22 February 2018

News Flash

आयुर्वेदाची वेगळी वाट

अशक्यप्राय वाटणारी गोष्ट एका आयुर्वेदिक डॉक्टरने शक्यच नव्हे तर यशस्वी करून दाखवली आहे.

वीरेंद्र तळेगावकर | Updated: November 12, 2016 1:13 AM

आयुर्वेदाचा प्रसार हल्ली खूपच मोठय़ा प्रमाणावर होत आहे. भारतीय पुन्हा एकदा या पुरातन उपचार पद्धतीचा मोठय़ा प्रमाणात अंगीकार करताना दिसू लागले आहेत. याच आयुर्वेदातील नाडी परीक्षण पद्धतीची आरोग्य उपचार पद्धती भारतात सर्वप्रथम व्यवसाय स्तरावर विकसित करणाऱ्या आयुशक्ती समूहाच्या संस्थापक-अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका डॉ. स्मिता नरम. आयुर्वेदातून वेगळ्या वाटेवरच्या या त्यांच्या व्यवसाय प्रवासाविषयी..

नाडी परीक्षण करून रुग्णावर उपचार करण्याची पद्धती फारच पुरातन. केवळ या पद्धतीचा वापर करून देश-विदेशात चिकित्सालयं उभारणं, या चिकित्सेवर आधारित आयुर्वेद उत्पादनांची दालनं सुरू करणं ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट एका आयुर्वेदिक डॉक्टरने शक्यच नव्हे तर यशस्वी करून दाखवली आहे. आयुशक्ती! ‘आयुशक्ती आयुर्वेद प्रायव्हेट लिमिडेट’, ‘आयुशक्ती हेल्थ केअर प्रा.लि.’ आणि विदेशातील ‘आयुशक्ती बीव्ही’ असा तो एकूण पसारा. तो मांडलाय डॉ. स्मिता नरम यांनी.

स्मिता या मूळच्या गुजरातच्या. मात्र शालेय, महाविद्यालयीन, वैद्यकीय असं सारं शिक्षण मुंबईतच झालेलं. आयुर्वेदाकडे आपण मुद्दामच वळल्याचं स्मिता सांगतात. त्या म्हणाल्या, ‘‘माझ्या माहेरच्या चार पिढय़ा आयुर्वेद क्षेत्रातच होत्या. आमच्या चिखली (नवसारी, गुजरात) गावात तर माझे काका गुणकारी औषधांसाठी खूपच प्रसिद्ध होते. मी १० वर्षांची असताना मला पोटाचा त्रास झाला. अ‍ॅलोपॅथी डॉक्टरने शस्त्रक्रिया करायला सांगितली. वडिलांनी काकांना विचारलं. अवघ्या एका दिवसात कुठल्यातरी कडवट रसाने मी अगदी ठणठणीत बरी झाले. आयुर्वेदातील वैद्यक शिक्षण घेण्याचं मी कळत्या वयापासून ठरवलं होतंच. पण त्यातही वेगळं असं काही तरी करावं म्हणून मी नाडी परीक्षणाकडे वळले. त्यासाठी परदेशात जाऊन मी शिक्षण घेतलं.’’

आयुर्वेदातील व्यवसायाच्या सुरुवातीबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, ‘‘माझं शिक्षण पूर्ण झालं, लग्न झाल्यानंतर १९८६ मध्ये पती डॉ. पंकज नरम यांच्याबरोबर मी सुरुवातीला आयुर्वेदिक प्रॅक्टिस सुरू केली. तब्बल १० वर्षे आम्ही दोघांनी एकत्र प्रॅक्टिस केली. पतीदेखील नाडी परीक्षा शिकले होते. त्यांच्याकडून मी ही विद्या शिकले. ते शिकल्यानंतर या क्षेत्रात स्वत:चं काहीतरी सुरू करायचं डोक्यात होतंच. व्यवसाय करायचा म्हटलं की जोखीम आलीच. ती घेण्याबाबत पती मात्र काहीसे सावध होते. माझा निश्चय मात्र ठाम होता. आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा म्हटल्यावर आम्ही सुरुवातीची सर्व व्यावसायिक भागीदारी थांबवली. पंकज यांनी स्वत:ची प्रॅक्टिस सुरूच ठेवली होती. नव्या कंपनीत माझा पूर्णपणे हिस्सा निर्माण झाला. मग याच क्षेत्रातील विस्ताराकरिता पुढे पाऊल टाकलं.’’

स्मिता सांगतात, ‘‘आयुर्वेद आणि त्यातही नाडी परीक्षेतील अद्ययावत ज्ञानाकरिता मी जगभर फिरले. परदेशात जाऊन त्याचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं. ३५० प्रकारचे रोग केवळ नाडी परीक्षणाने कसे ओळखता येतात हे आता आमच्यामार्फत जगभरातील २०० डॉक्टर शिकले आहेत. याची एक साचेबद्ध उपचार पद्धती मी पाश्चिमात्य तज्ज्ञ डॉक्टरांच्या साहाय्याने तयार केली. सध्या आम्ही ही उपचार पद्धती रुग्णांवर उपचारासाठी वापरण्याबरोबरच आयुर्वेदिक डॉक्टरांनाही शिकवितो. मी जगभर फिरले. युरोप, ऑस्ट्रेलिया, स्वित्र्झलडमध्ये या क्षेत्रातील आवश्यक ते सर्व ज्ञान घेतलं. पण व्यवसायाला काहीतरी बेंचमार्क असावा म्हणून माझ्या सर्व सेवांसाठी तिथेच आयएसओ प्रमाणपत्रासाठी मी आग्रही राहिले. मी अमेरिकेत (नाडी परीक्षा) याच क्षेत्रातील अनेक अभ्यासक्रम पूर्ण केले. व्यवसायाशी निगडित जाहिरात, विपणन विभागाचेही धडे मी घेतले.’’

आयुर्वेदाबद्दल स्मिता सांगतात, ‘‘आयुर्वेदाबाबत अनेकांच्या मनात शंका होती. ती नाहीशी करण्यासाठी त्याविषयीचं शिक्षण देणं आवश्यक होतं. आयुर्वेदामध्ये तुम्हाला वेगळे निकाल देता येतात. आयुर्वेदात अ‍ॅलर्जी, साइड इफेक्ट वगैरे असं काही नाही. पण नाडी परीक्षेसाठी मी एकटी किती पुरणार. मला भारताबरोबरच विदेशातही ही सेवा द्यायची होती. त्यासाठी व्यवसाय विस्तार जरुरीचा होताच आणि त्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणंही. जे आम्ही देतो आहोतच.’’

स्मिता त्यांच्या जीवनप्रवासाविषयी सांगत असताना एक यशस्वी व्यावसायिक नेतृत्वाबरोबरच त्यांचं कुटुंबवत्सल व्यक्तिमत्तत्वही समोर आलं. त्या सांगत होत्या, ‘‘मी स्वत:चा व्यवसाय सुरू केला तेव्हा माझा मुलगा १० वर्षांचा होता. पण सकाळी १० ते सायंकाळी ५ या कामाच्या वेळेव्यतिरिक्त मी पूर्णत: गृहिणी असे. कारण मुलाची शाळेची तयारी, त्याचं जेवण या गोष्टी कुणीही करू शकत होतं. पण त्याच्यावर योग्य ते संस्कार रुजविण्याची जबाबदारी माझीच होती.’’

व्यवसाय व घर हे एखाद्या स्त्रीकरिता स्वतंत्र कप्पे असले तरी त्यांचा समतोल साधता येतो, असं स्मिता मानतात. त्या सांगतात, ‘‘व्यवसाय म्हणा किंवा घरची बाजू. कोणत्याही गोष्टीसाठी पूर्वतयारी आवश्यक आहे. साधी रेसिपीचं बघा ना. सर्व वस्तू किती प्रमाणात घ्यायच्या यावर त्याची चव अवलंबून असते. आयुष्याचंही तसंच आहे. स्त्री म्हणून कुटुंबाकडे लक्ष द्यावंच लागतं. हल्ली तर स्त्रियांना कुटुंबाकडूनही पाठिंबा मिळतो. ‘तुम्ही जेव्हा द्याल तेव्हाच तुम्हाला मिळेल’, हे सूत्र मी बाळगलं.’’

यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली सांगताना त्या म्हणाल्या, ‘‘आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर माझी एक चतु:सूत्री महत्त्वाची वाटते. एक म्हणजे, कर्म हे ज्ञानाच्या होडीत बसून करावं तरच तुम्ही यशस्वी किनारा गाठू शकाल. दुसरं, ज्ञान सतत घेत राहावं. त्याला वय, कालमर्यादा नसाव्यात. तिसरं, एक व्यावसायिक म्हणून विक्री आणि महसुलावर नेहमी स्वत: पाळत ठेवा आणि शेवटचं, व्यावसायिकाने ग्राहक आणि त्याची क्रयशक्ती याचा सतत अंदाज घेत राहावा.’’

ज्ञान विस्ताराबाबत स्मिता खूपच आग्रही असतात. खरं तर त्यांचं या क्षेत्रातील सारं काही शिकून झालं आहे. त्यांची ही विद्या आता भारताबरोबरच परदेशातील डॉक्टरांनीही अवगत केली आहे. पण हे शिक्षण आता अकादमी स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा आपला मानस असल्याचं सांगत स्मिता नरम या व्यवसाय विस्ताराच्या भविष्यातील योजनाही उघड करतात.

 

व्यवसायाचा मूलमंत्र

उत्पादन आणि सेवा यांची गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न करा. एका ठरावीक वेळेनंतर छोटय़ा छोटय़ा गोष्टीत लक्ष घालणं सोडून द्या. नावीन्य आणि शिक्षण खूपच आवश्यक आहे. स्पर्धा खूप आहे. तुम्ही करत असलेल्या व्यवसायात अनेकजण असतात. तेव्हा तुमच्या व्यवसायात सतत नावीन्य हवं.

आयुष्याचा मूलमंत्र

आयुष्यात योग्य व्यक्ती मिळाली तर त्याचा उपयोग नक्की करून घ्या. सगळं काही मी एकटी करेन या भ्रमात राहू नका. तुम्ही सक्षम असाल तर तुम्ही स्त्री असा वा पुरुष काहीही फरक पडत नाही. तुम्हाला जे करायचं त्यावर लक्ष केंद्रित करा. नेतृत्व करण्याची मनीषा बाळगा.

आयुशक्ती

आयुशक्ती समूहाची नाडी परीक्षेद्वारे

उपचार, पंचकर्म आणि नर्सिग होम अशी भारतीय आयुर्वेदिक व्यवसाय विभागणी

आहे. आयुशक्तीचे भारतात ३२ परिपूर्ण केंद्र तर जगभरात १५० ठिकाणी दालन, भागीदारी, फ्रेंचाईझी तत्त्वावर अस्तित्व

आहे. आयुशक्तीची ३०० हून अधिक उत्पादनं आहेत.

स्मिता नरम

भारतातून आयुर्वेदिक उपचार पद्धतीचं पदवी शिक्षण घेतल्यानंतर त्यातही नाडी परीक्षा या विशेष शाखेत स्मिता यांनी पदव्युत्तर ज्ञान प्राप्त केलं. नाडी परीक्षणाद्वारे निदान ते संपूर्ण उपचार पद्धती अशी एकत्रित शृंखला व्यावसायिक स्तरावर देशात सुरू करणाऱ्या स्मिता या एकमेव स्त्री उद्योजिका आहेत.

 

veerendra.talegaonkar@expressindia.com

 

First Published on November 12, 2016 1:13 am

Web Title: way of ayurved
 1. सुहास निमकर
  Nov 29, 2016 at 3:31 am
  आयुर्वेद जर भारतातील शास्त्र असेल, तर ‘‘आयुर्वेद आणि त्यातही नाडी परीक्षेतील अद्ययावत ज्ञानाकरिता" जगभर फिरण्याची काय गरज? आणि "परदेशात जाऊन त्याचं पदव्युत्तर शिक्षण" घेण्याचीही काय गरज? माझ्या ओळखीच्या काही हुषार आयुर्वेदिक डॉक्टरांचा नाडी परीक्षेवर विश्वास नाही. एकूण हे शास्त्र आहे की अडाणी जनतेला फसवण्याचा (परदेशी छापासाहित) आणखी एक भारतीय मार्ग?
  Reply
  1. V
   vasant
   Nov 14, 2016 at 12:42 pm
   नाडी परीक्षा हि एक ज्योतिष शास्त्र सारखी आहे . या मध्ये एका रोग्याची परीक्षा दोन पेक्षा जास्त वैद्य ने केली असता त्यांची उत्तरे निरनिराळी असतात भारतात हि विद्या आयुर्वेदिक महाविद्यालये शिकवत नाहीत . सरकारी प्रयत्न करून त्याचे शास्त्र होऊ शकले नाही . अनेक वैद्य प्रदेशातील नाडी परीक्षा करतात शिकवतात पण भारतात त्याचे प्रसारण शिकवणे का करत नाही याचे उत्तर कोणी द्यावे . मी स्वतः: याबद्दल संशोधन केले आहे व त्याचे संगणकात रूपांतर केले आहे पण ना कोणी महा विद्यालयात या बाबतीत रस घेत नाही.
   Reply