03 August 2020

News Flash

रांगडी ‘रखमा’

‘झुंज’ नाटकातली रखमाची भूमिका अतिशय वेगळी होती. ती मला मिळाली तिचाही एक किस्साच आहे.

सीताराम खैरे, प्रमोद पवार आणि प्रा. मधुकर तोरडमल

|| वंदना गुप्ते

मी आत्तापर्यंत ५९ नाटकांतून भूमिका केल्या. त्यातल्या आवडत्या भूमिका सगळ्याच आहेत, कारण भूमिका आवडल्याशिवाय मी कधी स्वीकारल्या नव्हत्याच. मात्र थोडं डावंउजवं केलं तर मला ‘चारचौघी’ नाटकातली ‘विद्या’ आणि दुसरी ‘झुंज’मधली ‘रखमा’ फार आवडतात.

‘झुंज’ नाटकातली रखमाची भूमिका अतिशय वेगळी होती. ती मला मिळाली तिचाही एक किस्साच आहे. ‘झुंज’ हे मधुकर तोरडमल यांनी लिहिलेलं नाटक. ‘द मॅन’ या आयर्विन व्हॅलेसच्या कादंबरीवर आधारित ते नाटक होतं. दलित आणि दलितेतर असा संघर्ष त्याच्यात होता. हे नाटक ‘चंद्रलेखा’ने प्रकाशित केलं होतं. त्यात मधुकर तोरडमल यांचीच मुख्य भूमिका होती. त्यात अनेक कलाकार होते. मी होते; प्रमोद पवार, अनंत जोग, उषा लिमये आणि ‘चंद्रलेखा’ची नेहमीची टीम होतीच. मला आणि माझे पती शिरीष, दोघांनाही नाटकांची आवड असल्याने मी ज्या नाटकात काम करायचे त्या बहुतांश नाटकांचे वाचन आमच्या घरी व्हायचे. ‘झुंज’ नाटकासाठी जेव्हा आमच्या घरी वाचन करायचं ठरलं तेव्हा मधुकर तोरडमल यांनी सुरुवातीला खूप आढेवेढे घतले. कारण मी जी भूमिका या नाटकात केली ती भूमिका त्यांना सुलभा देशपांडे यांना द्यायची होती. तोरडमल यांचं असं म्हणणं होतं की, मी तोपर्यंत सगळ्या अत्याधुनिक, शहरी स्त्री भूमिका केल्या होत्या, म्हणजे साधारणत: वरिष्ठ वर्गातल्या स्त्रीच्या. ‘झुंज’ नाटकातली भूमिका ही एका दलित स्त्रीची भूमिका होती. रखमा तिचं नाव. रस्ते झाडणारी, दलित वस्तीत राहणारी.

मधुकर तोरडमल त्या नाटकात दलित ‘व्हाइस प्रिन्सिपल’ची भूमिका साकारत होते. त्यांच्या घरी बायकोच्या निधनानंतर त्यांच्या लहान मुलाचं संगोपन करण्यासाठी रखमा येऊन राहिलेली असते. त्यांच्यात नवरा-बायकोसारखे संबंध असतात. फक्त त्यांनी लग्न केलेलं नसतं. रखमाची भूमिका अशी होती की, ती अतिशय रांगडी बाई असते, दिसायला काळीसावळी, रस्ते झाडून, कष्ट करून रापलेली, गुडघ्यापर्यंत नऊवारी नेसणारी, मोठं कुंकू वगैरे. अशा पद्धतीची भूमिका मी आतापर्यंत केलीच नव्हती. त्यामुळे तोरडमलांनी कल्पनाच केली नव्हती की, मी ती भूमिका करू शकेन. म्हणूनच त्यांनी सुलभा देशपांडे यांचं नाव या भूमिकेसाठी सुचवलं होतं. त्यांना त्या जास्त योग्य वाटत होत्या. ‘चंद्रलेखा’चीही तोपर्यंत अशी भूमिका होती की, शक्यतो आपल्या संस्थेशी निगडित कलाकारांसाठी योग्य असेल तर त्यांनाच भूमिका द्यावी. त्यात रखमाची फारच भाव खाणारी भूमिका होती. त्यामुळे मीही हट्ट केला की, मला ही भूमिका करायचीच आहे.

तोरडमल थोडे आढेवेढे घेत मला म्हणाले की, ‘‘मी तुला ८-१० दिवस देतो. मग तुला जमतंय असं वाटलं तरच मी तुला ही भूमिका देईन.’’ मी म्हटलं, चालेल. त्यांनी मला रखमाचे दोन पानी संभाषण पाठ करायला दिले. मला आव्हानं स्वीकारायला आवडतात आणि प्रत्येक नाटकात काही वेगळं करायला मिळतं का हे मी आवर्जून पाहाते. तरच मी नवीन नाटक घेते. त्या वेळी तर माझा संसार, मुलं असं सगळं सांभाळून नाटक करायचं असायचं. नाटक करायचे म्हणजे जबाबदारी. त्यामुळे जे आपण करतोय त्याचा आनंद तरी मिळायला हवा होता. कारण त्या वेळी नाटकांमधून फार पैसा मिळत नसायचा. त्यात आनंदही नाही मिळाला तर हा व्यवसाय कशाला करायचा.. म्हणून व्यावसायिक नाटक स्वीकारताना मी फार चोखंदळ असायची, मी संसार सांभाळून नाटक करत होते. एक कर्तव्यदक्ष पत्नी, आई, सून, मुलगी, भगिनी ही नाती, सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून जपत आले आणि त्यात मला आनंदही मिळतो. मग नाटक करण्यामागेही माझी हीच भावना असते. जी संसाराची बांधिलकी तीच व्यावसायिक नाटकाचीही असते. खरंतर जरा अधिकच. कारण अभिनेत्री म्हणून नाटकातली पात्र साकारताना कुटुंबातल्या नातेवाईकांची काहीच मदत मिळत नाही. तिथे रंगमंचाच्या अवकाशात तुम्ही एकटेच असता. या उलट मी नाटकासाठी जो वेळ देते तेव्हा माझ्या मुलांची देखभाल करण्यासाठी अख्खं कुटुंब आनंदाने मदतीला उभं असतं. नाटय़संसार आणि घरसंसार सांभाळून इतकी वर्ष (४६ वर्ष) नाव मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी जी धडपड करावी लागली, ती मला खूप शिकवून गेली. शिवाय आई म्हणजे माणिक वर्मा, तिने कलाकार, व्यक्ती म्हणून मिळवलेल्या आदराला मला कुठेही धक्का द्यायचा नव्हता. त्यामुळे आपण जे करतो त्याचा आनंद आपल्यालाही मिळाला पाहिजे या मताशी ठाम राहूनच नाटकांची निवड करत आले. जवळपास ६० वेगवेगळी नाटकं केली जी सगळीच यशस्वी झाली, त्यांचे दौरे केले, तालमी केल्या. खूप खूप मेहनत, कष्ट केले ते मला वाया जाऊ द्यायचे नसतात. म्हणून सगळ्यांच्या संमतीने, पसंतीने नाटकांची निवड करीत आले.

मी केलेल्या प्रत्येक नाटकाला मीही भरभरून दिलं आणि नाटकांनीही मला, माझ्या व्यक्तिमत्त्वाला खूप वेगवेगळे पैलू दिले. प्रत्येक नाटकाने, त्यातल्या भूमिकेने मला व्यक्ती म्हणून फार फार सशक्त केलं. मी वंदना गुप्ते म्हणून समाजात वावरताना मी केलेल्या अनेक भूमिका मध्ये मध्ये डोकावतात, मला सावध करतात, आनंद देतात. आधार देतात. स्वाभिमान देतात.  ठोस आत्मविश्वास देतात. ‘रखमा’ ही भूमिका त्यातलीच एक.

भूमिका करण्यासाठी मी तसा कधी हावरेपणा केला नाही, मात्र ही भूमिका मला करायचीच होती. कारण रखमाची भूमिका मला आव्हानात्मक वाटली. तिचा बोलण्याचा लहेजा, ती अदब, तिचं तंबाखू खाणं, पान खाणं, ते थुंकणं, तिच्या शिव्या, तिच्या रोजच्या व्यवसायामुळे लागलेल्या सवयी तिच्या अंगात मुरलेल्या असतात. त्यामुळे ही भूमिका करायची म्हणजे ती पूर्ण शारीरिक, मानसिकरीत्या स्वत:मध्ये मुरवूनच करावी लागणार होती. त्यामुळे तोरडमल फारच साशंक होते माझ्याविषयी. मी मात्र ते आव्हान स्वीकारलं होतं.

रखमाच्या भूमिकेचा लहेजा वेगळाच होता. माझी नाटक वाचण्याची एक पद्धत आहे. मी एकदा लेखकाकडून नाटक ऐकते, मग ते नाटक मी स्वत: तीन-चार वेळा वाचते. मग त्यातले बारकावे हळूहळू कळायला लागतात. माझी भूमिका, तिचे संवाद मला हळूहळू कळायला लागतात. माझ्या भूमिकेविषयी नाटकातली इतर पात्र काय म्हणताहेत, हे मला समजत जातं. म्हणजे माझ्या भूमिकेबरोबरच नाटकातल्या इतर पात्रांचे स्वभावपैलू मला कळायला लागतात. त्यामुळे भूमिका करताना मदत होते. माझ्या नेहमीच्या पद्धतीने मी सगळं नाटक दोन-तीनदा वाचून काढलं. माझ्या भूमिकेविषयी कोण काय बोलतंय, एकूणच त्या नाटकाचं म्हणणं काय आहे, कुठल्या घरात मी वावरतेय, कुठून आलेय, अशा पद्धतीने भूमिकेचा अभ्यास मी केला. मी मानसशास्त्रात पदवी घेतली असल्याने त्याचा मला या नाटकासाठी फार फायदा झाला. म्हणजे एकूणच आतापर्यंत मी ज्या ज्या भूमिका केल्या त्यासाठी नेहमीच फायदा होत आला आहे. पाठांतर अगदी चोख होईपर्यंत मी स्क्रिप्ट हातातून सोडत नाही. कारण लेखकाच्या शब्दांवर माझा विश्वास असतो. त्यात मी तोडमोड करत नाही. पदरचे शब्द न घालता त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करते. पाठांतर झालं की मी रात्री सगळी निजानीज झाल्यावर घरातील बैठकीत येऊन सगळे दरवाजे बंद करून मोठय़ाने माझे संवाद म्हणते आणि मग त्यातून मला भावना उलगडत जातात, स्वर मिळत जातो. नाटकांत स्वरावर खूप मेहनत करायला लागते. स्वरातूनच आपले भाव पोहोचवायचे असतात. तोपर्यंत ४-५ नाटकं केली असल्याने माझा हा अभ्यास झाला होता.

मी ७-८ दिवस व्यवस्थित पाठांतर केलं. मग मी माझ्या दोन्ही मुलांना समोर बसवलं. लहान होती दोघंही. त्यांच्यासमोर तो म्हणून दाखवला. मात्र त्यांना तो कळलाच नाही. ना ती भाषा त्यांना कळली ना तिचा अर्थ. मला उगाच वाटलं की, आपण नापास झालो. मग मी अखेर प्रा.तोरडमल यांना जाऊन भेटले. त्यांनी मला त्या भाषेचा लहेजा अगदी चोख सांगितला. त्यानुसार मी अभ्यास केला. एवढंच नव्हे तर मी एक दिवस माटुंग्याच्या दलित वस्तीत संपूर्ण एक दिवस एका कुटुंबाबरोबर राहिले. त्या घरातील बाईचं उठणं, बसणं, चुलीवरून भांडं उतरवणं, तंबाखू चोळणं, सुपारी खाणं, मुलांकडे लक्ष देणं, मुलांवर ओरडणं आणि तिची भाषा, तिच्या तोंडातून कशा प्रकारे शिव्या येतात याचं निरीक्षण केलं. त्याचप्रमाणे मुलांच्या शर्टाच्या ‘गुंडय़ा’ कशी लावते, त्यांना शाळेत कशी पाठवते, शेजाऱ्यापाजाऱ्यांशी, नवऱ्याशी कसं बोलते, हे सगळं सहजी कसं करते. कारण उपरी भाषा असली, की आपण खूप कृत्रिम पद्धतीनं बोलतो. हे मला रखमाच्या भूमिकेत टाळायचं होतं. मला ती भूमिका अगदी नैसर्गिक वाटावी अशी इच्छा होती. त्या बाईचा सहजपणा आपल्याही अंगात यावा म्हणून मी हा अभ्यास केला. अशा प्रकारे अभ्यास झाल्यानंतर १०-१५ दिवसांनी मी तोरडमलांना सांगितलं की, ‘‘मी तयार आहे.’’ त्यांनी तालमी सुरू केल्या. एक दिवस अचानक मला सगळ्या कलाकारांसमोर रखमाचा दोन-पानी संभाषणात्मक संवाद म्हणून दाखवायला सांगितला. मी म्हणून दाखवला आणि मला ती भूमिका मिळाली..

मधुकर तोरडमल भूमिका करायचे ती होती, ‘व्हाइस प्रिन्सिपल ऑफ कॉलेज.’ अभ्यंकर नावाचे प्रिन्सिपल असतात. त्यांचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो, त्यामुळे दलित असणाऱ्या व्हाइस प्रिन्सिपलला प्रिन्सिपल होण्याची संधी मिळते. ते रखमाला आग्रह करतात की, तू आता रखमाची रुक्मिणी हो. कारण आता प्रिन्सिपलच्या बंगल्यात जाऊन राहायचंय. आपण रीतसर लग्न करू. मग तू त्या बंगल्यात राहायला ये. त्याला रखमाचा विरोध असतो. त्या वेळचे संभाषण तोरडमलांनी मला पाठ करायला दिले होते.

ते संभाषण आजही माझ्या लक्षात आहे. यश सहजासहजी मिळत नसतं, त्यासाठी आवश्यक असणारे कष्ट घ्यावेच लागतात, अशा आशयाचे ते संवाद होते. त्यात रखमा तिचे तत्त्वज्ञान सांगते, तिला बंगल्यात का राहायला यायचं नाही आणि लग्न का करायचं नाही याविषयी सांगते.

ही भूमिका कस लावणारी होती आणि मीही ती सही सही केली. त्यामुळे रखमाची भूमिका लोकांना आवडली, पटली. त्यामुळे त्या भूमिकेचा प्रभाव टिकला. ‘झुंज’मध्ये माझ्या बोलण्यात अगदी इरसाल शिव्या होत्या. माधव मनोहर यांनी ‘मार्मिक’मधील परीक्षणात लिहिलं होतं की, ‘वंदना गुप्ते यांनी इतकं छान काम केलं, इतक्या छान शिव्या घातल्या, की त्यांना घरीही शिव्या द्यायची सवय असावी असं वाटतं.’

असाच किस्सा होता सोलापूर दौऱ्याचा. तिथे एकदा नाटक संपल्यावर बांधाबांध सुरू होती. ती होईपर्यंत मी मेकअप रूममध्ये गेटअप उतरवून बसले होते. त्याच वेळी नाटय़गृहाबाहेर दोन पांढऱ्या अँबेसीडर कार उभ्या राहिल्या. त्यातून सात-आठ पुरुष मंडळी बाहेर पडली आणि तिथल्या रखवालदाराला त्यांनी विचारलं की, रखमा कुठे आहे. रखवालदाराने सांगितलं की, त्या आतमध्ये बसल्या आहेत. ते आत आले. त्यांनी पाहिलं तर रखमा आत दिसलीच नाही. कारण सगळा काळा मेकअप मी उतरवला होता. मी त्या वेळी जीन्स-टॉप घालून बसले होते. कृष्णा बोरकर हे मेकअपमन त्या वेळी तिथे होते. त्यांनी सांगितलं की, हीच ती रखमा; पण त्यांची समजूत  पटेना. त्यांना रखमाला भेटायचं होतं. बोरकरांनी भेटण्याचं कारण विचारल्यावर त्यांनी सांगितलं, त्यांचं तिथं जवळपासच्या गावात १०० एकरांचे शेत होते. त्यांच्या बायका त्या सांभाळायच्या आणि त्या सगळ्या खमक्या आणि तडफदार होत्या. तशीच मुलगी आम्हाला हवी असल्याचं त्याचं म्हणणं होतं. रखमा त्यांना पसंत होती. त्यांच्या मुलासाठी मागणी घालण्यासाठी ते आले होते. सोबत मुलालाही घेऊन आले होते.

रखमा इतकी लोकांना पटली होती, आवडली होती. समाधान देणारी भूमिका होती ती. ते नाटक पुन्हा करायला हवं असं वाटतं.

vandanasgupte@yahoo.com
chaturang@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2018 1:01 am

Web Title: vandana gupte writing about selection of role in drama
Next Stories
1 सच्चा स्वर देणारी विनी
2 वेदनेतील शल्य..
3 आत्मविश्वास देणारी ‘प्रज्ञा’
Just Now!
X