तीन दशकं ‘एलआयसी’च्या दीर्घ सेवेनंतर सरोज डिखळे यांची नियुक्ती गेल्या वर्षीचं म्हणजे जुलै २०१५ला ‘एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली. या नियुक्तीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत वरचष्मा असलेल्या फंड क्षेत्रातील त्या एकमेव महिला सीईओ ठरल्या आहेत. सरोज यांच्या केबिनमध्ये करिअर आणि कौटुंबिक स्नेह अशी दोहोंची सांगड पाहायला मिळते..
‘‘आई, तू केलेली चटणी सर्वाना खूपच आवडली आणि किती दिलीस तू ती. सगळ्यांनी खाऊनही खूप उरलीय. बरं. तू जेवलीस का? ..’’ सरोज यांचं आपल्या आईशी मोबाइलवर संभाषण सुरू असतं. केबिनमध्ये शिपाई ते निधी व्यवस्थापक अशा सर्वाचाच गराडा. जेवणाच्या प्लेट, भांडी आदींनी टेबल पूर्ण भरलेलं. पुस्तकं, फोन यांच्यासह रंगबिरंगी फुलांची, बुकेंचीही भाऊगर्दी.. चर्चगेटजवळच्या ‘एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंड’ कंपनीमधील चौथ्या मजल्यावरील केबिनमधलं हे चित्र. गेल्या अनेक महिन्यांनंतरची ही मोठी गडबड आणि सर्वाच्या चेहऱ्यावर कमालीचा उत्साह. निमित्त होतं आपल्या नव्या बॉसच्या आगमनानिमित्तानं स्नेहभोजनाचं!
‘तसं म्हटलं तर मी इथं येऊन सहा महिने उलटून गेलेत. सगळ्यांबरोबर माझीही इच्छा होतीच स्नेहभोजन आणि त्यानिमित्ताने सगळ्यांनी एकत्र येण्याची. आजचा मुहूर्त मिळाला, एवढंच.’ नव्या बॉस अर्थात सरोज डिखळे त्यांच्या केबिन कम (आत्ता झालेल्या) डायनिंग रूमचं स्पष्टीकरण देत होत्या. तीन दशकं ‘एलआयसी’च्या प्रदीर्घ सेवेनंतर सरोज यांची नियुक्ती गेल्या वर्षीच म्हणजे जुलै २०१५ला ‘एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली. या नियुक्तीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत वरचष्मा असलेल्या फंड क्षेत्रातील त्या एकमेव महिला सीईओ ठरल्या. ‘एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंड’चे नीलेश साठे यांच्यानंतर या पदावर आलेल्या सरोज याही ‘मंच तयार आहे; आता फक्त झेप घेण्याचं बाकी आहे’ हे आपलं ध्येय असल्याचं नमूद करतात.
म्युच्युअल फंडमध्ये खासगी कंपन्यांचा वरचष्मा. असं असताना सरकारी नाव लागलेल्या म्युच्युअल फंड कंपनीला खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत टक्कर देण्यासाठी खासगी, व्यावसायिक चेहरा देण्यामध्ये साठे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांची कारकीर्द लक्षणीय ठरली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच ‘एलआयसी म्युच्युअल फंड’ ही पहिल्या २० मध्ये वेगाने वर चढत आहे. तसंच कंपनीने सर्वाधिक मालमत्ता वाढ (एएमयू) नोंदविणारी कंपनी म्हणून प्रवास केला आहे. त्यामुळेच विमा क्षेत्रातील नियामक मंडळावर साठे यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आपल्यावर आलेली जबाबदारी अधिक महत्त्वाची आणि आव्हानात्मक असल्याचं सरोज मानतात.
वडिलांच्या पिढीतील नातेवाईकांचे राजकीय संपर्क, बरोबरच्या भाऊ, बहिणींचा प्रशासनातील वावर अशा वातावरणातील सरोज यांचा गेल्या ३२ वर्षांतील करिअर प्रवास हा ‘एलआयसी’भोवतीच राहिला आहे. सरोज या १९८३ मध्ये थेट निवड पद्धतीने ‘एलआयसी’त सहायक व्यवस्थापन अधिकारी बनल्या. एम.ए. इकॉनॉमिक्स आणि नोकरीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच एलएल.बी. करणाऱ्या सरोज यांनी ‘एलआयसी’मध्ये पर्सनल, अ‍ॅडव्हर्टायझिंग, मार्केटिंग, इंडस्ट्रिअल रिलेशन, डिव्हिजन असे सारे विभाग हाताळले आहेत. ग्राहक संपर्क ते उत्पादन नियोजन-विक्री अशी विविध जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. या वैविध्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांना नवी जबाबदारी आव्हानात्मक असली तरी वेगळी अशी वाटत नाही. कर्मचाऱ्यांप्रतीची आपुलकीची वर्तणूक, कार्यालयातील घरगुती वातावरण हे ती जबाबदारी अधिक सोपी करतात, असं त्या मानतात.
सरोज या आईबरोबर वांद्रय़ात राहतात. त्यांची वयोवृद्ध आईबद्दलची काळजी त्यांच्या बोलण्यातून जाणवत राहते. त्या राहात असलेल्या परिसरातील बोली, राहणीमान याची छापही त्यांच्यावर असल्याचं जाणवतं. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांमध्ये केवळ राहणंच नाही तर प्रत्येकाचं आयुष्य, त्याच्या सुख-दु:खातही सहभागी होता आलं पाहिजे, असं त्या मानतात आणि त्याचप्रमाणे त्या वागतातही. म्हणूनच त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ग्रुपमध्ये अल्पावधीतच थोरामोठय़ांनी दिलेल्या ‘मार्केट मंत्रा’बरोबरच अमुूक रेसिपी कशी बनवावी वगैरेही ‘व्हायरल’ होतंय. या सगळ्यातून सहकाऱ्यांचा अवघडलेपणा जावा आणि त्यांना कार्यालयातही मोकळं वातावरण मिळावं हा त्यामागचा त्यांचा हेतू. ‘प्रत्येकानं स्वत:च्याच कोशात जगणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न करतानाच सरोज या ‘सध्याचं कल्चर हे केवळ
ई-मेल कल्चर झालंय; लोकांनी एकत्र येणं, एकमेकांबद्दल शेअर करणं हे हल्ली दिसत नाही,’ अशी खंत व्यक्त करतात.
मार्केटिंगचं वेगळं कौशल्य त्यांच्याकडे आहे. एलआयसीतही महिला म्हणून त्यांच्याकडे ही जबाबदारी प्रथमच आली होती. शिवाय ग्राहक संपर्क, मनुष्यबळसारख्या विभागांचा अनुभव असल्यानं या अंगानं येणारं कौशल्य त्यांच्याकडे आहे. म्हणूनच व्यवस्थापनपदावर राहूनही कंपनीचे युनियन लीडरही त्यांचे समर्थक राहिले आहेत, हे त्या अभिमानाने सांगतात. सरोज या विभागीय व्यवस्थापक असताना पुण्यातील विमा शिक्षण संस्थेतील तीन वर्षे खूपच प्रेरणादायी असल्याचं तसेच संस्थेचे तत्कालीन संचालक डॉ. के. सी. मिश्रा यांच्याकडून नेतृत्व कसं करायचं हे शिकता आलं, असं त्या आवर्जून सांगतात. तसंच इथे, फंड कंपनीत साठे यांनी तयार केलेल्या भक्कम मंचावरून प्रवास करताना जबाबदारीचं महत्त्व अधिक पटतं, असंही त्या मानतात. त्यांच्या कामाचा आवाका आणि उरक पाहता ‘एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंड’ उत्तरोत्तर प्रगती करत राहील याबद्दल शंका नाही.

आयुष्याचा मूलमंत्र
मोठी स्वप्न पाहा आणि ते पूर्ण करण्यासाठी त्याचा माग घ्या, असं नवउद्यमी, करिअर करू इच्छिणाऱ्यांना सांगतानाच नैतिकतेला कधीही फाटा देऊ नये याबाबत त्या सावध करतात. जोखीम स्वीकारताना स्थिर मन आणि घेतलेल्या भूमिकेतील ठामपणा हे महत्त्वाचं
असल्याचं त्या मानतात. एक स्त्री म्हणून कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असंही त्या स्पष्ट करतात.
नोकरी सुरू झाली म्हणून शिकणं संपत नाही. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर नवं शिकणं, कालानुरूप स्वत:मध्ये- स्वत:च्या कार्यपद्धतीत बदल करणं कधीच सोडू नका. प्रत्येकाचं आयुष्य हे तुलनेत खूपच छोटं आहे. तेव्हा ‘सोशल’ व्हा. सर्वामध्ये मिसळून आपलेसे व्हा. वैयक्तिक आयुष्यातही सन्मानाची संधी प्रत्येकाला द्या.
करिअरचा मूलमंत्र
प्रत्येकाला संधी देणं ही संबंधित यंत्रणेची, त्या पदावरील व्यक्तीची नैतिक जबाबदारी असते. कंपनी, व्यवसाय म्हटलं की ‘टार्गेट’ही आलंच. पण ते खेळीमेळीने पार पाडा व जबाबदारीची जाणीव ठेवा. समाजाप्रमाणे कॉर्पोरेटमध्येही एकमेकांच्या कार्यपद्धतीत शिरकाव करण्याची संधी असली पाहिजे.

सरोज यांचे उल्लेखनीय कार्य
गोव्यात असताना ‘एलआयसी’ विमा विक्रीचा उत्साही अनुभव आपण घेतल्याचं त्या सांगतात. या दरम्यान त्या भागातील खेडी त्या स्वत: फिरल्या. २०० गावांमध्ये योजना विस्तारली. विम्याविषयी तळागाळातील अनास्था या माध्यमातून काही प्रमाणात दूर करण्याचं कार्य त्यांनी केलं. त्यांच्या दृष्टीने हा खरंच सुवर्णकाळ होता. वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक म्हणून त्यांच्या या कार्याचा गौरवही महामंडळाने केला. ‘फ्रीडम फॉर हंगर प्रोजेक्ट’अंतर्गत मासिक निवृत्ती योजनाही राबवली. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या या योजनेमुळे भविष्यात समूह विमा योजनाही तयार करता आली. एक मोठा विमा वंचित वर्ग या छताखाली आला. मायक्रो इन्शुरन्स विभागाचं नेतृत्व करतानाही स्वयं बचत गटासाठी केलेले आठ लाख लाभार्थी ही त्यांच्या कार्याची पावतीच होती. ‘आरटीआय’अंतर्गत ३४ कोटींच्या विमा प्रकरणांची हाताळणी, त्यांचा निपटारा हाही त्यांच्या कार्यकारी संचालक कारकीर्दीतील मैलाचा दगड ठरला.

एलआयसी नोमुरा
देशातील सर्वात मोठय़ा आयुर्विमा महामंडळाचं हे महत्त्वाचं अंग. भक्कम असलेल्या खासगी क्षेत्रातील फंड उद्योगाला तोंड देण्यासाठी महामंडळाने म्युच्युअल फंड कंपनीच्या माध्यमातून जपानी नोमुराचं घेतलेलं व्यावसायिक भागीदारी सहकार्य. ‘एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंड’ कंपनी आता पहिल्या दहात येण्याची अर्हता प्राप्त करत आहे. तसंच वेगानं मालमत्ता संचयही करत आहे. तिला खुद्द एलआयसी, एलआयसी हाऊसिंग फायनान्स, सार्वजनिक बँक – कॉर्पोरेशन बँक यांनी आपलं वाढीव हिस्सेदारीचं पाठबळ दिलंय. एकूण भारतीय फंड उद्योगाची वाढ तिसऱ्या तिमाहीत २१ टक्क्यांनीच झाली असताना ‘एलआयसी नोमुरा’ने मात्र याच कालावधीत तब्बल ६२ टक्क्यांची झेप घेतली आहे. कंपनी व तिच्या नव्या नेतृत्वाचं पुढील महिनाअखेर १५,००० कोटी रुपयांच्या मालमत्ता (एयूएम) संचयाचे लक्ष्य आहे.

veerendra.talegaonkar@expressindia.com