04 December 2020

News Flash

ब्रँडमागचा ‘अर्थ’

ब्रँडेड वस्तू म्हटली की आपसूक तिला वजन प्राप्त होतं

कंपन्या, त्यांची उत्पादनं यासाठी बँड्र अर्थात नाममद्रा खूपच  महत्त्वाची असते. या नाममुद्रेमुळे उत्पादनाच्या विक्री अथवा महसुलात ३६ टक्क्यांपर्यंत वाढ होते. अशा बँड्रना ग्राहकांमध्ये, बाजारपेठेत ओळख मिळवून देण्याचं जिकिरीचं काम बरखा दत्तानी गेली दहा वर्षे कल्पकतेने करत आहेत, ते त्यांच्या ‘बरखाज् बँड्र क्लिनिक’च्या माध्यमातून. १४ हजार ब्रँड तयार करणाऱ्या या ‘क्लिनिक’च्या संस्थापक-संचालक बरखांविषयी..

आजकाल ब्रँडेड वस्तूंची चलती आहे. ब्रँडेड वस्तू म्हटली की आपसूक तिला वजन प्राप्त होतं आणि म्हणूनच एखादं उत्पादन बाजारात आणण्यापूर्वीच तो ब्रँड म्हणून जास्तीत जास्त लोकप्रिय करणे, त्यासाठी जाहिराती करणे याला अनेक कंपन्या खूप महत्त्व देतात. त्या त्या उत्पादनांचा प्रसार आणि प्रचार यासाठी एकूण खर्चापैकी काही हिस्सा राखून ठेवला जातो. त्यासाठी गरज असते ती आकर्षक आणि योग्य त्या ब्रँडची, म्हणूनच कोणत्याही कंपनीची, तिच्या उत्पादनाची नाममुद्रा, बोधचिन्ह वा बँड्र खूप अभ्यासानंतर निश्चित केला जातो. तो विकसित करताना कार्याचा उद्देश, कार्यक्षेत्र यांचा विचार केला जातो. विविध कंपन्यांसाठी अशी सारी तयारी करून नाममुद्रा करून देण्याचं कार्य बरखा दत्तानी सुमारे दहा वर्षांपासून करत आहेत. ‘बरखाज् बँड्र क्लिनिक’च्या माध्यमातून या क्षेत्रातील महिला उद्योजक म्हणून कदाचित त्या एकमेव नसाव्यात, पण केवळ नाममुद्रा तयार करणारी त्यांची कंपनी ही भारतातील अशी एकमेव कंपनी.

बरखा मुंबईतल्याच. त्यांचं शालेय तसंच वाणिज्य शाखेतील महाविद्यालयीन शिक्षण इथंच झालेलं,  उच्च शिक्षणानंतर त्यांनी लंडनच्या बिझनेस स्कूलमध्ये व्यवसाय व्यवस्थापनाचे धडे घेतले. वडील शहरातील स्थावर मालमत्ता क्षेत्रातील प्रस्थ. उपनगरात त्यांच्या व्यवसायाचा असलेला पसारा आता पुण्यापर्यंत पोहोचला आहे. सध्या ही जबाबदारी त्यांचे बंधू पाहत आहेत. मोठी बहीण आरेखनकार आहे. उद्योग त्यांच्या रक्तातच आहे, बरखा सांगतात, ‘‘मी गुजराती समाजातील आहे. एक मुलगी म्हणून तरी घरून मला कधी आडकाठी आली नाही. शाळेत असल्यापासून मी वडिलांचा व्यवसाय जवळून पाहत होते. गृहनिर्माण प्रदर्शनादरम्यानच्या आमच्या कंपनीच्या सहभागातून मला वेगळा व्यवसाय खुणावू लागला. अन्य प्रदर्शनकर्त्यांकरिता त्यांच्या दालनांची उभारणी, उत्पादन-कंपन्यांच्या माहितीचे सादरीकरण असे मी सुरुवातीला करू लागले. नवी दिल्लीतील ऑटो शो ते अगदी लग्नसमारंभात जिथे कुठे नावाचा संबंध येईल त्याला कल्पक रूप मी देऊ लागले. मग मला वाटलं, आपण या छोटय़ा कंपन्या, उद्योग, व्यवसायांच्या नावाशी का खेळू नये. त्यातूनच या कंपन्यांचे बोधचिन्ह वा नाममुद्रा तयार करणाऱ्या व्यवसायाची कल्पना मला सुचली. त्यासाठी मग या क्षेत्रातील अल्प कालावधीचे शास्त्रोक्त शिक्षणही घेतले.’’

परिपूर्ण आणि केवळ बँड्रकरिता कार्य करणारी ‘बरखाज् बँड्र क्लिनिक’ जून २००७ मध्ये स्थापन झाली. कंपनीचा पहिला ग्राहक हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील होता. या कंपनीसाठी एक नव्हे, तर तब्बल सात नाममुद्रा विकसित करण्याचं काम बरखा दत्तानी यांना मिळालं. नाममुद्रा विकसित करण्याची संख्या आता १४ हजारांच्या वर गेल्याचंही त्या अभिमानानं नमूद करतात.

नाममुद्रा विकसित करण्यामागील तंत्र स्पष्ट करताना त्या म्हणतात, ‘‘आजकालचं जग हे ‘जो दिखता है वो बिकता है’ या स्वरूपाचं आहे. कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळण्यासाठी हे तंत्र स्वीकारलं आहे. म्हणूनच नाममुद्रेकरिता त्या कमालीच्या आग्रही असतात. ‘‘आम्हीही नाममुद्रा अधिक ग्राहकांपर्यंत कशी सहजरीत्या पोहोचेल यासाठी कार्य करतो. कल्पकता, नावीन्य, आरेखन असा सारा प्रवास एखादी नाममुद्रा अथवा बोधचिन्ह घडविण्यामागे असतो’’, असं त्या स्पष्ट करतात.

नाममुद्रेचा व्यवसायाच्या प्रगतीवर निश्चितच परिणाम होतो, हे सांगतानाच कंपन्यांच्या या नाममुद्रेमुळे विक्री अथवा महसुलात ३६ टक्क्यांपर्यंत वाढ होते, असे सर्वेक्षण असल्याचेही त्या नमूद करतात. एखाद्या कंपनीचा, त्याच्या उत्पादनाची नाममुद्रा हा उत्पादनाचा चेहरा असतो; आणि चांगला चेहरा कुणाला नाही आकर्षित करणार, असा सवाल करत बरखा नाममुद्रेचे महत्त्व पटवून देतात.

बरखा यांची त्यांच्या व्यवसायाविषयीची, कलेविषयीची उत्स्फूर्तता वेळोवेळी प्रदर्शित होते. बोलता बोलताही त्या संवादात आलेल्या एखाद्या नावाभोवती मनातल्या मनात घुटमळतात आणि लगेचच डाव्या हाताने कागदाच्या चिटोऱ्यावर तीन ते चार आरेखनं काढतातही. कंपनी, उत्पादन, संस्था, व्यक्तीमागील उपलब्ध निरीक्षणं आपल्या कलाकृतीतून कशी अधोरेखित होतात, हेही त्या बोलक्या रेषेतून स्पष्ट करतात.

या अनोख्या क्षेत्रात एक स्त्री म्हणून आपल्याला आव्हान जाणवत नसल्याचं त्या स्पष्टपणे सांगतात. किंबहुना कंपन्यांसाठी, त्यांच्या उत्पादनांसाठी नाममुद्रा तयार करण्यातही फार तारेवरची कसरत नाही, असं त्या म्हणतात. उलट कल्पनाशक्तीला वाव देणारं हे क्षेत्र आहे, यावर त्यांचा विश्वास आहे. नाममुद्रा साकारून संबंधित उत्पादनाचं स्वरूप खुलविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असं सांगत बरखा त्याचा उद्देश चांगलं काही तरी बिंबविण्याचा असायला हवा, असंही नमूद करतात.

विद्यमान राष्ट्रीय लोकशाही आघाडी/मोदी सरकारच्या नव्याने सुरू झालेल्या अनेक योजनांच्या नाममुद्रा बरखा यांनी साकारल्या आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील योजनांकरिता नाममुद्रा तयार करताना आपल्या कल्पनाशक्तीला अधिक वाव मिळतो, असं त्या सांगतात. त्यांनी तयार केलेले ‘नरेंद्र मोदीज् इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम’च्या नाममुद्रेसह ही योजनाही नुकतीच कार्यान्वित झाली. ‘अमूल’, ‘फोर्ब्स’, ‘पी. एन. ज्वेलर्स’ अशा कंपन्यांच्या, त्यांच्या उत्पादनांच्या नाममुद्रा तसेच आमिर खान, आर. माधवन, गौतम बॅनर्जी यांच्यासाठीही नाममुद्रा त्या विकसित करतात. कंपन्या, उत्पादने याचबरोबर वैयक्तिक स्तरावरूनही अशा नाममुद्रा तयार करण्याची मागणी गेल्या वर्षांपासून वाढल्याचे निरीक्षण त्या नोंदवतात. त्या व्यक्तीचे नाव, त्याची व्यावसायिक अथवा सामाजिक ओळख, त्याचे व्यक्तिमत्त्व हेरून अशा नाममुद्रा तयार केल्या जातात, असे त्या सांगतात. सब वाहिनीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील पात्रांवरील नाममुद्रा तयार करण्याच्या कामात त्या सध्या व्यस्त आहेत. त्याचबरोबर काही दूरचित्रवाहिन्यांच्या नाममुद्राही त्या करत आहेत.

नाममुद्रा हा त्या उत्पादनाचा चेहरा असतो. आणि एक स्त्री जेव्हा तो चेहरा खुलवत असते तेव्हा तो ‘अर्थ’पूर्ण करण्याची जबाबदारीही तिच्यावर असते. बरखा दत्तानी ही दुहेरी जबाबदारी लीलया पेलत आहेत असंच म्हणावं लागेल.

बरखाज् बँड्र क्लिनिक

मुंबईत तीन कार्यालये असलेल्या ‘बरखाज् बँॅड्र क्लिनिक’च्या आता गुजरातमधील जवळपास सर्वच शहरांमध्ये शाखा सुरू होत आहेत. लंडनच्या सात कंपन्यांपासून ते आता

१४ हजार छोटय़ा-मोठय़ा कंपन्या, व्यक्तींकरिता नाममुद्रा साकारण्याचं कार्य झालं आहे. कंपन्या, त्यांची उत्पादनं, विविध योजना याचबरोबर व्यक्तींकरिता नाममुद्रा तयार करणारी ‘बरखाज् बँड्र क्लिनिक’ ही मोठय़ा स्तरावरील काही मोजक्याच कंपन्यांपैकी एक कंपनी आहे.

बरखा दत्तानी

‘अमूल’, ‘फोब्र्ज’करिता नाममुद्रा विकसित करणाऱ्या बरखा दत्तानी यांच्याकडे सरकारच्या विविध योजनांना विपणन कौशल्य प्रदान करण्याचं श्रेय जातं. नाममुद्रेतील कल्पकता, त्यामागील रचना, त्यासाठीच्या सामाजिक, कंपनी पाश्र्वभूमीचा अभ्यास करत बरखा या स्वत: त्या विकसित करतात. आरेखन, नाममुद्रा विकसनातील अनेक पुरस्कारप्राप्त बरखा यांनी स्वत: प्रशिक्षण देऊन ५० जणांचा चमू तयार केला आहे.

व्यवसायाचा मूलमंत्र

आपल्या कलेबद्दल, व्यवसायाबद्दल तुम्ही आग्रही असलं पाहिजे. त्यात जीव ओतून देऊन काम करायला हवं. तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात, कार्यात १०० टक्के योगदान द्या. जे कराल ते आवडीनं करा.

आयुष्याचा मूलमंत्र

तत्त्वे पाळा. तडजोड स्वीकारू नका. दिलेलं वचन पूर्ण करा. आयुष्यात आदर्श असावा. पण त्याची प्रतिकृती नसावी. आपलं काहीतरी वेगळं करण्याचा, निराळं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा.

 

वीरेंद्र तळेगावकर

veerendra.talegaonkar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2016 1:08 am

Web Title: brand information
Next Stories
1 करिअरला साद घालणारी ‘व्हिसलिंग’
2 अचूकतेची संस्कृती
3 गॅझेट वुमन
Just Now!
X