20 October 2020

News Flash

अपंगत्वावर  मात

मनी बाळगलेली जिद्द अनेकदा गंभीर आव्हानांपुढे कमकुवत ठरते.

मनी बाळगलेली जिद्द अनेकदा गंभीर आव्हानांपुढे कमकुवत ठरते. स्मिनू जिंदाल या त्याबाबत एक वेगळे रसायन म्हणता येईल. अपघातात आलेल्या अपंगत्वावर मात करत ठरवलेले उद्दिष्ट त्यांनी गाठले, एवढेच नव्हे तर पोलाद क्षेत्रातील एकमेव स्त्री ही बिरुदावली मिरवण्यापेक्षा सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले. निराशेच्या वातावरणात आशेचा किरण दाखविणाऱ्या, आपले स्मिनू – हास्य हे नाव सार्थ ठरवणाऱ्या ‘जिंदाल सॉ लिमिटेड’च्या व्यवस्थापकीय संचालिका स्मिनू जिंदाल यांचा हा प्रवास..

लहान मुलांना मोठी माणसं एकच प्रश्न विचारतात. तू मोठेपणी कोण होणार? शिक्षक, डॉक्टर, इंजिनीअर, पायलट अशी पदं मग सांगितली जातात. पण पुढे त्यांनी खरोखरच तेच करिअर केलंय, अशा यशस्वी माणसांची संख्या फारच कमी. पण वयाच्या सहाव्या वर्षीच ठरवलेल्या उद्दिष्टाला अपंगत्वावर मात करत गाठणे, इतकंच नव्हे तर उल्लेखनीय पदे पादाक्रांत करत राहणे अशी उदाहरणे विरळाच. जिंदाल सॉ लिमिटेडच्या स्मिनू जिंदाल यांनी मात्र आपल्या उदाहरणाने ते खरं करून दाखवलं व पोलादाशी संबंधित क्षेत्रातल्या ९० च्या दशकातील त्या एकमेव स्त्री उद्योजिका ठरल्या.

स्मिनू या तीन बहिणींमध्ये सर्वात मोठय़ा. मारवाडी कुटुंबातील स्मिनू यांचे शालेय शिक्षण जयपूरमध्ये झाले. सुटय़ांमध्ये दिल्लीला घरी परतत असताना त्यांना अपघात झाला आणि अपंगत्व आले. तेव्हा त्या ११ वीत शिकत होत्या. पण बारावीत असतानाच त्या समूहाच्या एका कंपनीत रुजू झाल्या. दिल्लीत वाणिज्य शाखेतील पदवीनंतर त्यांनी वित्त विषयात पदव्युत्तर व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. या अभ्यासक्रमात त्यांनी सुवर्णपदकही मिळविले. पुढे व्यवसायाचा भाग म्हणून विपणन आदी कलाही त्यांनी अवगत केल्या. पुढे १९९८ मध्ये त्यांच्याकडे समूहाच्या ‘जिंदाल सॉ लिमिटेड’ची धुरा आली.

आपल्या उद्योजिकतेच्या प्रवासाबाबत स्मिनू सांगतात, ‘‘घरात उद्योगाचे वातावरण असल्याने मीही वयाच्या ६व्या वर्षीच उद्योजक व्हायचे ठरवले होते. पण अपघात झाला. आपलं उद्योजिकतेचं स्वप्न पूर्ण होईल की नाही याबद्दल शंका निर्माण झाली, पण मी खचले नाही. जिद्द होतीच आणि कुटुंबही पाठीशी होते त्यामुळे माझा आत्मविश्वास अधिक वाढला.’’ पोलादाशी संबंधित क्षेत्रात त्या ९० च्या दशकातील एकमेव स्त्री उद्योजिका होत्या. ‘‘काहीशा पुरुषी मानल्या जाणाऱ्या या क्षेत्रातील प्रवेशाच्या वेळी माझ्याबाबतही भुवया उंचावल्या गेल्या होत्या’’, स्मिनू सांगतात, ‘‘पण मला कुटुंबातून भक्कम आधार होता. व्यवसाय करण्याचे तर मी लहानपणापासूनच ठरवले होते. अगदी लहानपणापासून मी समूहाचा व्यवसाय पाहत आले होते. त्यातील बऱ्याचशा गोष्टी मला इतरांच्या मानाने खूप आधी कळल्या. प्रस्थापितांना हा धक्का होता. मला थोडासा विरोधही झाला, पण जबाबदार पदावर स्थिरावण्यापूर्वी मी त्यातील खडान्खडा माहिती घेतली होती. तेव्हा व्यावसायिक व्यवहारांबरोबरच  उद्भवणाऱ्या इतर समस्यांचे निराकरणही याच अनुभवाच्या जोरावर लवकर होत असे.’’

स्मिनू म्हणतात, ‘‘स्पष्ट कल्पना, कामातील सचोटी आणि काटेकोरपणा यामुळे मी अधिक भक्कम होत गेले. आमच्या क्षेत्रात तर आंतरराष्ट्रीय घडामोडी, बाजार याकडेही लक्ष द्यावे लागते, पण नावीन्य आणि ग्राहक हेरून आम्ही व्यवसायाला पूरक पर्यायही उपलब्ध केले. नवनवीन उत्पादन क्षेत्रात शिरकाव केला. आयुष्याप्रमाणेच व्यवसायही सोप्पा नसतो, पण हतबल होऊन चालत नाही.’’

स्मिनू आपले विचार अधिक स्पष्ट करताना सांगतात, ‘‘अपंगत्व आदी गोष्टींमुळे आपल्या सभोवतालच्या संधी जेव्हा हिरावतात त्यावेळी आपल्यातील नकारात्मकता एक आव्हान ठरते, ज्याच्यावर मात तर केलीच पाहिजे. ती एक परीक्षा ठरते, ती आपण द्यायलाच हवी. बुद्धी आणि कार्यक्षमतेबाबत आपण कुठे कमी पडतो का? तर नाही. मग संधी नाकारल्या जाण्याचे कारण काय?’’

व्यवसायात सक्रिय राहूनही संधी नाकारल्या जाणाऱ्यांसाठीचे दायित्व स्वीकारत स्मिनू यांनी २००० मध्ये ‘स्वयम्’ ही बिगर सरकारी संस्था स्थापन केली. उत्तर भारतातील आठ शहरांमध्ये तिचे कार्य आहे. संस्थेच्या माध्यमातून अपंग पुनर्वसन, रोजगार, जागरूकता आदींवर भर दिला जातो.

कुतूबमिनार, लाल किल्ला, फतेहपूर सिक्री अशा पर्यटनस्थळी अपंगांकरिता विशेष सोय करण्यासाठी स्मिनू यांनी पुढाकार घेतला. पंतप्रधान मोदी यांच्या दिव्यांग मोहिमेतही त्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. भटकण्याची आवड असलेल्या स्मिनू आपला वाचन, चित्रकलेचा छंदही जोपासतात.

पर्यटन, सामाजिक न्याय, नागरी विकास आदी विषयांशी संबंधित असलेल्या अनेक समित्यांवर त्या आहेत. केंद्र सरकारच्या पंडित दीनदयाल उपाध्याय संस्थेवर त्या प्रतिनिधित्व करतात. ‘असोचेम’ या भारतातील उद्योगांचे देशव्यापी नेतृत्व करणाऱ्या संघटनेच्या पोलादविषयक राष्ट्रीय परिषदेच्या त्या अध्यक्षा आहेत. अपंगांसाठी तसेच उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांनी, त्यांच्या संस्थेने अनेक पुरस्कार पटकावले आहेत.

उद्योजक, सामाजिक कार्यकर्त्यां अशी भूमिका वठविणाऱ्या स्मिनू यांचा ‘माय इन्क्रेडिबल इंडिया, कॅन बी एक्सेसिबल इंडिया’ यावर विश्वास आहे. आपण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या दिशेने कार्यरत राहू, अशी त्यांना खात्री आहे. व्यवसाय, सामाजिक कार्य सांभाळून आपला पती, दोन मुलांबरोबरचा संसारही त्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. अगदी मुलांचा अभ्यास घेण्यापर्यंत.

स्मिनू म्हणजे हास्य. अनेक अडचणी आल्या, आव्हानं आली तरी आपलं नाव स्मिनू अर्थात हास्य त्या सार्थ ठरवतात. त्या हास्याच्या जोरावरच त्या इथपर्यंत पोहोचल्या आहेत.

व्यवसायाचा मूलमंत्र

इच्छा तेथे मार्ग. तुमची आवड, छंद अथवा तुमची इच्छा म्हणून तुम्ही जे काही कराल त्यात यशस्वी होण्याचा प्रयत्न करा. आव्हाने येतीलच. पण त्यांचा सामना करा. कंपनी, उद्योग म्हणूनही तुम्ही एकप्रकारे इतरांसाठी काहीतरी चांगलेच कार्य आपल्या हातून घडवत असता. त्याच्याशी प्रामाणिक राहा.

आयुष्याचा मूलमंत्र

वैयक्तिक आयुष्याचेही तसेच. अपयशाने खचून जाऊ नका. चुकीच्या गोष्टींविरुद्ध लढा. हतबल, हताश होऊ नका. आज प्रत्येकाचे आयुष्य अनेक आव्हानांनी वेढलेले आहे. ती पेलायची आणि त्याचा सामना करायचा असेल तर अंगी जिद्द असू द्या. तुम्ही वेगळे आहात म्हणून नव्हे तर समान संधीसाठी आग्रह धरा.

जिंदाल सॉ लिमिडेट

जिंदाल सॉ लिमिटेड ही ओ. पी. जिंदाल समूहातील एक आघाडीची कंपनी. तेल व वायू क्षेत्राला लागणारे भले मोठे पाइप ही कंपनी तयार करते. केवळ आयातीवर निर्भर असलेल्या या क्षेत्रासाठी लागणाऱ्या पाइपची निर्मिती या कंपनीने सर्वप्रथम भारतात केली.

स्मिनू जिंदाल

कुटुंबाचा उद्योग स्मिनू यांच्याकडे त्यांच्या उच्च शिक्षणामुळे आला. मात्र तेल व वायू क्षेत्रासाठी लागणाऱ्या मोठय़ा सामग्रीच्या उत्पादनाच्या निमित्ताने स्मिनू या क्षेत्रातील पहिल्या महिला वरिष्ठ अधिकारी बनल्या. आपल्या कारकिर्दीत त्यांनी कंपनीची उलाढाल ७,००० कोटी रुपयांवर नेली.

 veerendra.talegaonkar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2016 12:50 am

Web Title: sminu jindal life story
Next Stories
1 जाहिरातीतील ‘आऊटडोअर’ यश
2 आयुर्वेदाची वेगळी वाट
3 शॉपिंगचा ऑनलाइन धमाका
Just Now!
X