29 November 2020

News Flash

ग्राहक देवो भव्

‘क्वॉलिटी ऑफ लाइफ सव्‍‌र्हिस’ हेच ब्रीद

‘‘कामाच्या ठिकाणी आव्हाने तर आहेतच. एक म्हणजे एकापेक्षा अधिक कर्मचारी किंवा ग्राहक कंपन्या. सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं गरजेचं असतं. ग्राहकाला काय हवंय हे ओळखून तशी सेवा देणं हे खरं आव्हान आहे. ‘अतिथी देवो भव्’ या भावनेने सेवा देणं हे आता कंपन्यांच्याही अंगी रुळलं आहे, सांगताहेत भारतासह आशिया पॅसिफिकमधील १२ देशांची जबाबदारी असणाऱ्या ‘सोडेक्सो’च्या संचालक विनीता टिकेकर.

ग्राहक दारात येईपर्यंत त्याचे आदरातिथ्य तर साऱ्याच कंपन्या, सेवा पुरवठादार करतात. पण खऱ्या अर्थाने प्रदान सेवेमार्फत ग्राहकाचे आयुष्य व कंपन्यांचा विश्वास वर्षांगणिक विस्तारणारे तसे हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच. तुमच्या आमच्यासाठी केवळ मिल कूपन देणारी म्हणून ओळख असलेल्या ‘सोडेक्सो’चा सेवा क्षेत्रातील पसारा खूप मोठा आहे. कॉर्पोरेट विश्वात जागतिक स्तरावर आणि मोठय़ा स्वरूपात खानपान ते तांत्रिक सेवा देणारी म्हणून ‘सोडेक्सो’ अव्वल आहे. तिच्या आशिया पॅसिफिक भागातील कंपनी सेवा विभागाच्या विपणन जबाबदारीच्या रूपात संचालक विनीता टिकेकर यादेखील सेवा पुरविताना गुणवत्तेशी तडजोड नको याबाबत तेवढय़ाच आग्रही आहेत.

विनीता या महाराष्ट्रीय. पुण्याच्या. पण आता वास्तव्य मुंबईत. आणि जगभ्रमंती असेल तर महिनोन्महिने सिंगापूर, मलेशिया आदी देशांमध्ये. पती व एक सात वर्षांचा मुलगा असं छोटंसं कुटुंब. विनीता यांचे वडील सैन्यात होते. तेव्हा घर, कुटुंब म्हणजे कधी खरगपूर, दिल्ली, मसुरी वगैरे ठिकाणी असे तात्पुरते बिऱ्हाड. त्यामुळे त्यांचे शालेय शिक्षणच विविध आठ शाळांमध्ये झाले. एकुलत्या एका भावाचीही जवळपास हीच स्थिती. विनीता यांचे पदवीचे शिक्षण नवी दिल्लीत झाले. विपणन आणि वित्त विषयात त्यांनी मुंबईतून एमबीए केलं. त्यानंतर त्या आघाडीच्या सर्वेक्षण व संशोधन कंपनी ए.सी. नेल्सन कंपनीत रुजू झाल्या. येथे त्या पाच वर्षे होत्या. ग्राहक सेवा वगैरे कार्य त्यांच्याकडे होतं. यानंतर त्या मुंबईत स्टॅण्डर्ड चार्टडमध्ये रुजू झाल्या. सुरुवातीला त्यांच्यावर संशोधन आणि विपणनाची जबाबदारी होती. यानंतर त्यांना याच बँकेमार्फत मलेशियात स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळाली. भारताव्यतिरिक्त अन्य देशांसाठीची ग्राहक सेवा आखणी यानिमित्ताने त्यांना करता आली.

यानंतर त्यांनी दोन वर्षांचा विराम घेतला. बाळंतपण आणि मुलाच्या संगोपनासाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचं त्या सांगतात. त्या म्हणतात, ‘‘मुलगा झाल्यानंतर मी अमेरिकेत वर्षभर राहिले. पुन्हा मुंबईत आले. इथे मग मी ‘सोडेक्सो’मध्ये विपणन व संपर्क विभागाची उपाध्यक्षा म्हणून २०१२ मध्ये रुजू झाले. सप्टेंबर २०१५ मध्ये विपणनाबाबतच्या विविध १२ देशांतील व्यवसायाची जबाबदारी माझ्यावर आली.’’

विपणन क्षेत्रात आपण जाणूनबुजून आल्याचं त्या स्पष्ट करतात. त्या म्हणतात, ‘‘शिक्षण म्हणून मी विपणनातील कौशल्य प्राप्त केलं होतंच. मला याही क्षेत्रात आतापर्यंत खूप काही वेगळं करण्याची संधी मिळाली.शिवाय स्त्री म्हणून घर आणि कार्यालय यामध्ये तुम्ही समतोल साधू शकता. ते अवघड असतं, पण अशक्य नसतं. एकाच वेळी दोन गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला अनेकदा तडजोडही करावी लागते. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया अधिक खंबीर असतात. करिअर म्हणून त्यांना घरातून, कुटुंबातून पाठिंबा आवश्यक असतो. असा पाठिंबा तुम्हाला करिअरमध्ये उभारी देऊ शकतो. बरं जोडीदाराबद्दल सांगायचं झालं तर, हल्ली पुरुषही स्त्रियांच्या बरोबरीने मदत करतात, अगदी स्वयंपाक घरातही सहकार्य करतात. तेव्हा कामाच्या बाबतीत लिंगभेद फारसा दिसत नाही. उलट अनेक छोटय़ा-मोठय़ा कंपन्या स्त्रियांना कामाच्या ठिकाणीही पूरक वातावरण उपलब्ध करून देऊन त्यांना प्रोत्साहनच देत असतात. कंपनीकडूनही काही प्रमाणात कर्मचाऱ्यांप्रति लवचीकता असावी, या मताची मी आहे.’’

‘क्वॉलिटी ऑफ लाइफ सव्‍‌र्हिस’ हेच ब्रीद असलेल्या ‘सोडेक्सो’तील सेवानुभवाच्या जोरावर विनीता स्पष्ट करतात, कामाच्या ठिकाणी आव्हाने तर आहेतच. एक म्हणजे एकापेक्षा अधिक कर्मचारी किंवा ग्राहक कंपन्या. पण सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं गरजेचं असतं. व्यवसाय, आयुष्यातही समतोल खूप महत्त्वाचा आहे. आपलं काम उत्तमच असायला हवं, हे पाहायला पाहिजे. ग्राहकाला काय हवंय हे ओळखून तशी सेवा देणं हे खरं आव्हान आहे. ‘अतिथी देवो भव्’ या भावनेने सेवा देणं हे आता कंपन्यांच्याही अंगी रुळलं आहे. तंत्रज्ञान इथं आहेच, फक्त तुमची मानसिकता बदलण्याची गरज आहे. वेतनापेक्षा कौशल्याला अधिक प्राधान्य दिलं जातं.

आज कोणत्याही क्षेत्रात स्त्रिया मागे नाहीत, हे विनीताही यानिमित्ताने अधोरेखित करतात. त्या म्हणतात, ‘‘स्त्रियांनी स्वत:वर विश्वास ठेवायला हवा. कोणतंही काम करताना एक सपोर्ट सिस्टमही तयार करायलाच हवी. पुरुषांच्या गर्दीतही हात वर करायला शिका. प्रश्न विचारा, बोलायला लागा. स्त्रियांनाच हे नकोय, अशीच मानसिकता विशेषत: पुरुष बॉसमंडळींची असते. ती तुम्हीच दूर करू शकता.या  उपाययोजनांमुळे नक्कीच एक स्त्री कर्मचारी म्हणून तुमच्याबद्दलचा गैरसमज दूर होण्यास मदत होईल.’’ विनीता यांचा हा स्वानुभवच त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एका अव्वल कंपनीचं नेतृत्व करण्याकरिता कामी आलाय.

वीरेंद्र तळेगावकर

veerendra.talegaonkar@expressindia.com

व्यवसायाचा मूलमंत्र

मूल्ये जपा. वैयक्तिक सेवा देताना किंवा कंपनी म्हणून समूहात राहताना सतत प्रोत्साहन मिळवा. हसतमुख सेवा द्या आणि सेवेत गुणवत्ता राखा. तुम्ही चांगलं काम करत असाल तरी ते अधिक उत्तम कसं होईल यासाठी सतत कार्यरत राहा.

आयुष्याचा मूलमंत्र

नेहमी समाजाचे भान ठेवा. त्याप्रति कार्य करण्याची ऊर्मी राखा. थोडंफार योगदान आपण समाजासाठीही देऊ शकतो का, याचा नक्की विचार करा व तशी कृती जरूर करा. तुम्ही जे निवडलं आहे, जे काही कराल ते आनंदाने करा.

 

विनीता टिकेकर

स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेत काम करताना विनीता यांना प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करण्याची संधी मिळाली. खास तरुण वर्गासाठी नवीन वित्तीय योजना आणि तीदेखील विदेशी तरुणाला भावेल अशी त्यांनी तयार केली आणि ती त्यांच्या स्पर्धक २० जणांमधून निवडली गेली. ‘सोडेक्सो’मध्ये भारतासह आशिया पॅसिफिकमधील १२ देशांमधील ग्राहक कंपनी सेवेची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

सोडेक्सो

सुविधा व्यवस्थापन सेवा क्षेत्रातील जगातील अव्वल अशा ‘सोडेक्सो’अंतर्गत मोठय़ा प्रमाणावरील खानपान तसेच तांत्रिक सेवाही पुरविली जाते. २० अब्ज युरोची तिची उलाढाल आहे. ८० देशांमध्ये कार्य असलेल्या ‘सोडेक्सो’चे भारतात ४० हजार मनुष्यबळ आहे. सोडेक्सोमार्फत दर दिवशी जगभरातील १.५० कोटी ग्राहकांना  विविध सेवा पुरविली जाते. भारतातील कंपनीच्या ग्राहकांची संख्या ८ लाखांहून अधिक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2016 1:07 am

Web Title: consumer as like god
Next Stories
1 ब्रँडमागचा ‘अर्थ’
2 करिअरला साद घालणारी ‘व्हिसलिंग’
3 अचूकतेची संस्कृती
Just Now!
X