शालेय जीवनात सुटीच्या निमित्तानं वडिलांच्या ऑफिसमध्ये येणं, दहावीत असताना व्यवसायात सक्रिय भाग घेणं आणि वयाच्या तिशीच्या आतच ‘फॅमिली रन बिझनेस’ची पूर्णपणे जबाबदारी पेलणं हा कृती जैन यांचा प्रवास. व्यवसायाचं बाळकडू आणि गाठीला असलेल्या कायदा, व्यवस्थापनाचे शास्त्रोक्त शिक्षण या जोरावर कृती जैन यांनी ‘कुमार अर्बन डेव्हलपमेंट’लाही कालानुरूप बदलवून स्थावर मालमत्ता या क्षेत्रात भरारी घेतली..
स्थावर मालमत्तासारख्या क्षेत्रात एक स्त्री? तीही एका मारवाडी कुटुंबातील? तीही यशस्वी? आणि गेल्या तीही पाच दशकांपासून? कृती जैन यांच्या बाबतीत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे होय अशी येतात. नेक्स्ट जनरेशन, फॅमिली रन बिझनेस यांचं कोंदण मिळालेल्या कृती यांनी एकूणच स्थावर मालमत्ता क्षेत्राला नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे.
कृती ललितकुमार जैन या पूर्वाश्रमीच्या ‘कुमार बिल्डर्स’ व आताच्या ‘कुमार अर्बन डेव्हलपमेंट लिमिटेड’ (केयूएल-कूल) च्या संचालक. स्थावर मालमत्तासारखं क्षेत्र, जिथे ‘ब्लॅक मनी’, ‘ब्युरोक्रसी’, ‘पॉलिटिकल’, ‘गँगस्टर’ अशा शब्दांचा कधी तरी अप्रत्यक्ष संबंध येतो, आणि वडील याविरुद्ध भूमिका घेत असताना त्या मात्र व्यवसायाला बाजारानुरूप आकार देण्यात गर्क आहेत.

बांधकाम क्षेत्रात पाऊल ठेवण्याबद्दल कृती सांगतात, ‘‘मी १३ वर्षांपासून शाळेला सुटी पडली की, वडिलांबरोबर त्यांच्या ऑफिसमध्ये असे. गृहनिर्माण प्रकल्प साकारत असलेल्या साइटवरही मी जायचे. विकासक म्हणून वडिलांचं बोलणं, वागणं; त्यांचे घर खरेदीदार, प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, कामगार, पर्यवेक्षक यांच्याशी होणारे संवाद, वागणूक लक्षात घ्यायचे. आठवीत असताना वडिलांबरोबर एका गृहनिर्माण वसाहत हस्तांतरण कार्यक्रमाला मी गेले होते. मला हे सगळं वेगळंच वाटत होतं. मी ठरवलं, हे सारं सवयीचं करून घ्यायचं. सकाळी ७.३० च्या ठोक्याला मी घरी वडिलांबरोबर न्याहारीसाठी टेबलावर हजर असे आणि त्यांच्याबरोबर थेट ऑफिसमध्येही. १५ वर्षांची असताना म्हणजे दहावीनंतर मी व्यवसायात सक्रिय भाग घ्यायला लागले. या क्षेत्रातील प्रशासन स्तरावरील ते थेट विपणन धोरणांपर्यंत सारं काही मी जाणून घेतलं. पुढील दोन वर्षे मी कंपनीच्या निरनिराळ्या विभागांत प्रत्यक्ष काम करायला लागले. या वेळी स्थावर मालमत्ता व्यवसायाचे पूर्ण कंगोरे जाणून घेण्याची संधी देण्याबरोबरच दिलेली ध्येय पूर्ण करण्याचं आव्हान खुद्द वडिलांनीच दिलं. बॉस असूनही साधं प्रकल्प प्रमुख म्हणूनही त्यांनी माझी कंपनीत नियुक्ती केली नाही. मात्र कर्तृत्वाच्या जोरावर वयाच्या १७ व्या वर्षी कंपनीचं कार्यकारी संचालकपद मी भूषवलं. माझ्या या क्षेत्रातील कार्याला अधिक शिस्तबद्ध करण्यात व्यवसाय व्यवस्थापन (बीबीए) व कायद्याची पदवी (एलएलबी) हे पूरक ठरलं.’’

vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता
Mahayuti, Hitendra Thakur
हितेंद्र ठाकूर यांना महायुती मदत करणारा का ?
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा

वडील ललितकुमार जैन हे या क्षेत्रातील नावाजलेलं व्यक्तिमत्त्व. या क्षेत्राचे संघटन स्तरावर नेतृत्व करणाऱ्या ‘क्रेडाई’चेही ते अध्यक्ष राहिलेले. याच वेळी कंपनीची नाममुद्रा बदलण्यापासून एकूणच स्थावर मालमत्ता क्षेत्रातील बदलाच्याही कृती या साक्षीदार राहिल्या आहेत. ऐन मंदीचा सामना करत असताना देशाच्या स्थावर मालमत्ता क्षेत्रातील बदल घडवून आणण्यात त्याही सहभागी झाल्या. एकीकडे वडील काळा पैसा, सरकारी अधिकारी-प्रशासन-नियंत्रण व्यवस्थेचा लाल फितीतील कारभाराविरुद्ध मोहीम सुरू करत असतानाच स्थावर मालमत्तासारख्या व्यवसायात अधिक पारदर्शकतेवर, गुणवत्ताप्रदान उत्पादनांवर भर देण्यास कृती यांनी सुरुवात केली. परिणामी या क्षेत्रात निश्चित व नेमकी दरप्रणाली त्यांनी विकसित केली. कार्पेट-बिल्टअपसारख्या गुंतागुंतीच्या व्याख्या अधिक स्पष्ट करत छुपी दरपद्धती त्यांनी नाहीशी केली. पुण्यासारख्या शहरातील विकासकांमध्ये याबाबत नापसंती असताना ‘मार्केटिंग’चा नवा खेळ खेळतानाच या क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणण्याचा त्यांचा आग्रह होता.

कुमार बिल्डर्सची ‘कुमार अर्बन डेव्हलपमेंट’ झाली आणि कंपनीलाही नवं व्यावसायिक रूप देण्यात कृती यांची भूमिका महत्त्वाची ठरली. कृती यांच्या नेतृत्वाखाली ‘केयूएल’च्या कामांचा पसारा ३५ हजार चौरस फुटांवरून ३ लाख चौरस फुटांपल्याडही गेला. ३० टक्क्यांपर्यंतचा खर्च वाचवण्याचं सर्व तंत्रज्ञान अवगत केलं. कंपनीच्या सर्व प्रकल्पात हरित प्रकल्प साकारण्याचा आग्रह त्या धरतात. ग्लास इमारती उभारण्याचा कल सर्व व्यापारी संकुलांमध्ये असताना सुरक्षिततेपोटी त्यांनी या पायंडय़ाला फाटा दिला आहे. कंपनीतर्फे साकारल्या जाणाऱ्या सर्व प्रकल्पांचं प्राथमिक आरेखन व वास्तूविषयक मार्गदर्शन स्वत: कृती करतात. पुण्यातील पहिला आयटी पार्क, पहिला मोठा मॉल साकारण्यात कृती यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
हिंदीत ‘कूल’चा अर्थ ‘एकूण’ असा होतो. तेव्हा घर खरेदीदारांना एकूणच समाधान देणाऱ्या उत्पादनाची निर्मिती आपल्या हातून व्हावी, हा उद्देश नजरेसमोर असतो, असं कृती सांगतात. वडीलच बॉस असले तर एक वेगळी जबाबदारी असते; त्यात वडिलांचं या क्षेत्रातील कर्तृत्व पाहून त्यानुरूप कार्य करण्याकरिता अधिक सजग राहावं लागल्याचं त्या अधोरेखित करतात. व्यवसायातील आपले प्रेरणास्रोत आपले वडील ललितकुमारच असल्याचं कृती सांगतात. व्यवसाय नेतृत्व हा गुण तर कुटुंबाच्या रक्तातच आहे; पण वडिलांची व्यावसायिक दृष्टी मला या क्षेत्रात अधिक चांगलं कार्य करण्यास भाग पाडते.
एक मुलगी म्हणून व्यवसायाच्या ठिकाणी आपल्याला कधी लिंगभेदाचा सामना करावा लागल्याचे आठवत नाही, असं कृती सांगतात आणि बॉसची अथवा बिल्डरची मुलगी म्हणून वेगळी वागणूक आपल्याला ना कार्यालयात ना या क्षेत्रात मिळाल्याचं त्या सांगतात. बरं, मारवाडी म्हणून घरातही तसं वातावरण कधीच नव्हतं. उलट इतक्या कमी वयात आणि तेही माझ्यासारख्या मुलीच्या हातात व्यवसायाच्या किल्ल्या येणं हे कुटुंबावर व आपल्यावरही झालेल्या पुरोगामी विचारांच्या संस्काराचंच द्योतक असल्याचं त्या मानतात.

थर्मेक्स’च्या मेहर पदमजी, ‘कायनेटिक’च्या सुलज्जा मोटवानी यांच्या जोडीला त्या अवघ्या तिशीच्या आत नावारूपाला आल्या आहेत. खेळ, चित्र रेखाटणं हा त्यांचा छंद आहे. वयाच्या ११ व्या वर्षी त्या राष्ट्रीय स्तरावरील हॉकी स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. व्यवसाय, कुटुंब साभाळून त्या चित्र काढण्यासाठीही वेळ काढतात.
आज जैन यांचं चौकोनी कुटुंब आहे. आई-वडील, कृती आणि त्यांचा लहान भाऊ प्रणय. तोही कंपनीचा संचालक आहे. त्याची स्वत:ची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नवउद्यमी (स्टार्टअप) कंपनी आहे.
शेवटी, तुम्हाला जे करायचं आहे ते करण्यासाठी वाटेल ती मेहनत घ्यायला आणि आवश्यक ते प्रशिक्षण घ्यायला तुम्ही तयार असाल तर यश तुमचंच असतं, हे कृती जैन यांनी आपल्या उदाहरणाने सिद्ध केलं आहे, ते अनेकींसाठी आदर्शवतच आहे.

व्यवसायाचा मूलमंत्र
व्यवसायात दिलेल्या शब्दाला खूपच महत्त्व आहे. त्याच्या पूर्ततेचं भान सतत राखलं पाहिजे. ‘कमिटमेंट’बरोबरच ‘डेडिकेशन’ही तेवढंच महत्त्वाचं आहे. व्यवसायात येणाऱ्या समस्या, आव्हानांची प्रतिक्रिया आपल्याद्वारे अन्यत्र उमटण्याआधी शांतपणे त्याच्या निराकरणाची प्रक्रिया अमलात आणली पाहिजे.

आयुष्याचा मूलमंत्र
आपल्याला जे करायचं त्यावर लक्ष केंद्रित करून ते पूर्ण धसास जाईपर्यंत स्वस्थ बसू नये. व्यवसाय आणि कुटुंब, तसंच मित्र-परिवार, समाजाची सांगडही घालता आली पाहिजे. एक स्त्री म्हणून घरच्यांचा पाठिंबा मिळण्यापेक्षा कुटुंबाला आधार देण्याचं कार्य झालं पाहिजे.

कृती
लहानपणापासून वक्तृत्वात माहीर असलेल्या कृती यांनी अमेरिकेत पतधोरणावर झालेल्या चर्चेत भाग घेताना अव्वल स्थान प्राप्त केलं. कायदा विषयक पदवी सुवर्णपदकासह त्यांनी मिळवली आहे. कौटुंबिक व्यवसायात पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या स्त्री ठरलेल्या कृती यांनी स्थिर व पारदर्शी किंमत दरपद्धती अमलात आणून एकूणच स्थावर मालमत्ता क्षेत्र हे काळ्या पैशाचा स्रोत नसल्याचं सिद्ध करण्यावर भर दिला.
केयूएल-कूल
देशाच्या स्थावर मालमत्ता क्षेत्रात गेल्या सहा वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या ‘कूल’च्या तीन पिढय़ांच्या नेतृत्वाने कालानुरूप व्यवसायातही बदल केला. अगदी २००० पर्यंत केवळ पुण्यापुरती मर्यादित असलेल्या ‘कूल’ने देशातील प्रमुख आठ महानगरांमध्ये आपले अस्तित्व विस्तारताना परवडणाऱ्या दरातील घरांपासून आलिशान निवाऱ्यांचीही निर्मिती केली. दीड दशकाच्या प्रवासात कंपनीने १०० पट व्यवसायवेग राखला आहे.

– वीरेंद्र तळेगावकर