‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकातली माधवी देशपांडे. म्हणजे ही काही एखाद्या सनसनाटी, वादग्रस्त किंवा सेन्सॉरच्या कचाटय़ातून कशीबशी सुटलेली अजरामर भूमिका नाहीये.. पण माझी अत्यंत आवडती भूमिका आहे! आज बघता बघता देशभरात फोफावलेल्या, भारताला ‘डायबेटिक कंट्री’ बनवणाऱ्या मधुमेहावर विनोदी पद्धतीनं भाष्यं करणारं, आनंदी जगण्याचा संदेश देणारं नाटक ‘साखर खाल्लेला माणूस’! चंद्रकांत कुलकर्णीचं दिग्दर्शन, प्रशांत दामलेंची प्रमुख भूमिका असलेलं, हाऊसफुल गर्दीत चालणाऱ्या या नाटकातली ‘माधवी’ साकारताना मला खऱ्या अर्थाने ‘ब्रशिंग अप’ आणि ‘रिस्टार्ट’चा अनुभव आला.

मालिकांमधून काम करण्याआधी आणि नंतर माझ्या वाटय़ाला आलेल्या मोजक्याच नाटकांमध्ये मी काम केलं. त्यातल्या भूमिका माझ्या परीने मी समरसून केल्या, त्यांचा आनंद घेतला. १९८८ मध्ये महेश एलकुंचवार लिखित, प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित ‘आत्मकथा’ हे नाटक माझ्यासाठी फारच महत्त्वाचं होतं. लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार – सगळेच दिग्गज. त्यातली ‘प्रज्ञा’ची भूमिका मी फार मन लावून केली – मी तेव्हा बावीस-तेवीस वर्षांची होते – मुंबईतलं पहिलं नाटक, महेश एलकुंचवारांची नाटकं वाचून, डॉक्टर लागूंची कामं पाहून मोठे होताना त्यांच्याबरोबरच काम करायची संधी मिळाली होती. स्वत: सिद्ध करण्याची ‘पहिली आणि शेवटची संधी’ असं मी मनाशी ठरवून खूप मेहनत घेऊन ती भूमिका केली होती. त्या वेळची मोजकीच, पण प्रतिष्ठित अशी सर्व बक्षिसं मला मिळाली. थोरामोठय़ांकडून कौतुक झालं. खूपच समृद्ध करणारा अनुभव होता तो. जेमतेम पाच प्रयोगांसाठी बसवलेलं प्रायोगिक नाटक होतं ते, त्याचे जवळजवळ २०० प्रयोग झाले!

त्यानंतर एकापाठोपाठ एक अशी नाटकं काही माझ्याकडे आली नाहीत. साताठ वर्षांनी, आमचा जिगरी दोस्त संजय मोने, त्याचं ‘सॉरी राँग नंबर’ नावाचं नाटक मी केलं. त्याचे जेमतेम ५० प्रयोग केले असतील. संजयचा तिरकस पण सुबुद्ध विनोद, चेतन-अतिशाचे बहारदार सीन्स, एक वेगळ्या शैलीतलं, मजेदार नाटक करायला मजा आली. त्यानंतर पाच-सहा वर्षांनी ‘शोभायात्रा’मध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. शफाअत खान यांनी लिहिलेलं अतिशय ब्रिलियंट नाटक. मराठीत त्याचे प्रयोग चालूच होते. त्याचं हिंदी रूपांतर करून ‘पृथ्वी फेस्टिव्हल’मध्ये सादर होणार होतं. त्यातही सगळी दोस्त मंडळी अफलातून कामं करत होती. नंदू माधव गांधीजींच्या भूमिकेत, पुष्कर श्रोत्री नेहरू, सयाजी आणि किशोर कदम आलटूनपालटून सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत.

मी ‘झाशीची राणी’..! त्या नाटकातलं आणि भूमिकेतलं ‘कारुण्य’ आजही अस्वस्थ करतं.. दुर्दैवाने त्याचेही फारच कमी प्रयोग झाले. मग २००१ मध्ये आलं सुधीर भटांच्या ‘सुयोग’ कंपनीचं अशोक पाटोळे लिखित, विजय केंकरे दिग्दर्शित ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’ हे हलकंफुलकं, व्यावसायिक नाटक. मंगेश कदम, सुनील बर्वे, संजय मोने, मैथिली वारंग आणि मी. या नाटकाचे मात्र आम्ही धुवाधार ७०० प्रयोग केले. त्या दरम्यानच केवळ अमेरिका दौऱ्यापुरतं ‘माझं घर’ नावाचं एक नाटक आम्ही केलं. इतकं अप्रतिम नाटक लिहिलं होतं जयंत पवार यांनी. त्याचे खूप प्रयोग व्हायला हवे होते. ते न झाल्यामुळे एक अभिनेत्री म्हणून फार नुकसान झालं माझं – कारण सर्वार्थाने उत्कृष्ट अशी भूमिका वाटय़ाला येणं – खासकरून अभिनेत्रींसाठी दुर्मीळ असतं.

तर, इन मिन तीन अशा या भूमिका माझ्या स्मरणात आहेत, कारण त्या नाटकांचं व्यावसायिक यश, आर्थिक गणितं फार ध्यानीमनी नव्हती, पण प्रत्येक भूमिका करताना मी विचारपूर्वकच केली आणि आनंद घेतला. आणि आता तब्बल चौदा वर्षांनंतर मी ‘साखर खाल्लेला माणूस’ या विद्यासागर अध्यापक लिखित नाटकातली ‘माधवी देशपांडे’ साकारतेय.

खरंतर, एक विनोदी नाटक, त्यात एक गृहिणीची भूमिका – महिन्यातून भरपूर प्रयोग – इथेच संपू शकते कहाणी. पण एवढं काय आहे या भूमिकेबद्दल लिहिण्यासारखं? माझ्यासाठी सर्व पातळ्यांवर ही महत्त्वाची भूमिका आहे. वैयक्तिक पातळीवर सांगायचं झालं तर.. बरीच वर्षे मालिकांचं शूटिंग करून करून मला खरंच शीण आला होता. अभिनय करण्याचा नव्हे, पण रोजचा तो ‘कॉल टाइम’ तिथे पोचतानाचा तोच तो रस्ता, रोज वाढतच जाणारा ट्रॅफिक जाम. सेटवर सुरुवातीला खेळीमेळीचं वातावरण मग हळूहळू वाढत जाणाऱ्या कुरघोडय़ा, कामाविषयीची अनास्था, प्रत्येकाच्या वेगळ्या वेळा आणि तारखा जमवण्यासाठी वेडेवाकडे फिरवलेले सीन्स. रोज उठून वेगळीच निराशा! कंटाळून गेले होते मी.

कुठल्याही कामाचा शीण आला तर काम सोडू नका, कामाचा ‘पॅटर्न’ बदला अशा धर्तीचं वाक्य मी कुठेतरी वाचलं होतं. नेमका याच वेळी मला प्रशांत (दामले)चा फोन आला. ‘‘एक चांगलं नाटक आहे, चंकु दिग्दर्शन करणार आहे, करशील का?’’

मला वाटलं, हीच ती ‘पॅटर्न’ बदलण्याची वेळ – मी नाटक न वाचताच हो म्हणून टाकलं.

प्रशांतनेही त्याच्या कामाच्या झपाटय़ानुसार मला पहिल्या वाचनाची तारीख, वेळ जागा कळवून टाकली! लॉक्ड! हे सगळं प्रशांत लंडनमध्ये ‘संशयकल्लोळ’च्या प्रयोगासाठी गेलेला असताना आणि मी शूटिंगवरून घरी पोहोचेपर्यंत घडलं होतं! तसा माझ्या मनात जरा गोंधळ उडालाच होता. हा निर्णय सर्व बाजूने योग्य आहे ना असा. कारण अभिनय ही माझी आवड तर आहे, पण ‘व्यवसाय’ही आहे. दुसरं, इतकी वर्ष एकाच ठिकाणी, एका सेटवर असण्याची, दोन सीन्स/शॉट्समध्ये आराम करण्याची सवय झालेली – अचानक रोज ट्रॅफिक कापत दादर, पार्ले, बोरिवली, डोंबिवली, कल्याण, पुणे, नाशिक असं मला झेपणार का?

पण हे सगळे विचार बाजूला ठेवून मी पहिल्या वाचनासाठी गेले फक्त दोन नावांसाठी – एक! सगळ्यांचा लाडका, विक्रमादित्य, गोंडस व्यक्तिमत्त्वाचा प्रशांत आणि वेगवेगळ्या धाटणीची नाटकं समर्थपणे सादर करून मराठी रंगभूमीवर खऱ्या अर्थाने ठसा उमटवलेला माझा जिवलग मित्र – चंदू – चंद्रकांत कुलकर्णी. पहिलं वाचन झालं. विद्यासागर अध्यापक यांच्या या नव्या नाटकाचा विषय फारच चांगला, महत्त्वाचा होता. प्रशांत तिथे येतानाच तालमीचं महिन्याभराचं वेळापत्रक घेऊन आला होता! त्यात तालमी, फोटोशूट, कॉश्च्यूम ट्रायल्स, रंगीत तालमी – या सगळ्यांचं प्लॅनिंग होतं! चंदूही प्रवेशांची मांडणी, आखणी करूनच आला होता. वाचन झाल्यावर सर्वानुमते काही फेरफार, अर्थातच लेखकाच्या मदतीने, संमतीने करणं आवश्यक होतं. ते ठरलं.

माझ्या लक्षात आलं. माझ्या भूमिकेत थोडी लांबी सोडल्यास तसं काहीच नव्हतं – चमकदार तर काहीच नाही, वैशिष्टय़ही काहीच नाही. रुंदी, खोली नव्हतीच. मी थोडी नव्‍‌र्हसच झाले. प्रशांत आणि चंदू मिळून हे नाटक उत्तमच घडवणार याची खात्रीच होती, पण थोडी धाकधूकही होती.

प्रशांतची नाटकं इतकी वर्ष पाहिली होती. त्याचा स्वत:चा एक फार मोठा प्रेक्षकवर्ग महाराष्ट्रात, परदेशांतूनही आहे, पण मी पहिल्यांदाच त्याच्याबरोबर नाटकात काम करणार होते. चंदूची दिग्दर्शनातली हातोटी तर सर्वानाच माहीत आहे, तो माझा सगळ्यात जुना आणि जिवलग मित्र आहे, पण त्याच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची माझी पहिलीच वेळ होती. १४ वर्षांनंतर मी नाटक करणार, त्या भूमिकेला आकारच नव्हता. मला स्वत:ला समाधान कसं मिळणार?

आता मागे फिरण्यात काही अर्थ नव्हता – तालमी सुरू झाल्या होत्या. मग मीच माझ्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्या भूमिकेला सजवायला घेतलं. विशिष्ट वाक्यरचना, वेशभूषेमधलं वैशिष्टय़ अशी भर घालायला सुरुवात केली. चंदूच्या परवानगीने काही बदल, काही अ‍ॅडिशन्स करत गेले. चंदूनेही दिलदारपणे मला स्वातंत्र्य दिलं. प्रशांतनेसुद्धा त्याचा ३५ वर्षांचा अनुभव, दुसऱ्या तालमीतच ५० व्या प्रयोगासारखे काम करण्याची समज असूनही मला माझ्या गतीने, चाचपडत चाचपडत तालीम करू दिली. तालमी पार पडल्या, रंगीत तालीमही झाली आणि हाऊसफुल असा पहिला प्रयोगही.

धुवाधार असे प्रयोग सुरू झाले. अजूनही चालूच आहेत. सुरुवातीचे प्रयोग करताना माझ्यावर फारच दडपण आलं होतं. मला फक्त ‘प्रशांत दामलें’च्या नाटकात काम करायचं नव्हतं तर प्रशांतच्या बरोबरीने भूमिका करायची होती, पण त्याच्यावर कुरघोडी वगैरे करण्याचा अनाठायी, केविलवाणा प्रयत्नही नव्हता करायचा.

खरंतर एवढा विचार करायची गरज होती?

एका हलक्याफुलक्या नाटकातली एक लोकप्रिय नटाबरोबर बायकोची भूमिका – जायचं, प्रयोग करायचा आणि घरी यायचं. बास्स. पण मलाच माझी ही भूमिका आतापर्यंत केलेल्या भूमिकेपेक्षा वेगळी आणि संस्मरणीय करायची होती. म्हणजे खरंतर प्रत्येक नाटक वेगळं असतं तेव्हा भूमिका वेगळीच लिहिलेली असते – पण आपण खूप काम केलंय, लोक ओळखतात, सह्य़ा घेतात – आता तर सेल्फीज्ही घेतात – काही कार्यक्रमांची आमंत्रणं येतात – तिथे नटूनथटून जाण्याच्या गडबडीत कलाकारांच्या काही गोष्टी निसटून जातात – फक्त तरुण आणि सुंदर दिसायचं आणि स्टेजवर धीटपणे वावरायचं ही माझी अभिनयाची व्याख्या कधीच नव्हती. ‘गोष्टीप्रमाणे अभिनय’ आणि ‘भूमिकेचा आनंद घेणं’ हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही भूमिका ‘वेगळी’ करण्याचा प्रयत्न सुरू केला.

चंदूने स्वातंत्र्य दिलंच होतं, प्रशांतनेही त्याचे अनुभवी सल्ले दिले, लेखक विद्यासागर अध्यापक यांनी माझ्या हट्टाखातर काही महत्त्वाची वाक्यं मला नव्याने लिहून दिली, काही ठिकाणी मी स्वत:ची काही वाक्यं चपखलपणे बसवली, त्याला सानंद अनुमती दिली. लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार यांच्या मदतीने मी माझी भूमिका उभी केली. केशभूषा, वेशभूषा यात माझे इनपुट्स टाकले. संवादांमध्ये काही वैशिष्टय़े टाकली. पूर्ण नाटकात वावरणाऱ्या माधवीसाठी तिचा स्थायीभाव मलाच एका उद्गारात सापडला – ‘किती छान!’

सगळ्यांनाच खूप आवडला हा उद्गार –

मग समीक्षकांनीच सरळसाधं आनंदी जीवन जगताना अचानक उद्भवलेल्या नवऱ्याच्या आजारपणाने गडबडलेली, तरुण, बेधडक स्वभावाच्या मुलीच्या काळजीने भांबावलेली अर्कचित्रात्मक शैलीतली ‘माधवी’ आवडल्याचं लिहिलं तेव्हा जीव भांडय़ात पडला. एका समीक्षकानं मात्र हा जीव भांडय़ातून काढून खाली आपटलासुद्धा! ‘प्रशांत दामलेंच्या बरोबरीने ‘लाफ्टर्स’ काढण्याचा प्रयत्न करते’ असं झोंबरं वाक्य लिहिलं..

पण त्यांना ठाऊक नाही माझ्यापेक्षा प्रशांतच अस्वस्थ होतो. माझ्या विशिष्ट वाक्याला हशा आला नाही तर. (असो!)

एका समीक्षकाने माझाच उद्गार वापरून प्रतिक्रिया दिली ‘किती छान!’

प्रत्येक प्रयोगाला आवर्जून भेटायला येणारे शेकडो प्रेक्षक ‘आतापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी वाटली’ ‘खूप आवडलं’ ‘सरप्राइजच होतं तुम्हाला अशा भूमिकेत बघणं’ असं प्रेमाने सांगतात तेव्हा या भूमिकेसाठी घेतलेल्या मेहनतीचं चीज झालं असं वाटतं.  प्रत्येक नाटकाचा, त्यातल्या भूमिकेचा बाज वेगळा असतो, तो ओळखून कलाकार म्हणून स्वत:त बदल करणं अगदीच प्राथमिक गरज आहे. आमच्या या नाटकाचा प्रयोग, माझी भूमिका करताना मी कायमच भान ठेवते, हे काही ऐतिहासिक किंवा सत्य घटनेवरचं नाटक नाही की तालमीत बसवलं तसंच चोख करायचं.

हे हलकंफुलकं, प्रेक्षकांना खळखळून हसवत एक महत्त्वाचा संदेश देणारं नाटक आहे. त्यामुळे ‘पॉपकॉर्न’सारखा प्रयोग झाला पाहिजे, म्हटलं तर हलकंफुलकं पण काळजीपूर्वक करावं लागणारं. वाक्यांचे दाणे कच्चेही नको जळकेही नको – प्रसंग फुलून यायला हवेत आणि विषयाच्या गांभीर्याचा मसालाही योग्य ठिकाणी, योग्य प्रमाणात पडला पाहिजे!

आज, २५० चा टप्पा पूर्ण करणारं आमचं हे नाटक! यातल्या ‘माधवी’मुळे एक हलकं फुलकं, पण महत्त्वाचा विषय हाताळणारं खणखणीत व्यावसायिक नाटक. प्रेक्षकांची हाऊसफुल्ल पसंती आणि एका वर्षांत आठ देशांतल्या आपल्या मराठी प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचं समाधान मिळालंय. त्यामुळे ‘साखर’चा प्रयोग असला की वाटतं ‘किती छान!’

– शुभांगी गोखले

ranimohangokhale@yahoo.co.in

chaturang@expressindia.com