा हात बघायला सांगितले. माझ्या हात बघण्याच्या प्रक्रियेतून उलगडले ते १६ र्वष तिच्या शरीरात (की मनात!) लपलेले प्रेतात्म्याचे आस्तित्व. त्यातून घडत गेले एक भीषण नाटय़!

एका उच्चशिक्षित घराण्यातील उच्चशिक्षित स्त्रीच्या शरीरात अधूनमधून एका अशिक्षित मृत स्त्रीचा संचार होणे, ही मृत स्त्री अंगात येताच त्या स्त्रीचे व्यक्तिमत्त्व आणि आवाज बदलणे असा अजब प्रकार घडत होता. त्या घरात मी महिनाभर नोकरीधंदा सोडून बसून होतो. तिच्या शरीरातील संचार काही काळ असायचा आणि ती शांत झाली की अतिशय साध्या गृहिणीसारखी वागायची. मी स्वत: केमिकल इंजिनीअर असल्यामुळे या गोष्टी भूतप्रेत या संकल्पना मी लगेच मान्य करणे शक्यच नव्हते. वसईचे डॉक्टर कुलुर आणि मुंबईचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. गुप्ते यांच्याशी सतत चर्चा व्हायच्या. या विषयातील पुस्तके आणून वाचून काढली. मी खरंतर अनवधानाने यात ओढला गेलो होतो, पण ते एक आव्हान म्हणून स्वीकारले. या प्रकाराची भीषणता नंतर वाढतच गेली. त्यावर वैद्यकीय उपचारांचा काही परिणाम होत नव्हता. मग मी ठरवले की ही अंगात येणारी बाई मृतात्मा आहे हे स्वत:शी मान्य करून या प्रेतात्म्याच्या मानसिकतेचा विचार करू. मग मी त्या प्रेतात्म्याशी चर्चा करू लागलो (हा प्रकार भयानक होता. घरातले रात्री थांबत नसत. मी रात्री तिच्याशी एकटा बोलायचो.). यातून मार्ग निघाला. महत्त्वाचे म्हणजे ती स्त्री बरी झाली. अथपासून इतिपर्यंत सगळं सांगायला कादंबरी लिहावी लागेल.

हे सर्व संपल्यावर प्रचंड ताण आला होता. एका बैठकीत मी प्रथम एकांकिका लिहून काढली ती म्हणजे ‘कलकी’. ती प्रचंड गाजली. अर्थात त्या एकांकिकेचा या कथेशी काही संबंध नव्हता. थोडा मानसिकदृष्टय़ा स्थिर झालो तेव्हा पहिल्यांदा या घटनेवर कादंबरी लिहावी असे वाटले होते. पण माझी वैचारिक किंवा मानसिक पातळीवरची देवाणघेवाण एका सुशील साध्या गृहिणीशी तसेच तिच्यात शिरणाऱ्या अशिक्षित जहाल मृत बाईशी संवाद रूपात झाली होती. त्यामुळे नाटक लिहिले.

माझे मित्र महेश सावंत यांनी त्यांच्या ‘प्रतिपदा’ या संस्थेतर्फे हे नाटक करावयाचे ठरवले. आजचे आघाडीचे दिग्दर्शक-अभिनेते राजन ताम्हाणे आणि मी त्या काळी अभिनेत्री रिमा लागू यांना गळ घालू शकत होतो (त्यावेळी आम्ही नवोदित असल्यामुळे आम्हाला पटकन इतर कोणी उभे करण्यापैकी नव्हते). रिमा नाटकात काम करायला तयार झाली, पण काही दिवसांनी ती गरोदर असल्याचे तिला कळल्यावर तिचा नाइलाज झाला. त्यामुळे आमच्या पुढे पुन्हा प्रश्न उभा राहिला. आता नटीच्या शोधात दोन पात्रे असा प्रवास सुरू झाला, भक्ती बर्वे, आशालता आणि वगैरे वगैरे. नाटक आणि ही व्यक्तिरेखासुद्धा सर्वाना आवडत होती, पण सगळ्या नको म्हणत होत्या. खरंतर हे नाटक सायकॉलॉजिकल आहे, पण त्याचे बॅकग्राऊंड भिववणारे आहे. भक्ती मला म्हणाली होती, ‘ही सादर करायला कठीण व्यक्तिरेखा आहे. ती मला त्रास देईल, झोपू देणार नाही.’ असा शोध घेता घेता एक वर्ष निघून गेले होते. तोपर्यंत रिमा ‘फ्री’ झाली होती. नाटक सुरू केले. व्यक्तिरेखेचा अभ्यास कसा करावा आणि त्यासाठी किती अथक प्रयत्न करावे लागतात हे आजच्या अभिनेत्रींनी (अपवादांनी क्षमा करावी) रिमासारख्या जुन्या अभिनेत्रींकडून शिकावे. आज पंधरा दिवसांत नाटके बसतात. रिमाने

१७ दिवस माझ्याबरोबर बसून फक्त ‘आवाजात होणारे बदल’ यावर मेहनत घेतली. रिमाने नाटकाचे सोने केले. आज तिची खूप आठवण येतेय. ‘सविता’चे शेकडो प्रयोग झाले. नाटकाच्या मध्यंतरात आणि शेवटीदेखील टाळ्या वाजत नसत. प्रेक्षक थिजल्यासारखे बसून राहायचे. त्यांना उठायचेसुद्धा भान राहात नसे. मला आठवतं, डॉ. श्रीराम लागू नाटकाला आले होते. नाटक संपल्यावर प्रेक्षक निघून गेले तरी ते एकटेच उभे राहून टाळ्या वाजवत होते. त्याच दिवशी संध्याकाळी ‘पॉप्युलर’ प्रकाशनाचे रामदास भटकळ यांचा मला दूरध्वनी आला. तुमच्या नाटकावर डॉक्टरांनी पुस्तक काढायला सांगितलंय. स्क्रिप्ट पाठवा. ‘सविता दामोदर परांजपे’ या पुस्तकाला नंतर राज्य पुरस्कार मिळाला.

एक नाटककार म्हणून ही व्यक्तिरेखा रंगवताना मी या व्यक्तिरेखेचा लाऊडनेस संपूर्णपणे दाबून ठेवला. जसा फुटलेला ज्वालामुखी आग ओकत असतो, तो पाहताना अंगावर येतो पण कुठेतरी खोल विवरात खदखदणारा ज्वालामुखी मात्र हादरवून टाकतो. मुळात जे माझ्या समोर प्रत्यक्ष घडले ते तसंच नाटकात मांडले असते तर ते अतिरंजित वाटले असते. पण तेच मी घुसमटवले आणि ते प्रेक्षकांच्या अंगावर आले. अर्थात यात माझे बंधू राजन ताम्हाणे यांच्या दिग्दर्शनाचा खूप मोठा वाटा आहेच. कुठलीही व्यक्तिरेखा विशेषत: स्त्रीची ही कॉलिडोस्कोप फिरवून पाहात राहावी लागते. एखादा प्रसंग तसाच घडलेला नसतो पण प्रसंग आवश्यकतेनुसार निर्माण करताना त्या प्रसंगात ती व्यक्ती कशी वागेल याचा विचार करावा लागतो. कधी कधी एखादी व्यक्तिरेखा मी या प्रसंगात अशी नाही वागणार असा हट्ट ही माझ्याशी करते मग मात्र हंटर घेऊन तिला तसे वागायला भाग पाडतो. ही सगळी नाटय़लेखन तंत्राची गंमत आहे.

‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकातील ‘कुसुम’ या व्यक्तिरेखेकडे नाटककाराने (म्हणजे उदाहरणार्थ मी) त्याला काय वाटतं एवढाच विचार करून चालत नाही. तिच्या नवऱ्याला काय वाटतं, तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना काय वाटत असावं, याचा विचार करावाच लागतो त्यामुळे मी त्या घटनेत मानसिकदृष्टय़ा जोडला गेलो होतो तरी नाटक लिहिताना मात्र दूर तटस्थ राहून विचार केला. तरी ते सोपं नव्हतं. मी स्वत: त्या नाटय़ातील एक घटक होतो किंबहुना ती घटनाच माझ्यामुळे घडत गेली होती. कुसुम या व्यक्तिरेखेबरोबर मानसिकरीत्या गुंतलेल्या मला स्वत:ला मी नाटककार म्हणून पाहाणे भीषण होते. माझ्या गाजलेल्या ‘तू फक्त हो म्हण’ या नाटकात एक वाक्य आहे, ‘मी त्या पाण्यात माझा चेहरा पाहिला तेव्हा तो भीषण दिसला.. मग मी त्यात गंध मिसळलं आणि ते पाणी पूजेसाठी वापरलं.’ सर्वच नाटकांमध्ये बुद्धिबळाच्या पटावरच्या सोंगटय़ा खेळवल्या जातात तशी रंगमंचावर नाटककाराला पात्रं खेळवायला लागतात.. निर्विकारपणे.. मात्र माझ्या नाटकांमध्ये त्या सोंगटय़ांतील राणी माझ्याकडे सतत रोखून पाहते. ती मला पाहते की माझ्या आरपार पाहतेय तेच कळत नाही.. आणि तेच हादरवणारं असतं. माझ्या प्रत्येक नाटकात हे असंच घडत असतं मी कितीही निर्विकारपणाचा आव आणला तरी!

shekhar@tamhanes.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2018 1:15 am

Web Title: shekhar tamhane article on savita damodar paranjpe marathi drama
Next Stories
1 आव्हानात्मक ‘अम्मी’
2 सिंधूताईंची वेदना
3 स्वाभिमानी, कणखर उमा
Just Now!
X